20 November 2017

News Flash

प्राध्यापकाची यशस्वी गटशेती

. रोपे, कीटकनाशके एकत्रित खरेदी केल्याने शेतकऱ्यांच्या खर्चामध्येच पन्नास टक्के बचत झाली.

वसंत मुंडे | Updated: May 20, 2017 12:26 AM

उद्धव घोळवे ११ शेतकऱ्यांच्या गटशेतीतून विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत.

 

शेतीच्या उत्पादनाला बाजारात भाव मिळत नसल्याने मागील काही वर्षांपासून शेतीला दुय्यम स्थान मिळाल्याने शेतकऱ्याचा मुलगाही आता ‘शेती नको रे बाबा’ म्हणतो. टोमॅटोचे उत्पादन पिकवून बाजारात त्याचा कसा ‘लाल चिखल’ होतो याच्या कथा पुस्तकातूनही पुढे आल्याने शिकून नोकरीला लागलेला कोणीही माणूस मागे वळून शेतीकडे पाहत नाही. अशा परिस्थितीत प्राध्यापक म्हणून वर्गात रमणारे उद्धव घोळवे यांनी मात्र दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना एकत्र करत गटशेतीच्या माध्यमातून खर्च कमी, उत्पादन जास्त आणि हक्काचा बाजार अशी त्रिसूत्री निर्माण करत शेतकऱ्यांना एकेरी टोमॅटोचे तीन लाख, तर झेंडूच्या शेतीचे साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी केला. नोटाबंदीच्या काळात बहुतांशी टोमॅटो आणि इतर माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली त्या वेळी हक्काच्या बाजारपेठेमुळे थेट दिल्लीतून एकेरी तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवल्याने शेतकरीही आता गटशेतीतून आíथक सुधारणा करू लागला आहे.

केज तालुक्यातील भाजीपाला उत्पादक असलेल्या िपपळगाव गावातील प्राध्यापक उद्धव घोळवे यांनी अकरा शेतकऱ्यांना एकत्रित करून गट बनवला. वेगवेगळ्या जातींच्या टोमॅटोचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी एकाच कंपनीची टिकवण क्षमता असणारी टोमॅटोची जात निवडून प्रत्येकी एका एकरमध्ये लागवड केल्याने अकरा एकरवर टोमॅटोचा मळाच फुलला. रोपे, कीटकनाशके एकत्रित खरेदी केल्याने शेतकऱ्यांच्या खर्चामध्येच पन्नास टक्के बचत झाली. फवारणी करण्याची पद्धत, पिकांची काळजी घेण्याबाबत योग्य मार्गदर्शन झाल्याने टोमॅटोचे पीकही पूर्वीपेक्षा दुपटीने आले. मात्र टोमॅटो बाजारात विक्रीसाठी येताच केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली. सर्वत्रच या निर्णयाने मोठय़ा प्रमाणात पिकलेला शेतीमाल कवडीमोल भावाने, तर कोठे बाजारात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मात्र प्राध्यापक घोळवे यांनी दिल्ली येथील विविध व्यापाऱ्यांशी संपर्क करून टिकवण क्षमता जास्त असणाऱ्या टोमॅटोबाबत माहिती दिल्यानंतर थेट दिल्लीत ७० ते ८० टन टोमॅटो एकाच वेळी विक्री झाले. एकेरी अडीच हजार कॅरेट उत्पादन निघाले. पन्नास ते २१० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हातात पडले. नोटाबंदीने सर्वत्र शेतकऱ्यांवर माल फेकून देण्याची वेळ आलेली असताना गटशेतीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात बचत आणि विक्रीची हमी मिळाल्याने शेतकरी आता मोठय़ा प्रमाणात गटशेतीकडे वळला आहे. टोमॅटोच्या पिकाबरोबरच आता प्रा. घोळवे यांनी झेंडूच्या फुलाच्या शेतीचा अभ्यास करून गटामार्फत झेंडूची शेती फुलवली आहे. केवळ ७५ दिवसांत झेंडूचे फूल हातात आले आणि जवळपास एकेरी साडेतीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हातात पडले आहे. दसरा, दिवाळीत झेंडू फुलांचे ढीगच्या ढीग सोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळ पाहून झेंडू लागवड केली तर किती उत्पादन मिळू शकते, याचा वस्तुपाठच या गटशेतीने निर्माण केला. या वेळी या गटाने गावरान पद्धतीची, जास्त अंबूस चव देणारी टोमॅटोची जात निवडली आहे. ६५ दिवसांत हा माल तोडायला येईल आणि एकेरी अंदाजे ६० टन उत्पन्न मिळून साधारण ५ लाख रुपये उत्पादन हातात पडेल असे नियोजन केले आहे. उद्धव घोळवे हे केज तालुक्यातील सांगवी सारणी येथील श्रीविठ्ठल उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक असून त्यांनी श्री भरवनाथ फळ व भाजीपाला उत्पादक शेतकरी बचत गट निर्माण करून शेतकऱ्यांना कमी खर्चातील शेतीचा आणि जास्त उत्पन्नाचा मार्ग दाखवला आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली तर चांगला फायदा होतो, असा त्यांचा अभ्यास आहे.

vasantmunde@yahoo.co.in

First Published on May 20, 2017 12:26 am

Web Title: group farming tomato farming