30 October 2020

News Flash

डाळिंबाला ‘तेल्या’ने ग्रासले

शेती हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| एजाजहुसेन मुजावर

शेती हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते. पुरेसा पाऊस व अनुकूल हवामानाची साथ असल्यास मोठय़ा काबाड कष्टाने लागवग केलेली पिके हाती येतात. परंतु त्याचवेळी कृषी बाजारपेठांमध्ये मालाला अपेक्षित उठाव असेल तर शेतक ऱ्याला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतात. शेतीमालाचे उत्पादन जास्त झाले आणि उत्पादनाचे दर कोसळले तर शेतक ऱ्याला मोठा फटका बसतो. या चक्रव्यूहातून शेतकऱ्याची सहजासहजी सुटका होत नाही. अलीकडे शेती उत्पादन खर्च वाढला असताना तेवढय़ा प्रमाणात उत्पन्न मिळत नाही, असा शेती क्षेत्रातील सार्वत्रिक निराशेचा सूर ऐकायला मिळतो. यातच आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे एकाचवेळी कोसळली तर शेतकऱ्याचे भवितव्यच धोक्यात येते. सध्या दुर्दैवाने सोलापूर जिल्ह्य़ातील डाळिंब उत्पादक शेतकरी अशाच आसमानी आणि सुलतानी संकटातून जाताना दिसून येतात. ‘तेल्या’ हे या संकटाचे नाव!

डाळिंबाला अधूनमधून ग्रासणाऱ्या तेल्या रोगाने आता पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तेल्या रोगाने डाळिंबाला ग्रासले असून त्यात कोणताही दिलासा मिळण्याऐवजी उलट, त्यात उत्तरोत्तर वाढ होत चालल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांवर तर डाळिंबाच्या बागाच काढून टाकण्याइतपत संकट ओढवले आहे. तेल्या रोग आटोक्यात आणायचा तर त्यासाठी औषधांची मोठय़ा प्रमाणात फवारणी करून बागांची निगा राखावी लागते. महागडी औषधे खरेदी करून योग्य नियोजनाद्वारे फवारणी करणे हे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. त्यासाठी कर्ज काढून बागा वाचविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शेवटी नशिबात काय लिहून ठेवले आहे, याची शाश्वती नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र सांगोला, पंढरपूर भागात दिसून येते.

एकेकाळी दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात सांगोला, मंगळवेढा या भागातील दुष्काळाचे संकट हे नित्याचेच झाले होते. कमी पर्जन्यमान, कोरडवाहू जमीन, अनुकूल हवामान यामुळे सांगोल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याच्या माळरानावर २५ वर्षांपूर्वी शंभर टक्के शासकीय अनुदानातून डाळिंब लागवडीचा कार्यक्रम फाटक्या शेतकऱ्यांना दिला होता. जिद्द,  चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर गरीब शेतकऱ्यांनी आपापल्या कोरडवाहू शेतात डाळिंबाच्या बागा लावल्या आणि थोडय़ाच काळात त्याचे चांगले दृश्य परिणाम दिसून आले. एकेकाळी पाण्याविना दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोल्याच्या माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलत गेल्या. डाळिंब उत्पादनाच्या माध्यमातून सांगोल्यात फलोत्पादनाची जणू क्रांतीच झाली. प्रभाकर चांदणे, विजय येलपले (अजनाळे), शिवाजी येलपले (मंगेवाडी), कोंडिबा सिद, आनंद जाधव, नामदेव सिद, बाळासाहेब काटकर (वाकी शिवणी) अशा अनेक शेतकऱ्यांनी मोठय़ा परिश्रमातून डाळिंबाच्या बागा फुलविल्या, त्यांचा विस्तार केला. इतर छोटय़ा गरीब शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून डाळिंब लागवडीसाठी उद्युक्त केले. परिणामी, सांगोल्यातील शेती क्षेत्राचा मोठा कायापालट आर्थिक सुबत्ता आली. दहा एकर क्षेत्रात तब्बल दोन कोटी रुपयांचे उत्पन्न घेणारे डाळिंब उत्पादक शेतकरी प्रकाशात आले. फाटक्या शेतकऱ्यांच्या घरी खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदू लागली. पत्र्यांचे छप्पर जाऊन आलिशान घरे आली. बंगले आले. अंगणात चार चाकी मोटारी आल्या. आर्थिक संपन्नतेमुळे या शेतकऱ्यांची पत वाढू लागली. बैलगाडी, एसटी बस किंवा फार तर खासगी मोटार किंवा रेल्वे या पलीकडे प्रवास माहीत नसलेल्या सांगोल्याचा हा बहाद्दर डाळिंब उत्पादक शेतकरी विमानाने नवी दिल्ली, कोलकोता, चेन्नई यांसारख्या दूरदूरच्या महानगरांमध्ये जाऊन तेथील बाजारपेठांमध्ये स्वत:च्या डाळिंबाची निर्यात करू लागला. इतकेच नव्हे तर लंडनच्या शेती बाजारातही सांगोल्याचे डाळिंब भाव खाऊ लागले. अशा या वाटचालीत डाळिंबाला काही वर्षांपूर्वी तेल्या रोगाने प्रथमच ग्रासले. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेपेक्षा स्वत: शेतकऱ्याचेच कष्ट, धडपड कामाला येत गेली.

सांगोल्याच्या आसपासच्या भागात तेल्या रोग आता नवा राहिला नाही. त्याची डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सवय झाली आहे.  मात्र वरच्यावर तेल्या रोगाचे ग्रासण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी येणारा खर्च वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांची ही डोकेदुखी ठरली आहे. कृषी खात्याने पुणे विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्य़ात सध्या ४१ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड असून त्यापैकी आतापर्यंत १७ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रातील डाळिंबाला तेल्या रोगाने पछाडले आहे. यात सांगोल्यात १४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रापैकी ७९४५ हेक्टर क्षेत्रात ‘तेल्या’ वाढला आहे. पंढरपुरात १० हजार १८५ हेक्टर क्षेत्रापैकी २३८८ हेक्टर क्षेत्रात डाळिंबाला तेल्याने ग्रासले आहे. माळशिरस भागात ६७०७ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास निम्म्या म्हणजे ३३६८ हेक्टर क्षेत्रातील डाळिंब तेल्या रोगामुळे धोक्यात आहे. मोहोळ, करमाळा या भागांतही डाळिंबाला तेल्याने पछाडले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी खाते आता जागे झाले आहे. फलोत्पादन पिकांवरील किडरोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (एचओआरटीएसएपी) कृषी खात्याने गेल्या १६ ऑगस्टपासून हाती घेतला आहे. हा प्रकल्प पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत चालणार आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी पर्यवेक्षकांमार्फत तेल्या रोगाने ग्रासलेल्या डाळिंब बागांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम अद्यापि पूर्ण झाले नाही. यात मनुष्यबळाची कमतरता सांगितली जाते. आर्थिकृष्टय़ा जास्त नुकसान होत असलेल्या डाळिंब बागांमध्ये शास्त्रज्ञांना पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्याची सुरुवात आज तरी झाली नाही, असे दिसते.

तेल्या रोगाचा फटका डाळिंबाला बसत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता स्वत:ची काळजी स्वत: घेण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी जोपासली आहे. तेल्या रोगावर आळा घालण्यासाठी तेलकट डाग प्रभावित बागेतील पाने, फुले व फळे काढून टाकावीत व ती गोळा करून नष्ट करावीत. छाटणी अवजारे सोडियम हायपोक्लोरेट (२.५० टक्के) रसायनात पडवून र्निजतूक करून घ्यावीत. बाग तणविरहीत ठेवावी, बोर्डी मिश्रणाच्या एक टक्का द्रावणाची फवारणी दर आठवडय़ात करावी, कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांची फवारणी करीत असताना शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क लावावा, हॅन्डग्रोजसारख्या साधनांचा वापर करून मगच फवारणी करावी, बागेची मशागत व उपाययोजना करताना डाळिंब झाडांची व्यवस्थाही पाहावी, अशा आशयाचा सल्ला शास्त्रज्ञ तथा अनुभवी शेतकरी देतात.

सोलापूर जिल्ह्य़ात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव काही वर्षांपूर्वी झाला असला तरी देशात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम १९५२ साली कर्नाटक, आंध्र प्रदेश व राजस्थानातील डाळिंबावर आढळून आला. तेल्या (बॅक्टेरियल ब्लाईट) रोगामुळे डाळिंबासाठी आव्हान ठरले आहे. कर्नाटकातून २००० साली महाराष्ट्रात या रोगाने शिरकाव केल्यानंतर २००३ साली सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील काही डाळिंब बागांवर हा रोग दिसून आला. नंतर हा रोग झपाटय़ाने वाढत गेला आहे. पाने, फुले, फांद्या, खोड व फळांवर हा रोग होतो. पानावर रोगाची सुरुवात होते. पानावर लहान आकाराचे लंबगोलाकार ते आकारहीन पाणथळ तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येऊन नंतर हे डाग काळपट रंगाचे होतात. डागांच्या कडेला पिवळसर वलय दिसते.यावरून तेल्या रोग ओळखणे सोपे जाते. डाग मोठे झाल्यानंतर पाने पिवळी पडून वाळू लागतात व पानगळ होते. फूल व कळीवरील रोगांची लक्षणे पानांसारखीच  असतात. नंतरच्या काळात रोगग्रस्त फळाला तडे जातात व फळे सुकतात. फळांचा दर्जा खालावतो. परिणामी फळाना बाजारभाव मिळत नाही. या रोगामुळे ४० ते ५० टक्के बागांचे नुकसान होते. परंतु वाढीला पोषक वातावरण  असेल तर हे नुकसानीचे प्रमाण अगदी ७० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. पावसाळी हवामानात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. २८ ते ३८ अंश सेल्सियस उष्ण हवामान, वाढती आद्र्रता, अधूनमधून कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण, अशा स्थितीत तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आणखी वाढतो. सध्या सोलापूर जिल्ह्य़ात नेमकी अशीच नैसर्गिक स्थिती असल्याने नजीकच्या काळात डाळिंबाला पडलेल्या तेल्या रोगाचा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता वाटते.

उत्पादन खर्च वाढला

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्य़ात डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. परंतु तेथे तेल्या रोगाने डोके वर काढले आहे. त्याचा फटका शेतक ऱ्यांना बसू लागला आहे. आपण एकरी उत्पादन यापूर्वी १५ टनांपर्यंत घेत होतो. त्यात आता घट होऊन ८ ते १० टनापर्यंत डाळिंब उत्पादन घेणे शक्य झाले आहे. उत्पादन खर्च वाढला असताना मिळणारे उत्पन्न कमीच आहे. त्याचा दोष कोणाला द्यावा?    – एम. बी. वालीकर, डाळिंब उत्पादक (इंडी)

रोगट हवामानाची भर

३५ अंश सेल्सियसपेक्षा पुढे गेलेले तापमान, वाढती उष्णता, ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी यामुळे सांगोला भागात डाळिंबाला पछाडलेला तेल्या रोग इतक्यात आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाही. तर उलट, त्यात आणखी वाढच होण्याची भीती आहे. शासकीय यंत्रणा अद्यापि कामाला लागलेली दिसत नाही. औषधांची फवारणी व छाटणी व्यवस्थापन करणे गरजेचे वाटते. जानेवारी महिन्यात घेतलेल्या आंबे मोहोराच्या डाळिंबाला तेल्या रोगाचा फटका सहसा बसत नाही. मात्र या उत्पादित मालाला दर कमी मिळतो.    – प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अ. भा. डाळिंब उत्पादक शेतकरी संघ

उत्पादनात घट

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची आवक मोठय़ा प्रमाणात होते. गेल्या वर्षभरात तब्बल १३६ कोटींची उलाढाल डाळिंबाच्या माध्यमातून झाली होती. यंदा तेल्या रोगामुळे डाळिंबाचे उत्पादनात घट झाली आहे. विशेषत: तेल्या रोगग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ासह शेजारच्या कर्नाटकातील डाळिंबाची आवक घटली आहे. तर नाशिक, नगर व पुण्याच्या काही भागांतून डाळिंबाची आवक लक्षणीय आहे. कारण तेथील डाळिंब तेल्यामुक्त आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होणाऱ्या एकूण डाळिंबामध्ये सोलापूर व कर्नाटकातील डाळिंबाची आवक ३० टक्के होती. हे प्रमाण आता तेल्या रोगामुळे निम्म्यापेक्षा कमी म्हणजे १५ टक्क्यांच्या खाली आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2018 1:33 am

Web Title: pomegranate agriculture in maharashtra
Next Stories
1 उसाइतके उत्पन्न देणारे ज्वारीचे नवे वाण
2 मोत्यांची शेती!
3 रोपवाटिकेला आधुनिकतेचा आयाम
Just Now!
X