24 November 2020

News Flash

कोकणातील भात पिकावर कीड, रोगांचे संकट

हवामानातील बदलामुळे भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

पावसाबरोबरच भात पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.

लांबलेला पाऊस आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे कोकणातील भात पिकासमोर संकट उभे राहिले आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोकणात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात सरासरीच्या ११६ टक्के पाऊस पडला, अनेक भागात तर पावसाने सरासरी चार हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरतो. यावर्षी मात्र ऑक्टोबर महिन्यातही मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो आहे. भात शेतीसाठी हे धोक्याचे आहे.

हळवा जातीतील भात पीक काढणीसाठी तयार आहे. तर निमहळवे आणि गरवे पीकही दाणा भरण्याच्या स्थितीत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शिवारातील उभे पीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरवर यावर्षी भात पिकाची लागवड करण्यात आली होती. चांगल्या पावसामुळे पीक परिस्थितीही चांगली होती. अनेक ठिकाणी जोमाने पीक आले होते. मात्र ८ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कापणीयोग्य झालेले पीक वाऱ्यामुळे आडवे झाले. तर काही ठिकाणी कापणी करण्यात आलेले पीक पावसामुळे भिजले आहे. जिल्ह्यात १५ ऑक्टोबपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पावसाबरोबरच भात पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकाच वेळी शेतकऱ्यांना दोन संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

यंदा कृषी विभागाकडून कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प  (क्रॉपस्वॅप) योजना राबविली जात आहे. यासाठी २५ स्काऊट्स आणि ४ निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दर आठवडय़ाला या स्काऊट्सच्या मदतीने पीक परिस्थितीचे सर्वेक्षण केले जात होते. कीडरोग प्रादुर्भावाची पाहाणी करून त्याबाबतचा ऑनलाइन अहवाल सादर केला जात होता. या सर्वेक्षणात आता अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, पोलादपूर या तालुक्यांमध्ये भात पिकांवर लष्करी अळी व खोडकिडय़ाचा प्रदुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

हवामानातील बदलामुळे भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीच्या अळ्या दिवसा झाडाच्या बुंध्यात, ढेकळीखाली किंवा बांधातील जमिनीच्या भेगात लपून राहतात. रात्री लोंबी कुरतडून खातात. त्यामुळे लोंब्यातील दाण्यांचे अतिशय नुकसान होते. खोड किडय़ाची अळी ताटाला छिद्र पाडून खोडात शिरते व आतील भाग खाते. त्यामुळे शेंडा वाळतो. लोंबीत दाणे भरत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शासकीय बियाणे न वापरता अन्य खासगी बियाणे वापरली आहेत त्या पिकांवर कीडरोगाचा सर्वात जास्त प्रदुर्भाव झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यतील कीटकनाशक फवारणीमुळे तीसहून अधिक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याबरोबरच कृषी विभागही धास्तावला, कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला असला तरी कीटकनाशकांची फवारणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज असल्याने पावसामुळे कीडरोग धुतले जातील आणि नष्ट होतील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात इतरत्र कीटकनाशक फवारणीचे शेतकऱ्यांवर दुष्परिणाम दिसून आले नसले तरी कृषी विभागाने अनावश्यक कीटकनाशक फवारणीला टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

रायगडप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यतील पीक परिस्थिती सारखीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका बाजूला लांबलेल्या पावसाशी तर दुसऱ्या बाजूला कीड रोगांशी दोन हात करावे लागत आहेत.

काही भागात करपा, खोडकिडीचा तर काही भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता शेतकऱ्यांनी भात पिकावर कीटकनाशके फवारू नयेत. भाताची कापणीच करावी. परंतु येत्या २ ते ३ दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्त भातकापणी करू नये अन्यथा कापलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेऊनच कापणी करावी. 

–   पांडुरंग शेळके, कृषी अधीक्षक, रायगड

हर्षद कशाळकर  meharshad07@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:34 am

Web Title: fungal diseases over rice crop in konkan region
Next Stories
1 कोकणात नवा गोवंश?
2 बुडत्याचा पाय खोलात..
3 उत्पादन वाढीची एक वेगळीच ‘केस’!
Just Now!
X