News Flash

‘तणकटा’ची लाट दणकट

समाज बदलतोय. त्याच्या हातात पैसा आलाय. टीव्हीचं त्याच्या जीवनावर प्रचंड आक्रमण आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात, त्यानंतरच्या नवरात्रोत्सवात ‘शांताबाई’ या गाण्याने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. त्यातूनच चर्चा सुरू झाली की हे नवं लोकगीत आहे का? आणि लोकगीताचा बाज बदलतो आहे का?

शांताबाई की चलने की
आवाज सुनी तुम लोगों ने..
छम्म् छम्म्..
छम्म्.. छम्म्..

यंदाच्या गणेशोत्सवात या गाण्यानं अवघ्या महाराष्टाला वेड लावलं. गणेशोत्सवानंतर नवरात्रात, त्याशिवाय इतर कार्यक्रमांमध्ये, पाटर्य़ामध्येही ‘शांताबाई’च्या तालावर थिरकण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आला नाही. याआधी म्हणजे गेली वीस-पंचवीस वर्षे दोन-तीन हजार गाणी लिहिणारा, रोजच्या जगण्याच्या लढाईतली हातमिळवणी करण्यासाठी ती येतील त्या किमतीला विकून टाकणारा शांताबाई या गाण्याचा गीतकार-गायक संजय लोंढे या एका गाण्यामुळे रातोरात स्टार झाला. खरंतर देवादिकांच्या गाण्यांमुळे आजवर संजय लोंढे लोकांना माहीत होते. त्यांच्या ‘३५ नॉनस्टाप अवतार जगदंबेचे’, ‘धनगरवाडय़ात घुसला देव, बानूच्या नादात फसला देव’ या गाण्यांची सीडी धार्मिक लोकांना खूपदा तोंडपाठ आहे. पण या सगळ्या गाण्यांनी एवढय़ा वर्षांत त्यांना जे दिलं त्याच्या कितीतरी पट शांताबाईने दिलं. मुळात शांताबाई गाण्याच्या रचनेमागची कहाणीही संवेदनशील माणसाला स्पर्श करून जाणारी. सिनेमातल्या योगायोगांसारखीच आणि तरीही खरी.

आपल्या लहान मुलीला जोजवून झोपवताना रचलेला ट्रॅक, वीस वर्षे हळूहळू शब्द रचत होत गेलेली गाण्याची रचना, नंतर भावाच्या उपचारांसाठी हे गाणं मिळेल त्या किमतीला विकून टाकणं, त्यानंतर आठ दिवसांतच भावाचा दुर्दैवी मृत्यू होणं आणि ते गाणं रातोरात हिट होणं ही सगळी गोष्टच लोकप्रिय हिंदी सिनेमासारखी आहे. सोपे शब्द निर्थक पद्धतीने रचत, उडत्या चालीत, थिरकायला लावणाऱ्या चालीत, मध्ये मध्ये कडवी ब्रेथलेस पद्धतीने गात केलेलं हे गाणं या सगळ्या गोष्टींसाठी लोकांना जेवढं अपील झालं त्याच्याहूनही ते त्याच्या रचनेमागची कहाणी कळल्यावर अपील झालं. एरवी कवी-गायकांची तीच ती नेहमीची नावं, तेच आवाज, त्याच पद्धतीच्या रचना या सगळ्यात त्यांना एकदम बदल मिळाला आणि त्यातही त्यामागे एक अनपेक्षित अशी दर्दभरी कहाणीही होती. या कवी-गीतकाराची प्रेरणा कुणी स्त्री नव्हती तर त्याची मुलगीच होती. किडनीच्या आजाराने त्रस्त भावावरच्या उपचारांसाठी त्याने आपलं गाणं मिळेल त्या पैशात विकलं. तो भाऊ  गेला. गाणं हिट झालं, पण लिहिणाऱ्याच्या हातात फारसं काहीच लागलं नाही.

शांताबाई हे गाणं लोकप्रिय व्हायला असे अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटक कारणीभूत आहेत. अर्थात असं म्हणताना त्याची रचना करणाऱ्या गीतकार संजय लोंढे यांचं योगदान नाकारण्याचा कुठेही प्रश्नच येत नाही, ते योगदान तर आहेच. पण इतर घटकही आहेत. सोशल मीडिया आहे. ‘शांताबाई’च्या बाबतीतलं एक वेगळेपण असंही सांगतिलं जातं ते म्हणजे आधी हे गाणं महाराष्ट्रभर वाजलं-गाजलं, त्याची वृत्तवाहिन्यांनी दखल घेतली आणि मग ते पुण्या-मुंबईतही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून डबस्मॅश होऊन फिरायला लागलं. टीव्ही वाहिन्यांवरून चर्चा सुरू झाली की हे महाराष्ट्राचं नवं लोकगीत आहे.

अर्थात सगळ्यांनाच हा मुद्दा मान्य होण्यासारखा नव्हताच. काही जणांच्या मते मुळात शांताबाई या गाण्यात आहेच काय? खाण-छान-बाण, चकरा-नखरा, जलवा-हलवा-कालवा-भलवा-बोलवा, अटक-मटक-झटक-लटक-चटक, नटापटा-झटापटा-लटापटा-पटापटा हे शब्द जोडून त्यांना चाल दिली, ताल दिला म्हणजे थोडंच गाणं तयार होतं? या गाण्याच्या कडव्यांमध्ये काय अर्थ आहे? काहींनी ‘शांताबाई’ गाण्याला मराठीतल्या अश्लील गाण्यांच्या यादीत टाकलं तर काहींच्या मते आणि अशी गाणी काय येतात, वाजतात आणि जातात. त्यांचं आयुष्य जेमतेम दोन महिन्यांचं वगैरे, वगैरे.

खरं तर गाण्यातून अर्थ शोधणाऱ्यांसाठी त्यात सोपे सोपे शब्द, ताल, ठेका याशिवाय काहीच नाही. ते २०११ मध्ये आलेल्या ‘कोलावेरी’ गाण्यासारखंच आहे. तेव्हाही ‘व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी’ या तमीळ आणि काही शब्द इंग्रजी अशा तमिळिंग्लिश गाण्याने लोकांना असंच वेड लावलं होतं. ते तर तमीळ भाषेत असल्यामुळे तमीळेतर लोकांना शब्दांशीही फारसं काही देणंघेणं नव्हतं. पण त्याचा ताल, त्याचा ठेका लोकांना इतका आवडला की हे गाणं ट्वीटरवर टाकल्या टाकल्या टॉपवर गेलं. एका आठवडय़ाभरात यूटय़ूबवर ते ३५ ते ४० लाख लोकांनी पाहिलं. दहा लाख लोकांनी ते फेसबुकवरून शेअर केलं. वर्ष संपेपर्यंत म्हणजे दोनच महिन्यांमध्ये ते कोटय़वधी लोकांनी यूटय़ूबवरून पाहिलं होतं.

‘शांताबाई’ या गाण्याबाबतची अशी आकडेवारी उपलब्ध नसली तरी ते निर्विवादपणे महाराष्ट्रातलं आजचं सगळ्यात लोकप्रिय गाणं आहे. त्यातले शब्द सोपे आहेत. त्याची चाल सोपी आहे. यमकपूर्ण शब्दांच्या पुनरुक्तीमुळे ते गाताना सहजपणे एक नाद, एक ठेका तयार होतो आणि त्याची झिंग चढल्यासारखी होते. शब्द तोंडात बसतात आणि ऐकणारा नकळत ते गुणगुणायला लागतो. असे गाणं लोकप्रिय होण्यासाठीचे सगळे गुणधर्म त्यात आहेत. पण त्याला नवं लोकगीत म्हणायाचं का यावर मात्र चर्चा होऊ  शकते.

लोकगीत आहे

शांताबाई हे गाणं किंवा यांसारखी आजवर पटकन लोकप्रिय झालेली ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, ‘कोंबडी पळाली’, ‘४४० करंट माझा’ ‘गाडी सुटली’, ‘पप्पी दे पारुला’ ‘गढुळाचं पाणी’, ‘हुंडा नको मामा’सारखी गाणी ही नवी लोकगीतंच आहेत, असं मानणाऱ्यांच्या मते लोकगीत म्हणजे तरी काय असतं? लोकांच्या रोजच्या जगण्यातले, लक्षात राहतील असे सहज-सोपे शब्द, साधी रचना, ठेका, ताल, एकदा ऐकल्यावर सहज गुणगुणता येईल अशी सोपी चाल, गेयता शब्दांच्या उच्चारणातली गंमत याच सगळ्या गोष्टी बाह्य़त सगळ्या लोकगीतांमध्ये असतात. ‘शांताबाई’ या गाण्यातही तसंच आहे. वेळोवेळी येणाऱ्या पटकन लोकप्रिय होणाऱ्या गाण्यांमध्येही तेच असतं मग या गाण्यांना नवीन प्रकारची लोकगीतं म्हणायला काय हरकत आहे? पूर्वीच्या लोकगीतांचा एक ठरावीक पॅटर्न होता. पण काळाबरोबर गोष्टी बदलतात. तेच लोकगीतांबाबत झालेलं असू शकतं. अशीही शक्यता आहे की यापुढच्या काळात हळूहळू कदाचित याच पद्धतीची गीतं येतील आणि लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनतील. तीच नंतर लोकगीतं ठरतील. पूर्वी माणसं जातींनुसार समूहाने राहायची, आपापल्या समूहांनुसार वावरायची, सणसमारंभ साजरे करायची, त्यानुसार त्यांची संस्कृती विकसित गेली होती. आज तसं राहिलेलं नाही. समाजात गेल्या पंचवीस वर्षांत प्रचंड प्रमाणात घुसळण झालेली आहे. ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. जातींनुसारच्या समूहाने वावरण्याबाबत देशकालस्थलपरत्वे बदल झाले आहेत. पारंपरिक पद्धतीची लोकगीतं जशी होती तशी नवीन लोकगीतं आता येणार नाहीत कारण तशा पद्धतीचं जगणंच बदलत चाललं आहे. कमालीचं वेगवान झालेलं आयुष्य, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि जगण्याच्या बदलत चाललेल्या पद्धती याचा परिणाम लोकसंस्कृतीवर होत असेल तर लोकसाहित्यावरही तो होणारच. त्यामुळे आता जुन्या पद्धतीची लोकगीतं येणार नाहीत. कारण जगणं बदलत चाललं आहे. त्यामुळे त्यानुसार लोकगीतांचा बाज बदलत चाललेला आहे आणि जाणार आहे. असे मुद्दे मांडून ही नवी लोकगीतंच आहेत असं एक समर्थन केलं जातं.

ही लोकगीतं नाहीत..

लोककला, लोकसाहित्याच्या प्रांतात वावरणाऱ्यांच्या दृष्टीने शांताबाई या गाण्याला किंवा त्यासदृश जी गाणी लोकप्रिय होतात त्यांना आजच्या काळातली नव्हे तर कोणत्याच काळातली लोकगीतं म्हणता येणार नाही. ही गाणी म्हणजे केवळ शब्दांचे खेळ करत फ्युजन म्युझिक देऊन लोकप्रिय केलेला प्रकार आहे. मुख्यत: शांताबाई गाण्यात तर पोतराजाचं असतं तसं किंवा गोंधळ घालतात त्यात असतं तशा पद्धतीचं संगीत दिलेलं आहे. लोकप्रिय केलेला प्रकार यासाठी म्हणायचं की त्यासाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो आहे. या गाण्यांमध्ये अतिशय आकर्षक असा ऱ्हिदम असतो. त्यामुळे मग ४४० करंट माझा, रेतीवाला नवरा पायजेल, वाट बघतोय रिक्षावाला, कोंबडी पळाली यांसारखी गाणी लोकप्रिय होतात. त्यांच्यात लोकगीतांची कोणतीच वैशिष्टय़े आढळत नाहीत. मुळात लोकगीतांचा एक ढाचा ठरलेला असतो. लोकगीतांमधून त्या त्या विशिष्ट समूहाची संस्कृती व्यक्त होत असते. उदाहरणार्थ आजच्या काळातली आगरी गाणी, कोळीगीतं ही लोकगीतांच्या प्रकारात मोडू शकतात. ‘बानूबाय’ किंवा ‘ही पोरी साजूक तुपातली’ ही अलीकडच्या काळातली गाणी ही नवी धनगरी किंवा आगरी लोकगीतं म्हणता येतील.

त्यांना त्यांचा एक पारंपरिक बाज आहे. शिवाय लोकगीतं देवाधर्माशीही निगडित असतात. त्यामुळे अशी गाणी ही लोकगीतं नव्हेतच, ती एक तात्पुरती लाट आहे. ती दोन-तीन महिन्यांत विरून जाईल आणि मग अशीच कुणीतरी रचलेली नवीन गाणी येतील.

मुद्दा अश्लीलतेचा

काही जणांनी शांताबाई या गाण्याला मराठीत उपलब्ध असलेल्या इतर काही चावट गाण्यांच्या यादीत टाकायचा प्रयत्न केला. आता शांताबाई या गाण्यात चावट-अश्लील असं काहीच नाही हे कुणीही मान्य करील. पण त्यानिमित्ताने चर्चा सुरू झाली ती मराठी भाषेतल्या चावटपणाकडे झुकणाऱ्या अगणित गाण्यांकडे. यूटय़ूबमुळे तर ती अगदीच सहज उपलब्ध व्हायला लागली. तिथे अशा गाण्यांचा अक्षरश: रतीब आहे. मराठीतल्या ग्रामीण जीवनातल्या अशा लोकप्रिय गाण्यांची यादी बघायची तर

‘ह्य़ा पाहून बाईला’, ‘काल ओपनिंग झालंया’, ‘जवा लागली भीशी’, ‘भाजीवाली बाई’, ‘पोरगं उठाया लागलं’, ‘वाऱ्यावर उडतो तुझा झगा गं’, ‘तिला गडी हा’ ही सगळी गाणी चावटपणाकडे झुकलेली आहेत. या गाण्यांना उच्च वर्ग नेहमीच नाकं मुरडतो, पण तळाच्या वर्गात ती गाणी लोकप्रिय होतात. पण या गाण्यांमध्येच कशाला परंपरागत चालत आलेल्या लोकवाङ्मयातसुद्धा चावटपणाला, काही अंशी सवंगतेला वाव दिला गेला आहेच. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ती एका वर्गाची गरजही असते. तो वर्ग हा चावटपणा एन्जॉय करत असतो आणि एका वर्गाला असा चावटपणा नेहमीच त्याज्य असतो. त्याच्या दृष्टीने असा चावटपणा अश्लील या प्रकारातच मोडणारा असतो. मग अशा गाण्यांवर संबंधित गीतकाराने सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेली खटपट असा शिक्का मारला जातो. खरंतर असा चावटपणा प्रत्येक वेळी लोकप्रियता मिळवण्यासाठीच केला जातो असं नाही. अशी गाणी ऐकणं ही जशी एका वर्गाची गरज असते, तशीच अशी गाणी लिहिणं हीसुद्धा एक प्रकारची अभिव्यक्ती, एक प्रकारचं एक्स्प्रेशन असू शकतं. त्यामुळे ते चांगलं वाईट ठरवण्यापेक्षा अशा अभिव्यक्तीचा अवकाश (स्पेस) मान्य करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण अगदी जिला भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती म्हणजेच देवादिकांची भाषा असं म्हटलं आहे, अशा संस्कृत-मध्येही चावटपणाकडे झुकणाऱ्या, श्रृंगारिक काव्याची जराही कमतरता नाही. फार कशाला भावगीतांच्या चाहत्यांच्या आवडीच्या ‘तरुण आहे रात्र अजुनी’ किंवा ‘मलमली तारुण्य माझे’ या गाण्यांमधूनही नको तो अर्थ काढून दाखवता येऊच शकतो. त्यामुळे आम्ही लिहू ते उच्च दर्जाचे आणि तळाच्या स्तरात लिहिलं जातं ते चावट, सवंग, अश्लील या वर्गीय गंडातूनच मुळात बाहेर येण्याची गरज आहे.

हा गंड निर्माण होण्याच्या मुळाशी अभिजात आणि लोकप्रिय हा सनातन वाद तर आहेच. कलाप्रकार मग तो कोणताही असो, जे जे लोकप्रिय ते ते वाईट, सवंग, निकस अशी एक सोपी मांडणी सरसकटपणे होतच असते. त्यामुळेच गीतरामायणामुळे आधुनिक वाल्मिकी असं बिरुद मिळवणाऱ्या, रसाळ, गेय, नितांतसुंदर गाणी लिहिणाऱ्या गदिमांचा कवी नव्हे तर गीतकार असाच उल्लेख होत राहिला. प्रचंड लोकप्रियता मिळवूनही सुहास शिरवळकरांसारख्या लेखकाला तथाकथित मान्यवर लेखकांच्या यादीत कधीही स्थान मिळू शकलं नाही. सिनेमाच्या माध्यमातून लोकांचं उत्तम मनोरंजन करणाऱ्या डेव्हिड धवनसारख्या दिग्दर्शकाला, गोविंदासारख्या नटाला मान्यवरांच्या यादीत स्थान मिळू शकलं नाही. एकेकाळी रॅप हे गरिबांचं गाणं होतं. आता ते पैसे मिळवून देणारं आणि प्रतिष्ठित झालं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजात एक मोठा वर्ग असाही असतो ज्याची गरज अभिजात किंवा शास्त्रीय संगीताची कधीच नसते. त्याची गरज असते ती त्याच्यामधली रग जिरवणाऱ्या संगीताची.

अभिजात आणि लोकप्रिय हा वाद जरी जुना असला तरी त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रातली अभिजात निर्मिती ही समाजाला सकस गोष्टी देत असते, त्यातून निकोप समाजाची जडणघडण होत असते, हे जितकं खरं आहे, तितकंच निकस रचना हीसुद्धा समाजाची एकप्रकारची गरज आहे हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तसं नसतं तर फक्त ओव्याच निर्माण झाल्या असत्या. शिव्या निर्माणच झाल्या नसत्या. त्या डोक्यावर घेऊन कुणी नाचत नसलं तरी विशिष्ट वेळी, विशिष्ट परिस्थितीत त्यांचा वापर होणं ही अपरिहार्यता आपण मान्य केलेली असते. तसंच फारसा अर्थ नसलेल्या, म्हटलं तर निकस असलेल्या गाण्यांचं आहे. तसंच शांताबाईसारख्या गाण्यांशिवायच्या चावटपणाकडे झुकलेल्या गाण्यांचं आहे. कोलावेरी डीसारखं गाणं किंवा एकेकाळी गाजलेलं इना मिना डिकासारखं गाणं काहीच सांगत नाही, अर्थ मांडत नाही, कारण त्यांना तो मांडायचाच नसतो. ते त्यांचं कामही नसतं, दोन क्षण मनोरंजन एवढंच त्यांचं अस्तित्व असतं, एवढंच त्यांचं काम असतं. ते काम ते चोखपणे करतात. चावटपणाकडे झुकलेली गाणी थोडी पुढे जाणारी, विशिष्ट अर्थ थेटपणे मांडणारी किंवा सूचित करणारी असतात. पण ज्याला मनोरंजनाची हीच पातळी हवी आहे, त्याचं दोन घटकांचं मनोरंजन एवढंच त्याचं मूल्य असतं. अशी गाणी येतात, थोडाफार काळ टिकतात आणि नवीन गाणी आली की मागे पडतात. जमिनीतून उगवणारं तणही असंच असतं. त्याच्याकडे फारसं लक्षही दिलं जात नाही. महत्त्वाचं असतं आणि महत्त्वाचं ठरतं ते आपलं पोषण करणारं धनधान्याचं पीक. पण म्हणून तणकटाचं अस्तित्व नाकारलं जात नाही. ते पिकात माजू नये, पिकापेक्षा महत्त्वाचं ठरू नये एवढंच बघितलं जातं. पटकन लोकप्रिय होणारी गाणीसुद्धा या तणकटासारखीच आहेत. त्यांची आश्चर्य वाटायला लावणारी दणकट लाट येते आणि जाते. त्यानंतरही अस्सल असेल, सकस असेल ते टिकून राहतंच. निकस रचना सकस रचनेला धक्का देऊ  शकत नसेल तर तिच्या असण्याबद्दल फारशी चिंता करण्याचं कारण उरत नाही. अभिव्यक्तीची आस असलेला प्रत्येकजण अभिजात, सकस रचना करू शकत नाही, म्हणून त्याची अभिव्यक्तीच नाकारणं, हिणवणं जसं चुकीचं आहे तसंच प्रत्येकाला सत्यजित रे यांचेच सिनेमे बघायला आवडतील असं गृहीत धरलं जाऊ नये. डेव्हिड धवनचे सिनेमेही तशी आवड असणाऱ्यासाठी परिपूर्ण मनोरंजन असूच शकतं. तसंच निकस रचना अभिरुची बिघडवू शकतात, हा मुद्दा असला तरी तो सरसकटपणे ग्राह्य़ धरता येत नाही.

अशी गाणी लोकप्रिय का होतात, याची चर्चा करताना असा एक युक्तिवाद आहे की आजची तरुण पिढी तुलनेत जास्त तणावग्रस्त, असुरक्षित आयुष्य जगते, तिला रोजच्या जगण्यातला ताणतणाव विसरण्यासाठी, तो बाजूला ठेवून एन्जॉय करण्यासाठी ठेका धरायला लावणारी, उडत्या चालीची गाणी हवी असतात. तिला फ्रीकआऊट व्हायची गरज असते. तिला शांतपणे ऐकायच्या संगीतापेक्षाही ज्याच्यावर नाचता येईल असं संगीत हवं असतं आणि त्यासाठी बेभान नाचायला ही गाणी उपयोगी पडतात.

दुसरा मुद्दा असा की समाज बदलतोय. त्याच्या हातात पैसा आलाय. टीव्हीचं त्याच्या जीवनावर प्रचंड आक्रमण आहे. मुळात सर्वसामान्य माणसाची बरीच अभिरुची टीव्हीने पोसली आहे. त्याच्या जोडीला वेगाने वाढणारं शहरीकरण समाजात घुसळण निर्माण करत आहे. पूर्वीची कृषी संस्कृतीवर आधारित समाजरचना आणि जगण्याची पद्धत बदलते आहे. तिचा परिणाम सांस्कृतिकतेवरही होतो आहे. या सगळ्यातून येणारी गाणी या परिस्थितीचं प्रतिनिधित्व करणारी असणं अपरिहार्य आहे. म्हणूनच तणकटासारख्या उगवणाऱ्या, लाटेसारख्या येणाऱ्या-जाणाऱ्या या गाण्यांना नाकारून चालणार नाही. त्यांचं अस्तित्व, त्यांचा अवकाशही मान्य करायला हवा.

वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 11:52 am

Web Title: is this a new marathi lokgeet trend
टॅग : Marathi Song
Next Stories
1 आनंदवन समाजभान अभियान
2 मोंगोलिआ
3 वार्षिक भविष्य : दिवाळी २०१५ ते दिवाळी २०१६
Just Now!
X