20 November 2017

News Flash

भाजी उत्पादक शेतकऱ्यांना ‘पॉलिटनेल’ची साथ

पॉलिटनेलसाठी एकपदरी २०० दशलक्षांश मीटर जाडीच्या अतिनील किरण प्रतिरोधक फिल्मचा वापर करण्यात येतो.

योगेश म्हेत्रे | Updated: August 19, 2017 1:03 AM

कोबीवर्गीय पिकांचे बी बारीक असल्याने गादीवाफ्यावर काळजीपूर्वक रोपे तयार करून रोपांची लागवड करावी लागते. संकरित वाणाचे बियाणे खूपच महाग असल्याने निरोगी रोपे तयार करून कमी बियाण्यात अधिक क्षेत्रावर लागवड करणे आवश्यक आहे. बाहेरील हवामानापासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी नियंत्रित वातावरणात रोपे तयार केल्यास अधिक फायदा होतो. यासाठी पॉलिटनेलचा उपयोग रोपे तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतो. पॉलिटनेलद्वारे हरितगृहातील पिकांना मिळणारे सर्व फायदे व संरक्षण सर्वसामान्य शेतकऱ्यास रोपवाटिका तयार करण्यासाठी कमी किमतीत मिळतात.

यामध्ये लोखंडी सांगाडा, पॉलिफिल्म (उष्णतेपासून बचाव करणारा प्लास्टिकचा कागद) आणि शेडनेट या तीन प्रमुख घटकांचा उपयोग करण्यात येतो. यामुळे रोपवाटिकेचा हवामानातील हानीकारक बदलापासून बचाव करणे शक्य होते. निरोगी, खात्रीशीर अशी भाजीपाला रोपवाटिका अत्यंत कमी क्षेत्रावर व कमी खर्चात तयार होते. पॉलिटनेल उभारणीत लोखंडी सांगाडा, पॉलिफिल्म आणि शेडनेट या तीन घटकांचा खालीलप्रमाणे वापर करण्यात येतो.

सांगाडा – संरक्षित पॉलिटनेलचा साांगाडा १० बाय ४ बाय ६ फूट या मापाचे दोन अर्धगोलाकार सांगाडे वापरून करतात. यासाठी १० मिमी. ६. मिमी लोखांडी सळ्या व २५ बाय २५ बाय ३ लोखंडी पट्टय़ांचा वापर करतात. हा सांगाडा पॉलिफिल्म, शेडनेट इत्यादी घटकांना आधार देण्यासाठी आवश्यक ठरतो.

पॉलिफिल्म – पॉलिटनेलसाठी एकपदरी २०० दशलक्षांश मीटर जाडीच्या अतिनील किरण प्रतिरोधक फिल्मचा वापर करण्यात येतो. त्यामुळे रोपांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पॉलिफिल्ममुळे अवेळी पाऊस, गारपीट, धुके, कडक उन्हाळा यांसारख्या हानीकारक बदलांपासून रोपांचे संरक्षण होते. पॉलिटनेलमध्ये रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असलेली आद्र्रता आणि तापमान याांचे प्रमाण हंगामानुसार व आवश्यकतेनुसार नियंत्रित करणे अथवा वाढवणे शक्य होते. यामुळे उन्हाळ्यातही रोपांची वाढ चाांगली होते.

शेडनेट – रोपे वाढीच्या विविध अवस्थेत वातावरणातील प्रखर सूर्यकिरणांपासून पॉलिटनेलमधील रोपांचे संरक्षण करण्यासाठी आणि आतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ५० ते ७५ टक्के शेड्नेटचा वापर करता येतो. उन्हाळ्यात नियमित आणि हिवाळ्यात आवश्यकतेनुसार दुपारच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी शेडनेटचा वापर केल्यास उन्हाळ्यातही रोपांची चांगली वाढ होते. शिवाय बिगरहंगामी रोपवाटिकाही तयार करणे शक्य होते.

पॉलिटनेल तयार करण्यासाठी दर चौरस फुटास केवळ १२ ते १५ रुपये खर्च येतो. एका २० बाय ६ फूट आकाराच्या संरक्षित पॉलिटनेलमध्ये पिकांच्या प्रकारापासून गादीवाफ्यावर एकावेळी सर्वसाधारण ५००० ते १२००० रोपे वाढविता येतात. पॉलिटनेलमध्ये तापमान नियंत्रित राहात असल्याने रोपांची जोमदार व एकसारखी वाढ होते. पॉलिटनेलमध्ये प्रक्रिया केलेल्या मातीचे लहान लहान वाफे तयार करावे. बीजप्रक्रिया करून ओळीमध्ये बी पेरावे व नियमित पण नियंत्रित पाणी द्यावे. म्हणजे आद्र्रता योग्य राखली जाऊन रोपांची जोरदार वाढ होते. पॉलिटनेलमध्ये २२ ते २५ दिवसांत रोपे तयार होतात. रोपांची लागवड मुख्य शेतात करण्याअगोदर त्याची मुळे कार्बेन्डॅझिमच्या ०.१ टक्के द्रावणात बुडवून घ्यावी. पॉलिटनेलमध्ये तयार केलेल्या रोपांची लागवड सायंकाळी करावी. म्हणजे त्यांना वातावरणातील बदलांचा धक्का लागत नाही. आणि कमी खर्चात निरोगी रोपवाटिका तयार करणे शक्य होते.

ydmehetre@kkwagh.edu.in

First Published on August 19, 2017 1:03 am

Web Title: polytunnel beneficial for vegetable farming