24 November 2020

News Flash

परसबागेची चळवळ..

रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत.

ममताबाई भांगरे

आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे.

कळसुबाई शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उतार लक्षात घेऊन लावलेली विविध प्रकारची झाडे. बांधांवर पसरलेले काकडीचे वेल. सभोवताली तसेच घराच्या भिंतीवर पोहोचलेले दोडक्याचे वेल. कारल्याचा मांडव. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत अशीच विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, आंबा, अंजीर, पपई, शेवगा, सीताफळ, फणस, गावठी वांगी, टोमॅटो. एका बाजूला ओळीत केलेली वाल आणि घेवडय़ाची लागवड ही शांताबाई धांडे यांची परसबाग. या बागेमध्ये जमिनीचा उतार आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन फळझाडे, वेलवर्गीय भाज्या, कंदभाज्या, पालेभाज्या यांच्या लागवडी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत येथे काहीच नव्हते, खडक होता. जनावरे फिरायची. शांताबाई सांगत होत्या पण त्या छोटय़ाशा परसबागेतून हिंडताना त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा प्रश्न पडतो. या सर्व भाज्या स्थानिक आहेत. पारंपरिक बियाणांचाच त्यासाठी वापर केलेला आहे आणि सर्व भाजीपाला, फळांचा मुख्यत: घरीच वापर केला जातो. फारच उत्पन्न आले तर थोडीफार भाजी बाजारात नेली जाते पण तीही क्वचितच. गावरान वाणांबरोबरच खत म्हणून गांडूळ खत यांचा वापर होतो. पूर्वी महिना पंधरा दिवसांतून भाजी घरी आणली जायची. आता मात्र मुबलक प्रमाणात भाजी, फळे उपलब्ध होतात. शिवरात्रीपर्यंत बाहेरून भाजीपाला आणावा लागणार नाही. शांताबाईचे पती खंडू धांडे सांगत होते. दोन वर्षांपूर्वी ‘बायफ’च्या (भारतीय कृषि अनुसंधान) मार्गदर्शनाखाली परसबाग लावायला सुरुवात केली. सर्वच कुटुंब आता त्या बागेच्या प्रेमातच पडले आहे. या परसबागेचा गवगवा झाल्यामुळे आता दूरवरून लोक ही परसबाग पाहायला येतात. त्यात काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. शांताबाईंचा मुलगा सोमनाथ एम.ए. बी.एड. झालेला आहे. त्याला विचारले असता, आईचा खूप अभिमान वाटतो असे तो म्हणाला.

आंबेवंगणच्या पुढेच देवगाव नावाचे खेडे आहे. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची ही भूमी. रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई भांगरे यांचे घर आहे. कौलारू घर, पुढे बाजूला घरालगत पडवी. घरापुढे बोगन वेलीचा ऐसपस मांडव. ऑक्टोबरच्या कडक उन्हाची तिरीपही आत येऊ शकत नव्हती. प्रसन्न वातावरण. येथेही घराच्या सभोवताली असणाऱ्या इंचन् इंच जागेचा भाजीपाला, फळ लागवडीसाठी केलेला वापर. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर गेलेले वेल. बांधावर पसरलेले डांगर, भोपळा यांचे वेल. रताळ, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या पाहायला मिळाल्या. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा, कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी. जोडीला विविध फळांची झाडे. थोडय़ाफार पालेभाज्याही होत्या पण आम्हाला रानभाज्याच आवडतात असे ममताबाई सांगत होत्या. सासू-सासऱ्यांमुळे या रानभाज्यांचे ज्ञान झाले. सासूबाई असताना रानातून या भाज्या तोडून आणायचो, पण आता घराजवळच त्यांची लागवड केली आहे. चहा, साखर आणि तेल मीठ सोडले तर बाकी सर्व घरचेच वापरतो. धान्य, कडधान्य, भाज्या, हळद, मिरची सर्व काही. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत. गांडूळ खत, शेण खत यांचाच वापर केला जातो. सेंद्रीय व गांडूळ खतांच्या गोळ्या हा ममताबाईंचा स्वत:चा शोध. भातालाही त्या गांडूळ खतच वापरत पण ओढय़ालगतच्या शेतालगत टाकलेले खत वाहून जायचे. विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली. गांडूळ खताचे लहान लहान गोळे केले, वाळवले. युरिया ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर सुरू केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या शोधाची खूप प्रशंसा झाली. साधे नसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबाईंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे शांताबाई किंवा ममताबाई या दोघीही निरक्षर आहेत. पण ममताबाईंचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात. या दोघींप्रमाणेच मान्हेरेच्या हिराबाई गभाले, जायनावाडीच्या जनाबाई भांगरे, एकदरे येथील हैबतराव भांगरे यांच्याही परसबागा पाहण्यासारख्याच आहेत. ‘सीड क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरेंची परसबाग तर दृष्ट लागण्यासारखीच आहे. ही झाली प्रातिनिधिक उदाहरणे पण कळसुबाई शिखराच्या आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी खेडय़ांमध्ये अशा अनेक ममताबाई, शांताबाई पाहावयास मिळतात.

आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी ही परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनी गावरान वाणांचे जतन परंपरेने केले आहे. पूर्वी त्या घराभोवती डांगर, भोपळा, काकडी अशा भाज्या लावायच्या. पण त्या कुठेही लावल्या जायच्या. कुपोषणाची समस्या दूर करायची असेल तर आदिवासींना दर्जेदार, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. घराभोवतीच्या दोन-तीन गुंठे जागेत योग्य नियोजन करून परसबाग फुलवली तर चार-सहा महिने ताजा भाजीपाला रोजच्या आहारासाठी उपलब्ध होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ‘बायफ’ने परसबागेचा हा उपक्रम हाती घेतला. यात हंगामी परसबाग आणि बहुवर्षांयू परसबाग अशा दोन्ही प्रकारच्या परसबागांची लागवड केली जाते. सुरुवातीला स्थानिक भाजीपाल्यांचे विविध वाण एकत्र करून त्यांचे बियाणे संच (सीड कीट) तयार करण्यात आले. यामध्ये गावरान भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, गावठी काकडी, शेपू, पालक, मेथी, चाकवत, मुळा, करजकंद यांसारख्या वीस-बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध बियाणे पुरविण्यात आले. या बियाणांची वैशिष्टय़े म्हणजे हे स्थानिक वाण असल्याने एकदा पुरवठा केलेल्या बियांपासून तयार केलेल्या भाज्यांचा उपयोग पुढील हंगामासाठी होतो. हे स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे आहेच तसेच खाण्यासाठी रुचकरही आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या शेणखत, गांडूळ खत, कम्पोस्ट खताचा योग्य वापर करून या भाज्या पिकवल्या जातात. संस्थेच्या मार्गदर्शनामुळे या परसबागा अधिक सुबक व आहारदृष्टय़ा परिणामकारक ठरत आहेत. एका हंगामात सरासरी ४०० ते ६०० किलोपर्यंत ताजा भाजीपाला उत्पन्न होतो. वाहून जाणारे पाणी, सांडपाणी याचा काटेकोर वापर यासाठी केला जातो. बहुवर्षांयू भाजीपाला प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू, सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता अशी विविध फळझाडे घराच्या भोवती लावली जातात. मिळणाऱ्या फळांचा, फुलांचा आहारात वापर होतो. यातून रक्ताक्षय, कुपोषण कमी होण्यासाठी मदत होत आहे. तालुक्यातील ३१ गावांमधील अडीच हजारपेक्षा जास्त कुटुंबांसाठी ‘बायफ’ ने हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती ‘बायफ’चे अधिकारी जितीन साठे यांनी दिली. पण आज त्यापेक्षाही अधिक कुटुंबांकडे ही चळवळ पोहोचली आहे.  इथल्या परसबागातून तयार झालेले बियाणांचे संच राज्याच्या अन्य भागांतही पोहोचले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या वर्षी असे आठ ते दहा हजार बियाणे संच वितरीत करण्यात आले. आज राज्याच्या विविध भागांतून या योजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ येथे येत आहेत. प्रत्येक घराभोवती अशी परसबाग उभी राहिली तर कुपोषणाला आळा बसू शकतो, त्यासाठी घर तेथे परसबाग ही चळवळ राबविण्याची गरज आहे.

प्रकाश टाकळकर – prakashtakalkar11@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:48 am

Web Title: home farming movement for nutritious vegetable in akole taluka
Next Stories
1 कोकणातील भात पिकावर कीड, रोगांचे संकट
2 कोकणात नवा गोवंश?
3 बुडत्याचा पाय खोलात..
Just Now!
X