30 October 2020

News Flash

वाणांच्या जतनाची शाश्वत दिशा

लोकपंचायत संस्था गेली दोन दशके या परिसरात या शाश्वत शेती विकासासाठी कार्यरत आहे.

सेंद्रिय शेतीचा प्रसार किंवा पारंपरिक वाणांच्या जतन संवर्धनाचे प्रयत्न विविध स्थरांवर सुरू आहेत. मात्र गावरान वाणांचे बीज संवर्धन तसेच सेंद्रिय शेती, शेतमालाची मूल्यवृद्धी आणि त्याला शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन होत असणारे प्रयत्न क्वचित पाहायला मिळतात. या पाश्र्वभूमीवर संगमनेर (जि. अहमदनगर) येथील लोकपंचायत संस्थेचे या संदर्भातील काम निश्चितच दिशादर्शक स्वरूपाचे आहे.

लोकपंचायत संस्थेने शाश्वत शेती पद्धत रूढ करण्यासाठी बळीराजा कृषक प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना केली, मात्र त्यातून एक परिपूर्ण सामाजिक उद्यमशीलता उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात पर्यावरण रक्षण, स्त्री-पुरुष समानता व विश्वासार्ह व्यापार प्रणाली या तत्त्वांना आधारभूत मानले आहे.

लोकपंचायत संस्था गेली दोन दशके या परिसरात या शाश्वत शेती विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेने कृषक पंचायत कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव पातळीवर पुरुष व महिला शेतकऱ्यांचे स्वारस्य गट (कॉमन इंटरेस्ट ग्रुप) उभारले व त्यांच्यासोबत गावरान बीज संवर्धन, सेंद्रिय शेती, शेतमालाची मूल्यवृद्धी करून वैशिष्टय़पूर्ण उत्पादने विकसित करणे असे उपक्रम संगमनेर-अकोले तालुक्यात सुरू केले आहेत.

अकोले तालुक्यातील चाळीस गाव डांगाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ भागात राहणारा आदिवासी समाज शेतीबरोबरच जंगलावरही अवलंबून आहे. वैशिष्टय़पूर्ण रानमेव्याला शाश्वत बाजारपेठ मिळावी या उद्देशाने गाव पातळीवर वनोपजक संकलक व प्रक्रिया गटांची बांधणी करण्यात आली. कृषी व वन आधारित उपजीविका सशक्त करताना तयार होत असणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे महत्त्वाचे होते. त्यातूनच प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना करण्यात आली.

ही संकल्पना लहान शेतकरी डोळ्यासमोर ठेवून विकसित केली गेली आहे. विशिष्ट माल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादित केलेला माल आहे तसा किंवा प्रक्रिया करून बाजारपेठेत विकावा हा या मागचा उद्देश आहे. कृषक पंचायत कार्यक्रमातील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन बळीराजा कृषक प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना इ. स. २००९मध्ये करण्यात आली, राज्यातील आद्य उत्पादक कंपन्यांपकी एक अशी कंपनीची ओळख आहे.

वैशिष्टय़पूर्ण सेंद्रिय, गावरान शेतमालाला व जंगलातील नसíगक वनोपजाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने जरी बळीराजा कंपनी स्थापन झाली असली तरी उपजीविकेच्या साधनाचे संवर्धन व्हावे, यासाठी लोकपुढाकारातून नसíगक साधन संपत्तीची शाश्वत व्यवस्थापन प्रक्रिया घडणे आवश्यक आहे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बळीराजा कंपनी सामाजिक उद्यमशीलतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कंपनीच्या कामकाजात महिलांना प्राधान्य दिले जात आहे, निसर्गस्नेही अशी आíथकदृष्टय़ा परवडणारी शाश्वत शेती व सेंद्रिय पद्धतीने गावरान वाणांचे उत्पादन घेणे, त्यासाठी स्थानिक स्रोतांचा वापर करणे, गावरान बीज पिकविण्यासाठी सातत्यपूर्ण उपक्रम घेणे, आम्ही पिकवलेला शेतमाल हा सेंद्रियच आहे, असा विश्वास व हमी देणारी व्यवस्था गावपातळीवर उभी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अकोले तालुक्यातील सुवासिक काळभात, देवठाण बाजरी तसेच खांद्या भूईमुग, खपली गहू, मालदांडी ज्वारी, कडू वाल, नागली, बटू व नानाविध कडधान्य यांना योग्य बाजारपेठ मिळवून दिली जात आहे.

सह्य़ाद्रीतील सातेरी माशीचा मध, हिरडा, करवंद, आंबा, जांभूळ या नसíगक वनोत्पादनांवर प्रक्रिया करून विक्री होत आहे. आदिवासी महिला व पुरुषांच्या संकलक गटांना गावपातळीवर माल खरेदी करण्याची सुविधा बळीराजा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. शाश्वत पद्धतीने वनोपजाचे संकलन व्हावे, यासाठी संकलक गटांसोबत काम करून शाश्वत वनोपजक संकलनाची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे व तिच्या वापरातून जंगल संवर्धनाची एक लोककेंद्री संस्कृती निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे विजय सांबरे यांनी सांगितले.

आजमितीला बळीराजाचे १०८ महिला व २४९ पुरुष असे एकूण ३५७ भागधारक आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह ८ संचालक कारभार पाहतात. कृषी व वन उत्पादनांच्या विक्रीसाठी संगमनेर येथे इर्जकि ऑरगॅनिक स्पॉट हे विक्री दालन सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी काळभात, देवठाण बाजरी, खपली गहू, वरई, नाचणी, कडू वाल, मांजा कुळीद, विविध प्रकारची कडधान्ये तसेच जंगली मध, जांभूळ व ज्युस पावडर, करवंद, लोणचे व सरबत आदी एकूण ३२ सेंद्रिय उत्पादनांची विक्री केली जाते, अशी माहिती व्यवस्थापक गंगाधर चारुडे यांनी दिली. त्याशिवाय निंबोळी पावडर, तेल, गांडूळखत यांचीही विक्री बळीराजा कंपनी करते.

संगमनेर व अकोले तालुक्यातील ४० गावांतील ७० उत्पादक गट व दीड हजारपेक्षा जास्त शेतकरी कुटुंब ज्यात मुख्यत: आदिवासी मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व अल्प भूधारक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत विशेष काम सुरू आहे. अकोले – संगमनेरबरोबरच पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तसेच नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे. आज कंपनीची वार्षकि उलाढाल ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. राज्यातील एक अभिनव प्रयोग म्हणून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यू एण्ड डीपी) नाबार्ड तसेच अन्य शासकीय, अशासकीय यंत्रणांनी याची दखल घेतली आहे. कृषी जैवविविधता संगोपनाच्या दृष्टीने पारंपरिक मिश्र पीक पद्धतीचा पुरस्कार संस्थेमार्फत केला जात आहे, त्यात इरवड (१५ पेक्षा अधिक धान्य व कडधान्याचे पेरणी) व माळीव (२२ पेक्षा अधिक भाजीपाल्यांची लागवड) या पीक पद्धतींना प्रोत्साहन दिले जात आहे. महिला गटांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा व अकोले तालुक्यातील धामणवन येथे गावरान बीजकोष कार्यान्वित झाले आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग हा शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा पर्यावरणस्नेही, स्थानिक जैवविविधतेचे जतन, सवंर्धन करणारा असावा याचे भान या सर्व उपक्रमांत राखले असल्याचे चारुडे म्हणाले.

प्रकाश टाकळकर

prakashtakalkar11@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2017 1:30 am

Web Title: organic farming in maharashtra
Next Stories
1 कोरफड : एक श्रीमंती फड
2 एक किलोचा.. रायपुरी पेरू
3 चंदनाचे नंदनवन कधी?
Just Now!
X