चौथी पास दत्तात्रय व बारावी पास शंकर या जाधव बंधूंनी वडिलांच्या निधनानंतर शेती कसायला सुरुवात केली. वडिलोपार्जति खडकाळ व मध्यम स्वरूपाच्या तीस एकर जमिनीतून वर्षांकाठी पंचवीस हजारांचेही उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे दत्तात्रय यांनी नवा प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. वृत्तपत्रातील कृषी सदरे, शिबिरे यातून मिळालेल्या तोडक्या माहितीच्या आधारे जाधव बंधूंनी २००७ मध्ये खरबूज लागवडीचा केलेला पहिला प्रयोग त्यांना शेतीतून पसा पिकवण्याचे आत्मबळ देऊन गेला आणि नऊ वर्षांत जाधव बंधूंनी ‘बेड’ पद्धतीचा अवलंब करत नफ्यातून शेतीत ऐंशी लाखांची गुंतवणूक करून वर्षांला पंचवीस लाख रुपये नफ्याचे गणित ‘पक्के’ केले. आपल्याबरोबर परिसरातील चारशे शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीची कास धरायला लावून शेतीतून आíथक उन्नतीचा मार्ग दाखविला. सर्वत्र शेती आटबट्टय़ाचा व्यवहार, निसर्गाच्या लहरीपणामुळे तोटय़ात गेल्यामुळे अनेक शेतकरी गळफास जवळ करतात. अशा परिस्थितीत अल्पशिक्षित असलेल्या जाधव बंधूंनी मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतीमध्ये बदल घडवत शेतीतून आíथक उन्नती साधत शेतीही फायद्याचा व्यवसाय असल्याचा वस्तुपाठच घालून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये दत्तात्रय यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.

बीड तालुक्यातील उदंडवडगाव हे बावीसशे लोकवस्तीचे गाव. गावचे उत्पन्नाचे साधन म्हणजे पारंपरिक शेतीच. महादेव जाधव यांची वडिलोपार्जति खडकाळ व मध्यम प्रतीची तीस एकर शेती. ते पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने वर्षांकाठी पंचवीस-तीस हजारांचे उत्पन्न निघनेही कठीण. १९९२ साली महादेव जाधव यांचे निधन झाल्याने शेतीची जबाबदारी दत्तात्रय जाधव यांच्यावर आली. जाधव बंधू परिस्थितीनुसार शेतीच्या कामाला लागले आणि त्यातच रमले. मात्र वर्षांकाठी शेतीतून मिळणाऱ्या तोकडय़ा उत्पन्नामुळे दत्तात्रय यांनी शेती वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार सुरू केला. दत्तात्रय यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २००७ साली प्रायोगिक तत्त्वावर एका एकरवर खरबूज फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आणि या प्रयोगातून अवघ्या तीन महिन्यांत एका एकरमध्ये ११ टन खरबूज निघाले. आणि मुंबईत चोवीस हजार रुपये प्रति टनाने एकदम सव्वा दोन लाख रुपये हातात पडले. ५५ हजार रुपयांचा खर्च वजा जाता हातात पडलेला पसा नव्याने शेती करण्यासाठी आत्मबळ देऊन गेला. त्यामुळे जाधव बंधूंनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न सुरू केला.

वर्षांकाठी पंचवीस हजार रुपये हातात न पडणाऱ्या जमिनीतून तीन माहिन्यांत खर्च वजा जाता सव्वा दोन लाख रुपये मिळाल्याने जाधव बंधूंनी आधुनिक शेतीची कास धरली. २००९ मध्ये खरबूज पिकाची लागवड केली. मात्र पाणी कमी पडल्याने उत्पादन घटले. त्यामुळे त्यांनी कृषी विभागाकडून तातडीने १ कोटी लिटर क्षमतेचे सामूहिक शेततळे तयार करून घेतले आणि पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला. २०१० मध्ये पुन्हा ३ एकरात खरबुजाची लागवड केली, १५ एकरात सोयाबीन आणि कापूस लागवड केली. १५ एकरातील कापसाचे दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि सोयाबीनही दीड लाखांची झाली. पण तीन एकरांत लावलेल्या खरबुजाने साडेसात लाख रुपयांचा नफा मिळवून दिला. ही आधुनिक आणि प्रयोगशील शेतीची तफावत त्यांनी इतरांनाही लक्षात आणून दिली.

उत्पादन वाढल्याने जाधव यांनी मार्केटिंगसाठी टेम्पो खरेदी केला. २०११ मध्ये बेड पद्धतीने चार एकरांत गहू पिकाची लागवड केली. गव्हाची पेरणी नाही तर गहू हाताने लावला. बेड पद्धतीमध्ये साधारण उंचवटा करून बाजूला पाण्याची सर केली जाते. यामुळे जमीन भुसभुशीत तर राहतेच पण कमी पाण्यात चांगले पीक येते. याच पद्धतीने त्यांनी इतरही पिके घेतली. ढोबळी मिरची, खरबूज, काकडी, कोबी, सोयाबीन, गहू, झेंडू फूल ही पिके जाधव घेत आहेत. बेड पद्धत, ठिबक सिंचन, मिल्चग पेपर, पिकांना प्रोटेक्शन कव्हर (योग्य वातावरणासाठी) आदी आधुनिक प्रयोग करून जाधव कुटुंबीयांनी शेती संपन्न केली आहे. दत्तात्रय बंधू शंकर जाधव आणि त्यांच्या पत्नी हे चौघे जण सध्या शेती करीत आहेत. सोने देणाऱ्या या खडकाळ शेतीत जाधव यांनी ८० लाख रुपयांची गुंतवणूक केली. यामध्ये ठिबक सिंचन, जमीन लेव्हल, दोन विहिरी, पाइपलाइन, गुरांसाठी शेड, गोडाऊन, कार्यालय, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रान्स्फार्मर, शेतीला रस्ते, बोअर आदी मुबलक खर्च करून वर्षांला शेतीत १० लाख रुपये पिकांवर खर्च केला जातो. त्यातून २५ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे. २००७ पूर्वी जेमतेम २० ते २५ हजार रुपये उत्पन्न मिळायचे मात्र आता ते लाखांवर गेले आहे. जाधव यांनी परिसरातील ३५० ते ४०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन त्यांचेही आयुष्य उन्नत करण्यास मदत केली.

वादळात ११ लाखांचे शेडनेट उद्ध्वस्त

२५ मे २०१६ रोजी बीड जिल्ह्यत सोसाटय़ाचे वादळी वारे आले होते. वादळाचे एवढे रौद्ररूप होते की, या वादळात वटवृक्षही उन्मळून गेले. याच वादळात जाधव यांनी उभारलेले ११ लाख रुपयांचे शेडनेट उद्ध्वस्त झाले. आतमध्ये ४० टन उत्पन्न देणारी अर्धा एकरातील काकडीही उद्ध्वस्त झाली. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही जाधव यांना शासनाने रुपयाचीही मदत दिली नाही. विमा कंपन्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. नेट आणि पॉली हाऊस जळाले तरच आम्ही विमा संरक्षण देतो, असे कंपनीने सांगितले. कृषी आणि महसूल विभागाने पंचनामा केला, मात्र त्याचा अद्याप काहीच फायदा झाला नाही.

पारधी समाजाचे कामगार

जाधव यांच्या शेतीत २२ मजूर काम करीत आहेत. हे सर्वजण पारधी समाजाचे आहेत. ज्या समाजाच्या माथी गुन्हेगारीचा कलंक आहे त्यांना हक्काचा रोजगार देण्याचे काम दत्तात्रय यांनी केले. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी जाधव यांचे याबाबतीत विशेष कौतूक केले होते. या मजुरांना १५० ते २५० रुपये रोजगार आहे.

काळ्या आईने भरभरून दिले

चौथी पास दत्तात्रय जाधव यांना काळ्या आईने आíथक बाबतीत सधन तर केलेच. पण त्यांचा सामाजिक स्तरही उंचावला. प्रगतीशील शेतकरी म्हणवून घेतांना त्यांना अभिमान वाटतो. याबरोबरच दत्तात्रय हे कृषि विभागाच्या आत्माशी संबंधित असलेल्या समितीवर सदस्य आहेत, शेतकर्याना कर्ज वाटप करणार्या डीसीसी बँकेच्या समितीवर सदस्य आहेत, कृषि विभागाच्या यांत्रिकी उपक्रमासाठी सदस्य आहेत तसेच २०१३ मध्ये गुजरात येथे झालेल्या कृषि प्रदर्शनात नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विशेष सत्कार केला होता. अनेक पुरस्कारांनी दत्तात्रय हे सन्मानित आहेत.

vasantmunde@yahoo.co.in