गावपातळीवर शेतातून निघालेला माल स्वच्छ करण्यासाठी पंचायत समिती, बाजार समिती यांनी ग्रामपंचायतीकडे चाळण्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपल्याच शेतात निघालेला माल वाळवला, त्याची चाळणी केली, चांगल्या व कमी दर्जाचा अशी प्रतवारी करून बाजारपेठेत माल आणला तर अनावश्यक बाबी बाजारपेठेत जाणार नाहीत व आणलेल्या मालाला चढा भाव मिळेल.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्वच क्षेत्रांत अतिशय वेगाने प्रगती होत आहे. त्यात कृषी क्षेत्रही आघाडीवर आहे. शात्रज्ञ सातत्याने दूरदृष्टीचा विचार करून संशोधन करत असतात. अंतराळात झिनियाचे फूल उगवून दाखवण्याची घटना मागील आठवडय़ात घडली. या पुष्प वनस्पतीचा वापर खाण्यासाठीही होऊ शकतो हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात अंतराळातील शेतीचे दिवस दूर नाहीत. जगभर शेतीत विविध प्रयोग होत आहेत. शेतीत पिकवलेला माल बाजारपेठेत कशा पद्धतीने न्यायचा, ग्राहकाला जसा हवा तसा माल बाजारपेठेत पुरवला गेला तर शेतीच्या मालाला अधिक भाव मिळू शकतो, मात्र यासाठी जो उत्पादन करतो त्यालाच या बाजारपेठीय तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत झाले तर मूळ प्रश्नच संपेल.
जगभरात याबाबतीत वेगाने क्रांती होत आहे. जगाची गरज लक्षात घेऊन शेतीत बदल होत आहेत. अनेक देशांत शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन मोठी आहे. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने शेती करून मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेता येऊ शकते. भारतात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे व शेतकऱ्याच्या मालकीची जमीन कमी होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शेती करण्यापेक्षा अकृषी करून ती विकण्याकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शेती आहे, ती अधिक फायदेशीर करण्याची मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.
भारतात कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत आहे व उर्वरित २० टक्के शेतकरीच सिंचनाची शेती करतात. कोरडवाहू शेतकरी जे उत्पादन घेतो ते बाजारपेठेत नेल्यानंतर चांगल्या दर्जाचा माल नाही, मालात ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे, माती अधिक आहे या कारणांमुळे शेतकऱ्याचा १० टक्के तोटा होतो. ही तूट भरून काढण्यासाठी प्रबोधन व व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.
मुळात शेती हा उद्योग आहे. त्यामुळे भावनिक दृष्टीने न पाहता उद्योगाचे निकष लावून त्यानुसार शेतीचे नियोजन करण्याची सवय लावली पाहिजे. थोडक्यात उद्योजकाची मानसिकता प्रत्येक गावापर्यंत कशी पोहोचेल याची काळजी घेतली पाहिजे. शेतातील माल तयार झाल्यानंतर त्याला चांगला भाव येण्यासाठी माल स्वच्छ असला पाहिजे, त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, बाजारपेठेत तो अधिक काळ टिकण्यासाठी त्यातील ओलावा कमी असला पाहिजे या बाजारपेठेच्या मूलभूत गरजा आहेत.
बाजारपेठेत माल नेल्यानंतर तेथील यंत्रणेला या बाबींवर लक्ष द्यावे लागते व त्यासाठी शेतकऱ्याचे किमान १० टक्के पसे कपात होतात. गावपातळीवर शेतातून निघालेला माल स्वच्छ करण्यासाठी पंचायत समिती, बाजार समिती यांनी ग्रामपंचायतीकडे चाळण्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपल्याच शेतात निघालेला माल वाळवला, त्याची चाळणी केली, चांगल्या व कमी दर्जाचा अशी प्रतवारी करून बाजारपेठेत माल आणला तर अनावश्यक बाबी बाजारपेठेत जाणार नाहीत व आणलेल्या मालाला चढा भाव मिळेल.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून अशी पद्धत रूढ नाही. त्यामुळे बाजारपेठेच्या आवारात राज्यभरात दररोज सरासरी २ हजार टन माती मालातून येऊन पडते. ही माती अतिशय उच्च दर्जाची असते. मातीचा एक कण तयार होण्यास २०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. बाजार समित्यांना बाजारपेठेत जमा झालेली माती दररोज उचलून घेऊन जाण्यासाठी ती लिलाव पद्धतीने विकावी लागते. त्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्यामुळे पावसाळ्यात अनेक बाजारपेठांत पायी चालता येत नाही, असे चित्र असते. याचे महत्त्व गावपातळीपासून रुजविल्यास निसर्गाची होणारी हानी थांबेल व शेतकऱ्याला अधिकचा भाव मिळेल.
कर्नाटक प्रांतातून बाजारपेठेत येणारी तूर ही स्वच्छ असते. त्यामुळे तिला अधिकचा भाव मिळतो. तेथील शेतकऱ्यांनी बाजारपेठेचे तंत्र लक्षात घेऊन स्वतला चांगली सवय लावून घेतली आहे. आंध्र प्रदेशात भुईमुगाचे उत्पादन चांगले होते. बाजारपेठेत भुईमुगाला नाही तर शेंगदाण्याला मागणी आहे. ही बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन शेतकरी भुईमुगाच्या शेंगा आपल्या शेतात वाळवतात. ज्याप्रमाणे मळणीयंत्र भाडय़ाने उपलब्ध होते त्याच पद्धतीने शेंगा फोडणी यंत्र शेतकऱ्याच्या शेतावर जाते व तेथून शेंगा फोडून वाळलेले शेंगदाणे बाजारपेठेत आणले जातात. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य भाव मिळतो. फोडलेल्या शेंगांचे फोलफट खतासाठी वापरता येते.
जगाच्या बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन आपल्याकडे साधनसामुग्री उपलब्ध केली, लोकांना शिक्षण दिले तर जगाला पुरवता येईल इतके उत्पादन आपल्याकडे उपलब्ध आहे. भाज्यांची व फळांची होणारी नासाडी थांबवण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या पाहिजेत. जगभर तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतमालाची जपणूक करणारे अनेक उपकरणे उपलब्ध झाली आहेत. हळूहळू ती भारतीय बाजारपेठेतही येत आहेत. झाडावरून शेवग्याच्या शेंगा काढणे, नारळ काढणे, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष काढणे, जमिनीतील बटाटे,
रताळे, गाजर याचबरोबर मक्याचे कणीस सोलून काढून त्यातील दाणे वेगळे करणे अशी यंत्रे उपलब्ध झाली आहेत.
सिताफळाचा गर व बिया वेगळे करणारे यंत्र निघाल्यामुळे सिताफळाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेऊन त्याला चांगला भाव उपलब्ध होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे थोडासा कल वाढतो आहे. ही यंत्रसामुग्री महागडी आहे. खाजगी मंडळी या क्षेत्रात उतरत आहेत. शेतीत पेरणीपासून काढणीपर्यंत यंत्राचा वापर ज्या झपाटय़ाने होत आहे तेवढय़ाच झपाटय़ाने अद्याप काढणी पश्चात मालावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्रीचा वापर होत नाही. तो होण्याची गरज आहे.
शेतकऱ्याचा माल साठवून त्याला बाजारपेठेत जेव्हा भाव येईल तेव्हा विकण्याची सोय उपलब्ध व्हायला हवी. फळे व भाज्या साठवणुकीसाठी शीतगृहे वाढत आहेत. दरमहा १ किलोसाठी ५० पशापासून १ रुपयापर्यंत याचा खर्च येतो. दुसरे तंत्रज्ञान आलेल्या मालातील ओलावा कमी करून ते वाळवून विकण्याचे आहे तर तिसरे तंत्रज्ञान काढणीनंतर त्यावर अत्याधुनिक वेष्टण लावून त्याचे आयुष्य १५ दिवसांपर्यंत ताजे ठेवण्याचे आहे. जगभर या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जगात मक्याची बाजारपेठ अतिशय मोठी आहे. बाजारपेठेत आणलेल्या मक्यात १२ टक्क्य़ांपेक्षा कमी ओलावा हवा व त्यात कॅन्सर वाढीस लागणाऱ्या विषाणूंचे प्रमाण अत्यल्प असल्याची खात्री हवी. त्यासाठी पिकाच्या वाढीच्या वेळेला लक्ष द्यावे लागते व काढणीच्या वेळी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन काढणी करावी लागते. अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन यंत्रसामुग्री उपलब्ध केली आहे व त्यानुसार त्यांनी बाजारपेठेवर ताबा मिळविला आहे. शेंगदाण्यापासून चॉकलेट तयार करणाऱ्र्या मार्क्‍स या कंपनीची उलाढाल १० हजार कोटींपेक्षा अधिक आहे. आद्रकामधील ऑइलचे प्रमाण किती आहे, त्यावर त्याचा भाव ठरतो. हळदीचे पेटंट रघुनाथ माशेलकर यांनी मिळविल्याचे लोकांना माहिती आहे, मात्र त्याहीपुढे जाऊन मराठवाडय़ातील संशोधक डॉ. वैभव तिडके
यांनी हळदीचे सहा पेटंट स्वतच्या नावावर मिळविले आहेत.
दुधाची बाजारपेठ हा एक मोठा विषय आहे. या बाजारपेठेत मोठी लूट शेतकऱ्याचीच होते. लिटरला ५ रुपये खर्च झाला व शेतकरीच आपल्या दुधाची पावडर करून ती तो साठवू शकला तर बाजारपेठेतील दुधाची नासाडी थांबेल व त्याला चांगला भावही मिळेल. असे तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचण्यास फार काळ लागणार नाही. आपल्या देशाची खरी गरज ही शेतीपूरक अत्याधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची आहे. त्यासाठी केंद्र शासनापासून ते गावपातळीपर्यंत सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत. हे केवळ एकटय़ा सरकारचे काम नाही, यासाठी खाजगी संस्थांनीही आपला सहभाग देण्याची गरज आहे.
नासाडी ४० टक्क्य़ांपर्यंत
फळे व भाजीपाला यांची नासाडी आपल्या देशात २० ते ४० टक्क्य़ांपर्यंत होते. ही नासाडी १०० टक्के थांबवली, तर प्रत्येक कुटुंबीयांना दररोज १ किलो भाजी व फळे मोफत देता येऊ शकतात, असे मत डॉ. वैभव तिडके या तरुण संशोधकाने व्यक्त केले. केवळ मत व्यक्त न करता त्यांनी सोलारवर आधारित भाज्या वाळवण्याचे यंत्र विकसित केले असून देशात आतापर्यंत १ हजार यंत्रे वापरली जात आहेत. या यंत्रामुळे वाळवलेल्या भाज्यांचा वापर किमान वर्षभर करता येतो. वाळवलेल्या भाज्या साठवून ठेवायला वेगळा खर्च येत नाही. जगभरात वाळवलेल्या भाज्यांच्या विक्रीची उलाढाल १ लाख कोटीपेक्षा अधिक आहे. त्यात भारताचा हिस्सा केवळ २ टक्के म्हणजे २ हजार कोटींच्या आसपास आहे. त्यातही कांद्याचा सहभाग ९८ टक्के आहे.