माती जिवंत करणारा ‘शिवराम’

हरितक्रांतीबरोबर रासायनिक अवक्रांतीलाही सुरुवात झाली.

 

 सत्तरच्या दशकात राज्यात हरितक्रांती आली. हरितक्रांतीबरोबर रासायनिक अवक्रांतीलाही सुरुवात झाली. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर करा, असे आवाहन सरकारी पातळीवरून केले जाऊ लागले. इच्छा नसतानाही शेतकऱ्यांनी हळूहळू रासायनिक खतांचा वापर सुरू केला. याचा अतिरेक एवढा की ऐंशीच्या दशकामध्ये शेती पूर्णपणे रासायनिक उत्पादनांवर अवलंबून होत गेली. रक्ताची चटक लागलेल्या कोल्ह्यप्रमाणे शेतकऱ्यांनी अविचाराने काळ्या आईवर रसायनांचा बेलगाम मारा केला. शेवटी व्हायचे तेच झाले. रसायनांमुळे जमिनीचा पोत ढासळला, पिकविण्याची क्षमता लयाला गेली. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होऊ लागला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी राज्य सरकारचा कृषिभूषण पुरस्कार मिळवणारा शिवराम घोडके  पुन्हा सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन करतोय.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी राज्य सरकारचा कृषिभूषण पुरस्कार मिळवणारा शिवराम घोडके आज माती जिवंत करण्यासाठी धडपडतोय! माती जिवंत; हा काय प्रकार आहे? आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. रासायनिक शेतीच्या अतिवापरामुळे जमीन वांझोटी झालीय. तिला मरणकळा लागल्या आहेत. भविष्यात नापिकीचे संकट ओढवण्याआधी माती जिवंत केलेली बरी! म्हणूनच शिवराम अहोरात्र झगडतोय. पुन्हा सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन करतोय. कारण मातीच्या आरोग्यावरच माणसाचे आरोग्य अवलंबून आहे.

सत्तरच्या दशकात राज्यात हरितक्रांती आली. हरितक्रांतीबरोबर रासायनिक अवक्रांतीलाही सुरुवात झाली. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर करा, असे आवाहन सरकारी पातळीवरून केले जाऊ लागले. इच्छा नसतानाही शेतकऱ्यांनी हळूहळू रासायनिक खतांचा वापर सुरू केला. याचा अतिरेक एवढा की ऐंशीच्या दशकामध्ये शेती पूर्णपणे रासायनिक उत्पादनांवर अवलंबून होत गेली. रक्ताची चटक लागलेल्या कोल्ह्यप्रमाणे शेतकऱ्यांनी अविचाराने काळ्या आईवर रसायनांचा बेलगाम मारा केला. शेवटी व्हायचे तेच झाले. रसायनांमुळे जमिनीचा पोत ढासळला, पिकविण्याची क्षमता लयाला गेली. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होऊ लागला. कर्करोगासारखे दुर्धर आजार तर आलेच; पण इतरही मानसिक आणि शारीरिक व्याधी जडू लागल्या. आज तर जमिनीचा प्रवास मृतावस्थेकडे होऊ लागला आहे. जमीन पुन्हा सुपीक, भुसभुशीत करायची असेल, तर माती जिवंत करणारा भूमिसुधार उपक्रम राबवणे या शिवाय आता गत्यंतर नाही.

बीड तालुक्यातील लोळदगाव या तीनशे उंबऱ्याच्या गावातील शिवरामने कृषी पदवी घेतल्यानंतर मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असतानाही तो शेती करण्यासाठी गावी परतला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनी वांझोटय़ा होऊन मानवी आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होऊ लागल्याचे शिवरामच्या लक्षात आले. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा आणि खतांचा अभ्यास सुरू केला. सेंद्रिय खते, कीटकनाशके निसर्गातील वनस्पतींपासून आणि गायीच्या मल-मूत्रापासून विकसित केले. शिवरामने सेंद्रिय शेतीचे महत्त्व राज्यभर पोहोचवले. प्रत्येक शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. या कामाची पावती म्हणूनच २०१० मध्ये त्याला राज्य सरकारने कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. शिवाय सेंद्रिय शेती धोरण ठरविणाऱ्या समितीवर सदस्य म्हणून घेतले. तसेच शेतीमाल भाव उपसमितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. शिवरामच्या कार्याची दखल अनेक नामांकित संस्थांनी घेऊन वेगवेगळ्या ४० पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आज नाम फाउंडेशन, सूर्योदय परिवार, आदिशक्ती फाउंडेशन, सयाजी िशदे, अरिवद जगताप यांच्यासोबत शिवराम सेंद्रिय शेतीच्या जनजागृतीचे काम करीत आहे. बळिराजा कृषी विज्ञान मंडळ (लोळदगाव) या त्याच्या संस्थेच्या माध्यमातूनही शिवराम अहोरात्र सेंद्रिय शेतीचे धडे देत फिरतो आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भय्यूमहाराज, सयाजी िशदे, अनुराधा पौडवाल यांना थेट उकिरडय़ावर नेऊन त्यांच्यामार्फत उकिरडा कंपोस्ट तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना शिकवले. ‘तुमच्या उकिरडय़ात कचरा नसून सोनं आहे,’ हे शिवरामने शेतकऱ्यांना पटवून दिले.

आपल्याकडे िलबाच्या झाडाकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. परंतु याच िलबोळ्यांपासून २५ हजार रुपये किमतीचे खत व कीटकनाशक तयार होऊ शकते. खताप्रमाणेच झाडपाल्यापासून दशपर्णी अर्क कीटकनाशक म्हणून तयार केले जाते. अगदी फुकटात येणारे आणि दशपर्णी अर्क करण्याची प्रक्रियाही रंजक आहे. करंजी, कानेर, िलब, पपई, सीताफळ, रुई, बेसरम, टणटणी या वनस्पतींचा रस आणि गोमूत्र, शेण यांचे एकत्रित मिश्रण दोनशे लिटर पाण्यात पाच-पाच किलोप्रमाणे एक महिना आंबवायचे. एका महिन्यानंतर तयार झालेले रसायन पिकांवर फवारल्यास कृमी-कीटकांपासून पिकांचा बचाव होतो. विशेष म्हणजे या मिश्रणाचा माणसाला कसलाही धोका नाही. या बरोबरच गांडुळखत प्रक्रिया देखील शिवरामने विकसित केली. तसेच जिवाणू तयार करणे, जिवामृत तयार करणे, बीजामृत तयार करण्याची कामेही केली जातात. या सेंद्रिय खतांचे आणि कीटकनाशकांचे प्रयोग शिवराम स्वत:च्या शेतीवर अनेक वर्षांपासून करीत आल्याने त्यांची घरची शेती अत्यंत कसदार आणि भुसभुशीत झाली आहे. या सर्व सेंद्रिय खतांचे आणि कीटकनाशकांचे प्रात्यक्षिक शिवराम शेतकऱ्यांना देतो. बीड जिल्हाच नव्हे, संपूर्ण राज्यभरातून सुमारे दोन लाख शेतकरी वेगवेगळ्या माध्यमातून शिवरामच्या संपर्कात आहेत.

शिवराम घोडकेंची प्रेरणा घेऊन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५० हजार हेक्टर जमीन सेंद्रिय होण्यास मदत झाली. लोळदगाव या शिवरामच्या गावात अनेक शेतकरी खताचे मिश्रण तयार करून विक्री करीत आहेत. दरवर्षी अंदाजे ३ कोटी रुपयांचे सेंद्रिय खत तयार केले जाते. शिवरामही खत विक्रीचा व्यवसाय करतो. आलेल्या पशातून शिवराम महाराष्ट्रभर सेंद्रिय शेतीची जनजागृती करीत फिरत आहे.

रासायनिक खतांमुळे नपुंसकता

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी तर वांझोटय़ा होत आहेतच; या बरोबरच माणसाची प्रतिकार शक्ती कमी होऊ लागल्याने हृदयरोग, कर्करोग, रक्तदाब, मधुमेह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नपुंसकता येऊ लागली आहे. पंजाबमध्ये सर्वात जास्त रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे पंजाबमध्ये दर चार माणसांमागे कर्करोगाचा रुग्ण असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच पंजाबमधून स्वतंत्र ‘कॅन्सर ट्रेन’ निघते. अशीच स्थिती देशाच्या काही भागात आणि महाराष्ट्रात येऊ घातली आहे. सत्तरच्या दशकात सरकारने रासायनिक खतांना प्रोत्साहन दिले आणि आज सरकारच सेंद्रिय शेतीकडे वळा, असे आवाहन करीत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली तर जमिनीचा कस वाढण्याबरोबरच निसर्गाशी आणि मातीशी एकरूप राहण्याचे समाधान तर मिळेलच; तसेच आíथक संपन्नताही प्राप्त करता येईल.

शेतीबरोबर पशुधन सांभाळणे किती महत्त्वाचे आहे हे सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रणालीवरून लक्षात आले. गीतेतही ‘गौ माँ वसते लक्ष्मी’ असे म्हटले आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले. मात्र, त्याचा उपयोग आणि उपभोग घेण्याकामी माणूसच कमी पडत असल्याचे दिसून येते. सेंद्रिय शेतीमुळे आज आपली ओळख महाराष्ट्रभर पोहोचू शकली आणि सन्मान मिळाल्याने शेतीची नाळ कधीच तोडणार असल्याचे शिवरामचे म्हणणे आहे. शिवरामप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीबरोबरच प्रयोगशील व प्रगतिशील शेती केली पाहिजे. शिवरामच्या कार्याचा लौकिक महाराष्ट्रभर पोहोचल्यानेच अनेक दिग्गजांसोबत आणि सरकारसोबत शिवरामला काम करता आले. नाम फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारीही शिवरामकडेच आहे. त्यामुळे शेती माणसाला संपन्नतेच्या शिखरावर पोहोचवू शकते, यावर प्रत्येकानेच निष्ठा ठेवून सुशिक्षितांनी शेतीकडे वळणे गरजेचे आहे.

उकिरडा कंपोस्ट करणे

रासायनिक खतांमुळे जमिनी उद्ध्वस्त होत आहेत. मग वापरायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. यावर शिवरामने विकसित केलेले सेंद्रिय तंत्रज्ञान अगदी सोपे आहे. सीपीपी कल्चरद्वारे कामधेनू सिद्धी ३ हे उत्पादन सेंद्रिय उकिरडा विकसित करण्यासाठी तयार केले आहे. यामध्ये दूध देणाऱ्या गायीचे ६० किलो शेण, अंडय़ाच्या टरफलाची  अडीचशे ग्रॅम पावडर, रॉक फॉस्फेट २५० ग्रॅम आणि आग्या वनस्पतीचा रस यांचे मिश्रण (कामधेनू सिद्धी) करून १० टन क्षमतेच्या उकिरडय़ात ३ बाय ३ अंतरावर ३ फूट खोल खड्डे करायचे. या खड्डय़ांमध्ये २ किलोगॅ्रम कामधेनू सिद्धीचे मिश्रण ओतायचे. विशेष म्हणजे उकिरडा हा खड्डय़ात असता कामा नये. खड्डय़ातील उकिरडय़ात खत सडण्याची प्रक्रिया घडत असते, म्हणून उकिरडा हा जमीन पातळीच्या बरोबर राहिल्यास हवा आणि सूर्यप्रकाश खताला मिळतो. या प्रक्रियेनंतर चहा पावडरीप्रमाणे खत निर्माण होते. या खताची बाजारभावाप्रमाणे किंमत ठरविल्यास केवळ पाचशे रुपयांत शेतकऱ्याला एक लाख रुपये किमतीचे खत मिळते. या सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपिकता वाढून पोषकद्रव्ये असलेले पीक उत्पादित होते.

vasantmunde@yahoo.co.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Organic farming by shivram ghodke

ताज्या बातम्या