पर्यावरण संतुलित राहण्यात रोप, वृक्ष लागवडीचे महत्व अनन्यसाधारण आहे.  पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेला वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येतो.  यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. यात रोपवाटिका तथा  नर्सरींचे  स्थान उल्लेखनीय आहे. वेगळ्या पायवाटेने जाणाऱ्याही काही नर्सरी आहेत, त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा नर्सरीत समाविष्ट होणाऱ्या शैलेश नर्सरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर ( ता. शाहुवाडी) येथील सुबोध मनोहर भिंगार्डे यांची शैलेश नर्सरी म्हणजे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे.

भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमांची आणि बियाणांची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रित समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात. अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयदृष्टय़ा निपज मोठय़ा प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे , रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे, हा दृष्टीकोन ठेवून  सुबोध  भिंगार्डे कार्यरत आहेत.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
Vidarbha has huge potential for natural resource based industries
साधनसंपत्ती आहेच, उद्योगही हवे..

भिंगार्डे यांची चौथी पिढी या क्षेत्रात काम करीत आहे. सन १९८३ साली १२०० स्क्वेअर फुटांवर सुरू करून सध्या ३५ एकरात विस्तार झालेला आहे. त्या काळी (१९८३) मलकापूरसारख्या ठिकाणी नर्सरी व्यवसाय सुरू करणे म्हणजे हिमालयात आईस्क्रीम विकण्यासारखे अवघड काम होते. कारण, एवढी वृक्षसंपदा असताना झाडे लावणे वेडेपणाचे समजले जात असे. कृषी पदवीधर असून कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता भिंगार्डे यांनी आजोबांनी घालून दिलेल्या पायवाटेने पुढे जाण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. पुढे वडीलांनी त्यांना मोलाची साथ दिली.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर मलकापूरपासून रत्नागिरी रोडवर ४ किलोमीटर अंतरावर ही नर्सरी आहे. या ठिकाणी इनडोअर, आऊटडोअर, जंगली रोपे, मसाल्याची रोपे, आषधी वनस्पती तसेच अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचे संगोपन, संवर्धन व विक्री चालते. त्याचप्रमाणे विविध प्रकारची भारतीय तसेच परदेशी फळझाडे, शोभेच्या झाडांचेसुद्धा उत्पादन व विक्री केली जाते. विविध प्रकारची १५०० हून जास्त प्रकारची रोपे मिळतात. त्याचप्रमाणे अत्यंत दुर्मिळ वनस्पती उदा. स्टेनोकार्पस, मॅनीलोटा, ट्रिपलॅटीस, टॅबूबिया डोनाऊस्मी, अमर्शीया, लोन्काकार्पस इत्यादी.

रोपवाटिकेच्या प्रवासाविषयी भिंगार्डे सांगतात, आज आमची चौथी पिढी या ठिकाणी काम करीत आहे. आजोबांनी शेती चालू केली. आज माझा मुलगा अंगद व सुन मंजिरी व पत्नी अश्विनी यामध्ये पूर्ण वेळ काम पाहतात. सन १९८३ रोजी वडिलांच्या मदतीने १२०० स्क्वेअर फूटमध्ये पेरलेले नर्सरीचे बिज आज ३५ एकरांत विस्तारले आहे. मुलगा व सून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराचा विकास करीत आहेत. गेली ३५ वष्रे ३५ एकरांचा विविध अंगांनी विकास केला आहे. निसर्गप्रेमींमध्ये शैलेश नर्सरीचे नाव, विश्वासार्हता आणि सचोटी यासाठी प्रसिद्ध आहे. शैलेश नर्सरी या नावावर लोकांची पावले आमच्या नर्सरीकडे वळतात. आणि निसर्गाचा आनंद द्विगुणीत करतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हाच आदर्श आम्ही नवीन पिढीपुढे ठेवत आहोत.

वॉकीटॉकीवर नर्सरीचा कारभार

सुमारे ३५ एकरावर पसरलेली नर्सरी सुमारे १०० ते १२५ लोक सांभाळतात. सर्वाशी संपर्कासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जातो. त्यासाठी १५ वॉकीटॉकी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्याद्वारे ग्राहकांच्या अडचणी किंवा माहिती एकमेकांना देता येते. व ग्राहक हाताळणे सोपे जाते. नेट बँकिंगचा वापर गेल्या ७ वर्षांपासून होत आहे. डेबीट-क्रेडीट कार्ड स्वीकारले जातात. एकूण विक्रीपकी जवळजवळ ५० टक्के विक्री इंटरनेटद्वारे होते. विविध भागात रोपे पाठविण्यासाठी वाहतुकीची उत्तम व्यवस्था नर्सरीकडून उपलब्ध करून दिली जाते.

२५ गुंठय़ात नर्सरीचे गार्डन सेंटर

सुमारे २५ गुंठे क्षेत्रावर कोल्हापूर-रत्नागिरी हायवेलगत नवीन नर्सरीचे गार्डन सेंटर उभारले जात आहे. त्यामध्ये विविध प्रकारची रोपे तसेच गार्डनसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे गार्डन सेंटर कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील एक महत्त्वाचे ठिकाण होईल, या पद्धतीने विकसित केले जात आहे. या ठिकाणी फॅन्सी कुंडय़ा, हत्यारे, गार्डनसाठी लागणाऱ्या सुबक वस्तू, खते, पुस्तके इ. सर्व काही लॅण्ड स्केिपगसाठी येथे पर्वणीच उपलब्ध होईल.

कालावधीनुसार रोपवाटिका

  • तात्पुरती रोपवाटिका : कमी जागेत व कमी कालावधीमध्ये रोपे तयार केली जातात आणि विक्री करतात.
  • कायम रोपवाटिका : या रोपवाटिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर कलमे व रोपे तयार करतात. अशा रोपवाटिका रेल्वे व रोडपासून अगदी जवळ हव्यात. त्यामुळे रोपांची व कलमांची विक्री सोयीची होते.

रोपवाटिकेचे महत्त्व

  • सावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात.
  • कमी जागेत मोठय़ा प्रमाणावर रोपे तयार करता येतात.
  • रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.
  • रोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते.
  • रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इत्यादी.
  • रोपांना पाणी, खते वेळेवर देऊन चांगली वाढविता येतात.
  • उत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.

dayanandlipare@gmail.com