16 December 2017

News Flash

बहुगुणी फणस दुर्लक्षितच..

सर्व पोषण घटकांचे मिश्रण फळात असल्यामुळे याची तुलना ऑलिव्हसारख्या फळाशी केली जाते.

आनंद देसाई | Updated: June 24, 2017 1:08 AM

 

वनस्पतीशास्त्रात फणसाचे नाव ‘आटरेकार्पस हेट्रोफायस लॅम’ असे आहे. फणस हे भारतातील एक महत्त्वाचे, पण दुर्लक्षित फळ आहे. गरिबांचे फळ म्हणून फणसाची ओळख आहे. फणसाची झाडे कोणत्याही व्यवस्थापनाशिवाय वाढताना दिसतात. फणसापासून ‘जॅकलिन’ नावाचे रसायन तयार केले जाते. त्याचा उपयोग लहान आतडय़ांच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी होतो. फणसाच्या बियांत भरपूर प्रथिने आहेत. सर्व पोषण घटकांचे मिश्रण फळात असल्यामुळे याची तुलना ऑलिव्हसारख्या फळाशी केली जाते.

एका आठळीत चार बदामांची पोषकता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आठळीतून तयार केलेली पावडर विविध पदार्थासाठी वापरता येते. फणसाच्या बियांचा स्वादासाठी विविध खाद्यपदार्थात वापर केला जातो. आइस्क्रीममध्ये नट्सचे भाजलेले तुकडे म्हणून या बियांचा वापर केला जातो. फणसामध्ये ब, क जीवनसत्त्वे, पोटॅशिअम कॅल्शिअम, लोह, प्रथिने व उच्च दर्जाची कबरेदके असल्यामुळे फणस हे आहारात पुरवणीचे काम करते. फणसाच्या पानात खनिजांचे प्रमाण चांगले असते. त्याच्या पानांपासून खत तयार केले जाते. या पानांपासून पत्रावळ्यासुद्धा बनविल्या जातात. फणसाच्या लाकडापासून वाद्ये, वीणा बनवितात. फणसामध्ये कापा व रसाळ या मुख्यत: दोन जाती आहेत. फणस हा शक्तिवर्धक आहे. रक्तपात व अतिसार यावर फणस गुणकारी आहे.

पश्चिम घाट, आसाम, ब्रह्मदेश येथील जंगलात याची वाढ उत्तम रीतीने होते. फणसाच्या झाडामध्ये तेलाचा अंग असल्यामुळे हे लाकूड वर्षांनुवर्षे टिकते. फर्निचर बनविण्यासाठीही या लाकडाचा वापर करतात. फणसाच्या लाकडापासून मोरोन आणि सायनोमॅक्युरीन हे पिवळे व निळे रंग मिळतात. फणसाला हिवाळ्यात फुले येतात. उन्हाळ्यात फळे पिकतात. फणसाचा प्रत्येक गर एकेका स्वतंत्र फुलातून निर्माण होतो. दोन गऱ्यांमध्ये जो चोथा असतो तो वाया गेलेल्या फुलांचा बनलेला असतो. फणसाचे लाकूड पिवळे, बळकट व मऊ असते. त्यावर कोरीव कामे होऊ शकतात.

सालीला चांगल्या प्रतीचा डिंक येतो. हृदयरोग व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना डॉक्टर मांसाहार वज्र्य करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे फणसाची भाजी मांसाहाराला पर्याय म्हणून केली जाते. उच्च रक्तदाबाला हे चांगले औषध आहे. फणस बहुगुणी असूनही भारतात त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. परदेशात या फळावर विविध संशोधन करण्यात आले आहे. मात्र, भारतात त्याची कमतरता आहे. या फळाचे फायदे पाहता शासनानेही लागवडीला आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

औषधी उपयोग

फणसाच्या झाडापासून मिळणारा चीक रातांधळेपणा कमी करण्यासाठी वापरला जातो. व्हिनेगरमध्ये मिसळून तो सूज कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. कोवळ्या पानांचा लेप सूज असलेल्या जागेवर लावतात. फणसाच्या झाडाचे विविध भाग दातदुखी, अस्थिरोग, पोटदुखी, दुखणारे अवयव, सूज, स्त्रियांमधील वंधत्व यावरील उपचाराला वापरतात.

sureshdesai46@gmail.com

First Published on June 24, 2017 1:08 am

Web Title: importance of jackfruit