प्लास्टिक मिल्चग संकल्पना पाणी वाचवण्याच्या दृष्टीने शेतीत रूढ आहे. दुष्काळी किंवा पाणीटंचाईच्या परिस्थितीत असे अस्तरीकरण शेतीसाठी खूपच फायदेशीर ठरते. पण आता हेच तंत्रज्ञान धोधो पावसाळा अनुभवणाऱ्या भातशेतीतही अमलात येतंय. अर्थात, तण नियंत्रणासाठी हा सोपा आणि सुटसुटीत उपाय कोकणातील शेतकऱ्यांना सापडलाय.

कोकणातील शेतकरी सर्वप्रथम कोणतेही नवीन तंत्रज्ञान सहजासहजी स्वीकारत नाही, अशी कृषी शास्त्रज्ञांची ओरड असते. पण मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्यानेच कृषी विद्यापीठांतील संशोधन बांधापर्यंत पोचत नाही, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. एका बाजूला कोकणातील भातशेती संपुष्टात येत असताना भाताच्या जातीवर जाती प्रसारित करण्याचे कृषी विद्यापीठांचे धोरण त्याचेच द्योतक ठरते. त्यामुळे कृषी शास्रज्ञांना भातशेतीतील नेमक्या समस्याच समजलेल्या नाहीत, याचा दाखलाही मिळतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे अभ्यासपूर्ण स्वानुभवच भातशेतीच्या मदतीला पुढे येतात. असे स्वानुभवावर आधारलेले नवीन तंत्रज्ञान कोकणातील शेतकरी तेवढय़ाच प्रामाणिकपणे स्वीकारतात, याची प्रचीती ‘एसआरटी’ अर्थात ‘सगुणा राइस टेक्निक’च्या वाढत्या प्रसारातून स्पष्ट झाली आहे. अर्थात, नेरळचे प्रसिद्ध शेतकरी शेखर भडसावळे यांनी ‘एसआरटी’च्या प्रसारासाठी घेतलेले श्रम तेवढेच महत्त्वपूर्ण ठरतात.

‘एसआरटी’ने शेतकऱ्यांचा नांगरणी, भातरोपवाटिका निर्मिती आणि भातलावणीचा खर्च कमी केलाच, पण त्यांना पावसाळ्यानंतर दुसऱ्या पिकासाठी तयार वाफेही उपलब्ध करून दिले. मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान दिलासा देणारे ठरले. त्यामुळेच कोकणात सध्या अनेक ठिकाणी या तंत्रज्ञानाचा बोलबाला झाला आहे. यामध्ये एक मीटर रुंदी आणि सहा इंचापेक्षा जास्त उंचीचे वाफे तयार केले जातात आणि त्यात भात बियाण्यांची ठरावीक अंतराने पेरणी केली जाते. विशेष म्हणजे ही व्यवस्था शेतात कायमस्वरूपी होते. भाताचा पेंडा, गवत आणि इतर टाकाऊ पालापाचोळा टाकून या वाफ्याची डागडुजी केली जाते. त्यामुळे दरवर्षी उत्पादन दुप्पट होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

एसआरटीचे फायदे लक्षात घेऊनच कोकणात या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात स्वीकार झाला. कृषी विभागही याच्या प्रसारात पुढे आला आहे. फक्त यात एकच अडचण आहे ती म्हणजे तण नियंत्रणाची. या वाफ्यांवर तण नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करणे अपेक्षित असते.

पालघर येथील वाडा तालुक्यातील सांगे गावचे प्रगतिशील शेतकरी अनिल पाटील यांच्या स्वानुभवातून या तणनियंत्रणावर आता उपाय सापडला आहे.

पाटील यांनी सहा वर्षांपूर्वी उन्हाळ्यात प्लास्टिक मिल्चगवर किलगड लागवड केली होती. पावसाळ्यासाठी प्लास्टिक काढून भातलावणी करायची ही त्यांची पद्धत. पण एका ठिकाणचे प्लास्टिक काढायचे राहून गेले आणि या वाफ्यावरील प्लास्टिकच्या भोकातून भात रुजून सशक्तपणे उभा राहिल्याचे त्यांना आढळले. तेथूनच त्यांच्या प्लास्टिक आच्छादनावरील भातशेतीची सुरुवात झाली. गेली पाच वष्रे त्यांचा हा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे. त्यांच्या या अभ्यासाची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनेही (आयसीएआर) वाखाणणी केली आहे. दोन वर्षांपूर्वी आयसीएआरने हैदराबाद येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात पाटील यांना संशोधनाचे सादरीकरण करण्यास निमंत्रित केले होते. एसआरटीने नांगरणी आणि लावणीविरहित भातशेतीला चालना दिली तर पाटील यांनी त्याला तणविरहित भातशेतीची जोड दिली. शेतकऱ्यांच्या स्वानुभवातून किती फायदेशीर तंत्रज्ञान निर्माण होऊ शकते, याचे हे आदर्श उदाहरण ठरले आहे.

rajgopal.mayekar@gmail.com