18 January 2018

News Flash

रोपवाटिकेचा शेतीपूरक पर्याय

शेतीला अनुकूल धोरण राबवण्याची भाषा शासन करत असले तरी अनेकदा उलटे वागते.

दयानंद लिपारे | Updated: April 21, 2017 3:44 PM

 

कधी दुष्काळ, कधी महापूर तर कधी अमाप पिकूनही भाव कोसळलेले अशा संकटांचा सामना शेतकरी वर्षांनुवष्रे करीत आला आहे. वरून त्याला सल्ला दिला जातो की, शेती शास्त्रीय पद्धतीने कर, नियोजनाची जोड दे, आधुनिक तंत्रज्ञान वापरीत जा.. वगरे वगरे. त्याचीही शेतकऱ्याला ना नसते. पण, अडचणी काय कमी असतात का? एक ना अनेक. निसर्गाची अडचण नित्याचीच झालीय. नियोजनबद्ध शेतीमध्ये पशाची अडचण ही गंभीर बाब असते. हंगामनिहाय नेमकी कोणती पिके घ्यावीत याचे नियोजन फसते. कोणत्याही पिकाचे किमान दीड महिना आधी नियोजन केले तर स्वत:च स्वत:ची रोपे तयार करता येतात आणि तिच रोपे वापरून पीक घेणे शक्य आहे. तथापि अनेक शेतकरी याचे नियोजन करीत नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या रोपांवर अवलंबून राहतात. अशा शेतकऱ्यांना रोपे पुरविण्याच्या निमित्ताने काही शेतकरी नर्सरी किंवा रोपवाटिका हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायामध्ये उत्पन्न उत्तम मिळते. कारण ऐनवेळी रोपांची मागणी करणारा शेतकरी चांगली रक्कम मोजून रोपे विकत घेत असतो. कित्येक शेतकरी रोपे विकून श्रीमंत झाले आहेत. पिचलेल्या बळीराजाला श्रीमंत करणारा हा व्यवसाय होय. यामध्ये कमी किमतीचे बी आणून त्याची उत्तमरीत्या रोपे तयार करून ती योग्य भावाला विकली जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापर, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि रोप लागण पद्धतीतील विविधता यायुळे हा व्यवसाया दिवसेंदिवस विस्तारतो आहे. कृषी विस्ताराचे महत्त्वाचे कार्य करणारा हा व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराने कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान अशा सर्वच आघाडय़ांवर हायटेक होऊ लागलेला आहे.

शेतीला अनुकूल धोरण राबवण्याची भाषा शासन करत असले तरी अनेकदा उलटे वागते. जिल्हा परिषदेचे कृषी विभाग एकेक योजना बंद करीत शेतकऱ्यांचे हातपाय बांधण्याचे उद्योग सुरू आहेत. यामुळे रोपवाटिका, नर्सर आदींना अधिक महत्त्व आलेले आहे. तेच आता परिणामकारक काम करू लागले आहेत. आज अनेक भागांमध्ये रोपवाटिकांचा पट्टाच तयार झाल्याचा दिसतो. विशिष्ठ भागात रोपवाटिका व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे वाढलेला पाहावयास मिळतो. त्यामुळे ते परिसर या व्यवसायामुळे ओळखले जातात. किंबहुना, अशा रोपवाटिका, नर्सरींनी त्या-त्या गावांची नवी ओळख निर्माण केली आहे.

नवनवीन कृषिसंशोधन, नवीन वाण, प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांशी उत्तम संवाद आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिविस्ताराचे महत्त्वाचे काम ही मंडळी नेटाने करताना दिसतात. या व्यवसायातील व्यावसायिक दृष्टिकोनामुळे कोटय़वधींची उलाढाल रोज होत असते. मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती केली जाते. कृषिपूरक अनेक व्यवसायांना या व्यवसायाने तेजीचे दिवस दिले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळाची तीव्रता वाढत गेल्याने या व्यवसायाला अवकाळ येऊ लागली होती. बऱ्याच रोपवाटिका बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. रोपांना पुढे शेतकरी ग्राहकच नव्हते. त्यामुळे मोठय़ा आवर्तनात हा व्यवसाय आला होता.

आजही बदलते हवामान, कुशल मनुष्यबळाचा अभाव, महागडे अद्यावत तंत्रज्ञान आणि याची उपलब्धता अशा काही अडचणींना ही मंडळी सामोरे जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचा निसर्ग कशी साथ देतो, या आशेने ही मंडळी उभारी घेण्यासाठी सज्ज आहेत.  मात्र हे करताना रोप विकणाऱ्यांची विश्वासार्हता महत्त्वाची असते. विश्वासार्हता ही या व्यवसायाची पहिली पायरी मानली जाते. जी मंडळी वर्षांनुवष्रे या व्यवसायात स्थिरस्थावर झाली आहेत, त्याच्या पाठीशी याच एका भक्कम मुद्दय़ाचा मोठा आधार आहे.

आज कोणी भाजीपाल्याच्या रोपांची नावीन्यपूर्ण अशी निर्मिती करतो आहेत, कोणी उसाच्या विविधतेची आणि संकटांवर सहज मात करतील, अशा रोपांची निर्मिती करत आहे. एका बाजूला ‘टिश्यूकल्चर’ रोपांची निर्मिती होते, त्याच वेळी निवड पद्धतीने चांगल्या दर्जाच्या रोपांचीही निर्मिती केली जाते. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार त्याला पुरवठा करण्याचे कसब या मंडळींनी आत्मसात केले आहे. विक्री पश्चात विविध सोयी आणि सुविधा दिल्याने शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. अनेक छोटय़ा-मोठय़ा गावातील रोपवाटिका, नर्सरीधारकांच्या दिमतीला कौशल्यासह उभ्या आहेत. मात्र, शासन अजूनही विद्यापीठांच्या संशोधनावावर आणि कृषी विस्तारावर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक चांगले निर्णय, नवीन संशोधन आणि चांगले वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत, असे चित्र आहे. खऱ्या अर्थाने या छोटय़ा व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय शासनाने घेणे आवश्यक आहे.

  • रोग व किडींचा रोपवाटिका क्षेत्रात शिरकाव रोखण्यासाठी हरितगृहांना असलेले पडदे, त्यावर बसवलेल्या कीटकरोधी जाळ्या, दरवाजे यांचा बरोबर वापर करावा. रोपवाटिकेच्या प्रत्येक विभागात काम करणाऱ्यांनी आणि वावरणाऱ्यांनी स्वच्छता पाळणे आवश्यक असते.
  • रोपवाटिकेच्या एकूण क्षेत्राची विभागणी ही उत्पादन क्षेत्र, साठवणूक क्षेत्र आणि विक्री क्षेत्र या तीन विभागांत केलेली असावी.
  • दुसऱ्या विभागात ट्रे, पिशव्या, कुंडय़ा इत्यादी ओळीत मांडण्यासाठी साध्या किंवा बांधीव वाफ्यांची योजना असावी. जरुरीप्रमाणे अशा वाफ्यांवर जाळीची किंवा प्लॅस्टिकची ६० सें. मी. उंची असलेली टनेल्स उभी करता येतील, असे प्रयोजन हवे. रोपांची मांडणी करताना वाफ्यांची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी.
  • रोपवाटिकेचा पहिला आणि दुसरा विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सांभाळावा. काम करणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशास मज्जाव करावा.
  • तिसऱ्या विभागात विक्रीयोग्य रोपांची मांडणी करून ठेवावी, या विभागात ग्राहकांना फिरून रोपे बघता येतील, अशी व्यवस्था असावी.
  • बा वातावरणातील बदलत्या घटकांपासून उगवलेल्या रोपांचे किंवा रुजणाऱ्या कलमांचे संरक्षण व्हावे म्हणून अनेक रोपवाटिकांमधून हरितगृहासारख्या साधनाचा वापर करावा. समयसूचकता बाळगून बदलत्या परिस्थितीप्रमाणे योग्य निर्णय घेतले तर उपलब्ध गोष्टींचा वापर करूनही तापमान, प्रकाश, आद्र्रता अशा परिणामकारक घटकांवर सहज नियंत्रण मिळवता येते.

dayanandlipare@gmail.com

First Published on April 15, 2017 12:23 am

Web Title: nursery farming options
  1. No Comments.