अलिबाग तालुक्यातील नेऊली आणि खंडाळा या गावात खरीपातील भातपीक कापणीनंतर पांढरा कांदा लागवड केली जात असे. मात्र या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाऊ लागली. मुंबई- पुण्यासह अनेक मोठय़ा शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन जिल्ह्य़ात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा यंदा सीमोल्लंघन करणार आहे. अलिबाग तालुक्यातील काही गावांपुरते मर्यादित असणारे हे पीक आता, वाढती मागणी आणि चांगला भाव यामुळे जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांतही मोठय़ा प्रमाणात घेतले जाणार आहे. अलिबागबरोबर महाड, रोहा, पेण, मुरुड, माणगाव आणि कर्जत तालुक्यात यावर्षी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्य़ात खरीप हंगामात भातपिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड होत असते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत. जिल्ह्य़ात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याची ओरड होताना पाहायला मिळते. मात्र गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, शेंगदाणे आणि पांढरा कांदा यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतीचे अर्थकारण बदलण्यास सुरुवात झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील नेऊली आणि खंडाळा या गावात खरीपातील भातपीक कापणीनंतर पांढरा कांदा लागवड केली जात असे. मात्र या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली होती. मुंबई- पुण्यासह अनेक मोठय़ा शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन जिल्ह्य़ात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता अलिबागपुरता मर्यादित असणारा पांढरा कांदा यापुढे, मुरुड, रोहा, पेण, माणगाव, महाड, तळा आणि  कर्जत तालुक्यांत सीमोल्लंघन करताना दिसणार आहे. जिल्ह्य़ात गेल्या वर्षी २१० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र २९० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यातून यावर्षी जवळपास तीन हजार मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. कांदा लागवडीसाठी वाफा आणि मिल्चग पद्धतीचा वापर करण्याची सूचना करण्यात येत आहे.  याशिवाय पाणीपुरवठय़ासाठी सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन आणि िस्प्रक्लर पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. यामुळे एकरी चोवीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यास मदत होऊ शकणार आहे. चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यास त्याला प्रतिमाळ १५० ते २०० रुपये इतका चांगला दर शेतकऱ्यांना मिळू शकेल, असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

रायगड जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाला, त्यामुळे जमिनीतील ओलावा अजूनही टिकून आहे. याचा फायदा कांदा आणि कडधान्य पिकाला होऊ शकेल. त्यामुळे यावर्षी पांढरा कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढेल. याशिवाय बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाकडूने पांढरा कांदा लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. याचे चांगले परिणाम यावर्षी दिसून येतील आणि शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होईल असा विश्वास कृषी अधीक्षक के. व्ही तरकसे यांनी व्यक्त केला.

पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म

पांढऱ्या कांद्याला औषधी गुणधर्म आहे. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे अ‍ॅनिमियाही दूर होतो, असे जाणकार सांगतात.