12 December 2017

News Flash

कलिंगड शेतीतून तिप्पट नफा 

खरिपातील भात लागवडीनंतर दुबार पीक म्हणून त्यांनी आपल्या शेतात कलिंगड लागवड केली.

हर्षद कशाळकर | Updated: April 21, 2017 3:42 PM

कलिंगड शेती

 

पारंपरिक भातशेतीला बगल देऊन नवनवीन पिके घेतली तर कोकणातील शेती फायद्याची ठरू शकते. कर्जत तालुक्यातील विनय मारुती लोखंडे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. खरिपातील भात लागवडीनंतर दुबार पीक म्हणून त्यांनी आपल्या शेतात कलिंगड लागवड केली. या लागवडीतून त्यांना दोन एकरातून १० टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले आणि तिप्पट नफाही मिळाला.

रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रात झपाटय़ाने घट होत आहे. अशा वेळी कमी वेळात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सिंचनाचे क्षेत्र मर्यादित आहे. शेतमजुरांची कमतरता आणि मजुरीचे चढे दर यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. अशा वेळी पारंपरिक पिकामध्ये अडकून न राहता शेतकऱ्यांनी नवनवीन आणि जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. ही बाब लोखंडे यांच्या लक्षात आली.

कर्जत तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी म्हणून राजनाला प्रकल्प राबविण्यात आला. यामुळे येथील शेती समृद्ध झाली होती. खरीप आणि रब्बी अशा दोन टप्प्यात भातपिकाची लागवड केली जात होती. मात्र योग्य देखभालीअभावी राजनाला कालवा नादुरुस्त झाला आणि शेतीला मिळणारे पाणी बंद झाले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसमोर आव्हाने उभी राहिली. कारण पाण्याआभावी उन्हाळ्यात भातपीक लागवड करणे शक्य नव्हते. त्यामुळे कमी पाण्यात होणाऱ्या पर्यायी पिकांचा शोध घेणे लोखंडे यांना भाग पडले. यातूनच भाजीपाला लागवडीचा पर्याय त्यांनी घेतला. आपल्या शेतापकी पाच एकरमध्ये त्यांनी भाजीपाला लागवड केली. पण त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे शेतात कलिंगड लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला दोन एकरमध्येच कलिंगडाची लागवड केली. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन वाफ्यांवर पॉलीथिन मिल्चग पेपर अंथरणी केली आणि ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. बियाणे, ठिबक सिंचन, मिल्चग पेपर, खते, कीटकनाशक, मजुरी आणि इतर खर्च असा मिळून दोन एकर शेतीसाठी ७० हजार रुपये त्यांना खर्च आला.

दीड महिन्यात दोन एकरांत तब्बल १० टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. पनवेल आणि कर्जतमधील बाजारपेठेत या कलिंगडांची विक्री कण्यात आली. चार किलोहून अधिक वजनाची कलिंगडे असल्याने या कलिंगडांना बाजारात मोठी मागणी होती. या विक्रीतून खर्चाच्या तिप्पट नफा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लागवडीसाठी वापरलेली आधुनिक पद्धत, खते, तणनाशक, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले व्यवस्थापन यामुळे कलिंगडांचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक पिकांना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन पिके घेतली तर जिल्ह्यातील शेती फायदेशीर ठरू शकते हे लोखंडे यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर तोटय़ाचा व्यवहार समजली जाणारी कोकणातील शेती फायदेशीर ठरू शकेल, यात शंका नाही.

harshad.kashalkar@expressindia.com

First Published on April 15, 2017 12:24 am

Web Title: watermelon farming