22 January 2018

News Flash

डाळिंबाच्या पिकाला भविष्याची चिंता

आतापर्यंत या डाळिंब पिकाने अनेक शेतकऱ्यांना चांगला मदतीचा हात दिला आहे.

मिच्छद्र ऐनापुरे | Updated: August 5, 2017 12:43 AM

डाळिंब पीक अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. कमी पाण्यात येणारे पीक दुष्काळी भागातील शेतकऱ्यांबरोबरच सर्वच भागातील शेतकऱ्यांसाठी पशाचे झाड ठरले आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत डाळिंबाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असल्याने त्याच्याबाबतीत वेगळीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. डाळिंबाला मिळत असलेला कमी भाव, प्रक्रिया उद्योग व निर्यातक्षम उत्पादनाचा अभाव यामुळे ही चिंता उभी राहिली आहे.

आतापर्यंत या डाळिंब पिकाने अनेक शेतकऱ्यांना चांगला मदतीचा हात दिला आहे. अनेक शेतकरी आíथक बाबतीत सक्षम होऊन त्यांचे राहणीमानही उंचावले आहे. त्यामुळे हे पीक महाराष्ट्र राज्यात सर्वदूर पसरले. दुष्काळी भागातून डाळिंब पीक सधन भागातही पोहचले आहे. त्यातल्या त्यात सांगली, सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, जालना, बीड आदी जिल्ह्यांत डाळिंबाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. सांगली, सोलापूर हे जिल्हे तर डाळिंबाचे आगारच म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत बाजारात आवक वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी डाळिंबाला प्रति किलो २० ते ३५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. तो आता १० ते ९० रुपयांपर्यंत मिळत आहे. राज्यातून बंगळूरु, चेन्नई, दिल्ली, गोरखपूर, अहमदाबाद, गोवा, मुंबई आदी शहरांकडे माल पाठवला जातो. शिवाय विविध शहरांमधूनही मागणी आहे. पूर्वी आवक मर्यादित होती. शिवाय अलीकडे डाळिंबावर पडणाऱ्या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी औषधांची निर्मितीही झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, त्यामुळे उत्पादन वाढत आहे. बाजारात आवक वाढली की आपोआप भाव कमी होतात. हीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. सध्या या संकटात डाळिंब पीक अडकले आहे. पूर्वी म्हणजे तीन वर्षांपूर्वी एका एकरात शेतकऱ्याला ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळत होते. शिवाय संशोधनाच्या माध्यमातून डाळिंबावर पडणाऱ्या विविध किडींवर मात करण्यासाठी अनेक औषधे बाजारात उपलब्ध झाली. त्यामुळे पिकावरील रोगांचे प्रमाण कमी झाले. सध्याच्या परिस्थितीत एकरात फक्त १ ते २ लाखांचेच उत्पन्न मिळत आहे. डाळिंबाचे पीक घेण्यासाठी खर्चही मोठा आहे. फवारणी आणि मजुरीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे केलेला खर्च तरी निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. नोटाबंदीनंतर सगळ्याच फळांचे बाजार कोसळले होते. लागवड क्षेत्र आणि उत्पादनात वाढ  याचा परिणाम भावावर होत आहे. डाळिंबाचा हंगाम हा सप्टेंबर, ऑक्टोबपर्यंत चालतो. त्यानंतर गुजरात, राजस्थान येथील डाळिंबाचे उत्पादन सुरू होते. त्या काळात परराज्यातील मागणी कमी होते. डाळिंबाचे उत्पादन जास्त होत आहे आणि देशातील बाजारपेठेची मर्यादा आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसमोर निर्यात हाही एक पर्याय आहे. डाळिंबावर प्रक्रिया उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारने संशोधनास प्राधान्य देण्याची गरज आहे.

प्रक्रिया उद्योगाची गरज

डाळिंबाची बाजारातील आवक अशीच राहिली तर त्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सगळ्याच जिल्ह्यांत जवळपास दोन ते तीनपटीने डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा यासाठी प्रक्रिया उद्योग आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. प्रक्रिया उद्योग स्थापन्याची आवश्यकता असून यात दिरंगाई धोकादायक ठरणार आहे.

ainapurem1674@gmail.com

First Published on August 5, 2017 12:43 am

Web Title: pomegranate crop future issue
  1. No Comments.