18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

घरचा चारा नसेल, तर..दूध व्यवसाय तोटय़ाचाच

गायीमुळे वर्षभरात ३६५० किलो खत मिळते. सरासरी त्याची किंमत ३ हजार रुपये.

श्रीराम फडके | Updated: June 17, 2017 1:46 AM

देशातील दूध व्यवसायाची सद्य:स्थिती भयावह असून गाईंचा पोषणाचा खर्च आणि मिळणारे दुग्धोत्पादन यांचा मेळ घालणे कठीण होत आहे. त्यामुळेच दूध व्यवसाय तोटय़ात आहे.

एक गाय सरासरी १४ ते १६ लिटर दूध देणारी निवडली तर तिची किंमत ७० हजार रुपयांपर्यंत असते. लसूण घास १० किलो (५० रु.), ऊस १० किलो (५० रु.), कडबा कुट्टी ५ किलो, गव्हाचे भूस ५ किलो (१०० रु.), सरकी पेंड ६ किलो (१६० रु.), मिनरल मिश्रण १०० ग्रॅम (२० रु.), कास धुण्यासाठी हळद वाइनर औषध (१ रु.), दिवसाची एका माणसाची मजुरी (३५ रु.), आजारपण (२० रु.) असा एकूण ४३६ रुपये खर्च दिवसाला येतो. गाय सरासरी १५ लिटर दूध देते. एका लिटरला मिळणारा दर २६ रु. आहे. १५ लिटर दुधाची किंमत ३९० रुपये म्हणजेच शेतकऱ्याला आजही ४३६-३९०=४६ रुपये तोटा सहन करावा लागतो. घरचा चारा असेल तर १५४ रुपये शेतकऱ्याला मिळतात. एका वेतापासून ३०० दिवसांत सरासरी २५०० लिटर दूध मिळते. त्याद्वारे ६५ हजार रुपयांचे उत्पादन मिळते. गाईचे वासरू कालवड असेल तर वर्षांची किंमत १० हजार रुपये मिळते. वळू असेल तर तो दुसऱ्याच दिवशी कसायाला ५०० रुपयांत विकला जातो.

गायीमुळे वर्षभरात ३६५० किलो खत मिळते. सरासरी त्याची किंमत ३ हजार रुपये. म्हणजे एका वेतापासून ७८ हजार मिळतात. पण चारा विकतचा असेल तर २५ हजार ८०० रुपये तोटा होतो. यातून कालवड आणि खतांचे पैसे वजा जाता १२ हजार ८०० रुपये तोटा एका गाईमागे होतो. घरचा चारा असेल तरच दुग्धव्यवसायात काहीतरी लाभ मिळतो.

शेतकऱ्यास व्यापारी वा दुधउत्पादकाकडून गाईंची वंशावळ मिळत नाही. वंशावळ कार्यक्रमाचा दर्जाही खालावला आहे. देशातील पशुपालक, दुध काढणारे लोक प्रशिक्षित नाहीत. त्यामुळेच भारतातील दुग्धोत्पादनासमोर मोठे आव्हान आहे. परदेशात मागील १०० वर्षांत ठरावीक गाईंचा वंशावळ कार्यक्रम राबवून दूध उत्पादन वाढविले आहे. तेथील गाईच्या प्रत्येक वेतात सरासरी १० लिटर दूध आहे. चारही सडामधील दूध सारखे आहे. तेथे दुधातील स्निग्धांश पाहून दुधाला दर दिला जातो. दूध जमा केल्यानंतर लगेचच खाद्य, औषधे, बँक हप्ता यांचे पैसे कापून रोजच्या रोज खात्यावर पैसे जमा होतात.

स्वीडन, हॉलंड, इस्रायल यांसारख्या देशांत अत्याधुनिक मिल्किंग पार्लरमध्ये गाई केव्हाही जाऊन दूध देऊ शकते. त्यामुळे कासांचे आजार कमी होतात. पशुपालकाचा दर कमी असला तरी त्यास महागाई निर्देशांकानुसार मोठय़ा प्रमाणावर सबसिडी दिली जाते. वंशावळ कार्यक्रमही कालवड जन्माला येईल अशा प्रकारेच केला जातो.

परदेशात मांसासाठी पशुपालन वेगळे केले जाते. गाई, वराह, कोंबडय़ा, शेळी, मेंढी यांचे मांसासाठी उत्पादन घेतले जाते. भारतात दूध व्यवसायासाठी मिळणाऱ्या सोयीसुविधा तोटक्या आहेत. औषधे, पशुखाद्य यांचा दर्जा अतिशय खराब आहे. त्यामुळेच भारतात दुग्धव्यवसाय करणे म्हणजे एक आव्हानच आहे.

shriramfadake@gmail.com

(लेखक स्वत: दूध व्यावसायिक आहेत.)

First Published on June 17, 2017 1:45 am

Web Title: milk business dairy farm business