09 March 2021

News Flash

आर्थिक घडी बसवणारी आल्याची शेती

आल्याच्या लागवडीसाठी निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत जमीन मानवते.

भारतात प्राचीन काळापासून मसाल्याच्या पदार्थाना अतिशय महत्त्व आहे. मिरे, लवंग, िपपळे, सुंठ यांचा वापर घरोघरी केला जातो. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अद्रकाची लागवड सर्वत्र केली जाते. स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वपूर्ण पदार्थ म्हणून आल्याला महत्त्व दिले जाते. आल्याचे व्यापारी पद्धतीने उत्पादन करणारे केरळ, ओरिसा, मेघालय, पश्चिम बंगाल, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश व महाराष्ट्र हे प्रांत आहेत. भारताच्या एकूण उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन केवळ केरळ व मेघालय या दोन छोटय़ा राज्यांत होते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या भागांत आल्याचे पीक घेतले जाते. आल्याच्या शेतीत चांगला नफा मिळत असल्याची ख्याती पसरल्यानंतर खानदेश व विदर्भातील शेतकरीही या शेतीकडे वळू लागले आहेत.

आल्याला आद्रक असेही नाव प्रचलित आहे. आल्याला आयुर्वेदशास्त्रात मानाचे स्थान आहे. सर्दी, खोकल्यावरील औषध तयार करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. जैविक कीटकनाशकामध्येही याचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. थंडीच्या दिवसात आले घातलेला चहा घेण्याकडे लोकांचा कल असतो. डोकेदुखीसाठी आल्याचा लेप डोक्याला लावला जातो. आल्यात जंतुनाशक व उत्तेजक गुणधर्म आहेत. अजीर्ण झाल्यास िलबाचा रस, मीठ व आल्याचा रस घेतला जातो. आल्याच्या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यातही केला जातो. पोटदुखी व मळमळ यासाठीही आल्याचा वापर होतो. आल्यास उष्ण व दमट हवामान लागते. सिंचनाची सोय असणाऱ्या ठिकाणी कोरडय़ा व उष्ण हवामानातही आल्याची लागवड करता येते. समुद्रसपाटीपासून जितकी उंचावर जमीन आहे तितका आल्याच्या उत्पादनासाठी लाभ होतो.

आल्याच्या लागवडीसाठी निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत जमीन मानवते. हलक्या जमिनीत शेणखत व कंपोस्ट खत घातल्यास त्याचा लाभ उत्पादनवाढीस होतो. आम्लधर्मी, खारवट व चोपण जमिनी आल्याच्या लागवडीसाठी टाळाव्यात. कंदवर्गीय पीक असल्यामुळे या पिकाची वाढ होण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहणे गरजेचे आहे. चुनखडी जमिनीत हे पीक चांगले येते. आले हे जमिनीत वाढणारे खोड असून त्यावर प्रक्रिया करून ते वापरले जाते. सुंठ निर्मितीसाठी काही जाती वापरल्या जातात. काही जातींचा उपयोग तेल काढण्यासाठी केला जातो. ज्या भागात आल्याचे उत्पादन घेतले जाते त्या भागाच्या नावावरून तेथील जाती ओळखल्या जातात. आसाममध्ये िथगपुई, जोरहाट, पश्चिम बंगालमध्ये बुर्ढवान, केरळमध्ये वायनाड, मननतोडी, एरनाड, कर्नाटकात करक्कल, आंध्र प्रदेशात नरसपटलम, महाराष्ट्रात माहीम या जातींची लागवड केली जाते. तर काही जाती विदेशातून आयात केलेल्या आहेत त्याचाही वापर लागवडीसाठी केला जातो.

१५ एप्रिलपासून १० जूनपर्यंत आल्याची लागवड केली जाते. त्यानंतर लागवड केल्यास कंद माशी व कंदकुंज याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. सुरुवातीच्या काळात आल्याला पाणी द्यावे लागते. त्यानंतर पावसाळ्याच्या कालावधीत पिकाची गरज लक्षात घेऊन पाणी दिले पाहिजे. कंदमाशी, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी अशा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे याकडे बारकाईने लक्ष ठेवून वेळोवेळी फवारण्या कराव्या लागतात. आले पिकाची ७५ टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी केली तरी बाजारात आल्याला चांगली किंमत मिळते. हिरवे आले सहा महिन्यांनंतर काढणी करून विक्री करता येते. उत्तम निचऱ्याची जमीन असेल तर हेच आले १६ ते १८ महिनेही जमिनीत ठेवता येते त्यामुळे उत्पादन चांगले वाढते. आल्याला १ हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रतिक्विंटल भाव मिळतो.

लातूर जिल्हय़ातील अहमदपूर तालुक्यातील वळसंगी गावचे शेतकरी व्यंकट कलमे हे गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतात आल्याची लागवड करतात. दरवर्षी किमान २ एकरवर ते हे पीक घेतात. १६० क्विंटल प्रति एकर उत्पादनाचा उच्चांक केल्याचे कलमे सांगतात. एम. ए. पर्यंत शिक्षण झालेल्या कलमे यांची स्वतची आठ एकर जमीन आहे व गावातील आठ एकर भाडय़ाने घेऊन ते भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. गेल्या दहा वर्षांत कमीतकमी ३ हजार ते अधिकाधिक १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकरी ३ लाखांपासून ८ लाखांपर्यंत आपल्याला नफा मिळाला असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी उसाऐवजी आल्याची लागवड केल्यास अधिक लाभ होत असल्याचे कलमे यांनी सांगितले.

देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर गावचे किशोर निडवंचे यांचा आल्याचा अनुभव अतिशय उत्साह वाढविणारा आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेले आले त्यांनी विक्रीसाठी न काढता तसेच पोसले व या वर्षी एका एकरात तब्बल ३०० क्विंटल उत्पादन झाले असून त्याचे तब्बल १२ लाख रुपये आपल्याला मिळाले असल्याचे निडवंचे यांनी सांगितले. निडवंचे यांचा अनुभव लक्षात घेऊन त्या परिसरातील शेतकरी आल्याची शेती कशी फायदेशीर ठरते हे समजावून घेण्यासाठी निडवंचे यांच्याकडे जात आहेत.

महाराष्ट्रात माहीम जातीची लागवड

वरदा ही जात भारतीय मसाला पिकाचे संशोधन केंद्र कालिकत येथून विकसित करण्यात आली आहे. दोनशे दिवसांत ही या जातीचे आले तयार होते. प्रतिहेक्टरी सरासरी २२.३ टन इतके उत्पादन होते. माहीम जातदेखील कालिकत येथील संशोधन केंद्रातूनच २००१ साली विकसित करण्यात आली. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात घेतली जाते. सरासरी २३ टनांपर्यंत हेक्टरी उत्पादन होते. सुंठेचे प्रमाण १९ टक्के असते. सुप्रभा, सुरुची, सुरभी अशा नव्या जातीही विकसित करण्यात आल्या आहेत. आल्यासाठी पूर्वमशागत म्हणून जमीन एक फुटापर्यंत उभी व आडवी नांगरून घेतली पाहिजे. कुळवाच्या एक-दोन पाळ्या करून स्फूरद व पालाश खताचा वापर करायला हवा. आल्याचे पीक जमिनीत १८ महिन्यांपर्यंतही ठेवता येते. त्यामुळे जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे. हेक्टरी २५ ते ४० टन शेणखताचा वापर केला तर उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळते. जमिनीच्या प्रतीनुसार आल्याच्या लागवडीची पद्धत वापरावी लागते. पठारावरील सपाट जमिनीवर वाफे पद्धतीने २ बाय १ किंवा २ बाय ३ मीटरचे सपाट वाफे तयार करून त्यात २० बाय २० सेंटीमीटर अंतरावर लागवड करण्याची पद्धत आहे. मध्यम व भारी जमिनीत सरीवरंबा पद्धत. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस २ इंच खोल लागवड केली जाते व दोन रोपातील अंतर किमान २२.५ सेंमी ठेवले जाते. काळ्या जमिनीत रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत वापरली जाते. तुषार व ठिबकसिंचनाचा वापर केला जातो.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2016 12:43 am

Web Title: ginger farming
Next Stories
1 पाणलोट क्षेत्र संकल्पना
2 पेरणी : खरीप कडधान्ये
3 शेतकऱ्यांना लखपती करणारा ‘वैजनाथ’!
Just Now!
X