नाचणीच्या रचनेमुळे शास्त्रज्ञांना संशोधनात मर्यादा आल्या. कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संशोधनाला टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्यातील धान्यसंशोधनाला एक वेगळीच दिशा दिली आहे.

दुर्लक्षित कोकणची दुर्लक्षित नाचणी. येथे लोक डोंगरउतारावर नाचणी लावतात. पण हे डोंगरउतार आज उजाड आहेत. जेथे भातशेतीच ओसाड तेथे डोंगरउताराचे आणखी काय होणार? खरे पाहता कोकण कृषी विद्यापीठाने भाताचे अनेक वाण विकसित केले आहेत. त्यांची यशस्वी बियाणेनिर्मितीही सुरू आहे, पण नाचणीत दापोली १आणि दापोली सफेद-१ यापुढे विद्यापीठाला जाताच आले नाही. ही कोंडी आता फुटली असून दापोली-२ ही टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने विकसित केलेली जात विद्यापीठाने तयार केली आहे. या जातीमुळे कोकणात सुधारणांसाठी टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाला पहिल्यांदाच जोड मिळाली आहे.

loksatta ulta chashma raj thackeray
उलटा चष्मा : असेही सेवा पुरवठादार..
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

मुळात नाचणी हे अतिशय हळवे आणि नाजूक पीक. रोपावस्थेत त्याला शेंडाकरपा रोग येणे आणि त्यामुळे रोपांचे नुकसान होणे ही कोकणातील नेहमीची तक्रार. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या रोगाला प्रतिकार करणाऱ्या वाणाचा ध्यास २० वर्षांपूर्वी घेतला. त्याला यश येऊन दापोली-१ या नाचणीच्या वाणाचा जन्म झाला. कोकणातील विविध भागांतील उत्तम जातीचे वाण शोधून निवड पद्धतीने जास्त उत्पादन देणारे आणि शेंडाकरपा रोगाला प्रतिकारक असे वाण विकसित करण्यात आले. यात शेंडाकरपा आणि जास्त उत्पादनाचे उद्दिष्ट साधले असले तरी नाचणीच्या रंगात मात्र शास्त्रज्ञांना यश आले नाही. तिची भाकरी काळसरपणाकडे झुकणारीच ठरली. त्यातूनच २०१२मध्ये निर्माण झाले दापोली सफेद-१ चे वाण. या सफेद रंगाच्या वाणाने नाचणीची पांढऱ्या भाकरीकडे आगेकूच करण्यात कोकण कृषी विद्यापीठाला यश आले. पण नाचणीच्या संशोधनातील अडचण अजूनही सुटली नव्हती. कोणत्याही वाणाची गुणवैशिष्टय़े १५ वर्षांनंतर कमी होत जातात. या दोन्ही वाणांचे असेच होणार, हे शास्त्रज्ञांना माहीत होते. १५ वर्षांनंतर या वाणाची निर्मिती प्रक्रिया त्यांना पुन्हा नव्याने करावी लागणार होती. एका बाजूला नाचणीच्या संशोधनातील मर्यादा आणि दुसऱ्या बाजूला वाणांमध्ये वैविध्यता आणण्यात आलेली अडचण यामुळे कोकण कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक संतोष सावर्डेकर यांनी २००९ पासून नाचणीच्या संशोधनात टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पाऊल उचलले. त्यातूनच नाचणी संशोधनातील कोंडी फुटली.

संशोधनातील अडचण

भातावर एवढे संशोधन कसे, त्याचे एवढे वाण कसे याचा विचार केला तर ते भाताच्या फुलोऱ्यावरून स्पष्ट होते. ही फुले मुळात सकाळी फुलतात. त्यात पर-परागीभवन शक्य असल्याने कृत्रिमरीत्या किंवा हवा आणि कीटकांद्वारे त्यांचे संकरीकरण होते. त्यामुळे एकाच शेतात अनेक गुणवैशिष्टय़े असलेले भातबियाणे तयार होते किंवा तसे कृत्रिमरीत्या तयारही केले जाऊ शकते. नाचणीच्या फुलांची रचना मात्र अशी नसते. मुळात रात्री फुलणाऱ्या या फुलांच्या पाकळ्या थोडय़ाशा उमलतात. त्यातही स्त्रीकेसर आणि पुंकेसर त्याच फुलात असल्याने त्यात आपोआप परागीभवन होते. त्यामुळे नाचणीमध्ये वेगवेगळी गुणवैशिष्टय़े असलेल्या बियाण्यांची निर्मितीच होत नाही. तसेच संकरीकरणाने चांगल्या बियाणांची निर्मितीही करता येत नाही. त्यामुळे डॉ. सावर्डेकर यांनी केलेला टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी ठरला.

नाचणीची उत्तम वाणनिर्मिती

एका नाचणीच्या दाण्यापासून टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने पेशी वेगळ्या करून एक क्लोन तयार करण्यात आला. या क्लोनचे एक हजार रोपांत रूपांतर करण्यात आले. या रोपांचे मूल्यांकन करून एक आशादायक वाण निवडण्यात आला. त्याची अठराशे रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली. त्यातील चांगले पोषणमूल्य असलेले, शेंडाकरपा रोगाला प्रतिकारक, जास्त उत्पादन देणारे आणि आकर्षक रंगाचे धान्य देणारे वाण निवडपद्धतीने विकसित करण्यात आले. याला सात वर्षे लागली. विशेष म्हणजे दापोली-१ हे वाण प्रतिहेक्टरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन देत असताना या नवीन वाणाने प्रतिहेक्टरी २० क्विंटलचा आकडा पार केला आहे. तीन वर्षांच्या प्रक्षेत्र चाचणीत या वाणाने अनुक्रमे २५.५ क्विंटल, १८.८२ क्विंटल आणि २६.७ क्विंटल एवढी उत्पादनाची नोंद केली आहे. त्याची भाकरीही दापोली-१ पेक्षा उजळ ठरली. याचे बियाणे पुढील वर्षी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

केळीनंतर प्रथमच धान्याकडे

मुळात टिश्यूकल्चर तंत्रज्ञान केळी आणि डाळिंबासाठी राज्यात वापरले जाते. कोकण कृषी विद्यापीठातही २०११ पासून सफेद वेलची केळीची रोपे टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने तयार करण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या वर्षी अशी दहा हजार रोपे तयार केल्यानंतर यंदा २५ हजार रोपांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

rajgopal.mayekar@gmail.com