20 November 2017

News Flash

चंदनशेतीला तस्करीची वाळवी

‘चंदनम वने वने’ असे एका सुभाषितात म्हटले असले तरी देशात सर्वत्र चंदनाची झाडे कमी

प्रकाश टाकळकर | Updated: May 13, 2017 3:52 AM

एकीकडे चंदनवृक्षांची मोठय़ा प्रमाणात होत असणारी तस्करी आणि दुसरीकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यावसायिक स्वरूपात चंदन लागवडीचा अभाव, चंदन लागवडीबाबतची शासनाची उदासीनता, त्याबाबतचे क्लिष्ट कायदे या पाश्र्वभूमीवर अलीकडेच राज्यात काही ठिकाणी चंदनशेतीचे प्रयोग सुरू झाले आहेत. चंदन लागवडीला शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य लाभल्यास राज्यात चंदनाचा सुगंध पुन्हा दरवळू लागेल. अकोले (जि.अहमदनगर) येथे नुकतीच शास्त्रीय व व्यावसायिक पद्धतीने चंदन लागवडविषयक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विख्यात चंदन वैज्ञानिक अनंतपद्मनाभन व निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक अरिवद भांगरे यांनी चंदनशेतीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा सारांश..

zभारतीय संस्कृतीमधील चंदन वृक्षाला विशेष स्थान आहे. ‘चंदनम वने वने’ असे एका सुभाषितात म्हटले असले तरी देशात सर्वत्र चंदनाची झाडे कमी अधिक प्रमाणात आढळतात. एका अर्थाने चंदन ही भारत देशाची संपत्ती आहे. पण विविध ठिकाणी विपुल प्रमाणात असणाऱ्या चंदन तस्करीची वाळवी लागली असून देशातील चंदनाचे वृक्ष झपाटय़ाने कमी होत आहेत. एकेकाळी चंदनाच्या जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ८५ टक्क्यांपर्यंत होता, तो आता जेमतेम २० टक्क्यांपर्यंत आला असून लवकरच देशाला आपली गरज भागविण्यासाठी चंदन आयात करावी लागेल काय? अशी स्थिती आहे. एकीकडे चंदनवृक्षांची मोठय़ा प्रमाणात होत असणारी तस्करी आणि दुसरीकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यावसायिक स्वरूपात चंदन लागवडीचा अभाव, चंदन लागवडीबाबतची शासनाची उदासीनता, त्याबाबतचे क्लिष्ट कायदे या पाश्र्वभूमीवर अलीकडेच राज्यात काही ठिकाणी चंदनशेतीचे प्रयोग सुरू झाले आहेत. चंदन लागवडीला शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य लाभल्यास राज्यात चंदनाचा वास पुन्हा दरवळू लागेल.

चंदन ही मूळ भारतीय वनस्पती आहे. रामायण, महाभारतातही चंदनाचे उल्लेख आढळतात. इंडोनेशियामधून चंदन भारतात आले, असे काही जण म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही ही मूळ भारतीय प्रजाती असून चंदनाला पाच ते सात हजार वर्षांचा इतिहास आहे. जगात चंदनाच्या ५६ प्रकारच्या जाती असून त्यात भारतीय चंदन सर्वात चांगले समजले जाते. पानथळ जमीन सोडून कोणत्याही निचरा होणाऱ्या जमिनीत चंदन येऊ शकते. दगडाळ जमिनीतील चंदनात सुवासिक गाभ्याचे प्रमाण जास्त आढळते. चंदनाला उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. समुद्रसपाटीपासून अठराशे मीटर उंचीपर्यंतच्या भूभागात तसेच सहाशे ते सोळाशे मिलिमीटर वार्षकि पर्जन्यमान चंदनाला उपयुक्त आहे. चंदन ही एका अर्थाने परावलंबी वनस्पती आहे. कारण चंदनाची मुळे जमिनीतून अन्नपाणी शोषून घेऊ शकत नाहीत तर दुसऱ्या झाडांच्या मुळातून चंदनाची झाडे अन्न ग्रहण करतात. चंदनाची मुळे त्यामुळे जमिनीत १० मीटपर्यंत पसरू शकतात. त्यामुळे चंदनाला वाढीसाठी एखाद्या यजमान वनस्पतीची आवश्यकता असते. लहान वयात चंदन दुसऱ्या झाडाच्या छायेत वाढते मात्र नंतर त्याला उन्हाची आवश्यकता असते. चंदनाच्या झाडाची उंची १२ ते २० मीटर तर गोलाई १ ते २.४ मीटपर्यंत असते. चंदनाचे तेल त्याच्या गाभ्यात असते त्यामुळेच चंदनाचा गाभा हा महत्त्वाचा असतो. नसíगकरीत्या चंदन अतिशय सावकाश वाढते. नसíगकरीत्या झाडांची गोलाई दर वर्षी १ सेंटीमीटरने वाढत असते.

राज्यात अनेक ठिकाणी चंदनाची झाडे विपुल प्रमाणात आढळून येत होती, पण चंदन तस्करीमुळे त्यांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. चंदनाची फळे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. पक्षांच्या विष्ठेद्वारे चंदनाचा प्रसार होतो. त्यातून ठिकठिकाणी चंदनाची झाडे उगवतात. हळूहळू ही झाडे मोठी होतात, मात्र अचानक एका रात्रीत ती गायब झालेली दिसतात. जंगलातील, शेताच्या बांधावरील एवढेच नव्हे तर एखाद्या बंगल्याच्या आवारातील झाडे ही अशाच प्रकारे रातोरात गायब झाल्याचे आढळते. चंदनाच्या झाडाला बाजारात प्रचंड किंमत मिळते मात्र चंदनाच्या बाबतीत समाजात प्रचंड अज्ञान व उदासीनता आढळून येते. यामुळे चंदन चोरीच्या बाबतीत सहसा तक्रारीही दाखल होत नाहीत. या झाडाबाबतचे कायदे, त्याचे उपयोग, बाजारातील त्याची किंमत याबाबत सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ आहे. त्यामुळेही चंदन तस्करांचे फावते.

राज्यात दरवर्षी वनखात्यामार्फत मोठय़ाप्रमाणात वृक्ष लागवड केली जाते, अनेक ठिकाणी वनशेतीचे प्रयोगही राबविले जात आहेत मात्र यात चंदनाच्या लागवडीचा कोठेही समावेश असल्याचे आढळून येत नाही. शास्त्रीय आणि व्यावसायिक पद्धतीने चंदनाची लागवड केल्यास संबंधीतांना मोठा आíथक लाभ मिळू शकेल. ऑस्ट्रेलियासारख्या देशात दरवर्षी व्यावसायिक पद्धतीने सुमारे सात साडेसात हजार एकर क्षेत्रात भारतीय चंदन शास्त्रज्ञ अनंतपद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली गत पंधरा वर्षांपासून चंदन लागवड केली जात आहे. अन्य काही देशातही चंदन लागवडीसाठी ते मार्गदर्शन करतात. मात्र देशात अथवा राज्यात याबाबत उदासीनता आहे. मध्य प्रदेशात थोडय़ाफार प्रमाणात काही व्यावसायिकांनी चंदन लागवड केली आहे पण राज्यात मात्र अद्याप त्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नव्हते. अलीकडेच मराठवाडय़ासारख्या दुष्काळी प्रदेशात चंदनाची लागवड करण्यात आली आहे. सॅण्डलवूड सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र विभागीय संचालक किशोर राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाडय़ातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्’ाांमध्ये २९२ एकर क्षेत्रात चंदनाची लागवड करण्यात आली. या तीन जिल्’ाांत ८७ चंदन फार्म आहेत. मराठवाडय़ात ७०० एकरांपर्यंत चंदन लागवडीचे नियोजन असल्याचे राठोड यांनी सांगितले.

शास्त्रशुद्ध पद्धतीने चंदनाची लागवड केल्यास पंधरा वर्षांत चंदनाचे झाड तोडण्यायोग्य हेते. तेव्हा चंदनाच्या झाडाच्या गाभ्यात ३.५ टक्क्यांपर्यंत तेल तयार झालेले असते. चंदनाच्या मुळापासून फुलापर्यंत प्रत्येक घटकाला वेगवेगळी किंमत मिळते. शास्त्रशुद्ध पद्धतीने चंदनाची लागवड केल्यास पंधरा वर्षांत चंदन झाडापासून २० ते २५ किलो गाभा (हार्ट वूड) व त्यापासून ३ ते ३.५ टक्के चंदन तेल प्राप्त होऊ शकते. आज देशात मागणीपेक्षा चंदनाचे उत्पादन खूपच कमी आहे. चंदनाच्या तोडणीचा पंधरा वर्षांचा कालावधी दहा वर्षांपर्यंत कमी करण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहेत. कृत्रिमरीत्या चंदनाचे तेल करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. जगात १९६ देशांना चंदनाची गरज आहे. चंदनाची जागतिक मागणी सहा हजार टनांपेक्षा अधिक असून उत्पादन मात्र हजार बाराशे टनांच्या आसपास आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे तरी चंदनाची मागणी सातत्याने वाढतच राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिक पद्धतीने चंदनशेतीला मोठा वाव आहे. दोन वर्षांपूर्वीच केंद्र पुरस्कृत औषधी वनस्पती योजनेत चंदनाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे चंदन लागवडीला अनुदानही मिळू शकते. अर्थात चंदनाची चोरी हा या प्रयत्नातील सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच शासनाच्या कृषी, वन, महसूल या सर्वच विभागांमध्ये या बाबतीत उदासीनता आहे. त्यामुळे व्यावसायिक चंदन लागवडीच्या प्रयत्नांना अद्यापही म्हणावे त्या प्रमाणात यश आलेले नाही.

१९१० च्या सुमारास चंदन गाभ्याचा प्रति किलोचा सरासरी दर आठ आणे तर चंदन तेलाची किंमत पाच रुपयांपेक्षा कमी होती. आज गाभ्याचा प्रति किलो दर साडे बारा हजार आणि चंदन तेलाची एक किलोची किंमत दोन लाख तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे व त्यात सातत्याने वाढ होत आहे, यावरून चंदनाच्या झाडाचे आíथक महत्त्व लक्षात येऊ शकेल. अलीकडेच जे चंदन फार्म नव्याने उदयास येत आहेत, त्या ठिकाणी चंदनाच्या झाडांचे विशेष पद्धतीने संरक्षण केले जात आहे. त्यासाठी चंदन फार्मभोवती लोखंडी जाळीचे कम्पाऊंड, सीसीटीव्ही कॅमेरे, बंदूकधारी सुरक्षारक्षक, डॉग स्क्वॉड अशा सुविधांबरोबरच चंदनाच्या झाडात मायक्रो चीप बसविण्याचीही कल्पना आहे, अर्थात व्यवहारात हे कितपत शक्य होईल याबाबत साशंकताच आहे.

चंदनाच्या लागवडीनंतर त्यापासून पंधराव्या वर्षांनंतर उत्पन्न मिळू लागते, एवढा दीर्घ काळ वाट पाहण्याची शेतकऱ्यांची आज तरी मानसिकता नाही. तसेच चंदन विक्रीबाबतही अनेक कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे सामान्य शेतकरी इच्छा असूनही आज तरी चंदन शेतीकडे कितपत वळेल याबाबत साशंकता आहे मात्र शासनाचे सहकार्य मिळाल्यास व संरक्षणाची हमी मिळाल्यास चंदन लागवडीला राज्यात मोठा वाव असल्याचे दिसून येते.

चंदनशेतीबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. वनखात्याने संयुक्त वनव्यवस्थापन क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर चंदनाची लागवड करावी. यामुळे संबंधित गावांना हमखास उत्पन्न मिळू शकेल.

अरिवद भांगरे, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक

माझ्या शेतातील चंदनाची तीन-चार वेळा चोरी झाली. वनखाते तसेच पोलिसांकडे याबाबत तक्रार केली असता त्याची दखल घेण्याऐवजी त्यांनी झाडे तुम्हीच लावली होती काय, सातबाराला नोंद आहे का, विमा होता का अशा प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर केली त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या चंदनाच्या झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद करावी. तसेच चंदनाच्या झाडाच्या विक्रीचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळायला हवे.

रमाकांत डेरे, प्रगतिशील शेतकरी, अकोले

prakashtakalkar11@gmail.com

First Published on May 13, 2017 12:40 am

Web Title: sandalwood farming sandalwood smuggling