25 November 2017

News Flash

सेंद्रिय शेतीचा बहर

संतोष पाटील हे कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे पदवीधर.

दयानंद लिपारे | Updated: July 15, 2017 1:24 AM

 

कोल्हापूर जिल्ह्य़ात वाळवा तालुक्यातील संतोष सुरेश पाटील यांनी त्यांच्या बोरगावमध्ये सेंद्रिय शेतीचे  प्रयोग केले आहेत. जमिनीची सुपीकता, उत्पादन वाढीसाठी केलेल्या त्यांच्या प्रयोगाला यशाची फळे लागल्याचे पाहून आता गावातील अन्य शेतकरीही याच मार्गाने शेती करत आहेत.

शेती करताना प्रयोगशीलतेवर भर द्यायचा. अधिक उत्पादन घेतल्याचे प्रथम आपण सिद्ध करायचे आणि नंतर गावकऱ्यांनाही त्यासाठी उद्युक्त करायचे. ‘चमत्कार तेथे नमस्कार’ याची खात्री पटल्यानंतर अन्य शेतकरीही मग त्याच यशोमार्गाने जाण्याचा निश्चय करतात. यातून पिकलेली शेतीच आपला उंचावलेला आलेख दाखवत दिमाखाने बहरत राहते. असे प्रयोग आता हळूहळू अनेक गावांमध्ये होऊ लागले आहेत. वाळवा तालुक्यातील संतोष सुरेश पाटील यांनी त्यांच्या बोरगावमध्ये सेंद्रिय शेतीचे काटेकोर प्रयोग केले आहेत. जमिनीची सुपीकता, उत्पादन वाढीसाठी केलेल्या त्यांच्या प्रयोगाला यशाची फळे लागल्याचे पाहून आता गावातील अन्य शेतकरीही याच मार्गाने शेती करत आहेत.

संतोष पाटील हे कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे पदवीधर. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेला दोन-तीन वेळा सामोरे गेलेले. यशाने हुलकावणी दिल्याने पुढे घरच्या आग्रहास्तव एमबीए केले खरे. पण जीव गुंतला होता तो शेतीत. पहिल्यापासून शेतीची आवड असल्याने पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी  एकत्र कुटुंबपद्धती. चौघे चुलतभाऊ. त्यातील एकजण बी. एस्सी अ‍ॅग्री झालेला. सोबतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय. दोघे पुण्यात. संतोष हे घरच्या संपूर्ण ६० एकर शेतीचा पसारा सांभाळणारे. ५० गुंठय़ावर ग्रीनहाऊस. त्यात काकडीचे, ऑर्केड याचे उत्पादन घेतले जाते .

घरच्या शेतीवाडी आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे प्रयोजनविषयी कथन करताना संतोष पाटील म्हणाले,  आमची ४० एकर जमीन बोरगाव, ता. वाळवा येथे तर १७ एकर कडेगाव येथे आहे. बोरगावची जमीन काळी आणि काही दिवस नदीबुड अशी आहे, तर कडेगावची जमीन थोडी माळरानाची आहे. दोन्ही ठिकाणी ऊस, हळद, आले, सोयाबीन, भुईमूग तसेच ऊसात कोबी, फ्लावर अशी आंतरपिके घेतो. चार-पाच वर्षांपूर्वीपर्यत चुलते शेती बघत होते. त्याच्या पद्धतीने उसाचे एकरी ८०-९० टनांचे सरासरी उत्पादन होते. वर्षांला ७००-७५० टन ऊस जातो. परिसरातील राजारामबापू, हुतात्मा, कृष्णा या कारखान्यांना ऊस जातो. आमच्या घरात शेतीची चांगली परंपरा आहे. मात्र, सातत्याने एकच पीक आणि सेंद्रीय खताअभावी जमिनी चिबड होऊ लागल्या होत्या. त्यामुळे उत्पादनात घट येताना दिसत होती. त्यामुळे सेंद्रिय शेतीवर भर देण्याचे ठरवून त्यानुसार शेती कसण्यास सुरुवात केली .

सध्या ४० एकरात ऊस आहे. को- ८६०७२ ही व्हरायटी असते. सहा फूट बाय २ फूटावर लागण केली जाते. लाख-दोन लाख रोपे लागतात. ती स्वत जागेवर तयार केली जातात. बाहेरून एक रोपही विकत आणले जात नाही.

पाडेगावहून फांऊडेशनचे बियाणे आणुन त्यापासून रोपे तयार केली जातात. चार किलोमीटरवर नदीहून स्वतची पाईपलाईन आणलेली आहे. १५ एच.पीची मोटरवर बहुतेक सर्व क्षेत्राला खास करून ऊसाला पाटानेच पाणी दिले जाते. हळद, आले व इतर पिकांसाठी मात्र ठिबक सिचंनाचा वापर केला जातो. केळी, सोयाबीन, गव्हू, हरभरा, शाळू, भुईमूग ही पिके सेंद्रिय पद्धतीने पिकविली जातात. घरापुरते त्याचे उत्पादन घेतले जाते. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात वाढ झाली. सोयाबीन मध्ये दोन ते तीन क्विंटल वाढ झाली आहे, तर केळी  मध्ये एकरी पाच टन वाढ झाली आहे.

अशी फुलवतो शेती

  • जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी आणि घटते उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खते वाढविली आहेत. यामध्ये आम्ही संपूर्ण क्षेत्राला शेणखत देऊ शकत नाही. म्हणून वेगवेगळ्या सेंद्रिय खत उत्पादकांना २० गुंठय़ाचे प्लाट करून प्रयोग आणि खात्रीसाठी दिले होते. यामध्ये आम्हाला महालक्ष्मी कृषीराज सेंद्रिय खताला प्राधान्य दिले आहे. त्यांची खते भट्टी करून टप्प्याटप्प्याने देण्याची पद्धती परिणामकारक आहे.
  • पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये आळवण्या, फवारण्या आणि भरणीबरोबरची खते यामुळे गेल्या तीन वर्षांत आम्हाला १० ते १५ टक्के उत्पादनात वाढ झाली आहे. आता आमचे उत्पादन १०५ टनांच्या पुढे गेले आहे. गतवर्षी आमचे एकूण ऊस उत्पादन ८४० टनांपेक्षा जास्त झाले आहे. शिवाय जमिनीच्या सुपीकतेमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.
  • भु-सुधारकांचा वापरही अधिक परिणामकारक ठरलेला आहे. टप्प्याटप्प्याने यंदा आम्ही आमचे ४० एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणलेले आहे. आमचे प्रयोग पाहून आमच्या बोरगाव गावात १०० एकरावर सेंद्रिय शेती केली जाते आहे. आम्हाला पाण्याची कमतरता नाही. मात्र, उन्हाळ्यात पिके कशी साथ देतात, यावर किमान एकरी ११० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळेल, असा विश्वास वाटतो.

dayanandlipare@gmail.com

First Published on July 15, 2017 1:24 am

Web Title: organic farming kolhapur