20 November 2017

News Flash

दुष्काळावर मात करून ‘पाणीदार’ गावाकडे

घरातील किमान एकाची पोट भरण्यासाठी मायानगरी मुंबईकडे धाव. उद्देश फक्त एकच ‘जगणं’.

चंद्रकांत दडस | Updated: May 13, 2017 12:38 AM

माण तालुक्यातील परकंदी गावात जलसंधारणाचे काम सुरू असून त्यात अबालवृद्धांचाही सहभाग आहे.

 

एका बाजूला महाबळेश्वरमध्ये ५७६१ मिलिमीटर पावसाची नोंद, तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या माण तालुक्यामध्ये फक्त ३५० ते ४०० मिलिमीटर पाऊस. मागील पाच वर्षांत कमी पावसामुळे वर्षांतून एकदाही ओढा पूर्ण भरून न वाहिल्याने विहिरींची कमालीची घटलेली पाणीपातळी, पावसाच्या भरवशावर एखाददुसरे पीक. पाणी नसल्याने उत्पन्न नाही. यामुळे घरातील किमान एकाची पोट भरण्यासाठी मायानगरी मुंबईकडे धाव. उद्देश फक्त एकच ‘जगणं’.

अशा या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईला आलेली काही मुलं एकत्र येत बैठक बोलावतात. चर्चा होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावादी, गटतट सोडून गावकरी एकत्र येतात. आणि सुरू होतो जलसंधारणाचा महायज्ञ. आता या o्रमरूपी यज्ञातून येणाऱ्या पावसाळ्यात कोटय़वधी लिटर पाणी जमिनीतून मुरवून धरणीमातेला एक प्रकारे अभिषेक घातला जाईल. सातारा जिल्हय़ाच्या माण तालुक्यातील परकंदी गावाची ही यशोगाथा. आमिर खान आणि किरण राव यांनी सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशनतर्फे  घेण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेसाठी साधारण १४०० लोकसंख्या असलेले हे गाव सध्या स्वत:ला पूर्णत: झोकून देऊन काम करत आहे. ‘रात्रदिन आम्हा जलसंवर्धनाचा ध्यास’ याप्रमाणे ग्रामस्थ काम करताना दिसतात.

पहाटे पाच वाजता या गावाचा दिवस उजाडतो. उठल्यानंतर गाई-म्हशींचे दूध काढून, सगळी आवराआवर करून हे गाव सकाळी साडेसहाच्या दरम्यान शाळेत वेळेत पोहोचण्याची घाई असलेल्या मुलाप्रमाणे फावडे आणि घमेले घेऊन घराबाहेर पडतात. यामध्ये वृद्ध महिला, आजोबा, पतीपत्नी, अपंग, तरुण मुले यांच्यासह गावातील लहान मुलांचाही समावेश असतो. सकाळी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ट्रॅक्टर, गाडय़ा यांचाही वापर केला जातो. सांगितलेल्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वाना सूचना केल्यानंतर कामाला सुरुवात होते. हे काम ७ ते १० वेळेत तीन तास केले जाते. १० नंतर उन्हाची काहिली होत असल्याने काम थांबवले जाते. या रमदानामध्ये दररोज किमान २५० ते ३०० जण सहभागी होतात. वृद्ध महिलांची संख्या यामध्ये ५० टक्केपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. असा हा उपक्रम मागील महिन्याच्या ८ एप्रिलपासून सुरू झाला असून, दुष्काळ हटविण्याचा हा यज्ञ २२ मे पर्यंत कायम राहणार आहे.

चंद्रभागा पिंगळे, वय वर्षे फक्त नव्वदीच्या घरात. पाठीत बाक आलेला. अशा अवस्थेत त्या घमेले हातामध्ये घेत माती आणि दगड उचलण्याचे काम करतात. त्या म्हणतात, आम्ही खूप दुष्काळ पाहिले, पाण्यासाठी खूप वणवण फिरावे लागते, टँकरची वाट पाहावी लागते. आमचं संपूर्ण आयुष्य पाणी, दुष्काळ आणि गरिबी यात गेलं. आता गावातील लोक पाण्यासाठी गटतट विसरून एकत्र आली आहेत. त्यामुळे कंबरेचं दुखणं न पाहता रोज न चुकता कामाच्या ठिकाणी येते. पाणी अडणार असल्यानं, त्याचा फायदा म्हणून विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. जरी पाऊस जास्त झाला नाही तर मुरलेल्या पाण्यावर आम्ही एक तरी पीक नक्की काढून दाखवू. यामुळे येणाऱ्या दिवसांत गावाला नक्की चांगले दिवस पाहायला मिळतील.

गावचे सरपंच महादेव इंगळे या उपक्रमाबद्दल सांगतात की, आम्हाला लोक एकत्र येतील की नाही, याबाबत शंका होत्या. लोकांना एकत्र करणं, त्यांना एक विचार पटवून देणं अवघड काम होतं. मात्र गावातून मुंबईला कामासाठी गेलेल्या मुलांनी आम्हाला पाण्याचं महत्त्व पटवून दिलं. ते सगळ्यांना पटलं. त्यानंतर आमच्या गावामध्ये जलसंवर्धनाची चळवळ सुरू झाली. त्यामध्ये आतापर्यंत कसलाही खंड पडलेला नाही. हे काम फक्त   स्पर्धेसाठी न करता यातून बचत होत असलेल्या पाण्याची गरज ओळखून असे उप्रकम पुढे कायम सुरू ठेवण्याची गरज आहे. गावामध्ये जलसाक्षरता होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत.

काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी गावातील एका तरुणाचे लग्न ठरले. वऱ्हाडी लग्नमंडपात दाखल झाले होते. लग्न सुरू होण्यापूर्वी वर आणि वधू तसेच आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी गावामध्ये एका ठिकाणी o्रमदान केल्यानंतरच विवाहसोहळा पार पडला. या घटनेबाबत गावकरी अतिशय उत्साहाने माहिती देतात. पाणी फाऊंडेशनकडून स्पर्धेत भाग घेताना कोणताही निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे गाव सहभाग आणि इतरांकडून निधी उपलब्ध करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नव्हता. त्यामुळे गावातील लोकांकडून काही प्रमाणात वर्गणी जमा करण्यात आली. मंदिराची काही रक्कम चांगल्या कामाची सुरुवात म्हणून वापरण्यात आली. मात्र त्यानंतर रक्कम कमी पडू लागल्यानंतर कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख आणि माजी आयुक्त सत्रे यांनी या कामासाठी आपला शब्द खर्ची केला. त्यानंतर आता कामांना आणखी वेग आला आहे. मात्र अजूनही बरेच काम शिल्लक असून, यासाठी मोठय़ा मदतीची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात. सद्य:स्थितीत या गावामध्ये पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण झाल्या असून, उन्हाळी पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत मुरणार आहे. यामुळे थेट ओढय़ावाटे वाहून जाणाऱ्या कोटय़वधी लिटर पाण्याची बचत होऊन ते पाणी थेट जमिनीत मुरेल. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा गावातील विहिरींना होऊन पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे.

गावकऱ्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर अगदी दोन वर्षे वयाची मुलेही यासाठी मदत करतात. त्याच वेळी या मुलांपेक्षा आणखी लहान असणारी मुले ग्रामस्थ काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन माती अडवून बांध घालत असल्याचा खेळ खेळत असतात. यातूनच जलसंवर्धनाचे काम लहानापासून तरुण ते अगदी ९० वर्षीय वृद्ध महिलेच्या नसानसात कसे भिनले गेले आहे, हे दिसून येते. वॉटर कप स्पर्धेत सहभाग न घेतलेल्या गावांसाठी हे मार्गदर्शक म्हणून अतिशय प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

गावात जलसंवर्धनाची चळवळ उभी करण्यामध्ये गावातून मुंबईला आलेल्या तरुणांचा लक्षणीय वाटा आहे. यामध्ये सरकारी अधिकारी, खासगी क्षेत्रात काम करणारे तसेच इतरांनी मोठा हातभार लावला आहे. पाच दिवस मुंबईत काम करून हे तरुण आठवडय़ातील दोन दिवस गावी येऊन काम करतात. काही तरुण तर नोकरीची पर्वा न करता, गावाचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी अखंड o्रम घेताना दिसत आहेत.

२२ तारखेपर्यंत गावातील जलसंवर्धन करण्याचे काम संपवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यानंतर प्रति व्यक्ती एक रोप लावण्यात येणार असून, त्यासाठी सरकारची मदत घेण्यात येणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर रोपांची लागवड करून रोप वाढवण्याची जबाबदारी संबंधित गावकऱ्याकडे देण्यात येणार आहे. यामुळे या झाडांची निगा राखली जाऊन या गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाऊसमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज गावकरी व्यक्त करताना दिसतात.   सातारा जिल्हय़ातील दुष्काळाचा कलंक असणाऱ्या तीन तालुक्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असून, येथे मोठय़ा पातळीवर ग्रामसहभाग वाढत आहे. येणाऱ्या काळात ही गावे टँकरमुक्त होण्यासह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. आज ही o्रमदानाची चळवळ सातारा जिल्हय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आहे.

वॉटर कप ही स्पर्धा गावकऱ्यांच्या एकत्र येण्यासाठी निमित्त ठरले असून, दुष्काळ निवारणासाठी या गावकऱ्यांमध्ये हुंकार भरण्याचे काम स्पर्धेने केले आहे. या स्पर्धेने गावातील गट-तट, पक्ष, जातीयता, गरीब-o्रीमंत यांची असणारी मोठी दरी तोडण्याचे काम केले आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू पडते.

chandrakant.dadas@expressindia.com

First Published on May 13, 2017 12:38 am

Web Title: man taluka mahabaleshwar water issue