केवळ दोन एकर कोरडवाहू शेती, अकरा जणांचे कुटुंब, नशिबी सततचा दुष्काळ आणि नापिकी. समस्यांची मालिका मोठय़ा कष्टाने बाजूला सारून उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी या छोटय़ा गावातील एक तरुण शेतकरी मोठय़ा धीराने उभा ठाकला आहे. निसर्गाशी सामना करीत त्याने वाटय़ाला आलेल्या दुष्टचक्रावर मात करून स्वत:ला सिद्ध केले आहे. शेतीतील वाढणाऱ्या समस्यांमुळे धास्तावलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील युवकाने महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांना पथदायी ठरेल असा नवीन मानदंड आपल्या कर्तृत्वाने निर्माण केला आहे.

उसनवारीवर घेतलेल्या पाच हजार रुपयांतून कुक्कुटपालन सुरू केले. चिकाटी आणि सातत्य राखल्यामुळे कुक्कुटपालनातील गुंतवणूक दिवसागणिक वाढत गेली आणि केवळ सात वर्षांत अनेकांनी या युवा शेतकऱ्याची झेप पाहून आश्चर्य व्यक्त केले. कुक्कुटपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून व्यवसायवाढीसाठी त्याने केलेली गुंतवणूक राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे. सध्या भाडय़ाच्या जागेवर पंधरा हजार गावरान कोंबडय़ांचा प्रकल्प आणि नामवंत जातीच्या गायींच्या माध्यमातून या युवकाने मोठे भांडवल उभारले आहे. जिद्द, चिकाटी, नुकसान पचविण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्बल परिस्थितीतून उभारी घेण्यासाठी कुटुंबातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे महिन्याकाठी वर्ग एकच्या अधिकाऱ्याइतके उत्पन्न ३५ वर्षीय युवक पोपट इंगळे महिन्याकाठी कमवीत आहे.

केवळ दोन एकर कोरडवाहू जमीन. तीही चार वर्षांच्या दुष्काळामुळे पडीकच होती. वडील सुभाष इंगळे यांचे गावात कपडय़ाचे छोटेसे दुकान होते. परंतु खेडेगावात उधारीवर चालणारा हा व्यवसाय काही काळातच आजारी पडला. त्यामुळे आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेल्या पोपट इंगळे यांनी गावातील एका बचत गटाकडून पाच टक्के व्याजदराने पाच हजार रुपये घेतले. त्यातून २० रुपये दराने २५० गावरान कोंबडीची पिले विकत आणली. कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीची सहा महिने पिलांचा घरातच सांभाळ केला. त्यानंतर जागेच्या अभावामुळे संगोपन आणि संरक्षण करणे अवघड झाल्याने पोपट इंगळे यांनी गावालगत प्रल्हाद डावकरे यांची दोन गुंठे व िलबराज डावकरे यांची तीन, अशी एकूण पाच गुंठे जागा दहा वर्षांसाठी भाडेकरारावर घेतली. शेजाऱ्याकडून दहा पत्रे वापरण्यासाठी घेऊन लहानसे शेड उभे केले. कोंबडय़ांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी शेडच्या दारात झोपावे लागत असे. अडीचशे पक्ष्यांच्या विक्रीतून ३५ हजार रुपये मिळाले. त्यातून कुक्कटपालनासाठी एक हजार पक्षी आणि दुग्धव्यवसायासाठी एक जर्सी गाय विकत घेतली. कुक्कुटपालनात मिळणारा समाधानकारक नफा आणि गायी सांभाळण्याचा प्रयोग यशस्वी झाला. प्रति पक्षी ८० ते १६० रुपये याप्रमाणे दर मिळत गेला. मागील पाच वर्षांत दर दोन महिन्याला हजार कोंबडय़ांचा लॉट विकून पोपट इंगळे यांनी कुक्कुटपालनात मोठी झेप घेतली. गावरान कोंबडीला मोठी मागणी आहे. मात्र असे प्रकल्प जिल्ह्य़ात फारच कमी असल्याने त्यांच्या कोंबडीने बाजारात चांगलाच भाव खाल्ला आहे. त्यामुळे कोंबडी विक्रीच्या चिंतेतून बाहेर पडून पोपट इंगळे, त्यांच्या पत्नी रोहिणी इंगळे, वडील सुभाष इंगळे, दोन भाऊ, आई यांच्या मदतीने पाऊण लाख रुपये किमतीच्या चार गायी खरेदी केल्या. अकलूज, पंढरपूर आदी ठिकाणांहून नामवंत जातीच्या व अधिक दूध देणाऱ्या गायी खरेदी केल्यानंतर पोपट इंगळे यांनी दुग्धव्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. पत्नी आणि आईकडे कुक्कुटपालन तर भाऊ व स्वत:कडे दुग्धव्यवसायाची जबाबदारी घेतली. कामे वाटून घेतल्याने दोन्ही व्यवसायात एक प्रकारे स्पर्धा निर्माण झाली. जनावरांचा सांभाळ करण्यासाठी सुरू झालेल्या या प्रेमळ स्पध्रेतून प्रगतीचा आलेख उंचावत गेला.

पाच गायींपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय आता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत म्हणून उभारला आहे. दररोज सुमारे शंभर लिटर दुधातून दिवसाला दोन ते अडीच हजार रुपयांचे उत्पन्न सुरू झाले आहे. महिनाभरात गायींसाठी १० पोते खुराक आणि सात हजार रुपयांच्या कडब्याच्या पेंडय़ा व अन्य किरकोळ असा एकूण २५ हजार रुपये खर्च होतो. खर्च वजा जाता दुग्धोत्पादनातून इंगळे यांना ४० हजार रुपये उत्पन्न मिळते.

सहा वर्षांत जसजसे उत्पन्न मिळत गेले, तसतसे मिळालेले उत्पन्न व्यवसायात गुंतविले. त्यामुळे सध्या पोपट इंगळे यांच्याकडे जर्सी, गीर (क्रॉस), हॉस्टन या महागडय़ा गायी व १५ हजार कोंबडय़ा आहेत. त्यासाठी त्यांनी पाच गुंठय़ांत ७० बाय २० व १०० बाय ४० आकाराचे दोन शेड उभारले आहे. पाच गायींसाठी स्वच्छतेला महत्त्व देऊन आधुनिक प्रकारचा गोठा उभारला आहे. गोठय़ात गायींसाठी स्वच्छ पाणी, कुट्टी केलेला चारा व वेळच्या वेळी खुराक दिला जातो. गावाबाहेर भाडय़ाने घेतलेल्या जागेत दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय उभारून अकरा जणांच्या कुटुंबाने मोठय़ा जिद्दीने केलेला हा व्यावसायिक प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या प्रकल्पाला आवर्जून भेट देतात. व्यावसायिक मार्गदर्शनातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे बेंबळी गावातील अन्य शेतकरीही कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन आणि शेळीपालन या व्यवसायाकडे वळू लागले आहेत.

कुटुंबाची मोलाची साथ

‘असेल साथ, तर जमेल बात’ या उक्तीप्रमाणे मला वडील सुभाष इंगळे, पत्नी रोहिणी, आई व दोन भाऊ यांची मोठी साथ मिळाली. सात वर्षांपूर्वी असलेली आमची बेताची परिस्थिती सुधारण्यासाठी मला कुटुंबाने मोठे बळ दिले. गावात घर असतानाही सर्व कुटुंबीय आज शेतात वास्तव्यास आहेत. गायी आणि कोंबडय़ांचे संगोपन, संरक्षण आणि व्यवसाय व्यवस्थापनात त्यांची मोठी मदत होत असल्याने या व्यवसायाची बात जमली आहे, असे इंगळे यांनी सांगितले.

दुग्धोत्पादनाचे अर्थकारण – पोपट इंगळे यांच्याकडे असलेल्या पाच गायींसाठी महिन्याकाठी १० बॅग सुग्रास लागतो. प्रति बॅग ११०० रुपयांप्रमाणे अकरा हजार रुपयांचा खुराक आणि सात हजार रुपयांचा कडबा असा एकूण १८ हजार रुपये खर्च गायींवर होतो. या गायींच्या दूध विक्रीतून महिन्याकाठी त्यांना ६५ ते ७० हजार रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता त्यांना जवळपास ४० हजार रुपये निव्वळ नफा राहतो. मिळालेल्या उत्पन्नातून अकरा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

ravindra.keskar@rediffmail.com