प्राण्यांपासून माणसांना आणि माणसांपासून प्राण्यांना होणाऱ्या आजारास जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये तीव्र दाहक- झुनॉटिक आजार म्हणून उल्लेखलेले आहे. मनुष्याला साधारणत: १४०५ आजार संसर्गाने होत असतात, पैकी ८१७ म्हणजे ५८ टक्के आजार झुनॉटिक स्वरूपाचे असतात. आजही ग्रामीण भागात जनावरांच्या आजारांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. उलट गाई, बैल, शेळी आजारी पडल्यास त्या प्राण्याला विकण्याचाच प्रयत्न होतो. उपचाराच्या पद्धतीही जुन्याच हे आजार पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळेच शासनाने अशा झुनॉटिक आजारांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.

संपूर्ण जगभर ६ जुलै हा दिवस ‘झुनॉटिक डे’ म्हणून पाळला गेला. विश्वातील प्रत्येक प्राणी आणि मनुष्य हा झुनोसिस या संकल्पनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संबंधित आहे. ‘झुनॉटिक डिसीजेस’ म्हणजे असे आजार, की जे माणसांपासून जनावरांना/प्राण्यांना व प्राण्यांपासून माणसांना अशा दुहेरी प्रक्रियेने एकमेकांना होतात. मनुष्याला साधारणत: १४०५ आजार हे संसर्गाने होत असतात, पैकी ८१७ म्हणजे ५८ टक्के आजार  झुनॉटिक स्वरूपाचे असतात. आधुनिक वैद्यक विज्ञानामध्ये आपणाला परिचित असणारे अनेक आजार  झुनॉटिक प्रकारातील आहेत. जसे की सीसीएचएफ, इबोला व्हायरस, सार्स, बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू या आजारांमुळे अनेक लोक आजही रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत; परंतु या आजारांच्या प्रसारणाबाबत समाज अनभिज्ञ आहे. रेबीज म्हटले की आपल्याला कुत्रा आठवतो. जगामधील पहिल्या प्रमुख दहा आजारांमध्ये त्याचा समावेश होतो. जगभरामध्ये प्रतिवर्षी साधारणत: ६० हजार मानवी मृत्यू रेबीज या विषाणूजन्य आजारांमुळे होतात. पैकी ३० हजार म्हणजे ५० टक्के मृत्यू हे एकटय़ा भारत देशात होतात. सर्वेक्षणानुसार कुत्र्यांमध्ये आजाराचे प्रमाण ४८.४ टक्के, मांजरांमध्ये २१.९ टक्के, गाई-म्हशींमध्ये ६१.४ टक्के, शेळ्यांमध्ये ४८.७ टक्के आणि घोडय़ांमध्ये ४५ टक्के आहे. रेबीज या आजारावर आतापर्यंत औषधे उपलब्ध नाहीत. म्हणूनच याला जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये तीव्र दाहक झुनॉटिक आजार म्हणून उल्लेखलेले आहे. प्रतिबंधात्मक लसीकरणाने या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. तशा प्रकारे जगातील जपान, युके, डेन्मार्क, स्वीडन, ग्रीस व ऑस्ट्रेलिया देश रेबीजमुक्त झाल्याचे घोषित केले आहे. भारतातील अंदमान, निकोबार व लक्षद्वीप ही बेटे रेबीजमुक्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.

तिसरा महत्त्वाचा झुनोफी आजार म्हणजे ब्रुसेलोसिस. ग्रामीण भागात आजही ऊर्जेचा स्रोत म्हणून गाईचे काढलेले कच्चे दूध पिण्याची प्रथा आहे. अशा प्रकारचे कच्चे दूध पिल्यास ब्रसेलोसिस झालेल्या जनावरापासून मानवास सहज हा आजार होऊ शकतो. पशुवैद्यक जनावराच्या गर्भाच्या तपासणीदरम्यान नेहमीच या आजारापासून बाधण्याची शक्यता अधिक असते. एफएओ (फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ऑफ यूएन) व ओआयई (वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी जगभरात या आजाराच्या प्रसाराच्या प्रतिबंधात्मक उपायावर माहितीपर व्याख्याने आयोजित केलेली आहेत. जनावरे विण्याच्या दरम्यान अनावधानाने शेतकरी व पशुपालक या आजारांना बळी पडतात. २००५ मध्ये मुंबईसारख्या महानगरीत ‘लेप्टोस्पायरोसीस’ नावाच्या आजाराने थैमान घातले होते. हासुद्धा एक झुनॉटिक आजार प्रसारणाचाच भाग आहे. उंदराच्या लघवीमध्ये हे जिवाणू प्रामुख्याने असतात. पुराच्या माध्यमातून अनेक उंदरांची आश्रयस्थाने नाहीशी झाल्याने त्यांच्या लघवीतील जिवाणूंच्या मानवाच्या पिण्याच्या पाण्याशी संपर्क आला व त्याची लागण म्हणून मुंबापुरीत या आजाराने हाहाकार माजविला. खोकल्यातील थुंकीच्या माध्यमातून पसरणारा महत्त्वाचा आजार म्हणजे क्षयरोग. हा आजार जसा व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होतो तसा तो एका जनावरापासून दुसऱ्या जनावरालाही होतो. आजही ग्रामीण भागात जनावरांच्या आजारांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. उलट गाई, बैल, शेळी आजारी पडल्यास त्या प्राण्याला विकण्याचाच प्रयत्न केला जातो. तसेच, उपचाराच्या पद्धतीही जुन्याच असल्याने या आजारांवर नियंत्रण मिळविण्याऐवजी हे आजार पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळेच शासनाने अशा झुनॉटिक आजारांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.

जगामध्ये सर्वात जास्त क्षयरोगाचे रुग्ण (२.२ दशलक्ष) हे भारतामध्ये आहेत. १९९७ मध्ये भारतीय केंद्रीय आरोग्य खात्याने टी.बी.च्या नियंत्रणासाठी आरएनटीसीपी (रिवाइज नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम) चालू केला. त्यामुळे बऱ्याच अंशी टीबी आजारावर नियंत्रण मिळविता आले. आजमितीस टीबीवर उत्तमोत्तम औषधोपचार उपलब्ध आहेत व त्यांचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागातील तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचलेला आहे.  मागील महिन्यात कोकण परिसरात माकडताप आजाराने अनेक नागरिकांना ग्रासले आहे. काही मृत्यूंची नोंदही झाली. महत्त्वाची बाब म्हणजे हा आजारसुद्धा झुनॉटिक प्रकारात येतो. या आजाराला कॅसनुर फॉरेस्ट डिसीज असे शास्त्रीय भाषेत संबोधले जाते. तो माकडांपासून माणसांना होतो. कर्नाटकातील कॅसनुर फॉरेस्ट या जंगलातून हा आजार प्रथम मार्च १९५५ मध्ये शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले म्हणून या आजाराला कॅसनुर फॉरेस्ट डिसीज असे नाव पडले.

प्रगत विज्ञानयुगामध्ये आपण निसर्गचक्र

जपण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. जनावरे आजारी पडल्यास त्यांना त्वरित पशुवैद्यकाच्या साहाय्याने उपचार करून घेतल्यास मुक्या जनावरांना झालेल्या आजाराचा प्रसार रोखता येईल. ‘एक आरोग्य’ ही जागतिक स्तरावर सर्व राष्ट्रांनी मिळून मान्यता पावलेली संकल्पना सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्या दृष्टीने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने ६ जुलै हा जागतिक झुनॉटिक दिन निश्चितच एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. गरज आहे प्रगत वैज्ञानिक दृष्टिकोनाची व सामाजिक सुज्ञतेची. (लेखक अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

काही महत्त्वाचे झुनॉटिक आजार

  • विषाणूजन्य झुनॉसिस – काईपॉक्स, रेबीज
  • जिवाणूजन्य झुनॉसिस – अँथ्रॅक्स, ब्रुसेलोसीस
  • बुरशीजन्य झुनॉसिस – खरूज, अ‍ॅस्परजिलोसीस
  • कृमीजन्य झुनॉसिस – टेनिअ‍ॅसिस, सिस्येझोमिअ‍ॅसीस

झुनॉटिक आजार वारंवार होण्याची महत्त्वाची कारणे

  • निसर्गचक्रामध्ये बदल – मानवाच्या स्वार्थासाठी त्याने निसर्गामध्ये ढवळाढवळ चालू केली. जसे की, जंगलतोड, धरणे, तलाव यांचे बांधकाम, शेतीपिकांमध्ये बदल, नद्यांचे नैसर्गिक प्रवाहबदल यामुळे साहजिकच नैसर्गिक वातावरणात बदल होतो व निसर्गचक्र बिघडते आणि आजारांना निमंत्रण मिळते.
  • जागतिक प्रवास – प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी हवाई मार्गाचा पर्याय स्वीकारला गेल्याने एका ठिकाणाचे आजाराचे जंतू दुसऱ्या ठिकाणी/देशांत अगदी सहजपणे प्रसारित होतात.
  • प्रदूषण व जागतिक तापमानवाढ – पावसाचा अनियमितपणा, वाढते प्रदूषण, कार्बनडाय ऑक्साइडचे वाढते प्रमाण यामुळे सजीवांच्या जीवनचक्रात बदल झाला व आजारांचे प्रमाण वाढले.
  • आहाराच्या बदलत्या सवयी – वाढता मांसाहार, आहाराच्या बदलत्या सवयी व पद्धतीमुळे झुनॉटिक आजारांचा प्रसार प्राण्यांकडून माणसांकडे होतो.
  • नियमबाह्य़ कृती – आजही देशाच्या अनेक भागांत जनावरांची नियमबाह्य़ कत्तल केली जाते. तसेच जैविक अस्त्र म्हणून अनेक जिवाणूंचा उपयोग केला जातो. यामुळे हे झुनॉटिक आजार पसरण्यास वेळ लागत नाही.

pankaj_hase@rediffmail.com