कमी पाण्यात, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करणारे पीक म्हणून ढोबळी (सिमला) मिरचीकडे पाहिले जाते. आधुनिक शेतीत या पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आहे.

ढोबळी मिरचीचा उगम हा ब्राझीलमधील आहे. युरोपियन लोकांच्या आवडीची भाजी म्हणून ही भाजी ओळखली जाते. ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व या भाजीत मोठय़ा प्रमाणावर असते. समशीतोष्ण हवामानात येणारे हे नाजूक पीक आहे. प्रारंभी सिमला प्रांतात हे पीक घेतले जात असल्यामुळे कदाचित या पिकाला सिमला मिरची हे नाव पडले असावे. मिरची मोठी असल्यामुळे हिला ढोबळी मिरची या नावानेही महाराष्ट्रात ओळखले जाते.

प्रारंभी उत्तर भारतात हे पीक घेतले जात होते. आता महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोकण या जिल्हय़ांबरोबरच शेडनेटमधील प्रमुख पीक म्हणून या पिकाची ओळख आहे. उन्हाळ्यात भाजीपाल्यास चांगला भाव मिळतो. या कालावधीत शेडनेटमध्ये उत्पादित केलेली सिमला मिरची बाजारपेठेत उपलब्ध झाली तर शेतकऱ्याला हमखास नफा मिळतो. देशांतर्गत मागणीबरोबरच भारतातून आखाती देशातही ही मिरची निर्यात केली जाते. आखाती देशातील मागणी मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे जितके मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होईल तेवढे ते विकले जाते. या पिकासाठी हलकी व मध्यम प्रतीची जमीन लागते. काळ्या जमिनीचा वापर ढोबळी मिरचीसाठी लाभदायक नाही. कारण काळ्या जमिनीत कॅल्शियम काबरेनेटचे प्रमाण जास्त असल्याने जमीन तापते व त्याचा फळावर परिणाम होतो.

या फळाच्या अनेक जाती आहेत. ज्वाला, तेजस, फुले, ज्योती, कोकण कीर्ती, इंद्रा, ग्रीनगोल्ड, बेलबॉय, बॉम्बी, लारिओ, अर्कावसंत, अर्कामोहिनी, भारत, यलोवंडर अशा अनेक जाती आहेत. शेडनेटव्यतिरिक्त उघडय़ावरही अनेक शेतकरी लागवड करतात. याची लागवड करताना दोन फुटांचा गादीवाफा केला जातो. दोन रोपांत दीड फूट अंतर ठेवून वाफ्याच्या मध्यावर लागवड करावी. सर्वसाधारणपणे फाल्गुन महिन्यात किंवा एप्रिल, जुल, ऑगस्ट महिन्यांत लागवड केल्यास सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत फळे मिळतात. वर्षभर येणारे हे पीक असल्यामुळे बाजारपेठेचा अंदाज घेऊन अनेक जण लागवडीचे गणित घालतात. या पिकाला पाणी देताना उन्हाळ्यात सकाळी आठच्या आत पाणी द्यावे व संध्याकाळी सहानंतर पाणी द्यावे. उन्हाच्या वेळी पाणी दिल्यास फळे तडकण्याची भीती असते. हिवाळ्यात पाणी कमी लागते तर पावसाळ्यात जमिनीतील ओलावा पाहूनच पाणी दिले पाहिजे. शेडनेटमध्ये पाण्यासाठी इनलाइन ड्रीप गरजेचे आहे. लागवडीपूर्वी अध्र्या एकरला किमान दोन ट्रॉली शेणखत वापरावे लागते. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेडनेटमध्ये सातत्याने खुरपणी करावी लागते. खते व पाणी व्यवस्थापन हे अतिशय आवश्यक आहे.

एकरी ४० ते ५० टनांपर्यंत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेता येते. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. रोपांची लावण करताना बीजप्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. रोपाच्या दोन ओळींतील अंतर चार इंच व दोन बियांतील अंतर एक इंच हे रोप तयार करण्यासाठी आवश्यक आहे. रोप दोन पानांवर आल्यावर त्याला झारीने जर्मिनेटर, थ्राईवरने चूळ भरावी लागते. २१ दिवसांनंतर रोप लावणीसाठी उपयोगात आणता येते. या पिकाला अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या कालावधीत रोप लहान असताना मररोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे लावणीपूर्वीच त्यावर बीजप्रक्रिया करावी लागते. इतर पिकांप्रमाणे या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.

रोपे लहान असताना ती हिरव्या रंगाची होतात व दुसऱ्या अवस्थेत पाने वाळू लागतात. बोकडय़ा नावाचा रोगही या पिकाला होतो. पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फूलकिडे, आदींची वाढ होते व त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. आवश्यकतेनुसार फवारण्या केल्या तर चांगले पीक येते.

उन्हाळ्यात शेडनेटमधील तापमान टिकवण्यासाठी फॉगरचाही वापर करावा लागतो. हिरवी मिरचीबरोबरच लाल व पिवळ्या रंगाची मिरची घेण्याकडे लोकांचा कल आहे. पिवळ्या व लाल रंगाच्या मिरचीस स्थानिक बाजारपेठेपेक्षा मोठय़ा शहरात व विदेशात मागणी आहे. आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या ढोबळी मिरचीची लागवड भारतात अनेक राज्यांत केली जाते. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

लातूर तालुक्यातील काटगाव येथील पारंपरिकतेला तंत्रज्ञानाची जोड

बारावीपर्यंत शिक्षण झालेले मुरलीधर लोखंडे यांची २५ एकर जमीन आहे. विहीर, िवधन विहीरही आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतात. प्रारंभी त्यांनी मोकळ्या रानात उत्पादन घेतले. आता शेडनेटमध्ये त्यांनी लागवड केली आहे. एक एकर शेडनेटमध्ये त्यांना २५ लाख रुपये इतके विक्रमी उत्पादन घेता आल्याचे त्यांनी सांगितले. कमीत कमी ३५ रुपये तर अधिकाधिक ६५ रुपये किलो भाव मिळाला. बाजारपेठेतील सरासरी ३५ ते ४० रुपये भाव पडल्यामुळे आपल्याला इतके विक्रमी उत्पादन घेता आले. दरवर्षीच बाजारपेठ साधते असे नाही. बाजारपेठेतील आवकनुसार मालाची किंमत ठरत असते. योग्य नियोजन केल्यास इतर पिकांच्या तुलनेत ढोबळी मिरचीचे उत्पादन हे किमान दुप्पट असते. भाव साधला तर हे प्रमाण अनेक पटीने वाढते. बाजारपेठेची गरज मोठी आहे. आखाती देशातून या भाजीला मागणी वाढत असेल तर शेतकऱ्यांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे. उत्पन्नात वाढ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व बाबींचा अभ्यास करत शेती केली तर ती हमखास फायदेशीर ठरते, असा अनुभव असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

pradeepnanandkar@gmail.com