शेतीत उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याने मीना भाऊसाहेब कदम यांनी नव्याने शेती करण्याचा विचार केला. शेतीबरोबर जोडधंदाही असल्याशिवाय आर्थिक घडी बसणार नसल्याचे ओळखून गावातील महिलांना एकत्र करून बचतगट बांधून शेतीत नवीन प्रयोग सुरू केले. गटाच्या माध्यमातून छोटा-मोठा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू केला. गटातील महिलांची सचोटी, प्रामाणिकपणा आणि धडपड यामुळे तालुका पातळीवर शाळांसाठीच्या पोषण आहाराची सुकडी तयार करण्याचे काम गटाला मिळाले. गुणवत्ता राखल्यामुळे तालुक्यातील दोनशे शाळांना सुकडीपुरवठा करण्याचा ठेका मिळाल्याने यातून गटाला दरमहा सत्तर हजार रुपयांचा नफा सुरू झाला. त्यानंतर महिलांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून दररोज हजारो लिटर पाणी बाटली व जारद्वारे विक्री सुरू झाली. वाहनही खरेदी केले. त्यातून अठरा ते वीस हजार रुपये नफा सुरू झाला. गावरान कोंबडय़ांचे कुक्कुटपालनही गटाने सुरू केले. त्यातूनही पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न उभे राहिले. अशा पद्धतीने पौंडूळसारख्या छोटय़ाशा गावातील सतरा जणींनी मिळून महिन्याला तब्बल एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न उभे करणारा गट निर्माण केला. मूळ नाळ शेतीशी असल्यामुळे आता या गटाने तालुक्यातील चारशे शेतकऱ्यांना एकत्र करून स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. साडेचार लाख रुपयांचे भागभांडवल आणि साडेतेरा लाख रुपये ‘आत्मा’कडून मदत मिळवली आणि गावातच टोमॅटोवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारला आहे. पहिल्या वर्षी नव्वद एकर आणि आगामी पाच वर्षांत जवळपास दीडशे एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली जाणार आहे. गावातच मालावर प्रक्रिया होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असल्याने शेतकरीही मोठय़ा संख्येने या उद्योगात सहभागी झाले आहेत. गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या गावातील सतरा जणींनी ‘शेतशिवार’ जपत ग्रामीण शेतकऱ्यांच्या जीवनात आíथक उन्नतीचाच उद्योग सुरू केला आहे.  बीड जिल्ह्यतील पौंडुळ (ता.शिरुर) हे कायम दुष्काळी आणि ऊसतोडणी मजुरांचा परिसर असलेल्या अवघ्या सत्तर उंबऱ्यांच्या गावात सतरा महिलांनी कृषी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत शेकडो शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीची नवी पहाट उगविली आहे. बीड शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला तलावामुळे शेतीला पाण्याची उपलब्धता झाली. मात्र बहुतांशी शेतकरी पारंपरिक शेती करण्यामध्येच धन्यता मानतात. शेतकरी कुटुंबातील महिला जास्त प्रमाणात शेतीत राबतात. बहुतांशी ठिकाणी तर महिलाच शेतीचे नियोजन आणि काम करत असल्या तरी शेतीमध्ये कोणते पीक घ्यायचे हे मात्र पुरुषच ठरवतात. पौंडूळ येथेही शेतीत उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मीना भाऊसाहेब कदम यांनी शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा विचार केला. पतीने साथ दिल्यामुळे सुरुवातीला त्यांनी गावातील महिलांचा गट बांधला. त्यात सीता बाबासाहेब काळे, शांता शिवाजी भोसले, स्वाती श्रीकृष्ण कदम, रतन अनिल भोसले, तारामती राधाकिसन मराडे, सुशीला भास्कर लांडगे, सत्यशीला मनोहर मराडे, सुशीला विलास कदम, नीलावती बन्सी मराडे, रुक्मीणी नारायण मराडे, राजू गणेश नवले, कालिंदा विश्वंभर कदम, अश्विनी बाळासाहेब काळे, अश्विनी अशोक शिंदे, अंतकर्णा वेताळ मराडे आणि प्रभावती दिगंबर कदम या शेतीत राबणाऱ्या महिलांना एकत्रित केले. बचत गटाच्या माध्यमातून सुरुवातीला खरेदी-विक्री सुरू केली. जिल्हा परिषदेमार्फत पोषण आहारासाठी अंगणवाडय़ांना सुकडी बनविण्याचे कंत्राट गटाला मिळाले. गटाकडे नफ्यातून पसा जमा होऊ लागल्याने महिलांनी शुद्ध पाण्याचा उद्योग सुरू केला. गावरान जातीच्या कोंबडय़ांना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्यामुळे महिलांनी कुक्कुटपालनाचा उद्योगही सुरू केला. यातून गटाला वर्षांला पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न सुरू झाले ते वेगळे.

वसंत मुंडे  vasantmunde@yahoo.co.in