News Flash

‘सोने देणारी’ शेळी!

नुकसान होऊ नये म्हणून शेळीपालनाचे संपूर्ण तंत्र त्यांनी आत्मसात केले.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाघोली येथील शेतकरी सतीश खडके यांनी स्टेजवरील शेळीपालनाचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाघोली येथे जमिनीपासून पाच फूट उंच स्टेजवर सतीश खडके यांनी सुरू केलेला उस्मानाबादी शेळीपालनाचा महाराष्ट्रातील एकमेव पॅटर्न आहे. उस्मानाबादी शेळी हे उस्मानाबादचे भूषण. स्वतच्या मातीतील हे वाण आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचायला हवे. त्याचे बलस्थान जगातील बाजाराला आपल्याकडे खेचल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद ठेवून त्यांनी सुरू केलेला ग्रामीण अर्थकारणातील हा अभिनव प्रयोग येणाऱ्या काळात शेळीपालन उद्योगात नवनवीन संकल्पना राबविणाऱ्यांसाठी निश्चितच फलदायी ठरेल.

सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणि तिची दंतकथा सर्वज्ञात आहे. मात्र उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे सोने देणारी शेळी आपल्याला पाहायला मिळेल. घरातील पदरमोड जमा करून महिलांनी सुरू केलेली उस्मानाबादी शेळीपालनाच्या व्यवसायाला सतीश खडके यांनी मोठय़ा परिश्रमाच्या माध्यमातून यशाचे कोंदण दिले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दुष्काळ आणि बेरोजगारीच्या कचाटय़ात सापडलेल्या अनेक तरुणांना दिशादायी ठरेल असा हा देशी उद्योग अनेकांचे आकर्षण बनला आहे. जमिनीपासून पाच फूट उंच स्टेजवर सुरू केलेला उस्मानाबादी शेळ्यांचा महाराष्ट्रातील हा एकमेव पॅटर्न आहे. उस्मानाबादी शेळी हे उस्मानाबादचे भूषण. स्वतच्या मातीतील हे वाण आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचायला हवे. त्याचे बलस्थान जगातील बाजाराला आपल्याकडे खेचल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद ठेवून खडके यांनी सुरू केलेला ग्रामीण अर्थकारणातील हा अभिनव प्रयोग येणाऱ्या काळात शेळीपालन उद्योगात नवनवीन संकल्पना राबविणाऱ्यांसाठी निश्चितच फलदायी ठरेल, असा आहे.

घरात बचत करून ठेवलेल्या पशातून पत्नी आणि भावजयीने घरात कोणालाही न सांगता एक-एक शेळी घेऊन त्या राखोळीला सोडल्या. चार वष्रे चाललेले त्यांचे हे व्यावसायिक कारस्थान मागील वर्षी उघड झाले आणि उस्मानाबादी शेळी आणि कडकनाथ कोंबडीपालनाला सुरुवात झाली. त्यातून वाघोलीसारख्या मागास गावातील शेतकरी सतीश खडके यांना दहा लाख रुपये नफा झाला आहे. त्यामुळे मूळ उस्मानाबादमध्ये विकसित झालेली उस्मानाबादी शेळी आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात विकसित झालेल्या कडकनाथ जातीच्या कोंबडीपालनातून खेडय़ातील लहान कुटुंबांना आíथक प्रगती साधण्यासाठी खडके कुटुंबीय दिवसरात्र कष्ट करीत आहेत.

वाघोली येथील सतीश खडके यांची ३० एकर शेती आहे. चार वष्रे दुष्काळी कळा सहन केल्यानंतर घरातील महिलांच्या ‘पिग्गी मनी’ने त्यांना तारले आहे. पत्नी कल्पना व भावजयी रेखा खडके यांनी चार वर्षांपूर्वी घरात कोणालाही न सांगता एक-एक शेळी घेऊन गावातील एका राखोळ्याकडे त्या राखोळीला सोडल्या. राखोळीच्या मोबदल्यात त्यांनी निम्मा तोटा सहन केला. चार वर्षांत दोघींनीही १० शेळ्या कमविल्या. तोवर कल्पना खडके आणि रेखा खडके यांनी गुपचूपपणे मिळविलेल्या पशातून एक-एक लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. सतीश खडके यांनी पत्नीला हे दागिने आले कुठून, असे विचारल्यानंतर त्यांनीही उस्मानाबादी शेळ्या आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे सोने खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे सतीश खडके यांनी त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय सकारात्मकतेतून मनावर घेतला. राज्यात विविध ठिकाणच्या शेळीपालन प्रकल्पांना त्यांनी भेटी दिल्या. नुकसान होऊ नये म्हणून शेळीपालनाचे संपूर्ण तंत्र त्यांनी आत्मसात केले. मात्र बहुतांश ठिकाणी शेळ्यांची निगा राखली जात नसल्याचे चित्र त्यांना दिसले. यातून मार्ग म्हणून त्यांनी आपल्या शेतात ४८ बाय २४ फूट आकाराचे शेड उभारले. हे शेड जमिनीपासून पाच फूट उंचीवर आहे. या शेडमध्ये १० बाय १० फूट आकाराचे दहा ब्लॉक तयार केले. शेळ्यांच्या लेंडय़ा आणि मलमूत्र यामुळे त्या आजारी पडतात. त्यामुळे या व्यवसायात तोटा होण्याची भीती असल्याने त्यांनी लोखंडी जाळीचा वापर करून गावातीलच कारागीरांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने शेडची उभारणी केली. यासाठी त्यांना पाच लाख रुपये खर्च झाला. सात ते आठ हजार रुपयांना एक शेळी याप्रमाणे त्यांनी ५० शेळ्या विविध ठिकाणच्या बाजारांतून विकत घेतल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांनी हा व्यवसाय फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केला. शेळ्यांना आजारापासून दूर ठेवता यावे, त्यांचे आरोग्य उत्तम राखले जावे आणि लेंडीखतापासून उत्पन्न मिळावे हा आधुनिक दृष्टीकोन समोर ठेऊन स्टेजवरील शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला.

पन्नास शेळ्यांपासून सुरू झालेल्या बंदिस्त शेळीपालनासाठी सतीश खडके यांनी सर्व शेळ्या उस्मानाबादी जातीच्या खरेदी केलेल्या आहेत. जिल्ह्यासह राज्यभरात मटणासाठी उस्मानाबादी शेळ्यांच्या बोकडांची मोठी मागणी आहे. वर्षभरात खडके यांनी सात हजार रुपयांप्रमाणे ३५ बोकडांची विक्री केली आहे. यातून त्यांना दोन लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच वर्षभरात त्यांना शेडच्या खाली पडणाऱ्या ४५ ट्रॉली लेंडीखत विक्रीतून एक लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सोबत या बंदिस्त शेळीपालन शेडशेजारी सुरू केलेल्या कडकनाथ कोंबडीपालनातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. आरोग्यास लाभदायी असलेल्या गुणकारी अंडी आणि मांसासाठी ही कोंबडी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कोंबडीपालनातूनही त्यांना उत्पन्न मिळत आहे. वर्षभरात दोन्ही व्यवसायांतून सतीश खडके यांना जवळपास दहा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

कुटुंबीयांची साथ मिळाल्यांमुळेच शेळीपालन सोपे झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आसपासच्या गावातील नवोदित शेतकऱ्यांना या व्यावसायाची माहिती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

शेळीपालन करताना येणाऱ्या अडचणी आणि शेळ्यांना आजारापासून वाचविण्यासाठी घ्यावयाची काळजी याची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यास शेळीपालन करणे सोपे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेळीपालनात लहान-लहान गुंतवणूक करून हा व्यावसाय वाढविता येत असल्याचेही खडके यांनी सांगितले.

सध्या सतीश खडके यांच्याकडे लहान-मोठय़ा मिळून ११५ शेळ्या आहेत. घरात शेळ्या राखण्यासाठी माणसे कमी आहेत. त्यामुळे बंदिस्त स्वरूपाचे शेळीपालन खडके यांनी सुरू केले आहे. दिवसातून केवळ दोन तास वेळ शेळ्यांच्या चारापाणी आणि स्वच्छतेसाठी लागतो. त्यामुळे कमी वेळ आणि कमी कष्टात अधिक नफा देणारा हा व्यवसाय ठरला आहे.

उस्मानाबादी शेळी ही उस्मानाबाद जिल्ह्यतच विकसित झालेली जात आहे. याचा अभिमान म्हणून शेळीपालनासाठी उस्मानाबादी शेळीची जात निवडली आहे. वर्षभरात दोन पदास क्षमता असलेली उस्मानाबादी शेळी एका पदाशीत दोन किंवा तीन करडांना जन्म देते. सहा महिन्यांत एक करडे विक्रीला येते. एक बोकड सरासरी सात हजार रुपये इतक्या किमतीने मांसविक्रेत्यांना विकला जातो. प्रत्येक सहा महिन्याला पाच ते सहा लाखांची उलाढाल या शेळीपालनातून होत असल्याने कुटुंबाची आíथक परिस्थिती सुधारली आहे.

सतीश खडके, वाघोली.

ravindra.keskar@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:11 am

Web Title: goat rearing business in osmanabad
Next Stories
1 चाईव्हज : फलदायी शेती!
2 अर्थकारण जपणारी कोथिंबीर
3 भरघोस उत्पन्न देणारी तूर
Just Now!
X