15 December 2017

News Flash

तीन एकरांत १५ लाखांचे खरबूज उत्पादन

ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा सुयोग्य वापर तीन एकरात ५० टन खरबुजाचे उत्पादन घेण्यास

रवींद्र केसकर | Updated: April 29, 2017 12:38 AM

खरबूज उत्पादन

 

वर्षांनुवष्रे सुरू असलेल्या पारंपरिक शेतीला आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगाची जोड मिळाली तर आजमितीस शेती परवडणारी ठरते. शेतमालाला मिळणारा भाव आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्याने भूम तालुक्यातील वालवड येथील जािलदर मोहिते या पदवीधारक शेतकऱ्याने शेवगा आणि खरबुजाची शेती सुरू केली. यातून त्यांना पहिल्याच वर्षी १५ लाखांचे उत्पादन मिळाले. एवढेच नव्हे तर शेतमजुरांनाही त्यांच्या शेतीत दररोज काम मिळत असल्याने बेरोजगारीनरही काहीअंशी मात करण्यात मोहिते परिवाराचा वाटा आहे.

मोहिते बंधूंनी पारंपरिक शेती आणि शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव, यातून नवा मार्ग म्हणून नवनवीन पिके घेण्यावर भर दिला आहे. अशी शेती फायद्याचीही ठरू शकते आणि नुकसानीचीही. परंतु प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी आपला प्रयोग यशस्वी केला आहे. एम.कॉमचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या जािलदर मोहिते यांनी कमी पाण्यात व हवामानाच्या होणाऱ्या बदलावर मात करीत तीन एकर खरबूज पिकाचे अवघ्या १०० दिवसांत भरघोस उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यतील अनेक फळबागा पाणीटंचाई व प्रतिकूल हवामानामुळे नष्ट होणाऱ्या मार्गावर असताना मोहिते यांनी तीन एकरात खरबुजाचे तब्बल १५ लाखांहून अधिकचे उत्पादन घेतले. पाणी व फळबागेचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात मोहिते कुटुंबीय यशस्वी ठरले. ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा सुयोग्य वापर तीन एकरात ५० टन खरबुजाचे उठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा सुयोग्य वापर तीन एकरात ५० टन खरबुजाचे उत्पादन घेण्यास उपयुक्त ठरले. त्पादन घेण्यास उपयुक्त ठरले. आधुनिक काळातसुद्धा शेतीत प्रत्यक्ष कष्टाला पर्याय नाही, असे मत मोहिते कुटुंबीयांचे आहे. मोहिते यांनी प्रारंभी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत नोकरी केली. त्यांनी आपल्या बंधूंच्या सहकार्याने ४३ एकर जमीन विकत घेतली. पारंपरिक पीक घेणे हाच त्यांचा परिपाठ होता. २०१० पासून मोहिते हे शेती करतात. शेती कामासाठी त्यांना भावाबरोबरच बी. एस्सी शिक्षण घेत असलेला मुलगा प्रशांत याचीही साथ लाभली. २०१४ नंतर त्यांनी पारंपरिक तसेच शास्रोक्त पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

जमीन खडकाळ असल्याने फारसे उत्पादन नव्हते. जमिनीचा पोत सुधारणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी शेणखत व हिरवळीच्या खताचा वापर केला. शेती लावगडयोग्य झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतात दीड एकर क्षेत्रावर फौंडेशनवर (मांडवावर) दोडका लावला. सहा एकरावर शेवग्याची लागवड केली आणि तीन एकर क्षेत्रावर माधुरी आणि मृदुला या जातीच्या खरबुजाची लागवड केली. योग्य व्यवस्थापनामुळे वर्षभरातच त्यांना जोमदार उत्पादन सुरू झाले. याचवेळी त्यांनी शेतात पाण्यासाठी म्हणून डझनभर कूपनलिका घेतल्या. नशिबाने थोडीफार साथ दिली. दोन कूपनलिकांना चांगले पाणी लागले. या पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा शेतीसाठी पुरेसा वापर व्हावा यासाठी त्यांनी शेतात एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. आता त्यांना या शेततळ्याचा फायदा दिसू लागला असून त्यांची सुमारे १२ एकर जमीन पूर्णत ओलिताखाली आली आहे.

पारंपरिक पिकांना बगल देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात नवनवीन पिके घेतली तर शेती फायदेशीर ठरू शकते हे मोहिते यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर तोटय़ाचा व्यवहार समजली जाणारी शेती फायदेशीर ठरू शकेल, यात शंका नाही. सध्याची शेती नुकसानीची होत असल्याची ओरड होत आहे. मोहिते यांनी फळशेतीमधून फायदेशीर शेती कशी करावी याचा आदर्श दाखवून दिला आहे. त्याची फळशेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

मुंबईसह पुण्याची बाजारपेठ जिंकली

  • सध्या इतरत्र शेतीमालाला व भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे पिके रस्त्यावर फेकून देण्याची किंवा भाजीपाला मोफत घेऊन जा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
  • द्राक्ष, मोसंबीशिवाय अन्य पिकांचा उत्पादन खर्च व मिळणाऱ्या दराचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी उदासीन आहेत. मात्र, याचवेळी १०० दिवसांत तीन एकरमध्ये मोहिते यांनी त्यांच्याकडील माधुरी व मृदुला या जातीच्या खरबूज पिकाचे १५ लाखांहून अधिकचे उत्पादन घेतले, तर दीड एकरमध्ये लावलेल्या दोडक्याचे त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत आठ लाखांचे उत्पादन झाले आहे. आता त्यांच्याकडे सहा एकर शेवगा असून यातून त्यांना किमान आठ ते दहा लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे.
  • उस्मानाबादसह लातूर, सोलापूर बाजारपेठेत सध्या शेवगा कवडीमोल भावाने विकला जात आहे. मात्र मोहिते यांच्या शेवगा, खरबूज व दोडक्याने मुंबईसह पुण्याची बाजारपेठ जिंकली आहे. तेथे वालवडचा हा शेवगा प्रतिशेंग पाच ते सात रुपये दराने विकला जात आहे.

मनात काही तरी करण्याची उमेद होती. भावाचे, मुलांचे व पत्नीचे बळ मिळाले. चिकाटी, मेहनत आणि आधुनिक शेतीचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. तीन-चार वर्षांत शेतीत नंदनवन फुलले आहे.

जािलदर मोहिते, शेतकरी

ravindra.keskar@rediffmail.com

First Published on April 29, 2017 12:38 am

Web Title: melon production melon farming