scorecardresearch

दृष्टी बदला, शेती परवडेल!

पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.

शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणारा निसर्गाचा लहरीपणा.. बी-बियाणे, औषधे, खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती.. बहुतांश वेळा खर्चही भरून निघणार नाही इतपत मिळणारा भाव, या सर्वाची परिणती शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होण्यात होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची ही कथा आहे.

शेतीला लाभदायक होण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव होऊन आधुनिक चौकट आखणाऱ्यांचे हे युग आहे. असे काही केले तरच शेती परवडू शकते. शिवाय निव्वळ शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतीपूरक अनेक व्यवसायांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील सॉफ्टवेअर अभियंता दीपक पाटील यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करताना त्यास शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन ते कुटुंबीयांचा आधारवड बनले आहेत. पाटील यांनी नोकरी सोडून वडिलांसह काकांनी सुरू केलेल्या शेतीपूरक दुग्ध व्यवसायात झोकून दिले. ते केवळ दुग्ध व्यवसायावरच थांबले नाहीत, तर त्यात कुक्कुटपालनाची भर घातली. इतकेच नव्हे, तर भविष्यात शेळीपालन करण्याचाही त्यांचा विचार आहे. म्हणजेच शेतीपूरक जे काही करता येईल ते सर्व करण्याचा त्यांचा ध्यास आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सतत दुष्काळाच्या चक्रात होरपळणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी प्रगतीची नवीन वाट दाखवून दिली आहे.

बाराही महिने दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांपैकी कलमाडी हे एक गाव. शेकडो एकर शेती असलेले शेतमालकही या तालुक्यात कधी काळी मुबलक प्रमाणात होते. पुरेसे पाणी नाही म्हणून शेती तुकडय़ातुकडय़ांनी सावकारांसह व्यापारी, उद्योजकांना देण्याशिवाय अनेकांकडे पर्याय उरला नाही. असे व्यवहार करून अनेकांनी शक्य तेवढी रोकड मिळविली, पण वडिलोपार्जित शेती कसणाऱ्या प्रकाश पाटील आणि राजेंद्र पाटील या भावंडांनी कलमाडीकरांसमोर एक नवा आदर्श घालून देण्याचा संकल्प केला. आधुनिक पद्धतीने शेती करून याच जमिनीचा उपयोग त्यांनी चारा निर्माण करण्यासाठी केला. दुभत्या जनावरांना हा मुबलक चारा चारून आपल्याच एके काळच्या कोरडवाहू जमिनीतून दुधाची गंगाजळी कशी उगम पाऊ  शकते, याचे उदाहरण उभे केले. जनावरांना पुरेल एवढे पाणी या शेतीत उपलब्ध होत नसेल, तर प्रसंगी टँकर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाणी आणले जाते.

विशिष्ट जातीच्या गाई या दूधगंगेला वाहती ठेवण्यात मोलाच्या ठरल्या आहेत.

पाटील कुटुंबीयांना पावसाचा अभाव आणि सतत पडणारे शेतमालाचे भाव यामुळे शेती करणे परवडतच नव्हते. यामुळे दोन वर्षांपूर्वी शेती व्यवसायाला पूरक असा दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी म्हशीऐवजी अधिक दूध देणारी गाय पाळावी असे ठरले. एक, दोन गाई या कुटुंबीयांचा आधार ठरू लागल्या. त्याला कारण स्वमालकीची शेती आणि या शेतीतून पिकाऐवजी उत्पादित होणारा मुबलक चारा. यामुळे दुभत्या जनावरांच्या उदरभरणासह पाटील कुटुंबीयांचेही प्रश्न सुटले आहेत. सुरुवातीला लहान प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या दूध व्यवसायात आर्थिक सुबत्ता आल्याने दुभती जनावरे वाढविण्याचा विचार अमलात आला. दुग्ध व्यवसायाला मिळालेली चालना या कुटुंबीयांचा उत्साह वाढविणारी ठरली आणि आधुनिकतेच्या स्पर्शाने दुधाची अनपेक्षित वाढ झाली. सततच्या दुष्काळामुळे न परवडणारी शेतीच दुग्धोत्पादनामुळे परवडू लागली आहे.

अभियंता असलेल्या दीपक पाटील यांनाही कलमाडी येथील आपल्या गोठय़ात राबण्याचा मोह आवरता आला नाही. दीपक हा प्रकाश पाटील यांचा मुलगा. त्याने नोकरी सोडून दुग्धोत्पादनाच्या व्यवसायात झोकून दिले आहे. त्याने गोठय़ात केलेले बदल दुग्ध व्यवसायाच्या वृद्धीसाठी पूरक ठरले आहेत. पाटील कुटुंबीयांनी केलेले गाईंचे पालन बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आता इतर जिल्ह्यांतूनही शेतकरी येथे भेट देऊ  लागले आहेत. हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना पाटील बांधवांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शिंदखेडा तालुका दुष्काळी आहे. सुलवाडे, वाडी, शेवाडी, अमरावती, जामफळ ही धरणे या भागातील शेतीला वरदान ठरायला हवी होती, पण धरणांतील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीला धरणातील पाणी मिळणे कठीण झाले आहे. विविध योजनांच्या घोषणा केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या ठरल्याचे आरोप होतात. कलमाडी आणि माळीच या गावांना दुष्काळाची अधिकच झळ बसत आहे. विहिरी साधारणपणे ९० तर कूपनलिका ५०० ते ७०० फूट खोल गेल्यानंतरही पाण्याचा लवलेश दिसत नाही. यामुळे पाटील बंधूंनी सुरू केलेला दुग्ध व्यवसाय हा आदर्श मानून परिसरातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळू लागले आहेत.

दुष्काळाचा शाप असला तरी शेती मुबलक उत्पादन देऊ  शकते याची खात्री असल्याचे दीपक पाटील सांगतात. दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक अनेक व्यवसाय डोळ्यासमोर आले. घरच्या शेतीमुळे त्यातील दुग्ध व्यवसाय निवडला. या व्यवसायातून आर्थिक बळ मिळाले. आता शेळीपालन सुरू

करण्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरांमध्ये जाऊन कित्येक वर्षे केवळ पाच ते १० हजार रुपयांची नोकरी करणारे अनेक जण आहेत. घरी शेती असतानाही शेतीत बदल न करता ही मंडळी शहरांमध्ये काम करताना दिसतात. अशा युवकांनी पुन्हा शेतीकडे वळावे, शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा, हेच पाटील कुटुंबीयांकडून शिकावयास मिळते.

  • पाटील कुटुंब ४० वर्षांपासून शेती कसत आहे; परंतु पाऊस आणि पडलेले भाव यांमुळे शेती परवडत नसल्याने ते हताश झाले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाटील बंधूंनी राज्यात विविध ठिकाणी भेट दिली. त्यातून मिळालेल्या माहितीला त्यांनी शेतीला दुग्धोत्पादनाची जोड दिली. आज या कुटुंबीयांच्या शेतात पिकाऐवजी देशी आणि होस्टेन गाई दिसतात. पाटील यांच्या गोठय़ात आता १७ गाई आहेत. या गाई दररोज साधारणपणे ५०० लिटर दूध देतात. गाईंचे दूध डबल बकेट या आधुनिक यंत्राने काढले जाते. गाईंचे संभाव्य आजार टाळण्यासाठी सुसज्ज शेड तर आहेच, शिवाय आजार पसरविणाऱ्या माश्या, गोचीड किंवा कीटक होऊ नयेत यासाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे.
  • प्रकाश पाटील हे ३५ एकरांच्या शेतीत इतर मोठी पिके घेण्यापेक्षा दूधवाढीला पोषक ठरणारी चारापिकेच अधिक घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने घास, मका आणि ऊस या पिकांचा समावेश आहे. गाईंना दररोजचा नियमित आहार किलोग्रॅममध्ये मोजूनच दिला जातो. दुग्धोत्पादनाबरोबर त्यांनी देशी आणि चिनी कोंबडय़ांचे पालनही सुरू केले आहे. प्रामुख्याने गिरिराज, गावरान, कडकनाथ, व्हाइट लेव्हन अशा कोंबडय़ा येथे पाहायला मिळतात. कडकनाथ या जातीच्या कोंबडीला मागणी अधिक असल्याने दीपक पाटील यांनी कडकनाथ कोंबडीची अंडी आपल्या गावरान कोंबडीखाली ठेवून उबविण्याचा प्रयोग केला आहे. कोंबडय़ांना खुराडय़ात न कोंडता शेतात मोकळेच सोडलेले असते. शेतातील उकिरडय़ांवरच या विविध जातीच्या कोंबडय़ांना खाद्य उपलब्ध होते.

santoshmasole1@gmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार ( Lokshivar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Change vision towards farming farmers situation

ताज्या बातम्या