नाशिकपासून जवळच असलेल्या म्हसरूळ शिवारात पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी पद्माकर मोराडे यांची शेती आहे. अगदी अलीकडेपर्यंत द्राक्षबागांसाठी असलेली ही शेती आता वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध झाली आहे. कृषिपूरक व्यवसाय म्हणून राज्यातील अनेक जण शेळीपालनाकडे वळले असले तरी शेळीऐवजी निव्वळ बोकडपालन व्यवसाय करणारे मोराडे हे महाराष्ट्रातील मोजक्याच शेतकऱ्यांपैकी एक आहेत.

नाशिक येथील म्हसरूळ शिवारात आधुनिकतेची कास धरलेल्या युवा शेतकऱ्याने सुरू केलेला कृषिपूरक व्यवसाय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यापासून राधाकृष्ण विखे, पांडुरंग फुंडकर, डॉ. राहुल आहेर यांसारख्या कित्येक राजकारण्यांनी या ठिकाणी भेट देत या शेतकऱ्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या युवा शेतकऱ्याच्या कामगिरीची दखल वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानलाही घेणे भाग पडले. यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद येथील या प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे कृषी पुरस्कार महाराष्ट्रात प्रतिष्ठेचे समजले जातात. २०१५-१६ या वर्षांच्या कृषिभूषण पुरस्काराने प्रतिष्ठानतर्फे त्यास गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे कृषिपूरक व्यवसायासाठी प्रथमच प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. असा आहे तरी कोणता कृषिपूरक व्यवसाय?

नाशिकपासून जवळच असलेल्या म्हसरूळ शिवारात पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी पद्माकर मोराडे यांची शेती आहे. अगदी अलीकडेपर्यंत द्राक्षबागांसाठी असलेली ही शेती आता वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध झाली आहे. कृषिपूरक व्यवसाय म्हणून राज्यातील अनेक जण शेळीपालनाकडे वळले असले तरी शेळीऐवजी निव्वळ बोकडपालन व्यवसाय करणारे मोराडे हे महाराष्ट्रातील मोजक्याच शेतकऱ्यांपैकी एक आहेत. २०१५-१६ या अवघ्या वर्षभराच्या कालावधीत मोराडे यांनी बोकडपालन व्यवसायातून संपूर्ण खर्च वजा जाता ४० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. मोराडे यांच्या या यशामागील रहस्य जाणून घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आजपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांसह इतर अनेक राज्यांमधील सुमारे ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या केंद्रास भेट दिली आहे.

मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा अनवाटेने जाण्यासाठी अधिक धाडस लागते. मोराडे यांचा स्वभाव मुळातच धाडसी असल्याने द्राक्षबागांना तिलांजली देत त्यांनी शेळीपालन हा कृषिपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. म्हसरूळ ते आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय या रस्त्यावर म्हसरूळपासून अवघ्या तीन किलोमीटरवर त्यांची शेती आहे. संपूर्ण तयारी करूनच व्यवसायात उतरण्याचे ठरवून त्यासाठी त्यांनी या व्यवसायाचा अभ्यास व्हावा म्हणून सहा वर्षे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. अनेक शेतकऱ्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय बंद केल्याचेही त्यांना दिसून आले. चारापाणी आणि त्यावर होणारा खर्च हे कारण त्यांना देण्यात आले. बहुतेक शेळीपालन केंद्रे ही बंदिस्त असल्याने शेळ्यांना आजार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण मोराडे यांनी नोंदविले. राजस्थानातील सिरोही या जातीच्या शेळ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी थेट राजस्थान गाठले. राजस्थानातील सिरोही जिल्ह्य़ात प्रामुख्याने या शेळ्या आढळत असल्याने त्यांची ओळखही ‘सिरोही’ म्हणूनच झाली आहे. या जातीतील बोकडांची वाढ झपाटय़ाने होते. सहा महिन्यांत २५ ते २८ किलोपर्यंत त्यांचे वजन भरते. ही माहिती मिळाल्यावर मोराडे यांनी मग बोकडपालनाचा निर्णय घेतला. त्यातही त्यांनी एक शक्कल लढविली. १८ हजार रुपयांना एक याप्रमाणे एक हजार सिरोही शेळ्या आणि १५० बोकड विकत घेऊन सिरोही जिल्ह्य़ातीलच ११६ शेतकऱ्यांवर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सोपवली. शेतकऱ्यांना शेळीपासून मिळणारे दूध, लेंडीखत यांचा लाभ होणार असल्याने त्यांनी सहजपणे ही जबाबदारी स्वीकारली. २६ ते २८ किलो वजनाचे बोकड झाल्यावर या शेतकऱ्यांकडून ते नाशिकमध्ये आणावयाचे असे स्वरूप ठरले.

नाशिकमध्ये येणाऱ्या बोकडांच्या पालनासाठी मोराडे यांनी आपल्या शेतीत दीड एकरमध्ये व्यवस्था केली. तसेच सात एकरमध्ये या बोकडांसाठी घास, यशवंत गवत यांची लागवड केली. याशिवाय बोकडांना गहू, तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी यांचा भरडा, वड, बाभूळ यांसारख्या झाडांचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. बोकड संपूर्णपणे निरोगी राहावेत म्हणून त्यांचे लसीकरण केले जाते. लसीकरणासह इतर औषधोपचारावर सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार मोराडे यांच्याकडून वर्षभरात एक हजार बोकडांची एक याप्रमाणे चार गटांची हैदराबाद तसेच नाशिक येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. सौदी अरेबियात बोकड पाठविण्याच्या दृष्टीने त्यांनी नियोजन सुरू केले आहे.

आधुनिक पद्धतीला महत्त्व देणारे मोराडे हे सकाळ आणि सायंकाळी एक तास बोकडांना संगीत ऐकवितात. थाळी वाजवीत व सोबत चारा घेऊन शेतात एखाद्याने पळणे सुरू केल्यावर सर्व बोकडही त्यामागे धावतात. अशा प्रकाराने बोकडांकडून धावण्याचा व्यायाम करून घेतला जातो.

बोकडपालनापासून लेंडी खत तर मिळतेच, त्याशिवाय या लेंडींपासून आयुर्वेदिक धूप तयार करण्याचा मोराडे यांचा मानस आहे. शेळीचे दूध हे लहान बाळांच्या आरोग्यवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. अनेक मातांना वेगवेगळ्या कारणांमुळे बाळास दूध देणे शक्य होत नाही. त्यामुळे पावडरपासून तयार केलेले दूध बाळांना देणे भाग पडते. ही समस्या लक्षात घेऊन भविष्यात शेळी दुधाची ‘मिल्क बँक’ तयार करण्याचीही त्यांची योजना आहे.  शेतीतून उत्पन्न मिळणे न मिळणे हे निसर्ग आणि शासनाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी कांदा उत्पादकांची होणारी फरफट सर्वच जण पाहात असतात. अधिक भाव मिळाला तरी त्याचा लाभ त्यांना फार काळ घेता येत नाही, कारण कांद्याचे दर वाढल्यास शहरी ग्राहक नाराज होत असल्याने शासनाकडून भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. कांद्याचे दर कमी झाल्यास ते इतके कमी होतात की बाजार समितीपर्यंत कांदा नेण्याचा खर्चही वसूल होत नाही. अशा वेळी शेती परवडत नाही म्हणून रडत न बसता शेतीला पूरक अशा इतर व्यवसायांकडे लक्ष द्या, असे संदेश मोराडे यांनी इतर शेतकऱ्यांना सुचविले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पुरक व्यवसाय म्हणून शेळी, कुक्कुट, गोपालन करतात.

मात्र, आर्थिक अडचणीमुळे शेतकरी हा व्यवसाय वाढविण्याचा आणि व्यवसायात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. या व्यवसायाकडे पुरक व्यवसाय म्हणूनच पाहिले जाते. राज्य सरकारची शेळीपालनासाठी अनुदान देण्याची योजना आहे. मात्र, या योजनेद्वारे मदत मिळविताना शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रे सादर करण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे सरकारने या योजनेतील अटी काही प्रमाणात शिथिल केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

केंद्रातील सर्व माहिती संगणकामध्ये साठविलेली असल्याने औषधोपचार, पाणी, चारा यांचे योग्य वेळापत्रक आखणे त्यांना शक्य झाले आहे. याशिवाय व्यापाऱ्यांची माहिती असलेले ‘व्हॉट्स अ‍ॅप’ ग्रुप तयार केले आहेत. त्यामुळे आपल्याकडील बोकडांसंदर्भात दूरवरील व्यापाऱ्यांनाही ते माहिती देऊ शकतात. बोकडपालन व्यवसायातील हे यश आपल्यापुरतेच मर्यादित राहू नये म्हणून मोराडे यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावयास सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५०० ठिकाणी आता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. साधारणपणे पाच दिवसांच्या या केंद्रात बोकडपालन व्यवसायासंदर्भातील सर्व काही कार्यानुभवासह सांगण्यात येणार आहे.

अविनाश पाटील avinashpatil@expressindia.com