तामशी या ३ हजार ५०० लोकवस्तीच्या गावात पूर्वी मुबलक पाणीसाठा होता. येथील विहिरीतून इतर गावांना पाणी पुरवले जाई. मात्र, गेल्या २० वर्षांपासून गाव पाणीटंचाईने होरपळू लागले आणि गेल्या १० वर्षांपासून तर मायमाऊलींची पाण्यासाठी पायपीट नित्याचीच झाली. शेतजमीन उत्कृष्ट असूनही केवळ पावसावर खरीप हंगामा घ्यावा लागत होता. निसर्गाची अवकृपा झाली, तर सारेच कष्ट पाण्यात. ऐन दिवाळीतच विहिरी कोरडय़ा पडू लागत. गाव टंचाईग्रस्त घोषित करून शासनाने गावाजवळील ५ विहिरी अधिग्रहित केल्या तरी ही समस्या कायम सुटणार नव्हती. त्यामुळे यावर स्वबळाने मात करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये विचार परिवर्तन घडू लागले.

वाशीमजवळील तामशी गाव गेल्या २० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. मात्र तामशीकरांनी गाव जलयुक्त करण्यासाठी ९५ लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून दोन तलाव बांधले. श्रमदानातून श्रद्धेने उभारलेल्या या तलावांचे लोकरंग व लोकसागर जलमंदिर, असे नामकरणही करण्यात आले आहे. तामशीकरांनी दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी आदर्शवत कामगिरी करून दाखविली.
तामशी या ३ हजार ५०० लोकवस्तीच्या गावात पूर्वी मुबलक पाणीसाठा होता. येथील विहिरीतून इतर गावांना पाणी पुरवले जाई. मात्र, गेल्या २० वर्षांपासून गाव पाणीटंचाईने होरपळू लागले आणि गेल्या १० वर्षांपासून तर मायमाऊलींची पाण्यासाठी पायपीट नित्याचीच झाली. शेतजमीन उत्कृष्ट असूनही केवळ पावसावर खरीप हंगामा घ्यावा लागत होता. निसर्गाची अवकृपा झाली, तर सारेच कष्ट पाण्यात. ऐन दिवाळीतच विहिरी कोरडय़ा पडू लागत. गाव टंचाईग्रस्त घोषित करून शासनाने गावाजवळील ५ विहिरी अधिग्रहित केल्या तरी ही समस्या कायम सुटणार नव्हती. गावाजवळ पाणीच नसल्याने १८ कि.मी. दूर धरणातून पाईपलाईन टाकून ते आणण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पाणीपुरवठय़ासाठी निश्चित आराखडा नसल्याने तेही शक्य नव्हते. त्यामुळे यावर स्वबळाने मात करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये विचार परिवर्तन घडू लागले. त्यानंतर लोकसहभागातून गावासाठी मोठे तलाव बांधण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची १ एकर ३६ गुंठे ई-क्लास जमिनी निवडण्यात आली. यावरील अतिक्रमण काढण्यात आले. यंदा १७ जानेवारीला तलावाचे काम सुरू झाले. २९ फेब्रुवारीपर्यंत २५० बाय २५० फू ट व २६ फूट खोल तलाव तयार करण्यात आला. यात एका बाजूला केलेल्या खड्डय़ात पाणीही लागल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. या तलावात ५ कोटी लिटर पाणी साठवणूक होणार आहे. त्याला चारही बाजूंना आखीवरेखीव पद्धतीने बंधिस्त केले असून, पाण्यासाठी इन्लेट-आउटलेट तयार केले. या तलावाच्या चारही बाजूने वृक्षारोपणासह सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. पाणी हे गावासाठी देवरूप असल्याने मंदिराप्रमाणे तलावाचे पावित्र्य जपले जावे म्हणून या तलावांना ‘लोकरंग जलमंदिर’ तर, काम सुरू असलेल्या तलावाला ‘लोकसागर जलमंदिर’ अशी नावे देण्यात आली आहेत.
‘लोकसागर’ तलावही २२५ बाय २२५ फू ट व २० फूट खोल करून ३ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचा करण्यात येणार आहे. यात पाणी जमा व्हावे यासाठी वाशीम-मालेगाव रस्त्यापासून गावापर्यंत अडीच किलोमीटर नाली काढण्यात आली आहे.
गावातील या अनमोल कार्यासाठी अक्षरश: घराघरांतून एक हजारावर लोकवर्गणी दिली. बालकांनी खाऊचे पैसे देऊन खारीचा वाटा उचलला. महिलांनी तर अंगावरचे दागिने विकले. गावातील शंभरावरजण नोकरीसाठी बाहेर आहेत. त्यांनीही आपापल्या क्षमतेनुसार वर्गणी दिली. गावातील हनुमान मंदिर संस्थानने वर्गणीतील २ लाख रुपये दिले. शेतकरी गटांनी पैसा तर दिलाच शिवाय श्रमदानही केले, त्यामुळे या तलावांच्या कामासाठी एकही रुपयाची मजुरी चुकविण्याची वेळ आली नाही. अशा प्रकारे गावकऱ्यांनी ९५ लाखांची लोकवर्गणी व २५० ते ३०० गावकऱ्यांनी ५० दिवस दररोज श्रमदान करून जलमंदिर साकारले आहे. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या ८ कोटी लीटर पाण्याचा साठा आता तामशीकरांकडे राहणार असल्याने गावाची पाणीसमस्या कायमची मिटण्यासह सिंचनाचीही सुविधा होणार आहे. त्याचा लाभ शेतीलाही बराच होणार आहे. परिणामी, आता खऱ्या अर्थाने जलयुक्त तामशी गाव राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.
प्रशासनाचे दुर्लक्षच
राज्य शासन जलयुक्त शिवार योजनेसाठी आग्रही असताना शासनाची कुठलीही मदत न घेता तामशीच्या गावकऱ्यांनी लोकसहभागातून दोन तलाव उभारले, पण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीकडे जिल्हा प्रशासनाने मात्र सातत्याने दुर्लक्षच केल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.

डॉ.राजेंद्र सिंहांकडून कौतुक
जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह वाशीम दौऱ्यावर असताना त्यांनी आवर्जुन तामशीला भेट देऊन या तलावाची पाहणी केली. गावकऱ्यांनी लोकसहभागातून केलेले काम पाहून तेही अचंबित झाले. त्यांनी गावकऱ्यांवर कौतुकाचा वर्षांव केला. भविष्यात या कामाचा खूप मोठा फायदा होईल, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगून इतरांनी त्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

प्रबोध देशपांडे – prabodh.deshpande@expressindia.com