22 January 2018

News Flash

गांडूळ खत : एक समृद्ध पर्याय

जैविक सुपिकता ही भौतिक सुपिकतेवर अवलंबून असते.

महेश महाजन | Updated: August 5, 2017 12:54 AM

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नतिक जबाबदारी आहे.

जमिनीची सुपिकता तीन प्रकारची असते. भौतिक सुपिकता, रासायनिक सुपिकता, जैविक सुपिकता या परस्परावलंबी आहेत. भौतिक सुपिकता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर पिकांसाठी जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता अवलंबून असते. जैविक सुपिकता ही भौतिक सुपिकतेवर अवलंबून असते. रासायनिक सुपिकता भौतिक व जैविक सुपिकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

गांडुळाचे प्रकार 

१. एपिजिक – ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी ८० टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर २० टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.

२. अ‍ॅनेसिक – ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.

३. एण्डोजिक – ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अ‍ॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.

खत तयार करण्याची पद्धत  

गांडूळ खत विविध पद्धतीने तयार केले जाते, सिमेंट व विटांची टाकी बांधून त्यात पालापाचोळा, काडी कचरा व शेण टाकून त्यात गांडुळे सोडली जातात. पण सोपी व कमी खर्चाची म्हणजे पट्टा पद्धत होय.

ऊन व पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित अशा जागी गांडूळ खत निर्मिती करावी. पट्टय़ाची रुंदी ३ फूट, उंची २ फूट व लांबी आपल्या सोयीप्रमाणे ठेवावी. उपलब्ध काडी कचरा आधी अर्धवट कुजवून घेतल्यास खत तयार होण्यास कमी कालावधी लागतो.

जाड काडय़ा, नारळाच्या कुंच्या वगरे (४ इंच जाडी), सेंद्रिय पदार्थ (६ इंच जाडी), जुने शेण (२ इंच जाडी), गांडूळ हे घटक गांडूळ खतासाठी आवश्यक ठरतात.

पट्टा लावायची जागा सपाट करून घ्यावी व त्यावर जाड काडय़ा, बांबूच्या काडय़ा, नारळाच्या कुंच्या यांचा सुमारे ४ इंच उंचीचा थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले सेंद्रीय पदार्थ टाकून त्यावर हलके पाणी िशपडावे. नंतर ३-४ दिवस वा त्याहून जुने शेण पसरावे. शेणावर पाणी मारून गांडूळ पसरून टाकावेत. शक्यतो प्रतिचौरस मीटर २००० याप्रमाणे गांडूळ सोडावेत. उर्वरित १ फूट उंचीचा सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा. या पट्टय़ात ओल टिकून राहील इतपत पाणी दररोज िशपडावे. चिखल होणार नाही ही काळजी घ्यावी. गांडूळ हे पदार्थ खाऊन विष्ठा शरीरातून बाहेर टाकतो. साधारणत ४०-४५ दिवसांत खत तयार होते. सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर काळसर, कणीदार व गंधरहित खतात होते व गांडूळ वरच्या टोकापर्यंत आलेले असतात.

खत तयार झाल्यावर त्यावर पाणी िशपडणे बंद करून ते सुकू द्यावे. २-३ दिवसांनी छोटे-छोटे ढीग करावेत. खत सुकत जाते व गांडूळ जमिनीच्या लगत असलेल्या काडय़ामंध्ये जाऊन राहतात. मग खत काढून घ्यावे व पुन्हा सेंद्रिय पदार्थ व शेण टाकून पट्टा लावावा. गांडूळ वर येऊन आपली क्रिया सुरू करतात. आपण टाकलेल्या पदार्थानुसार त्यांच्या वजनाच्या १/२ ते ३/४ खत मिळते. यावरून कचरा ही अस्थानी असलेली संपत्तीच आहे याची प्रचीती येते.

घ्यावयाची काळजी

 • पावसाचे पाणी व उन्हापासून पट्टय़ाचे संरक्षण करावे.
 • पाणी योग्य प्रमाणातच फवारावे.
 • मीठ, रासायनिक खते, कीटकनाशके यापासून गांडुळांना दूर ठेवावे.
 • काच, प्लॅस्टिक, रबर, चिनी माती यांचा वापर करू नये.
 • ताजे शेण वापरल्यास गांडुळे मरतात, कोंबडय़ांची विष्ठाही वापरू नये.

वैशिष्टय़े

 • गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. इतर खतांमध्ये असे सहसा आढळत नाही. गांडूळ खतामुळे जमिनीची भौतिक सुपिकता टिकून राहते.
 • गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे झाडांची मुळे ती सहजपणे घेऊ शकतात.
 • गांडुळाच्या पचनसंस्थेत अनेक सूक्ष्मजीव असतात. ते अन्नपदार्थामध्ये मिसळले जातात व विष्ठेसोबत येतात. त्यात अ‍ॅक्टिनोमायसिट्स, सिडेरोफोर्स स्ट्रेप्टोमायसिसा, अ‍ॅझेटोबॅक्टर जिवाणू व बुरशी यांचा समावेश असतो. या सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो व पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी होतो.
 • गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते.
 • गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
 • जलधारण क्षमता वाढल्याने पाऊस अनियमित झाल्यास पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.
 • बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते.
 • गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.
 • गांडूळ सेंद्रिय पदार्थ अधिक प्रमाणात खाते व त्याचे रूपांतर खतात करतो. शेतकरी त्याच्याकडे असलेल्या प्रचंड काडी कचरा, पालापाचोळा बऱ्याचदा फेकून देतो व जाळून टाकतो. त्यापासून गांडूळ खत तयार होऊ शकते. गांडूळ खत म्हणजे कचऱ्यातून निर्माण झालेली संपत्ती आहे.
 • प्रत्येक शेतकरी स्वतच्या गरजेइतके गांडूळ खत तयार करू शकतो. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढतो.

गांडूळ खत म्हणजे काय?

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा  म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला २४ तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो.

maheshmahajan2014@gmail.com

(लेखक कृषिविज्ञान केंद्र, रावेर, जिल्हा जळगाव येथे कृषिशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

First Published on August 5, 2017 12:54 am

Web Title: earthworm fertilizers fertilizers for farming
 1. No Comments.