News Flash

गवत, झाड यांची माती तयार करण्याची क्षमता

आमच्या परसदारी केलेल्या प्रयोगाची माहिती मी इथे देतो. तिथे संशोधनासाठी गवत काढलेले होते.

 

आमच्या परसदारी केलेल्या प्रयोगाची माहिती मी इथे देतो. तिथे संशोधनासाठी गवत काढलेले होते. आता संशोधन संपल्यावर पुन्हा गवत लावायचे ठरले. आम्ही त्या जागेत अनेक वर्षे पाला टाकला होता तेव्हा आता तिथे गवत सहज वाढेल असे वाटले. त्यात फक्त जमिनीखाली असलेले काही पानांचे गोळे काढण्यासाठी रोटोटिलरने एक पाळी घातली. हे काम १९३९ च्या वसंत ऋतूत केले आणि ऑगस्टपर्यंत दोनदा दगडगोटे गोळा केले व नुकतेच उगवून आलेले तण काळडे. जमिनीचा पृष्ठभाग खूप कडक झाला. गवत पेरणीच्या वेळी त्याला भेगा पडल्या. पण नंतर संधी मिळणार नाही म्हणून आम्ही त्याच अवस्थेत पेरणी केली. पृष्ठभाग अजिबात न खरवडता मी त्या संपूर्ण क्षेत्रावर काळजीपूर्वक केंटकी ब्लूग्रासचे बी पसरले. त्यावर पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून साधारण एक अष्टमांश इंच जाडीपर्यंत वाळू पसरली. हे झाल्यावर गवत पेरून झाले. त्यावेळी किंवा नंतरसुद्धा अजिबात पाणी दिले नाही. सप्टेंबरमध्ये पाऊस येईपर्यंत काहीच झाले नाही. पावसानंतर जमीन अधूनमधून हिरवी दिसायला लागली. हळूहळू ते हिरवे पुंजके एकत्र व्हायला लागले. आणखी एका महिनाभराने सबंध क्षेत्रात जोमाने वाढणारे गवत झाले. ते इतके जोमदार होते की त्या शरदऋतूत ते अनेकवेळा कापावे लागले. मातीत चांगल्या मिसळलेल्या पानांच्या पुरवठय़ामुळे ते इतके चांगले पोसले गेले की त्याची नियमितपणे कापणी करावी लागली. नाहीतर पुढल्या हंगामात त्याचे जंगलच झाले असते.

१९४०मध्ये जवळ वर्षभर दर आठवडय़ाला कापणी करावी लागली. मला वाटत होते की त्या गवताची उत्तम निगा राखली जात आहे कारण कापणी यंत्राने जितके शक्य होते तितक्या उंचीवर मी गवत कापत होतो. तरीसुद्धा पुढल्या वसंतऋतूत आम्हाला असे आढळून आले की आमचे गवत फारच आजारी झाले आहे. मी कोडय़ात पडलो. पण जिकडेतिकडे गवतावर अतिक्रमण झाले होते. तरी मी गेल्या हंगामात पुष्कळदा मी गवतावर अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली होती. हा १९४१ चा वसंतऋतु होता. मला असे वाटायला लागले की ते गवत मरू लागले होते कारण त्याची मुळे उपाशी राहात होती. मी पानांचा भाग इतका आखूड ठेवीत होतो की त्यामुळे त्याच्या मुळांना पुरेसे पोषण मिळत नव्हते. मग मी कापणी यंत्राचे पाते ४ इंच उंच बसेल (मूळ पाते दीड इंचावर होते) अशा तऱ्हेने बनवून घेतले. मरणाऱ्या गवतावर इलाज म्हणून मी फक्त या उंच पात्याने त्याची कापणी करीत राहिलो. यावेळी मी खत किंवा चुनखडी घातले नाहीत. दोन वर्षे फक्त हे करीत राहिल्यावर ते गवत इतके दाट वाढले की ते ब्रशच्या केसांसारखे दिसत होते.

खत आणि / किंवा चुनखडीने ही सुधारणा जास्त जलद होऊ शकली असती. पण मला त्याशिवाय किती भरभर सुधारणा होते ते कळायला पाहिजे होते. ज्यांना उत्तम दर्जाचे गवत खूप जलद निर्माण करायचे आहे त्यांनी या दोन्ही पद्धतींची सांगड घालावी. उंचावर कापणे आणि खतावणे. माती सुधारणे न सुधारणे त्यावर वाढणाऱ्या वनस्पतींच्या क्रियांच्या प्रमाणात होत असते. वरच्या अनुभवावरून असे दिसते की गवत अखूड कापल्यावर त्याची मुळे पसरण्यास प्रतिबंध होतो. मुळे पसरली नाहीत, तर ती जास्त लांबचे कुजलेले पदार्थ घेऊ शकत नाहीत. मुळे न पसरणे म्हणजे त्या वनस्पतीचा मृत्यू. विशेषत जर खत किंवा चुनखडी किंवा दोन्ही वापरले नाहीत तर. तेव्हा उंचावर कापणे आणि खत व चुनखडी वापरणे हे दोन्ही केले तर उत्तम गवत मिळेल.

वनस्पतींना हस्तक्षेप किंवा अडथळ्याशिवाय वाढू दिले तर त्या उत्तम माती बनवतात. अशा तऱ्हेने आपोआप माती सुधारण्याच्या तंत्राने शेतकरी आपली जमीन कसदार बनवू शकतो. निसर्गात असे माती घडवणारे घटक अस्तित्वात असतात, त्यांना उत्तेजन दिले तर ते दर्जेदार माती बनवू शकतात.

(‘प्लाउमॅन्स फॉली’ या एडवर्ड फॉकनर लिखित पुस्तकातील प्रकरणाचा जाई निंबकर यांनी केलेला अनुवाद)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:12 am

Web Title: grass and tree prepare the soil
Next Stories
1 पेरणी : खरीप कडधान्ये
2 कृषीवार्ता : आठ राज्यांतील २३ बाजारपेठा जोडणार
3 माती जिवंत करणारा ‘शिवराम’
Just Now!
X