21 January 2021

News Flash

पडीक जमिनीचे सेंद्रिय शेतीमुळे ‘सोने’

आज देवरे यांच्या सेंद्रिय शेतीत आंबा, तूर, आवळा आणि सीताफळाची झाडे आहेत.

उत्पन्न वाढविण्यासाठी आणि रोगराईला अटकाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात रासायनिक औषधांचा भाजीपाला, फळबागा, पिकांवर मारा केला जात आहे. यामुळे उत्पन्नात वाढ होत असली तरी त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. प्रामुख्याने फळ, भाजीपाल्यांच्या चवीवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार केली जाते. अशा फळे, भाजीपाल्यांमध्ये जीवनसत्त्वही कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या पाश्र्वभूमीवर आता सेंद्रिय शेतीचा पर्याय शेतकऱ्यांना खुणावत आहे. या पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे यांना मागणीही वाढत आहे. धुळे जिल्ह्य़ातील म्हसदी येथील सुधाकर देवरे या शेतकऱ्याच्या सेंद्रिय शेतीची ही माहिती.

एकिकडे रसायनांचा अधिकाधिक वापर करून अमाप पीक घेणारे आणि केवळ जिल्ह्य़ातच नव्हे, तर परजिल्ह्य़ात, परदेशातही शेती उत्पादन निर्यात करणारे शेतकरी वाढले आहेत. दुसरीकडे सुधाकर नारायण देवरे (७७) यांसारख्या सुशिक्षित व्यक्तींनी सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून पडीक जमीन वास्तुविशारद देवरे यांनी विकसित केली. त्यामुळे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसदी येथे सह्य़ाद्री पर्वतरांगाच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात सेंद्रिय शेती बहरली.

देवरे यांनी अनाथ बालकाश्रमात शिक्षण घेतले. साडेतीन वर्षांचे असताना वडील गेले. तिसरीपर्यंत म्हसदीत, त्यानंतर चौथीपासून आठवीपर्यंत अनाथाश्रम, नंतर नववी ते अकरावी धुळे वंचित बालकगृहात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. साक्री तालुक्यातील शेवाळी येथील एका वास्तुविशारदाकडून त्यांना त्या संदर्भातील शिक्षणाची माहिती मिळाली. १९६६ मध्ये पुण्यात गेल्यावर त्यांनी मग वास्तुविशारदची पदवी घेतली. गुजरातमध्ये या संदर्भातील कामाचा अनुभव त्यांनी घेतला. देवरे यांचा शेती व्यवसायाशी तसा काडीचाही संबंध नव्हता. शेती असावी म्हणून त्यांनी म्हसदी येथे १९८४ मध्ये शेती खरेदी केली. वन विभागाच्या जागेलगत डोंगर, दऱ्या आणि नाले उतारावर असलेल्या या शेतीला शेती म्हणावे की केवळ पडीक जमीन हेही सांगता येत नसे.

त्या वेळी तेथे केवळ एक महू, तर दोन पिंपरीची झाडे होती. त्या वेळी या ठिकाणी मुक्कामाला असलेल्या मजुरांना स्वयंपाक करायचा म्हटला तर सुकलेले साबर जाळण्यासाठी वापरावे लागे. यावरून हा परिसर किती उजाड होता याची कल्पना येऊ  शकते. वन खात्याच्या चराईबंदी, चाराबंदी कायदा आणि इतर काही योजनांचा विचार करून देवरे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करताना केवळ मोठय़ा प्रमाणात आणि देखणे पीक घ्यायचे नाही, तर चविष्ट आणि आरोग्याला सर्वार्थाने पोषक ठरेल अशी पिके घ्यायची असे ठरविले. रासायनिक खतांच्या वापरामुळे मानवी अवयवांवर कालांतराने काहीना काही प्रमाणात विपरीत परिणाम होतो हे देवरे यांना माहिती होते.

आज देवरे यांच्या सेंद्रिय शेतीत आंबा, तूर, आवळा आणि सीताफळाची झाडे आहेत. चंदनाची २० ते २२ झाडे चोरली गेली. आजकाल फळे, भाजीपाला यांच्यावर होणारी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आरोग्याला घातक असून हे सर्व पाहिल्यावर आणि या रसायनांचा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम जाणून घेतल्यावर आपण टोमॅटो, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर हे खाणेच सोडले असल्याचे देवरे सांगतात. हा भाजीपाला किंवा फळभाजी सेंद्रिय शेतीतून असेल तरच आपण त्याचा वापर करतो, असेही त्यांनी नोंदविले. देवरे यांच्या सेंद्रिय शेतीतून पिकविलेली सीताफळे गुजरात (सुरत) आणि धुळे बाजारात विकली जातात. साधारणपणे ४०० ग्रॅम वजनाचे, पण अतिशय गोड असलेल्या कांचन आणि नरेंद्र-७ या वाणाच्या सीताफळाला अधिक मागणी असल्याचे देवरे यांनी नमूद केले.

देवरे यांच्या शेतीतून पिकलेला हापूस, केशर, नीलम, तोतापुरी, दशहरी, शोप्या (वर्षांतून दोन वेळा येतो), लंगडा, महाराजा या आंब्यांना आसपासच्या गावांमधून मोठी मागणी असते. शेतात अंजनची साधारणपणे दीडशे झाडे आहेत. आंब्याच्या दिवसात घरून थेट ग्राहकांच्याच दारी आंबे जात असल्याने आणि विशेषत: सेंद्रिय पद्धतीने लागवड आणि त्याच पद्धतीने आंबे पिकविलेले असल्याने नेहमीचे ग्राहक आगाऊ नोंदणी करतात. धुळे बाजार समितीतून पोल्ट्री खतांचे ट्रक, ट्रॅक्टर शेतापर्यंत नेणे परवडत नसल्याने देवरे यांनी शेळ्या, गाई घेतल्या आणि त्यांचे शेण, लेंडय़ा यांचा खत म्हणून वापरास सुरुवात केली. देवरे यांच्या सेंद्रिय शेती उत्पादनाला बाजारातील किमतीपेक्षा अधिक भाव मिळाला. या प्रयोगामुळे देवरे यांना १९९२ मध्ये कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वनशेतीसाठी दिला जाणारा हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

देवरे यांच्या शेतात आधी कोणतीच झाडे नव्हती. आज परिसर निसर्गरम्य झाल्याने मोर, बगळे, तितूर, लावरी, घोरपड, कोकिळा या पक्ष्यांबरोबरच प्राण्यांमध्ये रानबोक्या, घोरपड, ससे, हरिण, रानडुक्कर,  हेही दिसू लागले आहेत. देवरे यांनी एकाच झाडाला विविध जातींच्या आंब्यांचे कलम केले होते. ही पद्धत नवीच असल्याने त्या वेळी परिसरातून अनेक जण हा प्रयोग पाहण्यासाठी देवरे यांच्या शेतीवर येत. वन खात्याच्या मदतीने डोंगरावर आडव्या चाऱ्या (दगड जमा करून लहान भिंत बांधणे), नाला बंदिस्ती अशी कामे त्यांनी केली आहेत. सध्या १० एकरांत ठिबक पद्धतीने सिंचन करण्यात आले आहे. त्यात तूर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात तुरीचे उत्पादन अधिक झाल्याने यंदा अपेक्षित भाव मिळणार नाही. मात्र, विविध पिकांमुळे देवरे यांचा चिंता नाही. त्यामुळेच शेतात एक किंवा दोन प्रकारच्या

पिकाचे उत्पन्न घेतले तर हा शेतमाल परदेशातही पाठवून शेतकऱ्यांना पैसे मिळवता येतात, असेही देवरे म्हणाले.

एकाच शेतात अधिक पिके घेतली तर शेतकरी शेती कामातच व्यस्त असतो. यामुळे अन्य बाजारपेठेचा अभ्यास करणे आणि तेथे माल पोहोचविणे शेतकऱ्यांना अवघड होत असल्याची माहिती देवरे यांनी दिली. ही परिस्थिती बदलण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेणे अधिक योग्य ठरेल. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचेही देवरे म्हणाले.

  • देवरे यांनी परिश्रमपूर्वक साधारणपणे ११० एकर शेतींपैकी सुमारे ६० एकर शेती पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने पीक घेण्यास लायक केली. यासाठी देवरे यांना वास्तुकलेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे लागले.
  • देवरे यांनी कोट-टाय संस्कृतीला बगल देत कोपरी, पायजमा आणि हाती शेती अवजार यांना जवळ केले.
  • सेंद्रिय शेती तयार करण्यासाठी धुळे बाजार समितीतून विकतचे पोल्ट्री खत ट्रॅक्टरमध्ये वाहून नेले; परंतु हा खर्च परवडत नसल्याने नंतर त्यांनी स्वत: शेळी, गाई विकत घेतल्या. त्यांच्यापासून मिळणाऱ्या खताचा वापर केला. याशिवाय निंबोळी, सीताफळ, पानांचा अर्क, तंबाखू भुकटी वापरली.
  • दोन ते तीन दिवस भिजवून ठेवल्यानंतर एका पातेल्यात पाण्यात ही पाने टाकायची आणि चांगली उकळवून घ्यायची आणि निघणारा अर्क कीटकनाशक म्हणून फवारायचा.
  • वृक्षांना (खोडांना) मोरचुद, चुना, गेरू लावल्याने वाळवी लागत नाही, असे देवरे यांचे म्हणणे आहे.

santoshmasole1@gmail.com    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2017 1:01 am

Web Title: uncultivated land organic farming
Next Stories
1 शेळीचे दूध दुर्लक्षितच..
2 गोवंश कोण ठरवणार?
3 अल्पभूधारक शेतीचा प्रयोग
Just Now!
X