09 March 2021

News Flash

आत्मविश्वास जागविणाऱ्या ‘शेतकरी’ कंपन्या

बियाणे, फवारणीसाठी लागणारी औषधे, बाजारपेठ, बीजोत्पादन यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढला.

लोकमाउली अ‍ॅग्रो प्रोडय़ुसर कंपनीने तांदुळजा येथे उभारलेली बीजप्रक्रियासाठीची यंत्रसामग्री. 

छोटा शेतकरी शेतीत लागणारी सर्व यांत्रिक औजारे विकत घेऊ शकत नाही. अद्ययावत तंत्रज्ञान थेट त्याच्या बांधापर्यंत फारसे पोहोचत नाही. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकरी एकत्रित आल्यानंतर त्याचे फायदे सर्वाच्या लक्षात यायला लागले व त्याची परिणती शेतकऱ्यांच्या विकासात झाली. शिवाय समूहामुळे उत्पादन खर्च कमी झाला. एकमेकांना प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन मिळू लागले. बियाणे, फवारणीसाठी लागणारी औषधे, बाजारपेठ, बीजोत्पादन यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढला.

उत्पादन खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ व त्या बदल्यात योग्य उत्पादन न निघणे, उत्पादित मालाला योग्य भाव न मिळणे यामुळे सामान्य शेतकऱ्याचा शेती व्यवसायावरील विश्वास ढळत आहे. राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळे प्रयोग केले जातात. २०१० मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प ही संकल्पना पुढे आली. या अंतर्गत शेतकऱ्यांचे छोटे गट तयार करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसंदर्भात मार्गदर्शन, उत्पादकता वाढवणे, गुणवत्तापूर्ण उत्पादन, शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ई-मार्केट, थेट निर्यात अशा संकल्पना घेऊन राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. प्रारंभी ही कल्पना प्रत्यक्षात उतरेल का, अशी शंका होती. आजघडीला महाराष्ट्रात सुमारे ३५० कंपन्या अस्तित्वात असून देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

छोटा शेतकरी शेतीत लागणारी सर्व यांत्रिक औजारे विकत घेऊ शकत नाहीत. अद्ययावत तंत्रज्ञान थेट त्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकरी एकत्रित आल्यानंतर त्याचे फायदे हळूहळू सर्वाच्या लक्षात यायला लागले व त्याची परिणती शेतकऱ्यांच्या विकासात झाली. शिवाय समूहामुळे उत्पादन खर्च कमी झाला. एकमेकांना मार्गदर्शन मिळू लागले. बियाणे, फवारणीची औषधे, बाजारपेठ, बीजोत्पादन यात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला.

लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकमाउली अ‍ॅग्रो प्रोडय़ुसर कंपनी सुरू केली. २०१५ मध्ये याची सुरुवात झाली. यात ३७० सभासद आहेत. पकी १३० जण भागधारक आहेत. गतवर्षी या गटातील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले व राजस्थानला १३ गाडय़ा टोमॅटो पाठवला, तर चार गाडय़ा पाकिस्तानात पाठवल्या. या गटाचे प्रमुख उल्हास डोलारे हे कृषी विभागात नोकरी करीत होते. नोकरी सोडून त्यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांना एकत्र केले. आज तांदुळजा गावात ११ शेडनेट उभे आहेत. या वर्षी १५० एकरवर सोयाबीन बीजोत्पादन घेण्यात आले. बीजप्रक्रियेसाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. गोदामाचे बांधकामही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या एकत्रित येण्यामुळे सर्वाचा शेतीतील आत्मविश्वास वाढला असल्याचे डोलारे यांनी सांगितले.

औसा तालुक्यातील किल्लारी येथे रावसाहेब पाटील अ‍ॅग्रो प्रोडय़ुसर कंपनीची सुरुवात २०१४ मध्ये झाली. ३०० शेतकरी कंपनीचे सभासद आहेत. कंपनीने स्वतची औजार बँक तयार केली. ट्रॅक्टरवर लागणारी सर्व औजारे कंपनीकडे आहेत. सभासदांना कमी दरात ही औजारे पुरवली जातात. त्यातून शेतकऱ्यांची कामे सहज होतात. या वर्षी एडीएम कंपनीचे १७० एकरवर, तर महाबीजचे १०० एकरवर सोयाबीनचे बीजोत्पादन करण्यात आले. यातून शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा अधिक पसे मिळतात. सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदानावर गांडूळ खताचे युनिट कंपनीमार्फत दिले जाते. आतापर्यंत १०० शेतकऱ्यांनी गांडूळ खताचे प्रयोग सुरू केले आहेत. एडीएम कंपनीने शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व निविष्ठा पुरवण्यासाठी करार केल्याचे कंपनीचे प्रमुख दीपक पाटील यांनी सांगितले.

लातूर तालुक्यातील कातपूर गावच्या लालासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने कातपूर अ‍ॅग्रो प्रोडय़ुसर कंपनीची सुरुवात झाली. २०१० मध्ये देशमुख यांनी शेतकऱ्यांचा बचतगट तयार केला. प्रारंभी गटातील शेतकऱ्यांना अडीअडचणीला या बचत गटामार्फत कर्जपुरवठा केला जात असे. शंभर जणांच्या सभासदांकडून दरमहा २०० रुपये गोळा केले जात. बचतगटातील शेतकऱ्यांचा काही ठिकाणी दौरा नेण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना शेतीतील वेगवेगळे प्रयोग लक्षात यायला लागले. २०१४ मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून सभासदांकडून २ हजार १०० रुपये शुल्क घेतले. सुमारे ६०० सभासद आसपासच्या २५ गावांतील सहभागी आहेत. कंपनीला बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीचा परवाना मिळाला आहे. गावातच सभासदांना शेतीत लागणारे खत, औषधे वितरित केले जातात. लातूर बाजारपेठेपेक्षा ५० रुपये कमी दरात घरपोहोच पोहोचवले जाते, शिवाय गुणवत्तेची हमीही मिळते.

सोयाबीनचे बिजोत्पादन या वर्षी एडीएम कंपनीचे १५० एकरवर, तर महाबीजचे ५०० एकरवर घेण्यात आले. कातपूरबरोबर सिकंदरपूर, धानोरा, सेलू, सिंदाळा अशा आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनीही या कंपनीत सभासदत्व घेतले. शेतकऱ्याच्या मालाची थेट खरेदी करण्याचा करार सोयाबीनसाठी एडीएम कंपनीसोबत केला आहे. याच पद्धतीने हरभरा, तूर असे वाणही कंपनीमार्फत थेट विकले जाणार आहे. शिवाय गावातच डाळमिल सुरू करून त्यामार्फत थेट डाळीची विक्री करण्याची कल्पना असल्याचे लालासाहेब देशमुख यांनी सांगितले. कृषी विभागातील डॉ. तुकाराम मोटे, मोहन भिसे, आर. टी. मोरे, सी. डी. पाटील या अधिकाऱ्यांचे प्रारंभापासून मार्गदर्शन मिळाले. देशमुख म्हणाले, आमच्या गावात सिंचनाचा प्रश्न होता. सर्व काही सरकार करेल, असा विचार न करता गटातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही केले तर सर्वाना लाभ होईल, अशी कल्पना २०१० मध्ये मांडली. त्या वेळी १ किलोमीटर ओढय़ाचे ४० फूट रुंद व २ मीटर खोल असे काम करण्यासाठी २ लाख १६ हजार रुपये लोकांनी जमा केले व काम पूर्ण झाले. २०११ मध्ये दीड लाख रुपये गोळा करून गावातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे नवीन टाकले. २०१२ मध्ये कोल्हापूर बंधाऱ्याची उंची वाढवण्यासाठी ८७ हजारांचा खर्च शेतकऱ्यांच्या सहभागातून केला. २०१३ मध्ये गावातील ५५ जणांनी हिवरेबाजार येथे जाऊन त्या गावची पाहणी केली. आर्ट ऑफ लिव्हिंगने बंगळुरू येथे घेतलेल्या सरपंच परिषदेत देशमुख यांनी सहभाग घेतला. २०१३ मध्ये गावातील मोठा ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी गावातील लोकांइतकाच वाटा आर्ट ऑफ लिव्हिंगने देण्याचे मान्य केले. त्यातून गावकऱ्यांनी ८ लाख १५ हजार रुपये जमा केले. तितकेच पसे आर्ट ऑफ लिव्हिंगने खर्च केले. ४० फूट रुंद, ३२ फूट खोल व सुमारे ९०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले.

शेतकऱ्यांच्या विहिरीचे, िवधनविहिरीचे पाणी वाढले. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. आता कंपनीमार्फत शेतीची औजारे खरेदी करून सभासदांना कमी दरात ती वापरण्यास दिली जाणार आहेत. गावात एक शेडनेट उभे आहे. १२ शेडनेटचे प्रस्ताव दाखल असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कातपूर गावात आता ८० टक्के शेतकरी पदवीधर आहेत. २४ महिन्यांचे शेतीचे नियोजन केले, तर शेतकऱ्याला अडचण येणार नाही. पाऊस कमी पडणे, हवामानात होणारे बदल याचा अंदाज घेऊन किमान दोन वर्षांचे नियोजन केले पाहिजे, असे प्रबोधन देशमुख करतात. लातूरप्रमाणेच राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी साखळी तयार होते आहे. अत्याधुनिक शेतीचे ज्ञान आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचते आहे. शेतकरी सभासदांची फसवणूक होणार नाही, त्यांच्या मालास अधिक भाव मिळेल याची काळजीही कंपनीमार्फत घेतली जात आहे.

बेटी बचाव अभियान

‘आधी केले मग सांगितले’ या पद्धतीने कातपूरच्या लालासाहेब देशमुख यांनी शेतकरी बचतगटात स्वत:ची गुंतवणूक करीत लोकांचा उत्साह वाढवला. शिवाय २०१० पासून गावातील कोणाच्याही घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने २ हजार रुपये बँक ऑफ बडोदा येथे फिक्स डिपॉझिट १८ वर्षांपर्यंत ठेवण्याची घोषणा केली व त्यांची आई गुणाबाई देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आतापर्यंत ६५ मुलींच्या नावे त्यांनी व्यक्तिगत पसे ठेव म्हणून ठेवले आहेत. १८ व्या वर्षी त्या कुटुंबाला ते पसे मिळणार आहेत.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:14 am

Web Title: farming companies who build confidance
Next Stories
1 नाशिकच्या शेवग्यावर गुजरातमध्ये संशोधन
2 गवत, झाड यांची माती तयार करण्याची क्षमता
3 पेरणी : खरीप कडधान्ये
Just Now!
X