23 November 2017

News Flash

शिवारातील ‘स्वयंचलित प्रणाली’चे यश!

राजकारणातून थेट शेतात रमलेल्या गोरे यांची ही आधुनिक शेती सध्या चच्रेचा विषय आहे.

वसंत मुंडे | Updated: September 9, 2017 1:49 AM

बीड तालुक्यातील शाहबाजपूर दिलीप गोरे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून शेतीच शाश्वत रोजगाराचा उत्तम पर्याय असल्याचे उदाहरण उभे केले आहे. दोन एकरातील टोमॅटोतून अवघ्या तीन महिन्यांत तब्बल चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवला आणि टोमॅटोच्या वेदनादायी लाल चिखलची कहाणी बदलली.

तीन वर्षांपासून शेतीत रमलेल्या दिलीप गोरे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून शेतीच शाश्वत रोजगाराचा उत्तम पर्याय असल्याचे उदाहरण उभे केले आहे. दोन एकरातील टोमॅटोतून अवघ्या तीन महिन्यांत तब्बल चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवला आणि टोमॅटोच्या वेदनादायी ‘लाल चिखल’ची कहाणी बदलली. घरची ऐंशी एकर शेती वर्षांला एक कोटी रुपयांचा नफा देईल अशा पद्धतीने करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. एकच पीक सरधोपटपणे न घेता बाजाराचा अंदाज घेऊन वेगवेगळी पिके घेऊन गोरे यांनी शेतीत ‘स्वयंचलित प्रणाली’ची यंत्रणा उभारली जात असून यामुळे नियंत्रण कक्ष आणि मोबाइलवर शेतीमधील पिकांची प्रत्येक क्षणाला माहिती मिळणार आहे. त्यामुळे एका बटणावर पिकांना आवश्यक पाणी, खते, औषधांचा डोस देणे सोयीचे होईल. राजकारणातून थेट शेतात रमलेल्या गोरे यांची ही आधुनिक शेती सध्या चच्रेचा विषय आहे.

बीड तालुक्यातील शाहबाजपूर हे चाळीस उमऱ्यांचं गाव. शिवार काळ्या मातीचा असली तरी पाण्याची उपलब्धता नसल्याने पारंपरिक कोरडवाहू पिकांवरच शेतकऱ्यांचा भर असल्याने शेती कायम आतबट्टय़ाची. सातबारावर कितीही एकर शेतजमीन असली तरी शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले शिकून शहरात पडेल ती नोकरी अथवा राजकारणात रमतात. याच गावातील ज्ञानोबा गोरे यांचा दिलीप हा मुलगा विद्यार्थी दशेपासून राजकारणात रमत नगराध्यक्षपदापर्यंत गेला. राजकीय पाश्र्वभूमी नसताना संघटन आणि मृदू स्वभावाने त्यांनी आपली ओळख निर्माण केली; मात्र कायम संघर्ष आणि उपेक्षेने पदर सोडला नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांशी संपर्क आल्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील शेतीमधील विविध प्रयोग आणि बारामतीमधील शरद पवार, सोलापूरमधील मोहिते पाटील यांनी राजकारणात उच्च पदावर असतानाही विकसित केलेले शेतीचे आधुनिक तंत्र पाहण्यात आले. त्यामुळे आपल्याही परिसरात शेतीला पाणी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी गावाच्या जवळून जाणाऱ्या सिंदफना, डोंबरी, विद्रूपा या नद्यांच्या संगमावरील सिरसमार्ग येथे बंधारा उभा केला. शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तर फायद्याची होऊ शकते, ही खूणगाठ मनाशी बांधून दिलीप गोरे यांनी तीन वर्षांपूर्वी आपला मुक्काम शेतीत टाकला आहे. घरी वडिलोपार्जति ऐंशी एकर शेती असल्याने व बंधाऱ्यामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तीन एकर क्षेत्रात सात कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधून सहा किलोमीटर सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून पाच विहिरीत मुबलक पाणीसाठा आणि जमिनीत ओलावा निर्माण केला. बाजारातील मागणी आणि कमी क्षेत्रात जास्त उत्पादनाचा विचार करून सरधोपटपणे एकच पीक न घेता वेगवेगळी पिके निवडली. मे महिन्यात सव्वादोन एकरमध्ये टोमॅटोच्या अभिनव वाणाची लागवड केली. सहा फूट अंतराचे बेड तयार करून ठिबक अंथरले. बेडमध्ये निविष्ठा भरून ठरावीक खतांचा डोस सुरू केला. युरिया, कॅल्शियम नाइट्रेट आणि वेळेनुसार पोषकतेसाठी व किडींचा प्रभाव थांबवण्यासाठी ठिबकद्वारेच डोस देण्यात आले. रोपांच्या लागवडीचे अंतर, पाण्याचे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यामुळे झाडांची वाढ झपाटय़ाने होऊन अवघ्या पावणेदोन महिन्यात टोमॅटोंचा भर तोडणीला आला. जून अखेरीस टोमॅटोचे भाव एकदम दीडशे ते दोनशे रुपये किलो गेल्याने गोरेंच्या एका कॅरेटला सोळाशे रुपयांचा भाव मिळाला. दोन एकरात आतापर्यंत ३६०० कॅरेटची विक्री करून तब्बल चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले. आणखी शेवटच्या तोडणीत सहाशे कॅरेटपर्यंत टोमॅटो निघतील असा अंदाज असल्याने शेती शास्रशुद्ध पद्धतीने केली तर कमी क्षेत्रात सर्वोत्तम उत्पन्न देणारी होऊ शकते असा विश्वास यातून निर्माण झाला आहे.

दोन एकरात चाळीस लाखापेक्षा जास्त नफा मिळाल्याने गोरेंची टोमॅटो शेती शेतकऱ्यांसाठी आता मार्गदर्शक ठरली आहे. टोमॅटोच्या रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात शेडनेट आणि पॉलीहाऊस तयार केले जाणार असून इतर क्षेत्रात तीन एकर अद्रकाची लागवड केली आहे. तर दहा एकरात झेंडुची शेती फुलली आहे. आठ एकरात मोसंबी, आठ एकरात पपई, आठ एकरात केळी, तीन एकरात मधुमकाची लागवड करुन मशागत सुरू आहे. शेतीतून वर्षांला तब्बल एक कोटी रुपयांचा नफा कमवण्याचा उद्देश गोरेंनी डोळ्यासमोर ठेवला आहे. टोमॅटोचे भरघोस उत्पन्न हातात पडल्यानंतर गोरेंचे भाऊ अशोक आणि सुभाष यांच्यासह सर्वच कुटुंबाला आता आधुनिक शास्रोक्त शेतीचा मंत्र पटला. तर जवळपासच्या शंभर माणसांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. सध्या ७५ एकर शेतीत स्वयंचलित प्रणाली उभी करून पूर्ण शेती सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन यंत्राच्या निगरानीत आणण्याचे काम सुरू आहे. साठ एकरात वायिरगचे काम पूर्ण झाले असून वायिरगद्वारे सेंन्सर बसवून कंट्रोल रुम आणि मोबाईलवर नोटीफिकेशन देऊन पीक परिस्थितीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे एका बटनवर आवश्यक त्या ठिकाणी पाणी आणि खत पुरवले जाणार आहेत.

स्वयंचलित प्रणालीद्वारे पाणी, खते आणि औषधे पीकांना देण्यासाठी आठ-आठ एकरच्या प्लॉटचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पुण्याची रानडे बायोटेक कंपनी हे काम सध्या करत असून ते अंतिम टप्प्यात आहे. कमी मनुष्यबळात आधुनिक साधनांचा वापर करुन शेती उत्पादनाचा खर्च कमी करणे आणि फवारणी, मोगडा, पाळी, बेड, माती लावणे ही कामे यंत्रणाद्वारेच केली जातात. दिलीप गोरेंच्या या आधुनिक शेतीने आणि कमी कालावधीत चांगल्या नफ्याने परिसरातील शेतकरी नव्या पध्दतीच्या शेतीकडे आकर्षति झाले आहेत. शंभर शेतकऱ्यांनी गट तयार करून शेती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गटाच्या माध्यमातून एकत्रित बियाणे, निविष्ठा खरेदी, उत्पादनाची एकत्रित विक्री यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ हे शास्र पारंपरिक पद्धतीने पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पटले आहे. त्यामुळे शेती हाच रोजगाराचा उत्तम पर्याय होऊ शकतो यासाठी आता गोरेंनी आधुनिक शेतीची चळवळ शेतकर्यामध्ये रुजवण्यासाठी संघटन कौशल्य पणाला लावले आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी या परिसरातील शेती परवडत नाही अशी धारणा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आता शेतीच फायद्याचा व्यवसाय असल्याचा विचार रुजू लागला आहे.

शेतीच रोजगाराचा उत्तम पर्याय!

मी राजकीय क्षेत्रात काम करताना पश्चिम महाराष्ट्रातील विकसित शेतीचे तंत्रज्ञान जवळून पाहून आपल्या परिसरातील शेतीचा कायापालट करण्यासाठी तीन वर्षांपासून शेतीत लक्ष घातले आहे. शेतकऱ्यांना सामाजिक समानता मिळवून देण्यासाठी एक वेगळे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. शेती उत्तम रोजगाराचा आणि उत्पन्नाचा मार्ग आहे. हे दाखवून देण्यासाठी आपण सध्या संपूर्ण लक्ष शेतीच्या विकासातच केंद्रित केले आहे.

vasantmunde@yahoo.co.in

First Published on September 9, 2017 1:49 am

Web Title: sustainable employment sustainable farming