मुंबईत कोटक महिंद्रा या कंपनीत वरिष्ठ विक्रेता पदावर कार्यरत असलेल्या पद्मसिंह गणपत पाटील (३१) या तरुणाने नोकरी सोडून गावी परतल्यावर दुग्धव्यवसायात स्वत:ला झोकून दिले. पश्चिम महाराष्ट्रात म्हाडा तालुक्यातील मानेगाव हे पद्मसिंहचे मूळ गाव. दुधाची किंमत १८-२० रुपये प्रति लिटरवरून २५-२६ रुपये प्रति लिटर वाढल्यामुळे केवळ सहा महिन्यांपूर्वी दुग्धव्यवसायात आलेल्या पद्मसिंहला मोठा लाभ झाला आहे. भविष्यात आणखी फायदा मिळविण्याची अपेक्षा त्याला आहे.

मुंबईतील अखेरच्या नोकरीत पद्मसिंहचे वार्षिक वेतन ५.५ लाख रुपये होते. गावात पद्मसिंहच्या घरासमोर एक एकर जमीन आहे. या जागेत पाच गाई चरण्यासाठी सोडल्या जातात. तसेच, या गाई ठरावीक वेळेनंतर एका ठिकाणी खाद्यासाठी जमतात. प्रत्येक गाईला ३५ ते ४० किलो चारा लागतो.

मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावात राहणारे माझे मामा सत्यवान बाबुराव घाडगे (४२) यांच्याकडे २५ जर्सी गाई असून त्यांनी अवघ्या १८ महिन्यांत दुग्धव्यवसायात यश मिळविल्याचे पद्मसिंहने सांगितले. पद्मसिंहने अकलूज तालुक्यातील कृषी महाविद्यालयातून पदविकेचे शिक्षण घेतले आहे. पद्मसिंह सांगतो की, प्रत्येक गाई सरासरी २० लिटर दूध देते. सगळ्या गाईंचे दूध सरासरी ७० लिटर मिळते. २६ रुपये प्रति लिटर दराने या ७० लिटर दुधाचे १,८२० रुपये दररोज मिळतात. यामध्ये दूध वाहून नेण्याचा आणि गाईंच्या चाऱ्याच्या खर्चाचा समावेश आहे.

पाटील कुटुंबाची पाच ते सहा एकर संलग्न शेतजमीन असून त्यामुळे त्यांनी या जागेत गाईंसाठी चाऱ्याची लागवड केली आहे. मुंबईतील ऐशोआरामाचे आयुष्य सोडून पद्मसिंहने गावात येण्याचा निर्णय घेतला. शहरात कोणत्याही कंपनीत १० ते १२ तास अतिशय तणावात काम करावे लागते. त्याचप्रमाणे ठरवून दिलेले लक्ष्य पूर्ण करावे लागते. शहरात नोकरी दुसऱ्या टोकाला आणि राहण्याचे ठिकाण दुसरीकडे असल्यामुळे प्रवास त्रासदायक आणि खर्चीक असतो, असेही पद्मसिंहने सांगितले. स्वत:च्या गावात नोकरीच्या तुलनेत अध्र्या कष्टात आणि योग्य नियोजन केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. दुग्धव्यवसायात मी ५.५ लाख रुपयांचे वार्षिक वेतन सहज मागे टाकले आहे. शहरी आणि ग्रामीण भागातली राहणीमानात मोठा फरक असून कमी खर्चात गावात चांगल्या दर्जाचे आयुष्य जगणे आणि बचत करणे शक्य असल्याचे पद्मसिंह सांगतो.

पद्मसिंह मागील सात वर्षे मुंबईत होता. यादरम्यान त्याने बीपीओ कॉल सेंटरमध्येही काम केले. त्यानंतर त्याने आयडिया सेल्युलर, फ्युचर इंडिया, जनरल लाइफ इन्शुरन्स आणि कोटक महिंद्रा या नामांकित कंपन्यांमध्ये विक्री व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली. आणखी सहा गाई खरेदी करण्याचा माझा प्रयत्न असून दूध संचयन करण्यासाठी शीतगृह उभारण्यात येणार आहे. या शीतगृहांमध्ये २,५०० लिटर दूध साठविण्याची क्षमता असेल, असे पद्मसिंहने सांगितले. तसेच, भविष्यात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचाही त्याचा प्रयत्न आहे.

हिंगणी गावातील सत्यवान बाबुराव घाडगे यांचीही अशीच दुग्धव्यवसायातील प्रगती थक्क करणारी आहे. सलग चार वर्षे शेतीत ठरावीक उत्पादन घेण्यात अपयशी ठरल्यानंतर घाडगे यांनी दुग्धव्यवसायात येण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी यांनी दोन गाईंसह या व्यवसायाला सुरुवात केली. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन घाडगे यांनी आता २५ जर्सी गाई खरेदी केल्या असून शेतातील काही जमिनीचा वापर त्यांनी गाईंच्या संगोपनासाठी केला आहे. या जागेत गाईंसाठी आधुनिक गोठा आणि चारा लागवड करण्यात आलेली आहे. घाडगे आणि त्यांचा लहान भाऊ अभिमन्यू यांनी गाई खरेदीसाठी बँक ऑफ इंडियाकडून प्रत्येकी आठ लाख रुपये कर्ज घेतले आहे. सांगोला बाजारपेठेतून त्यांनी ७० हजार ते दीड लाख रुपयांदरम्यान काही गाई खरेदी केल्या. घाडगे स्वत: सर्व गाईंच्या खाद्याचे वेळापत्रक सांभाळतात.

आमच्याकडे २५ जर्सी गाई असून त्याद्वारे सरासरी २५० ते २७५ लिटर दूध मिळते. हे दूध आम्ही मोहोळ येथे पाठवितो. सहकारी संस्था या दुधाला २६ ते २७ प्रति लिटर भाव देतात. मागील सहा ते आठ महिन्यांपासून प्रशासनाने भेसळ आणि भ्रष्ट कारभार करणाऱ्या दूध सहकारी संस्थांविरोधात कठोर कारवाई केल्यामुळे शेतकऱ्यांना दुधाची चांगली किंमत मिळत आहे, असे सत्यवान घाडगे यांनी सांगितले.

सहकारी दुग्ध संस्थांमधील दलाल दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी १५ ते १७ रुपये लिटर इतक्या कमी भावाने दूध सहकारी संस्थांना द्यावे यासाठी हेच दलाल शेतकऱ्यांवर दबाव टाकतात. त्यानंतर हे दूध तब्बल ४० रुपये लिटर दराने ग्राहकांना विकले जाते. त्यात रसायने आणि पाणीही मोठय़ा प्रमाणात मिसळले जाते, अशी माहिती घाडगे यांनी दिली. दुष्काळात सामान्य शेतकऱ्याला जगण्यासाठी दोन गाईंचाच आधार असतो. मात्र, दूध संस्थांमधील दलालांच्या पिळवणुकीचा फटका या शेतकऱ्यांना बसतो. शासनाने या सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार दूर करून सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याची भावना घाडगे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या अहवालानुसार सध्या राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत दरदिवशी सरासरी २१० ग्रॅम दूध पोहोचते. मात्र ते २५० ग्रॅम पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादन वाढविण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.