कोकणात यंदा आंबा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. आंब्यासाठी पोषक वातावरण कायम असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आंबा उत्पादनात १० ते २० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.

रायगड जिल्ह्य़ात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मात्र या उत्पादनात १० ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण कायम राहिल्याने, तसेच किडरोगाचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने आंबा उत्पादनात काही प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्याची प्रक्रिया सुरू होत असते. या पालवीला जानेवारी महिन्यात मोहर येतो. यंदा मात्र मोहर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे. एकूण उत्पादनक्षम क्षेत्रापकी जवळपास ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत फळधारणेचे प्रमाण समाधानकारक आहे. कोकणातील आंबा आता वाशीच्या मार्केटमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पण हे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे या आंब्याचे दर सध्या जास्त आहेत.

एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल. जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात आंबा बाजारात असेल असा अंदाज कृषी अधीक्षक के. व्ही. तरकसे यांनी व्यक्त केला. आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी मँगोनेट कृषी विभागाकडून मँगोनेट योजना राबविली जात आहे. यासाठी जिल्ह्य़ातील ८२५ बागायतदारांनी नोंदणी केली आहे. यातील २५८ बागायतदारांची सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दुसरीकडे आंबा पिकावरील किडरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी हार्टस्वॅप योजना सुरू करण्यात आली आहे. दर आठवडय़ाला आंबा बागांचे सर्वेक्षण करून बागायतदारांना किडरोग नियंत्रणासाठी सल्ला दिला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत रायगड जिल्ह्य़ात आंब्यावर फारसा किडरोगांचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. उत्पादकासाठी हीदेखील समाधानाची बाब आहे.

आंबा पिकासाठी पोषक वातावरण कायम असल्याने या वर्षी आंबा उत्पादनात १० ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. बाजारात सध्या कोकणातील आंबा कमी प्रमाणात दिसत असला तरी एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठय़ा प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल.

–  के. व्ही तरकसे, कृषी अधीक्षक, रायगड

यंदा दक्षिणेकडील राज्यामधील आंबा बाजारात लवकर दाखल झाला आहे. कोकणातील बागायतदारांसाठी ही एक चिंतेची बाब आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कोकणातील आंब्याला बाजारात चांगला भाव मिळतो. यंदा मात्र परराज्यातील आंब्यामुळे कोकणातील आंब्याला अपेक्षित दर मिळण्यात अडचणी येत आहे.

–  डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार

meharshad07@gmail.com