दुष्काळात आपली गुरेढोरे जगवायची कशी या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे.. परभणी तालुक्यातील भारस्वाडा या गावी मेंढय़ांना ‘अ‍ॅन्थ्रॅक्स’ हा रोग झाल्याने त्या दगावल्या. तब्बल १४० मेंढय़ा मृत्युमुखी पडल्याने आसपासच्या गावातील शेतकरी धास्तावले. आज मेंढय़ा मरत आहेत उद्या हा रोग शेळ्यांना तर होणार नाही ना? गाई-बलांना-वासरांना तर होणार नाही ना या धास्तीने अनेकांना ग्रासले. सध्या दुष्काळात मुक्या जनावरांच्या जगण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. जनावरे जगवायची कशी आणि भर उन्हाळ्यात त्यांच्या चारापाण्याचे काय करायचे ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. अशावेळी एखाद्या रोगाने टोळधाडीसारखे यावे आणि मुक्या जिवांवर हल्ला करावा हे दुर्दैवी आहे. मेंढय़ांमध्ये जो रोग झाला तो अ‍ॅन्थ्रॅक्सच आहे असा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला आहे. या रोगाला मराठीत ‘फाशी’ असा शब्द आहे. काळपुळी या नावानेही तो ओळखला जातो. या रोगाने जनावरे तात्काळ मृत्युमुखी पडतात. या रोगाचा जिवाणू त्वचेवरील जखमेद्वारे त्वचेचा आणि श्वसनाद्वारे आत गेल्यास पोटाचा ‘अ‍ॅन्थ्रॅक्स’ होतो. ताप येणे, अंगावर सूज येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. भारस्वाडा येथे तब्बल दीडशेच्या आसपास मेंढय़ा या रोगाने मृत्युमुखी पडल्या. हे संकट शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा’असेच ठरणारे आहे. शेती परवडत नाही. म्हणून शेतकरी जोडधंद्याकडे वळत असताना मुक्या जनावरांच्या अस्तित्वावरच घाला यावा ही बाब सर्व शेतकरी वर्गाची काळजी वाढविणारी आहे.

मागील दोन वर्षांत परभणी जिल्ह्य़ात तरुण शेतकरी जोडधंद्याकडे वळू लागला आहे. अनेक ठिकाणी शेळीपालनाचे प्रकल्प उभे राहिलेले दिसतात. काही मोठे प्रकल्प आढळतात, बँकांच्या वित्तीय सहकार्यातून सध्या अनेक ठिकाणी असे शेळीपालनाचे प्रकल्प साकारले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्त असावे या उद्देशाने शेळीपालनावर शेतकऱ्यांचा भर आहे. अशावेळी जर ‘अ‍ॅन्थ्रॅक्स’चा जिवाणू शेतकऱ्यांची झोप उडवणारा असेल तर या जिवाणूबाबत वेळीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने भारस्वाडा येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ‘अ‍ॅन्थ्रॅक्स’बाबत गावकऱ्यांना माहितीही देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार किमान २० किलोमीटरच्या परिसरात ‘अ‍ॅन्थ्रॅक्स’च्या जिवाणूंचा प्रादुर्भाव असू शकतो. ज्या जनावरास हा आजार होतो त्या जनावराच्या मृत्यूनंतर या जनावरांची तात्काळ विल्हेवाट लावायास हवी. मेंढय़ांना जर हा रोग झाला असेल आणि त्या मृत्युमुखी पडल्या तर अशा मृत मेंढय़ाची विल्हेवाट तातडीने लावावी. मृत मेंढय़ांची लोकर काढण्याचा प्रयत्न करू नये. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यापूर्वी जंतुनाशक औषधांचे बोळे वापरून नसíगक छिद्रे बंद करावीत. असे अनेक खबरदारीचे उपाय आहेत. या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

जेव्हा मुकी जनावरे या रोगाची शिकार होतात तेव्हा माणसांनाही हा रोग होऊ शकतो काय, अशी धास्ती वाटणे स्वाभाविक आहे. अशावेळी जनतेने घाबरून जाऊ नये असाही सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे परभणी जिल्ह्य़ावर अवर्षणाची छाया आहे. अवर्षणाच्या स्थितीत चरणाऱ्या जनावरांच्या पोटात जमिनीतील जिवाणू जाऊन हा रोग होतो. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर मृत जनावराची विल्हेवाट पूर्णपणे जाळून अथवा दोन मीटर खोल पुरून लावणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या दक्षतेमुळे झालेला रोग ‘अ‍ॅन्थ्रॅक्स’च होय असे निदान झाल्याने ग्रामस्थांच्या मनातील भीती कमी झाली. आणि या संदर्भात योग्यवेळी उपचार झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव अथवा संसर्ग अन्य ठिकाणी झाला नाही. आधीच दुष्काळाने लोक हैराण आहेत. अशावेळी मुक्या जनावरांचे काय करावे? आपल्या दावणीतले ‘जितराब’ जगवावे कसे या विवंचनेने लोक त्रस्त झाले आहेत. आपल्या जनावरांना ही ‘फाशी’ बसू नये याची काळजी लोकांनी घ्यावी.

गंगाखेड तालुक्यातही निदान नाही

अहमदपूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गंगाखेड तालुक्यातील ‘बिनपाण्याची दामपुरी’ या गावात गेल्या काही दिवसांत ५० जनावरे आणि २५० शेळ्या दगावल्याची माहिती समोर आली आहे. हे गाव डोंगराळ भागात दुर्गम ठिकाणी आहे. गावात साहाय्यक पशुविकास अधिकारी येत नाहीत. त्यामुळे आजाराचे निदानही होत नाही. दोन महिन्यात या गावातील झालेले पशुधनाचे नुकसान मोठे आहे. जनावरे, शेळ्या, गाय, बल आदींच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणीही निर्माण झाला आहे.

aasaramlomte@gmail.com