News Flash

लग्नाच्या गाठी.. स्वर्गातून थेट जमिनीवर

कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा.

कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. म्हणूनच आजच्या वेगवान जगाशी जुळवून घेताना आजची तरुण पिढी लग्नव्यवस्थेबद्दल नेमका कसा विचार करते याची पाहणी करणारे एक प्रातिनिधिक सर्वेक्षण ‘लोकप्रभा’च्या ‘टीम युथफूल’ने केले. त्यातून पुढे आलेली निरीक्षणे बदलत्या लग्नव्यवस्थेची चुणूक दाखवणारी आहेत.

संयोजन : वैशाली चिटणीस, सुहास जोशी, सर्वेक्षण सहभाग : शलाका सरफरे, किन्नरी जाधव, कोमल आचरेकर, प्राची परांजपे, सायली पाटील, वेदवती चिपळूणकर, मानसी जोशी. चौकटी : सुहास जोशी, पराग फाटक, चैताली जोशी, प्रशांत ननावरे, प्राची साटम, चारुता गोखले, मृणाल भगत

‘द मोस्ट डेंजरस फूड इज वेडिंग केक.’, ‘शादी के लड्डू खाएं तो भी पछतायें; न खाएं तो भी पछतायें’.. लग्नाबाबत प्रत्येक भाषेत या अर्थाची म्हण, वाक्प्रचार असतोच बहुधा. दुसरीकडे ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ असं म्हणत लग्नाची अपरिहार्यताही बऱ्याचदा व्यक्त होते. लग्नाशिवाय राहिलेल्या माणसाकडे समाज वेगळ्या नजरेने बघतो.. प्रत्येकाचं लग्न झालंच पाहिजे, ते वेळच्या वेळी झालं पाहिजे आणि ते यशस्वीच झालं पाहिजे, हा एकमेव समज बाळगत याआधीच्या पिढय़ा जगल्या. पण, हळूहळू चित्र पालटतंय. म्हणजे असं वरकरणी तरी आपल्याला वाटतंय. नव्या पिढीत लग्न जुळण्याच्या, जुळवण्याच्या, करण्याच्या आणि निभावण्याच्या पद्धती बदलताहेत, हे खरं आहे का? हे बदल नेमके कशामधून येताहेत, त्यामागे काही विचार आहे की, दुसऱ्याने केलं म्हणून करण्याचा एकसुरीपणा आहे? ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला कायदेशीर मान्यता मिळाली, त्या वेळी आता लग्नसंस्था धोक्यात येणार अशा अर्थाच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात आजची तरुण पिढी लग्न या विषयाकडे कशी बघते? लग्नाला पर्याय उभा राहतोय का? लग्नाविषयी, ते कसं करावं, कुणाशी करावं याविषयी या पिढीची मतं काय आहेत? जोडीदाराविषयीच्या अपेक्षांमध्ये काही बदल झाले आहेत का? ते कालानुरूप आहेत की, कालविसंगत? त्याचे परिणाम भविष्यात काय असू शकतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘लोकप्रभा’ने एक सर्वेक्षण केलं. लग्नप्रक्रिया बदलतेय या गृहीतकावर आधारित एक प्रदीर्घ प्रश्नावली (तब्बल ७० प्रश्न) त्यासाठी तयार केली आणि नव्या पिढीतील प्रतिनिधींशी त्यावर चर्चा केली. आमच्या हाती लागलेल्या उत्तरांपैकी काही अपेक्षित होती, तर काही अगदीच अनपेक्षित. चौकटीबाहेरची. नवी पिढी किती वेगळ्या अंगाने लग्नाचा विचार करतेय हे सुचवणारी!

लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि ‘निभावण्याच्या’ ठरलेल्या चौकटीला नव्या पिढीतील तरुणाई थोडे धक्के द्यायचा प्रयत्न नक्कीच करतेय. पण, यामुळे थेट लग्नसंस्था धोक्यात येण्याएवढे बदल लगेच दिसणार नाहीत, हेदेखील या सर्वेक्षणातून पुढे आलं. अर्थात कोणताही आमूलाग्र बदल एका पिढीत होत नसतो. पण, दोन पिढय़ांच्या विचारांमधील अंतर नक्कीच वाढतंय, हे या उत्तरांमधून जाणवलं. जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांमध्ये झपाटय़ाने बदल होतोय. लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये जोडीदाराचं व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता आली आहे का हेदेखील या सर्वेक्षणातून दिसून आलं. मुलींच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा बऱ्याच टोकदार आणि स्पष्ट झाल्यात आणि त्या मोकळेपणाने आणि थेटपणे मांडल्या जाताहेत. त्याला अनुलक्षून मुलांच्या अपेक्षांमध्ये, प्राधान्यक्रमांमध्ये बदल झालेत. जोडीदाराची जात, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक स्तर या गोष्टी मात्र आजही प्राधान्याने तपासल्या जात आहेत. लग्न कसं ठरवायचं यामध्ये बदल झालेत, पण लग्नसोहळा पारंपरिक हवा म्हणणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे. पुन्हा याच तरुणाईचं मत अशा सोहळ्यावरील खर्च टाळायला हवा असंही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न हा विषय आमचा वैयक्तिक आहे, असं नवी पिढी स्पष्टपणे म्हणू लागली आहे. लग्नाचा निर्णय आमचा असेल, आमच्या पसंतीनंच सगळं होईल आणि त्याबाबत बंधनं असू नयेत, हे सगळ्या विचारांतून अधोरेखित होतंय. थोडक्यात, जुन्यातलं सगळं टाकून देण्यासारखं नाही, त्यातलं आमच्या सोयीनं आम्ही घेऊ, असं या पिढीचं मत आहे. लग्न नावाच्या साच्यातून त्यांना बाहेर पडायचंय. पण, तो साचा त्यांना तोडायचा नाहीय, तर जास्त रुंद करायचा आहे, मोकळा करायचा आहे, हे यातून दिसलं.

सर्वेक्षणामागची भूमिका

या सर्वेक्षणातून पुढे आलेली माहिती सविस्तरपणे मांडण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. संपूर्ण देशाची तरुण पिढी काय विचार करते असा विस्तीर्ण आवाका या सर्वेक्षणाचा नाही, किंबहुना त्याची गरज नाही आणि ते शक्यही नाही. कारण पावलोपावली भाषा बदलते, तसं पावलोपावली तरुणाईचे विचार, प्राधान्यक्रम आणि अपेक्षा बदलते. या सर्वेक्षणाचा हेतू हा तरुणाईच्या मनात चाललेली स्पंदनं, त्यामुळे निर्माण होणारी आंदोलनं हळुवार टिपणं आणि लग्नासारख्या प्रश्नावर त्यांना विचार करायला लावणं, तो विचार मांडायला लावणं हा होता. केवळ शहरी तरुणाईचा यासाठी विचार केला गेला. मुंबई आणि परिसरातील १८ ते २८ र्वष वयोगटातील मुला-मुलींशी संवाद साधून त्यांना सविस्तर प्रश्नावलीच्या आधारे बोलतं केलं. या तरुणाईशी बोलून त्यांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. या सर्वेक्षणातील आकडे महत्त्वाचे नसून, त्यांचं प्रमाण नेमकं काय सुचवतंय हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

माय चॉइस

लग्नप्रक्रिया, प्राधान्यक्रम, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा बदलल्या आहेत या गृहीतकावर आधारित प्रश्नावलीद्वारे तरुण पिढीच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या गृहीतकाला आधार होता, गेल्या वर्षभरात घडलेल्या, गाजलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचा. त्यातली ठळक दोन उदाहरणं नमूद करावीशी वाटतात. एक म्हणजे स्त्रीस्वातंत्र्याचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या आवाजातला, तिचा चेहरा प्रातिनिधिक ठेवून बनवलेला ‘माय चॉइस’ हा व्हिडीओ. हा व्हिडीओ मध्यंतरी बराच गाजला होता. लग्न कधी करायचं- माय चॉइस यापासून सुरुवात करून मी कसे कपडे घालायचे, मूल होऊ  द्यायचं की नाही, कुणाशी बोलायचं.. माय चॉइस हे सगळं त्यात आलं होतं. याखेरीज पुढच्या अनेक पायऱ्यांवरचे ‘ती’चे चॉइसेस यात आले होते.  ‘टू हॅव सेक्स आउटसाइड मॅरेज.. माय चॉइस’ यामुळे खरा गदारोळ झाला होता. व्यक्तिस्वातंत्र्याची एवढी मोकळी व्याख्या अनेकांच्या पचनी पडली नव्हती. तेव्हा पुन्हा एकदा लग्नसंस्थेचं काय होणार अशी भीती व्यक्त केली जात होती. लग्नातलं हे स्वातंत्र्य एकीकडे आणि लग्नबंधन म्हणणारी लग्नाची संकल्पना दुसरीकडे. एका ठरावीक वयात आपल्या अपत्याचं लग्न झालंच पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे असं वाटणाऱ्यांची पिढी अजूनही संपलेली नाही. त्या पिढीच्या डोक्यात लग्नाबाबत पारंपरिक ठोकताळे अजून घट्ट आहेत आणि त्याच वेळी व्यक्तिस्वातंत्र्याचं एवढं स्पष्ट, टोकदार स्वरूप माध्यमांमधून व्यक्त व्हायला लागलंय. स्त्री-पुरुष समानतेबाबतही तेवढय़ाच परखडपणे बोललं जातंय, तशी उदाहरणंही दिसताहेत. मागच्या पिढीच्या हे पचनी पडायला वेळ लागतोय.

दुसरं उदाहरण बंगलोरला राहणाऱ्या इंदुजा पिल्लई नावाच्या सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या लग्नाळू वयाच्या मुलीचं. लग्नासाठी स्वत:चं प्रोफाइल तयार करून ती जाहिरात तिनं स्वत:च्या ब्लॉगवर अपलोड केली आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर आणि इतर माध्यमांमधून तिचं हे मॅट्रिमोनयल प्रोफाइल इतकं गाजलं की, इंदुजाच्या या प्रोफाइलची दखल परदेशी माध्यमांनाही घ्यावी लागली. इंदुजानं लिहिलं होतं.. ‘माझे केस छोटे आहेत आणि मी ते कधीच वाढवणारही नाहीय, मला चष्मा आहे. मी तशी फारशी चांगली दिसत नाही. माझ्या कामावर माझं प्रेम आहे. आय अ‍ॅम नॉट अ‍ॅट ऑल अ मॅरेज मटेरिअल.’ जोडीदारही फारसा कुटुंबातच रमणारा नसावा, अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली होती. तिच्या प्रोफाइलला तरुणाईकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ‘आमच्याही मनात हेच होतं’ सांगणाऱ्या मुलींचा आणि ‘हे भलतंच काहीतरी, ही तर स्टंटबाजी’ म्हणत विरोध करणाऱ्यांचाही. पण, या निमित्ताने या ‘मॅरेज मटेरिअल’बाबत चर्चा झाली. पुन्हा एकदा या पिढीचं काही खरं नाही, असाही सूर लागला. शहरी मराठी कुटुंबांमधील तरुणाईवर या दोन टोकाच्या विचारांचा नेमका काय परिणाम झालाय, हे बघण्याचा उद्देशही या सर्वेक्षणातून साध्य झाला. कारण सोशल मीडियामधून या गोष्टी गाजल्या होत्या आणि ही माध्यमं याच तरुणाईची आहेत, त्यांच्याच हातात आहेत. सगळे करताहेत तसं आणि सगळे करताहेत म्हणून यापेक्षा काही वेगळा विचार करायचं (किंबहुना लग्नाविषयीचा काही विचार करायचंच) स्वातंत्र्य आधीच्या पिढीतल्या मुला-मुलींना नव्हतं. त्या मानानं आज परिस्थिती बरीच सुधारली आहे. तरीही थेट ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि पालकांनी बघून दिलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न या दोन टोकांच्यामध्ये बहुतांश तरुणाई आहे, हेच या सर्वेक्षणातून दिसलं. बहुतेकांना स्वत:चा निर्णय स्वत: घ्यायचाय, पण त्यामध्ये पालकांनाही सामावून घ्यायचंय. सुवर्णमध्य साधायचाय.

लग्न पहावं करून

लग्न पहावं करून, हे अजूनही या पिढीच्या तरुणाला तितक्याच प्रकर्षांने वाटतंय हे या सर्वेक्षणात लक्षात आलं. त्यातही आपलं ‘लव्ह मॅरेज’चं असावं, असं निम्म्यांना वाटतंय. ‘अ‍ॅरेंज्ड मॅरेज’ करायचंय म्हणणारे केवळ ११ टक्के आहेत. उरलेल्यांचा याबाबत अजून स्पष्ट विचार झालेला नाही. लग्न करावंसं वाटत नाही, असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण मात्र अगदी कमी (८ टक्के) आहे. लग्न केलं नाही, तर फारसं काही बिघडत नाही. प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे असं नाही, असंही या नव्या पिढीला वाटतं. ‘लिव्ह इन’बद्दल त्यांना फारसं काही वावगं किंवा आक्षेपार्ह वाटत नाही. कारण यासंबंधींच्या प्रश्नावर व्यक्त होताना कुणी अनैतिकतेचा विषय काढला नाही. पण तो लग्नाला पर्याय असू शकतो असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी (२० टक्के) आहे. याउलट लग्नाला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा पर्याय नाही, असं ७० टक्के तरुणांना वाटतं. तुमच्या आवडत्या व्यक्तीने लग्नाशिवाय एकत्र राहू या का, असं विचारलं तर तयारी असेल का या प्रश्नाला २३ टक्के तरुणाईने तयारी दर्शवली तर ६४ टक्के तरुणाईने नकार दर्शवला. वेळ-काळ बघून निर्णय घेऊ म्हणणारे १२ टक्कय़ांवर आहेत. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ऑफर दिली तर या प्रश्नावर होय म्हणणारे आणि विचार करून ठरवेन म्हणणाऱ्यांची संख्या कमी असली, तरी नगण्य म्हणण्याइतकी नाही. बहुतेकांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या संकल्पनेविषयी गोंधळ असल्याचं जाणवलं. लग्न न करण्याचा निर्णय घेतला तर शारीरिक गरजेपुरता एखादा सेक्स पार्टनर शोधाल की, ती गरज टाळणं योग्य वाटतं हा प्रश्नही सव्‍‌र्हेक्षणात विचारला. कारण नव्याने आलेल्या डेटिंग अ‍ॅप आणि वेबसाइट्सवर भारतीय मुलंच नाही तर मुलींची संख्याही वाढल्याचं निरीक्षण  होतं. सेक्स पार्टनरची गरज टाळू असंच बहुतेकांनी सांगितलं. पण आत्ता सांगता येणार नाही, असंही अनेकांनी सांगितलं. सेक्स पार्टनर शोधू किंवा पर्याय म्हणून पाहता येऊ  शकेल असं स्पष्ट करणाऱ्यांची संख्याही नगण्य म्हणावी अशी नाही, हे इथे नमूद करावं लागेल. या प्रमाणावरून हेच सिद्ध होतं की लग्नाला पर्याय सध्या तरी नाही, पण भविष्यकाळात पर्याय शोधणाऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं. लग्न का, कोणासाठी करायचं याबाबतही तरुण बऱ्यापैकी ठाम आहेत.

लग्न म्हणजे काय?

लग्नाचा अनुभव घेऊन बघितला पाहिजे की, लग्न यशस्वी झालंच पाहिजे या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया एकसाची नव्हत्या. लग्न यशस्वी व्हायला हवं, ही इच्छा तर प्रत्येकाची होती. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, याबाबतही बहुमत होतं. पण यशस्वीच झालं पाहिजे, याबाबत दोन वेगवेगळी मतं होती. ‘लग्न काही ऑफिसचं काम नाही, अनुभव घेऊन बघायला, ते यशस्वीच झालं पाहिजे’, यापासून ते ‘लग्न ठरवतानाच मोडायचा विचार कशाला करायचा, म्हणून अद्याप विचार केला नाही,’ असं सांगणारे जवळपास निम्मे होते. उत्तरलेल्यांपैकी अनेकांनी अधिक व्यावहारिकपणे, ‘यशस्वी होणं-न होणं परिस्थितीवर अवलंबून आहे’, असा पवित्रा घेतलेला दिसला. ‘अनुभव घेतला पाहिजे, यशस्वी होईलच असं नाही’. ‘पटत नसेल तर वेगळं होण्यातच आनंद आहे.’ असा विचार करणारेही अनेकजण आहेत. तरुणाईच्या मते लग्न म्हणजे नेमकं काय हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही थोडा वैचारिक गोंधळ दिसला. ‘लग्न म्हणजे प्रत्येकाला देवानं दिलेलं अमूल्य बक्षीस.’ ‘लग्न म्हणजे सुंदर स्वप्न’ असे भाबडे आणि काव्यात्म विचार काहींनी मांडले. तर  ‘लग्न म्हणजे तडजोड’, ‘लग्न म्हणजे सर्वसामान्य बाब’, असे बरेचसे व्यावहारिक, बरेचसे टोकाचे विचारही मांडले गेले. ‘लग्न म्हणजे व्यवस्था. केवळ वंश चालवायला म्हणून नव्हे, तर आयुष्यभरातली सुख-दु:खं वाटून घेणारा साथीदार हवा म्हणून लग्न करावं,’ सहजीवनाविषयी बोलणारे मोजके अपवाद वगळता बाकी विषय लग्नसंस्थेच्या स्वप्नाळू कविकल्पनेत किंवा नकारात्मक व्यावहारिकतेमध्ये अडकलेले जाणवले. पण लग्न कशासाठी करायचंय याचं उत्तर आयुष्यभरासाठी जोडीदार हवा म्हणून असं बहुतेकांनी दिलंय.

अपेक्षा बदलल्या पण..

जोडीदाराकडून अपेक्षा काय, हा प्रश्न बहुधा सगळ्या लग्नाळू वयातल्या मुला-मुलींना कधीतरी विचारला जातोच. ज्यांनी आपला प्रेमाचा साथीदार आधीच निवडलेला असतो, त्यांच्याही अपेक्षा कधी ना कधी व्यक्त होतात. पण, ठरवून लग्न (अ‍ॅरेंज्ड मॅरेज) करणाऱ्यांना त्या आधीच स्पष्ट कराव्या लागतात. कळत्या वयात आल्यापासून जोडीदाराविषयी स्वप्नरंजन सुरू होतं. आसपासच्या उदाहरणांवरून, अनुभवांतून अपेक्षांना अधिक ठाशीव स्वरूप यायला लागतं. मुलांच्या अपेक्षा बऱ्याचशा पारंपरिक साच्यातल्या, पण थोडय़ा सैलावलेल्या दिसल्या. त्यातून त्यांची बदलाची मानसिक तयारी झालेली जाणवली. मुलींच्या अपेक्षांमध्ये सुबत्ता असणारा, जास्त शिकलेला वगैरे पारंपरिक मुद्दे आलेच, त्यासोबत ‘स्पेस’ आणि स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मुद्दे आले. मुलगी आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाली, घरखर्चाला हातभार म्हणून नव्हे तर आवडतं म्हणून ती नोकरी करायला लागली त्याचा हा परिणाम असावा.

मुलगा समजूतदार, काळजी घेणारा, ‘वेल सेटल्ड’ असावा, अशा अपेक्षा अनेक मुलींनी व्यक्त केल्यात. ‘वेल सेटल्ड’च्या व्याख्येत अनेकींनी स्वत:चं स्वतंत्र घर असलेला हवा आहे हे विशेष. कारण स्वत:चे घर असावे ही अट आहे का, या प्रश्नाला ५४ टक्के मुलींनी होकार दर्शवला आहे. मुलगा जास्त कमावणारा हवा, अशीही अपेक्षा आहे, हे पुढच्या प्रश्नांवरून स्पष्ट झालं. मुलाचा स्वभाव आणि पगार दोन्ही गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटतात. त्यातून संशयी नको, एकनिष्ठ हवा यादेखील अपेक्षा व्यक्त व्हायला लागल्यात आणि मुलींकडूनच जास्त प्रमाणात त्या व्यक्त होताहेत.

मुलांच्या मुलींकडून असणाऱ्या अपेक्षांमध्ये मला सांभाळून घेणारी, घर-संसार सांभाळणारी, आई-वडिलांची काळजी घेणारी या अपेक्षा प्रामुख्याने व्यक्त झाल्या. मुलीचा स्वभाव आणि तिचं दिसणं या दोन्ही गोष्टी मुलांना महत्त्वाच्या वाटतात. असं सांगणारे बहुसंख्य (५२ टक्के) आहेत. पण ४६ टक्के मुलं म्हणतात केवळ मुलीचा स्वभाव बघूनच लग्न करणार. मुलीचं दिसणं महत्त्वाचं असं अगदी दोन-चार मुलांना वाटतं. ‘मॅरेज मटेरिअल’ असण्याची एक अट शिथिल होतेय, असा यातून अर्थ काढायला हरकत नाही.

मुलाकडून असणाऱ्या अपेक्षांमध्ये ‘स्पेस देणारा’ असा उल्लेख अनेक मुलींनी केलाय. मुलींना अजूनही ही ‘स्पेस’ मागून घ्यावी लागतेय. मात्र ‘स्पेस’ची अपेक्षा धरणाऱ्या मुलींना आपल्यापेक्षा शिक्षण, नोकरी पैसा यात सरस जोडीदारच हवा आहे. मुलांनी मात्र मुलींचं बाहेर जाणं, बाहेर रमणं, स्वतंत्रपणे कमावणं मान्य केलंय कदाचित. पण, ‘बायको’ची परंपरागत व्याख्या आणि त्यातून आलेली अपेक्षांची चौकट मोडवत नाहीय, असा अर्थ यातून निघतो. दोन-तीन मुलांनी अपेक्षांमध्ये नोकरीमधून वेळ मिळेल तशी घरात आईला मदत करणारी असावी असं स्पष्ट केलं. म्हणजे काळानुरूप व्यक्त होणाऱ्या अपेक्षा बदलताहेत, पण त्यामागचा दृष्टिकोन कायम आहे. तो बराचसा परंपरागत आहे, असं दिसतं. अपेक्षांच्या या बदलत्या जंत्रीतून आणखी एक वेगळा अर्थही काढता येईल.

रुंदावणारी ‘स्पेस’

सर्वेक्षणात दिसून आलं की, जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांमध्ये सगळ्यात वरचा क्रमांक लागतो समजूतदारपणाला. मुलं आणि मुली दोघांनीही जोडीदार समजून घेणारा, घेणारी असावी असं प्राधान्यक्रमानं म्हटलंय. मुलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमध्ये समजूतदारपणा ‘सांभाळून’ घेण्याच्या वृत्तीकडे झुकतोय असं वाटलं. कारण बहुतेकांनी सहचरीण मला सांभाळून घेणारी आणि माझ्या आई-वडिलांशी जुळवून घेणारी हवी अशी अपेक्षा एकत्रितपणे नमूद केली आहे. तर मुलींनी समजूतदारपणात ‘माझी स्पेस, माझं स्वातंत्र्य समजणारा आणि जपणारा’ असं सुचवलंय. मुलींच्या या ‘स्वातंत्र्या’च्या अपेक्षेतूनच मुलांची ‘आई वडिलांना सांभाळणारी’ ही अपेक्षा आली असावी, असं म्हणण्यास वाव आहे. कारण दर चार मुलांमध्ये एकाने ‘आईवडिलांना सांभाळावं’ ही अपेक्षा प्राधान्यक्रमाने दिली आहे. मागच्या पिढीचा विचार केला, तर सासू-सासऱ्यांना सांभाळणे, नीट संसार करणे या व्यक्त करण्याच्या अपेक्षा नव्हत्याच. ते गृहीत असायचं. ती अपेक्षा आज मुलांना प्राधान्यक्रमाने ‘व्यक्त’ करावीशी वाटतेय. कारण मुलींचे प्राधान्यक्रम बदलले आहेत आणि त्यांच्या अपेक्षा त्या टोकदारपणे आणि स्पष्टपणे मांडू लागल्यात. ‘माझ्या करिअरला पाठिंबा देणारा, माझ्या आवडीचं काम करण्याची मुभा देणारा,’ अशा अनेक मुद्दय़ांतून मुलींना त्यांची ‘स्पेस’ हवी आहे, हे दिसतंय. याला बदलती समाजव्यवस्था, बदलती परिस्थिती अर्थातच कारणीभूत असणार, त्यातून आधी म्हटलं तसं मुलीच्या हाती स्वत:चा पैसा आल्यानं थोडं अवलंबित्व कमी झालं आणि त्यातून हे निर्णयस्वातंत्र्य आलंय. त्यालाच अपेक्षा वाढल्यात असं म्हणता येईल. ‘माझ्याही कुटुंबाला सांभाळायची तयारी असणारा जोडीदार हवा, कारण मी एकुलती एक मुलगी आहे’ असं आवर्जून नमूद करणाऱ्या मुलीही सापडल्या. मुलींना मिळत असलेलं आर्थिक स्वातंत्र्य हा या उत्तरांमधला महत्त्वाचा दुवा आहे. तरीही कुणी मुलींनी या स्वातंत्र्याचा थेट उल्लेख या शब्दांत केलेला नाही, हे विशेष. बहुतेक मुलींचं स्वप्नं आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण असणं असेलही कदाचित, पण मुलाकडून असलेल्या अपेक्षांमध्ये किंवा इतर कुठल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते थेट मांडलं गेलेलं नाही.

मुलांनी त्यांच्या ‘स्पेस’चा फार प्रकर्षांने उल्लेख केलेला नसला, तरी सांभाळून घेण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये तो दडला असावा. कारण मोजक्याच मुलांनी मिळून-मिसळून वागणारी, प्रेम करणारी, माझ्यातल्या चांगल्या-वाईट गुणांसह स्वीकारणारी हवी असंही नमूद केलंय. ‘स्पेस’ची मुलीची आणि मुलाची व्याख्या वेगळी असणार, कारण अजूनही आपल्या समाजात तशी समानता नाही. काही मुलींनी ‘स्पेस’ म्हणजे उशिरापर्यंत बाहेर राहण्याची मुभा, ‘वनपीस’ घालून पार्टीला जाऊ  दिलं पाहिजे, स्वयंपाक न करण्याचं स्वातंत्र्य हवं, कुठे आणि कोणती नोकरी करावी याचं स्वातंत्र्य, करिअरला पाठिंबा असे मुद्दे मांडलेत. म्हणजे लग्नानंतर काय घालावं, कुठे जावं याचं स्वातंत्र्यही तिला मागावं लागतंय याचं वाईट वाटून घ्यायचं की, तिची अपेक्षासुद्धा वनपीस घालू दिला पाहिजे, इतकी तोकडी असावी याचं वैषम्य वाटून घ्यायचं हा प्रश्न पडतो.

व्यसनाचा मुद्दा गौण?

पारंपरिक अपेक्षांच्या यादीत मुलांसाठी गृहकृत्यदक्ष आणि मुलींसाठी निव्र्यसनी हे दोन लोकप्रिय शब्द. हे दोन शब्द तरुण पिढीच्या अपेक्षांच्या यादीत अभावानेच पुढे आले. एकाही मुलाने गृहकृत्यदक्ष या शब्दाचा वापर केलेला नाही आणि मोजून तीन मुलींनी जोडीदार निव्र्यसनी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर चर्चेत असं लक्षात आलं की, बायकोनं नोकरी सांभाळून आईला मदत करावी, अशी अपेक्षा मुलांची आहे. पण ‘फुलटाइम घरकाम’ करण्यासाठी बायको हवी, असं कुठल्या मुलानं सांगितलं नाही. मुलींशी बोलताना, निव्र्यसनी हवा हे गृहीत आहे, पण ‘ऑकेजनली ड्रिंक्स घेणारा’ किंवा ‘सोशल ड्रिंकिंग’ करणारा चालेल असं त्यांचं म्हणणं होतं. आम्हालादेखील सोशल ड्रिकिंग करायला आवडेल, असंही काहींनी नमूद केलं. त्याचं व्यसन लागलेलं नको, असंही त्या म्हणतात. (व्यसनात केवळ अल्कोहोल हाच मुद्दा चर्चेत होता.)

तीच गोष्ट वयाच्या बाबतीत. वयात फार अंतर नसावं असं सगळ्यांचं मत होतं. साधारण शून्य ते पाच र्वष अंतर असावं याबाबत बहुमत होतं. लव्ह मॅरेजच्या बाबतीत वयाची अट नाही, असंही तरुणाईला वाटतं. ठरवून लग्न करताना कमी वयाचा मुलगा आणि जास्त वयाची मुलगी चालेल का, असं विचारल्यावर इतर अपेक्षांमध्ये बसत असेल तर वयाची अट फार गंभीरपणे मनावर घेणार नाही, असं बहुतेकांनी सांगितलं. अगदी मोजक्या मुलांनी मुलगी कमी वयाची हवी, असं सांगितलं. मुलगी जास्त कमावती असेल तर चालेल असं म्हणण्यात मुलं आघाडीवर आहेत. ९२ टक्के मुलांना आपल्यापेक्षा जास्त शिकलेली आणि कमावणारी मुलगी चालेल. मुलींची मात्र ती तयारी दिसत नाही. आपल्यापेक्षा कमी शिकलेला, कमी कमावणारा मुलगा नको असं म्हणणाऱ्या मुली५२ टक्के आहेत.

व्यक्तिस्वातंत्र्य विरुद्ध पझेशन

प्रेमात, लग्नात पझेसिव्हनेस असतोच. आपल्या प्रेमाच्या, हक्काच्या माणसाने आपल्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे, अशी प्रेमळ अट असते. पण, या अटीचं रूपांतर नियमात होतं तेव्हा बांधीलकीचं बंधन होतं आणि ते नको वाटतं. पझेसिव्हनेस आणि व्यक्तिस्वातंत्र्य यातलं अंतर प्रत्येकाच्या स्वभावानुसार आणि व्यक्तिमत्त्वानुसार सापेक्ष असलं, तरी तरुण पिढीची याविषयीची मतं जाणून घेण्यासाठी काही प्रश्न त्यांना आवर्जून विचारले. लग्नाआधीच भावी जोडीदाराने असे कपडे घाल, तसे घालू नको, असे केस ठेव, हेच दागिने घाल असा आग्रह सुरू केला तर, या प्रश्नावर मुली तातडीने रिअ‍ॅक्ट झाल्या. त्याचं ऐकणार असं कुणाचंच मत नव्हतं. अजिबात ऐकणार नाही, मला हवं तेच करणार असं टोक गाठणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आणि बहुतांश मुलींनी व्यावहारिकपणाने जितकं पटेल तितकं ऐकू असं सांगितलं. हीच बाब नोकरीबाबत. हा प्रश्न मुलं-मुली दोघांनाही विचारला. जोडीदारानं ठरावीक नोकरी कर किंवा असलेली नोकरी बदलण्याचा आग्रह धरला तर, या प्रश्नावरही विचार करून जितकं पटेल तितकं ऐकू म्हणणाऱ्यांची संख्या जास्त होती. स्वत:ला हवं तेच करणार म्हणणारे २९ टक्के होते.

लग्नाच्या आधीच तुमच्या पैशाबाबत जोडीदारानं पझेसिव्हनेस दाखवला तर, या प्रश्नावर मात्र बहुतेकांनी चालणार नाही, असं थेट उत्तर दिलं. एका ठरावीक मर्यादेपर्यंत समजून घेऊ  पण, त्यापलीकडे लग्न मोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल. थेट लग्न मोडू असं सांगणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. याचा अर्थ पैशांबाबतचा पझेसिव्हनेस महागात पडणारं आहे.

मुलाचे किंवा मुलीचे आई-वडील आपल्या अपत्याविषयी जास्त पझेसिव्ह आहेत, असं जाणवलं तर, या प्रश्नावर व्यावहारिकपणे जोडीदाराशी बोलून समजावून सांगू, असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी होती. आई-वडिलांच्या पझेसिव्हनेसपायी लग्न मोडू म्हणणारेही होते. पण, ते प्रमाण २० टक्क्यांच्या आत होतं. बहुतेकांची अपेक्षा याबाबत जोडीदारानंच त्याच्या किंवा तिच्या आई-वडिलांशी बोलावं अशी होती. आधीच वेगळं होण्याविषयी चर्चा करू, असंही काहींनी सांगितलं.

नावात काय आहे?

लग्नानंतर नाव बदलणार का, हा प्रश्न खरं तर मुलींना विचारलेला. काही मुलांनी आपणहून याचं उत्तर दिलं आणि बदलणार नाही किंवा तिला हवं तसं ठेवू असं उत्तर दिलं. मुलींकडून आलेल्या उत्तरांमध्ये मात्र चांगलं वैविध्य दिसलं. आपलं नाव हीच आपली ओळख असते. त्यामुळे लग्न झालं म्हणून ओळख बदलण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही नाव-आडनाव बदलणार नाही, असं ३८ टक्के मुलींनी सांगितलं. १३ टक्के मुलींना नाव आणि आडनाव दोन्ही बदलण्यास हरकत नाही, असं मत नोंदवलं. नावात काय आहे? आडनाव आणि नाव दोन्ही आम्ही ठेवलेलं नाही. आमच्या पालकांनी नाव ठेवलं आणि आडनाव जन्मजात मिळालं. त्यात आमचा चॉइस नव्हता. त्यामुळे मग ते बदललं तरी हरकत नाही. असा विचार त्यांनी मांडला. सगळ्यात मोठी संख्या आडनाव बदलणार पण पहिलं नाव नाही, असं म्हणणाऱ्या मुलींची होती. (४८ टक्के) नाव ही आमची ओळख आहे. ते सवयीचं आहे. आडनावाने फारसा फरक पडत नाही आणि तशी रीत आहे. ते सोयीचं आहे. असं त्यांचं म्हणणं. यातल्या बऱ्याच मुलींनी माहेरचं आणि सासरचं दोन्ही आडनावं लावणार असंही सांगितलं. त्यामुळे आमची मूळ ओळख जपली जाईल. पण, त्यामुळे तुमची पहिली ओळख लग्न झालेली मुलगी अशीच होणार नाही का, असं विचारल्यावर मात्र यातल्या बहुतेक मुलींना पुन्हा एकदा प्रश्न पडला.

स्वयंपाक कुणी करायचा?

खरं तर लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत स्वयंपाकाचा मुद्दा असावा का आणि तो सर्वेक्षणात घेण्याइतका महत्त्वाचा असावा का, याबाबत मनात साशंकता होती. पण, प्रश्नावली तयार करण्यापूर्वीच्या प्राथमिक पाहणीत असं लक्षात आलं की, अजूनही लग्न ठरवताना, विशेषत: अ‍ॅरेंज्ड मॅरेजमध्ये स्वयंपाक येतो का, स्वयंपाकाची आवड आहे का, हा प्रश्न आवर्जून विचारला जातोय. हा प्रश्न लग्न ठरवण्याच्या पहिल्या भेटीतल्या चर्चेत येणं बहुतेक मुलींना आवडत नाहीय. हा प्रश्न मुलांकडून येत नाही, तर त्यांच्या पालकांकडून जास्त येतो. बहुतेक मुलं स्वयंपाक बायकोच करणार हे गृहीत धरूनच बोलत असतात, असं मुलींच्या बोलण्यात आलं. मुलाने एक वेळचा स्वयंपाक करायला हवा, अशी अपेक्षा मुलीनं व्यक्त केली तर, हा प्रश्न म्हणूनच केवळ मुलांना विचारला. १५ टक्के मुलांनी त्यावर जमणार नाही, लग्न मोडू असं थेट उत्तर दिलं. उरलेल्या बहुतेकांना स्वयंपाकाला बाई लावू, बाहेरून मागवू असं मध्यममार्गी उत्तर दिलं. जमलं तर करू. बारीकसारीक मदत करू. सगळा स्वयंपाक जमणार नाही. ती महत्त्वाची नोकरी करत असेल तरच एक वेळचा स्वयंपाक करू, परिस्थितीनुसार ठरवू, अशी उत्तरं बहुतेकांनी दिली. अपेक्षा रास्त आहे, नक्की करू, अट मान्य, असं निर्भेळपणे सांगणारे १५ टक्के होते.

लग्न ठरवण्याची पद्धत बदलतेय

लग्नाच्या बदललेल्या स्वरूपामधील सगळ्यात दृश्य बदल कदाचित लग्न ठरवण्याच्या पद्धतीतच आलेला असावा. पारंपरिक ‘कांदेपोह्य़ाचा कार्यक्रम’ हल्ली कुणालाच नकोय. मुलांचं आणि मुलींचं याबाबतीत एकमत दिसतंय. लव्ह मॅरेज हवं असं निम्म्याहून जास्त तरुणाईला वाटतंय. अ‍ॅरेंज मॅरेज झालंच तरी जोडीदार स्वत: निवडणार असं बहुतांश तरुणाई म्हणते आहे. आई-वडील ज्याला योग्य म्हणतील त्याच्याशी लग्न करीन असं केवळ ४ टक्केतरुणांचं म्हणणं आहे. बहुतेकांचा कल सुवर्णमध्य साधण्याकडे आहे. अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये पारंपरिक पद्धतीप्रमाणे लग्न ठरवावं, असं थोडय़ाच लोकांना वाटतं. हॉटेलमध्ये भेटून गप्पा मारून मग आई-वडिलांना भेटायचं, ही पद्धत आता चांगली रुळली आहे. आपल्याला आवडलेला मुलगा किंवा मुलगी आई-वडिलांना आवडली नाही, तर त्यांना पटवून देण्याकडे सगळ्यांचा कल आहे. पण, लग्न हा वैयक्तिक निर्णय आहे आणि नातेवाईकांची ढवळाढवळ त्यात नको, असंही त्यांना वाटतंय. आई-वडील आणि आम्ही म्हणजेच कुटुंब हे आजच्या पिढीच्या मनात दृढ झालंय, हे यातून दिसतं. त्यामुळे कुटुंबाचा सल्ला म्हणजे केवळ आई-वडिलांचं मत. त्यात इतर नातेवाईकांचा समावेश नाही. लग्नसोहळ्यात सगळ्यांनी सहभागी होण्यास हरकत नाही, पण निर्णयात नको, असं त्यांचं स्पष्ट मत या सर्वेक्षणाच्या वेळी दिसलं.

पत्रिका आणि जात-धर्म-प्रांत

ठरवून लग्न करताना पत्रिका हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कुंडल्या जमवून, गुणमीलन किती ते बघूनच लग्नाची बोलणी पुढे जातात. पण, तरुण पिढीला पत्रिका जमणं फार महत्त्वाची गोष्ट वाटत नाही. पत्रिका बघून केलेली लग्न तुटलीच नसती, घटस्फोट झालेच नसते, असं ते सांगतात. केवळ १० टक्के तरुणाईला पत्रिका बघणं आवश्यक वाटतं. जात-धर्म-प्रांत वेगळा असेल तर मात्र त्यांची तयारी फारशी नसते. जाती-धर्मावर-प्रांतावर आधारित लाइफस्टाइल असते. ती संपूर्णपणे वेगळी असेल तर अवघड जाईल. त्यामुळे ठरवून लग्न करताना तरी एकाच जातीतील जोडीदार बघू असं त्यांचं म्हणणं. आवडलेल्या मुलीने किंवा मुलाने पत्रिकेवर विश्वास नाही, असं सांगितलं तर? काही फरक पडत नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चालणार नाही असं अगदी मोजक्या लोकांनी म्हटलंय. आवडलेल्या मुलानं किंवा मुलीनं देवावर विश्वास नाही, धार्मिक गोष्टी आवडत नाही, असं सांगितलं तर? यावर केवळ पाच जणांनी नकारात्मक उत्तर दिलं. विश्वास नसला तरी चालीरीती पाळल्याच पाहिजेत, एका मर्यादेपर्यंत चालेल वगैरे उत्तरं देणारे आणखी तिघे. म्हणजे एकुणात लग्न ठरवण्यात धार्मिक विश्वासाचं स्वातंत्र्य आजची पिढी गृहीत धरते आणि पत्रिकेचा अडथळा आजच्या पिढीला मान्य नाही, हे दोन सकारात्मक बदल या सर्वेक्षणातून पुढे आले.

‘रिलेशनशिप’चं ‘स्टेटस’..

सोशल नेटवर्किंग साइट्स आयुष्यात आल्यानंतर ‘रिलेशनशिप’ या शब्दाशी आपली नव्याने ओळख झाली. तरुण पिढीनं ती करून दिली. तरुण मुला-मुलींचं ‘रिलेशनशिप’मध्ये असणं ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. अफेअर, लफडं या शब्दातली नकारात्मक भावना गळून पडली आणि प्रेमाला ‘रिलेशनशिप’ला स्टेटस मिळालं. त्यामुळे आपली पूर्वी एखादी रिलेशनशिप होती, असं मुलानं किंवा मुलीनं सांगितलं तरीही तो लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याची आजच्या पिढीची तयारी झाली आहे. ९२ टक्के तरुणाईला आधी रिलेशनशिप असेल तरीही लग्न जुळवण्यात अडचण वाटत नाही. पण, ठरलेलं लग्न मोडलेलं असेल तर ही अ‍ॅक्सेप्टन्स लेव्हल थोडी कमी होते, असं दिसतं. कारण ठरलेलं लग्न मोडलं असेल तरीही विचार करू असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण ६५ टक्क्यांवर येतं. मुलगा किंवा मुलगी घटस्फोटित असेल तर हे प्रमाण केवळ ३८ टक्क्यांवर येतं. घटस्फोटाची किंवा लग्न मोडण्याची कारणं विचारात घेऊन निर्णय घेऊ  असं म्हणणारेही अनेक आहेत. ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींचं किंवा मुलांचंसुद्धा पुन्हा जमणं अवघड आहे, असा सर्वसामान्य समज अगदी आत्तापर्यंत होता. तो हळूहळू का होईना बाद होतोय हा बदल निश्चित स्वागतार्ह म्हणता येईल. लग्न मोडण्याच्या कारणांचा विचार करताना येणारे दोन प्रमुख मुद्दे विचारात घेत आम्ही दोन प्रश्न विचारले. लग्न आणि नोकरी यात तडतोड करण्याची वेळ आली, तर कशाला प्राधान्य द्याल, यात जास्त (२१ टक्के) नोकरीला प्राधान्य देण्यात आलं. लग्नाला प्राधान्य देणारे १७ टक्केच होते आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक होतं. मुलाच्या किंवा मुलीच्या चारित्र्याबद्दल लग्न ठरल्यानंतर काही कानावर आलं तर निर्णयावर परिणाम होणार नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असणं हा आणखी एक चांगला बदल. एखाद्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न ठरवलं आणि आणखी एखादं चांगलं प्रपोजल आलं किंवा कुणी अचानक आवडायला लागलं तर? ठरलेल्या व्यक्तीशीच लग्न करू असं म्हणणारे जास्त सापडले. परिस्थितीनुसार वेळ घेऊन विचार करून निर्णय घेऊ , असंही काहींनी सांगितलं.

लग्नाचा खर्च

लग्न ठरवण्याची पद्धत बदलतेय तशी करण्याचीही बदलते आहे का, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पण, बहुतेकांना अजूनही पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यात रस आहे. पारंपरिक लग्नातला अनावश्यक खर्च त्यांना नको आहे. पण, लग्न तर धूमधडाक्यात करण्याकडे कल आहे. यामध्ये मालिका, चित्रपटांचा प्रभाव आहे का, असं विचारल्यावर बहुतेकांनी नकार दिला. टीव्ही मालिकांमध्ये दाखवतात तसं लग्न करायला आवडेल, असंही काही थोडके म्हणाले. मालिकांमध्ये किंवा चित्रपटात लग्नसोहळ्यांमध्ये दाखवतात त्या सगळ्याच गोष्टी आवडत नाहीत आणि परवडलं तर करू, अशी पुस्तीही त्या थोडक्यांनी जोडली. परवडलं तर ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करू, असं म्हणणारेही काही होते. तेदेखील मोजक्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना घेऊन. लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी एवढा मोठा घाट आणि गोतावळा कशाला, असं म्हणणं काही तरुणांनी मांडलं. लग्नाचा वायफळ खर्च अनावश्यक वाटतो, पण डेस्टिनेशन वेडिंग चालेल. म्हणजे.. लग्नसोहळ्याचा पारंपरिक खर्च नको, पण मोजक्या मित्रमंडळींबरोबरची आधुनिक स्वरूपातील मौज परवडली तर हवी आहे. थोडक्यात, तरुणाईची लग्नासाठी खर्च करण्यास ना नाही,  पण, तो आपल्या आनंदासाठी असावा, प्रथा पाळण्यासाठी नको, असंही त्यांचं मत दिसतं.

आपल्याच शहराला पसंती

ठरावीक गावातील, शहरातील, राज्यातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न व्हायला पाहिजे, अशी तुमची अट आहे का यावर अपेक्षेप्रमाणे बहुतेक सगळ्या मुलांनी, अशी अट नसल्याचं सांगितलं. मुलींनी मात्र याबाबतच्या अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त केल्या. मुंबईत राहणाऱ्या मुलीला एकवेळ पुणे चालेल, पण ठाण्यापलीकडचा मुलगा नकोय, असं सांगणाऱ्या काही जणी सापडल्या. तर मराठवाडय़ातला नको, कोकणातलाच हवा असं सांगणाऱ्याही मोजक्या होत्या. अमुक गावाचीच मुलगी किंवा मुलगा हवा अशी अट नाही म्हणणारे ७७ टक्क्यांच्याजवळ असले तरी समजा एखाद्या मुलाचं प्रोफाइल आवडलं, पण त्याच्या शहरात राहण्याची इच्छा नसेल तर लग्नासाठी त्याचा विचार करणार का, या प्रश्नाला ६९ टक्के मुलींनी नकारात्मक उत्तर दिलं आहे.

एकत्र कुटुंब चालेल का?

मुलाची इच्छा लग्नानंतरही आई-वडिलांसोबत राहण्याची असेल तर तुम्ही ते मान्य कराल का, या प्रश्नाला ९१ टक्के मुलींनी होकार दिलाय. एकत्र कुटुंबात राहायचं नाही म्हणणाऱ्यांची संख्या केवळ ९ टक्के आहे. हाच प्रश्न मुलांना विचारला. लग्नानंतर माझे आई-वडीलही आपल्या घरी राहतील किंवा त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल असं मुलीनं सांगितलं तर, या प्रश्नावर ८६ टक्के मुलांनी सकारात्मक उत्तर दिलं. केवळ ६ टक्के जबाबदारी घेणार नाही असं म्हणाले. काहींनी एकत्र राहण्याला प्रॉब्लेम नाही, पण स्पेस मिळायला हवी, असं म्हटलंय. घरजावई व्हायला मात्र ही मुलं नकार देतात. आम्ही आणखी एका पर्यायावर तरुणाईची मतं जाणून घेतली. मुलाचे आई-वडील आणि मुलगा-मुलगी असं एकत्र कुटुंब असू शकतं का, या प्रश्नावर हा उत्तम पर्याय असल्याचं काहींनी सांगितलं. आदर्श कुटुंब होऊ  शकतं असंही काहींचं मत. यात मुलगा-मुलगी भेद नाही. मुला-मुलींचे पालकांसोबत एकत्र कुटुंब ही आदर्श इच्छा आहे पण व्यावहारिकतेबद्दल त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. स्पेसची काळजीही आहेच.

लैंगिक आरोग्य

लग्नापूर्वी लैंगिक आरोग्यासंदर्भात काही प्रश्न पडतात का, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सेक्सविषयी भीती असेल तर त्याविषयी मोकळेपणाने भावी जोडीदाराशी बोलणं आवश्यक वाटतं का, या संदर्भात समुपदेशन घ्यायची गरज वाटते का? की भीतीचा वेगळा अर्थ घेतला जाईल असं वाटतं यावर सरसकट सगळ्यांनी भावी जोडीदाराशी या संदर्भात मोकळेपणानं बोलणं आवश्यक असल्याचं सांगितलं. समुपदेशनाची गरज मोजक्या लोकांनी व्यक्त केली. समुपदेशन कशासाठी, कौन्सेलर नेमके  काय करतात याबाबत मुलांच्या मनात बराच गोंधळ आढळला. समुपदेशनाची गरज नाही, असा बहुतेकांचा पवित्रा होता.

सुवर्णमध्ये साधण्याकडे कल

तुमच्या आई-वडिलांनी लग्नाच्या बाबतीत वेळोवेळी आडमुठय़ा भूमिका घेतल्या तर? त्यांना समजावू, सुवर्णमध्य साधता येऊ  शकेल का तपासू असं त्यांचं मत आहे. आई-वडिलांचं अजिबात ऐकणार नाही असं तरुणाई म्हणत नाही. तुम्हाला जोडीदार पसंत आहे पण त्याचे आई-वडील पझेसिव्ह आहेत किंवा डिमांडिंग आहेत, असं लक्षात आलं तर? परिस्थितीनुसार निर्णय घेऊ , असं तरुणाई सांगते. केवळ नऊ मुलांना अशा परिस्थितीत लग्न मोडावंसं वाटतं. प्रथम जोडीदाराशी बोलू, समजावून सांगू, सुवर्णमध्य काढू असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुलांना मुलीच्या आई-वडिलांचा फार हस्तक्षेप नको आहे, पण त्याबाबतीत मुलीशी बोलून मार्ग काढायची तयारी आहे. मुलींनादेखील ‘ममाज बॉय’ नको, असं त्या स्पष्ट करतात. पण, याबाबतीत मुलाशी बोलून आपली बाजू समजावून सांगणं आणि मार्ग काढणं त्यांना गरजेचं वाटतं. सल्ले द्या, पण मतं लादू नका, असं या पिढीचं सांगणं आहे.

थोडक्यात, लग्न हा वैयक्तिक निर्णय आहे. पण, आई-वडिलांना त्यात सामावून घेणार. त्यांच्या पसंतीला महत्त्व आहे. पण, ती सर्वस्वी त्यांची जबाबदारी नाही. लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेपासून दूरचे नातेवाईक दूरच ठेवणं पसंत आहे. लग्नानंतर आई-वडिलांची ढवळाढवळ मुलींना नको आहे. व्यक्तिस्वातंत्र्य जपण्याकडे त्यांची अपेक्षा आहे. म्हणूनच सामाजिक, आर्थिक बाबी जुळणारा साथीदार त्यांना हवा आहे.
या सर्वेक्षणातून समोर आलेला महत्त्वाचा धागा असा की, लग्नप्रक्रिया बदलते आहे हे गृहीतक संपूर्णपणे खोटं नाही. ते सिद्ध झालंय. पण, हे सिद्ध होताना आणखी एक गोष्ट पुढे आली आहे. जुन्या पद्धतीच्या लग्न ठरवण्याच्या ढाच्यात निश्चित बदल होतोय. स्वत:साठी, स्वत:च्या विचारांनी लग्न करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे आणि यात मुली आघाडीवर आहेत. मुलींच्या एकूणच आयुष्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत, साहजिकच त्या लग्नाकडूनही वाढलेल्या आहेत आणि त्या सहजपणे व्यक्त करण्यातला मोकळेपणा आता त्यांच्यात आला आहे. त्या तुलनेत मुलं मात्र फार बदलताना दिसत नाहीत. अर्थात लग्न केल्यानंतर जेवढय़ा तीव्रतेने मुलींचं आयुष्य बदलतं, तेवढं मुलांचं आजही बदलत नसल्यामुळे असेल कदाचित, पण मुली काहीशा धीट, बऱ्याचशा डिमांडिंग आणि मुलं थोडीशी पारंपरिकतेच्या साच्यात अडकलेली, असं आजच्या लग्नव्यवस्थेचं प्रातिनिधिक स्वरूप या सर्वेक्षणातून पाहायला मिळालं. म्हणूनच असं म्हणता येईल की लग्नाच्या गाठी
स्वर्गात बांधल्या जातात हे नव्या पिढीला मान्यच नाहीय. त्यामुळे त्या बाबतीत ती जमिनीवर आहे, पण, तरीही पारंपरिक रूढींचं, विचारांचं जोत अजूनही पुरतं उतरलेलं दिसत नाही.

पत्रिकेपेक्षा विचार जुळणं महत्त्वाचं…

‘लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात’, हे वाक्य प्रत्येक लग्नाळू मुलगा किंवा मुलीच्या कानावरून जातेच जाते. घरचे, नातलग, मित्र-मैत्रिणी यांपैकी कोणाच्या ना कोणाच्या तोंडी हे वाक्य असतंच. बॉलीवूड प्रेमकथांनीसुद्धा हे वाक्य आपल्या मनावर बिंबवायचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांवर या संकल्पनेचा काही अंशी परिणाम होतो. त्यामुळे अजूनही २३.४ टक्के मुले या गृहीतकावर विश्वास असल्याचे सांगतात. तर  ७६.६ टक्के मुले मात्र लग्नाचा विचार करताना या गृहीतकावर विश्वास ठेवण्याऐवजी एकमेकांचे विचार, स्वभाव जुळणे महत्त्वाचे मानतात.

लग्नाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा भाग म्हणजे ‘पत्रिका जुळणे’. मुला-मुलीचे किती गुण जुळताहेत, पत्रिकेत मंगळ तर नाही ना अशा शंकाकुशंकांचे समाधान झाल्याशिवाय लग्नाची बोलणी पुढे न्यायची नाहीत, असे आजही घराघरांत समजले जाते. विशेषत: पारंपरिक पद्धतीमध्ये कित्येकदा दाखवण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम होण्याआधीच दोघांच्या पत्रिकांची तपासणी दोन्हीकडच्या गुरुजींकडून केली जाते. पण आताची पिढी मात्र पत्रिकांचा फारसा बाऊ  करताना दिसत नाही. उलटपक्षी पत्रिकांचा विषय टाळणेच त्यांना अधिक पसंत आहे. लग्न जुळवताना पत्रिका पाहण्याची गरज नसल्याचे ६० टक्के मुलांचे म्हणणे आहे. तर ३० टक्के मुलांच्या मनात पत्रिका पाहण्याबाबत खात्री नाही. सध्याची पिढी प्रेमविवाहाला अधिक कौल देताना दिसते. अशा वेळी कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी एकत्र असलेल्या त्या दोघांना एकमेकांना जाणून, समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यांच्यासाठी कित्येकदा ‘पत्रिका पाहणे’ हे अडथळ्याचे असते. मुलांचा विश्वास नसला तरी, पत्रिकेत एखादा गुण जुळत नाही म्हणून पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत राहतेच. त्यामुळे नात्याची सुरुवात करताना प्रेमविवाहाला पसंती देणारे तरुण पत्रिका पाहणे शक्यतो टाळतातच. पारंपरिक पद्धतीच्या बाबतीत मात्र पत्रिका पाहणे चुकवता येत नाही. पण त्याला किती महत्त्व द्यायचे याबद्दलही तरुण विचार करू लागले आहेत. त्यामुळे गुण जुळत नसले पण विचार जुळत असल्यास घरच्यांना त्याबद्दल पटवून देण्याची तयारीही त्यांची आहे.

पत्रिकेइतकंच लग्नाळू मुला-मुलींना देवधर्म आणि त्यासोबत येणाऱ्या रीतीभाती टाळता येणे शक्य नसते. एरवी लाडाकोडात वाढलेल्या मुलीला वयात येताच हरतालिकेचे व्रत करायला लावण्याची आईची विनंतीवजा सक्ती असो किंवा मुलाने किमान सकाळी देवापुढे हात जोडावे हा वडिलांचा हट्ट असो, तो चुकत नाही. लग्नानंतर घरात येणाऱ्या सुनेकडूनही रीतीभाती पाळण्याची अपेक्षा सासरच्यांकडून केली जाते. पण तरुण पिढी मात्र देवावरील विश्वास, रीतीभाती पाळणे याबद्दल प्रत्येकाची स्वतंत्र मते असणे पसंत करते. आपला भावी जोडीदार नास्तिक असेल किंवा त्याला पूजाअर्चामध्ये जास्त रस नसल्यास त्याला कुठलीही जबरदस्ती करायची गरज या पिढीला वाटत नाही. पण त्याच वेळी आपल्या श्रद्धेबद्दल समोरच्याने आक्षेप नोंदवू नये किंवा त्यात वाजवीपेक्षा अधिक दखल देऊ  नये, असेही ते नमूद करतात. अर्थात लग्नानंतर बायकोला देवाधर्माबद्दल समजावून सांगू आणि तिचे मत बदलू असा विश्वास असलेली मुलेही आहेत. पण त्यातही ठरावीक मर्यादेपलीकडे सक्ती केली जाणार नाही, असेही ते सांगतात.       ’ ’
– मृणाल

एकत्र कुटुंब हवं, पण हस्तक्षेप नको..

आजच्या पिढीने व्यावहारिक आणि भावनिक या दोन्ही प्रवृत्तींची योग्य सांगड घालत आयुष्य जगण्याचा मंत्र स्वीकारला आहे, हे तिच्या लग्नसंस्थेबाबतच्या विचारांवरून दिसून येतं. लग्न तर करायचंय पण, पूर्वीच्या काही नियमांना नवलाईचं वलय लावून त्याचा अनुभव घ्यायचा आहे. लग्न झाल्यानंतर मुलीने तिचं घर सोडून मुलाच्या घरी म्हणजे सासरी जाऊन राहायची पद्धत आजही आहे. पण, आता यात बदल करायला हवेत, अशी आजच्या पिढीची विचारसरणी पुढे येऊ लागली आहे. ‘मुलाचे आणि मुलीचे आई-वडील, मुलगा-मुलगी असं एकत्र कुटुंब असू शकतं का?’ या सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नावर बहुतांशी तरुण मुलं-मुली सकारात्मकरीत्या व्यक्त झाले. एकीकडे तरुण पिढीचा विभक्त कुटुंब पद्धतीकडे कल आहे असं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे कुटुंब पद्धतीविषयी तरुण पिढीचे सकारात्मक बदलते विचार सर्वेक्षणातून पुढे आले. मिळालेल्या प्रतिसादावरून असे लक्षात येते की, सगळे एकत्र राहत असतील तर एका नव्या कुटुंब पद्धतीचा पायंडा पडू शकेल. अलीकडे एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असण्याचंही प्रमाण वाढतंय. अशा वेळी मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांना एकटं राहावं लागतं. अशा परिस्थितीत मुलगा मुलीच्या घरी तिच्या आई-वडिलांसोबत राहायला तयार नसतो, कारण तोही एकुलता एक असतो. त्यामुळे यावर मुलाचे आणि मुलीचे आई-वडील आणि मुलगा-मुलगी असं एकत्र राहण्याचा तोडगा आजच्या पिढीला स्वागतार्ह वाटतो. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांनी एका वेगळ्या कुटुंब पद्धतीला दुजोरा दिला आहे. या प्रश्नावर ‘असं कुटुंब नक्की असू शकतं, सध्या एकुलत्या एक मुलामुलींच्या आईवडिलांनी जायचं कुठे?’, ‘असे केल्याने आदर्श कुटुंब तयार होईल’, ‘असं एकत्र कुटुंब असणं उत्तमच’ आणि ‘असं घर असण्याची माझी स्वत:ची इच्छा आहे’ अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रिया यामध्ये मांडल्या गेल्या आहेत.

ही पिढी भावनिक आणि व्यावहारिक आहे. त्यांना एकत्र कुटुंब पद्धत हवी आहे, पण त्यांना त्यांची ‘स्पेस’ही हवीय. ‘स्पेस’ची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते. काहींच्या मते बंधन नसलेलं आयुष्य तर काहींच्या मते त्यांच्या आयुष्यात इतरांची ढवळाढवळ नसणं. भलेही मुलीचे आई-वडील मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांसोबत राहतील, पण त्याच वेळी दोघांच्याही आई-वडिलांचा संसारात हस्तक्षेप होता कामा नये, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. ‘एकत्र राहणं चालेल, पण मुला-मुलीला त्यांची स्पेस हवी आहे’, ‘अशा कुटुंबाची हरकत काहीच नाही, पण मुला-मुलीच्या संसारात हस्तक्षेप करायचा नाही’ अशीही काही उत्तरं सर्वेक्षणात आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र राहायला तयार आहोत, पण आमच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन लादायचे नाही, आमच्या संसारात हस्तक्षेप करायचा नाही आणि कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याचा दडपण नको, असा या पिढीचा पवित्रा आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की, या पिढीची अडचण एकत्र राहण्यात नाही किंवा येणारी जबाबदारी झिडकारण्यातही नाही. त्यांना फक्त त्यांची ‘स्पेस’ हवी. काही मुला-मुलींचा सूर आजही याबाबत काहीसा नकारात्मकच आहे. घरात चार माणसं एकत्र राहत असली तरी त्यांच्या भिन्न स्वभाव आणि मतप्रवाहांमुळे कुरबुरी होत असतात. अशा वेळी मुलाचे आणि मुलीचे पालक असे सगळे एकत्र राहिल्यावर वाद होण्याला आणखी कारणं मिळू शकतात. म्हणूनच ‘असं एकत्र कुटुंब नको
कारण अनेक माणसं एकत्र आल्याने मतमतांतरे होऊन वाद होऊ शकतात’ अशा प्रकारची उत्तरं मिळाली. इथे तरुण पिढीचा व्यवहारीपणा दिसून येतो.

एकुणात, आजच्या तरुण पिढीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. त्यांना काय हवंय, काय नकोय याविषयी त्यांची ठरलेली मतं आहेत. त्यानुसार त्यांची वागणूकही तशीच असते. अर्थात त्यांना जुनंही हवंय, पण नवलाईचं वलय असलेलं. तसंच एकुलत्या एका मुलीच्या पालकांचा पूर्वी इतका विचार केला जात नव्हता, पण आता त्या मुलीचा होणारा नवरा या गोष्टीचा विचार करतो. हा बदल युवा पिढीच्या विचारांवरून, मतांवरून जाणवतो. एकत्र कुटुंबाच्या नव्या पद्धतीविषयक प्रश्नांतर्गत नकारात्मक उत्तरं आढळून आली असली तरी त्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या बदलत्या विचारांकडे सकारात्मकतेने बघायला अजिबात हरकत नाही. भविष्यात या संकल्पनेत शंभर टक्के बदल झाला नाही तरी हा सकारात्मक विचार पुढे येतोय हेही नसे थोडके..! ’ ’

रिलेशनशीप चालेल, पण घटस्फोटित नको…

अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू असं म्हटलं जातं, परंतु लग्नाच्या बाजारात मात्र नवलाईलाच महत्त्व मिळतं. लग्नाचा अनुभव असलेल्या किंवा त्या अनुभवातून पोळलेल्या मुलाचा किंवा मुलीचा साथीदार म्हणून विचार करण्याची आजही ५० टक्के उमेदवारांची तयारी नाही. घटस्फोट म्हणजे लग्न झालेल्या जोडप्याने कागदोपत्री विभक्त होणं. यामागे आíथक-सामाजिक- कौटुंबिक काहीही कारण असू शकते. घटस्फोट घेतल्यानंतर तो किंवा ती नव्याने स्वतंत्र आयुष्य सुरू करू शकतात. पण घटस्फोट घेण्यापर्यंतच्या निर्णयाप्रत येणं भावनिकदृष्टय़ा वेदनादायी असतं. विभक्त होण्याची प्रक्रिया सरकारी असली तरी दोन माणसं, दोन कुटुंबं विलग होणार असतात. आधुनिक, टेक्नो जगातही घटस्फोटाकडे नकारात्मक भावनेने पाहिलं जातं. घटस्फोट घेतल्याने मुलगा किंवा मुलगी वाईट ठरत नाही, खरं तर लग्नाचा त्यांचा पहिला अनुभव यशस्वी ठरलेला नसतो. पण एकूणच लग्नासाठी स्थळ म्हणून घटस्फोटित मुलगा किंवा मुलगी नको हाच सर्वसाधारण दृष्टिकोन आहे. मात्र जागतिकीकरणाच्या टप्प्यानंतर कुटुंब, घर याकडे बघण्याची भूमिका बदलल्याने ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी घटस्फोटित मुलगा किंवा मुलीला साथीदार म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वेक्षणाचा एक महत्त्वपूर्ण पलू म्हणजे एकीकडे घटस्फोटित साथीदार नको म्हणणारी मुलंमुली लग्नापूर्वी रिलेशनशिप असणारा मुलगा किंवा मुलगी चालेल असं बहुतांशीजणांनी मत नोंदवलंय. लग्न म्हणजे जगाला सांगून होणारा सोहळा अशी संकल्पना. पण रिलेशनशिपबाबत मर्यादित लोकांना माहिती असतं. अगदी आतापर्यंत आपल्या समाजात विवाहित आणि अविवाहित अशी वर्गवारी होत असे. पण आता या दोन गटांदरम्यान रिलेशनशिपमध्ये असलेला हा नवीन वर्ग तयार झाला आहे. घटस्फोटाशी नकारात्मकता जोडलेली आहे तशी भावना रिलेशनशिप ब्रेक झालेल्या व्यक्तींकडे पाहताना नाही. समाजातील विचारांमध्ये झालेलं हे विचारसंक्रमण आहे. रिलेशनशिप वर्कआउट नाही झाली, हरकत नाही हा दृष्टिकोन रुजू लागला आहे. सोशल मीडियावर इन अ रिलेशनशिप म्हटलं की सोपं होतं, पण ही रिलेशनशिप निभावणं सोपं नाही याची जाणीव होऊ लागली आहे. एकमेकांशी बोलल्यानंतरच समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी समजतात. लग्न ठरल्यानंतर भेटीगाठी वाढू लागतात. त्यातूनच आपलं एकमेकांशी जमणं कठीण आहे हे लक्षात आल्यावर घाईने लग्न मोडण्याची ८१ टक्के युवकांची तयारी नाही. आणखी संवाद साधू, समजून घेण्याचा प्रयत्न करू असाच बहुतांशी व्यक्तींचा दृष्टिकोन आहे. तोडणं सोपं असतं पण जोडायला वेळ लागतो याची जाणीव होणंच महत्त्वाचं आहे. याव्यतिरिक्त एकनिष्ठतेला अजूनही प्राधान्य असल्याचंही स्पष्ट झालं आहे. लग्न आणि नोकरी या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. दोन्हीपकी प्राधान्य कोणाला द्यायचे हे सापेक्ष आहे. म्हणूनच परिस्थितीनुसार योग्य काय ते ठरवू या पर्यायाला पसंती मिळाली आहे. लग्न ठरल्यावर एकमेकांचा विश्वास संपादन केला जातो. अशा वेळी काहीजण नात्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीतरी भावी साथीदाराबदल गरसमाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामुळे लग्नाच्या निर्णयावर परिणाम होणार नाही असं बहुतांश उमेदवारांनी स्पष्ट केलं आहे. दोघांच्यामध्ये तिसऱ्या कोणाची तरी उठाठेव सहन करणार नाही हेही यातून अधोरेखित होत आहे.     ’ ’

लग्न म्हणजे अ‍ॅडव्हेंचर ट्रिप..

मुंबईतली शनिवारची निवांत नसलेली खुसखुशीत अशी संध्याकाळ. चहा- कॉफीचा एकमेकांत मिसळू पाहणारा गंध. गप्पांच्या मैफिली रंगायला हे एवढं पुरेसं असतं. कॉलेजच्या कट्टय़ावर बसून गप्पा मारल्याला आता तशी बऱ्यापैकी र्वष लोटलेली. आणि आज अचानकच तो योग जुळून आला होता. किती बोलू अन् काय काय बोलू असं झालेलं प्रत्येकीला.

‘‘काय गं तू आणि यतीन कधी लग्न करताय फायनली?’’ गप्पांच्या गाडीला करकचून ब्रेक दाबला गेला स्पीडब्रेकर आल्यासारखा. ‘‘कसलं काय गं ठरतंच आहे आमचं अजून.. आम्ही दोघंही अजून तितकेसे सेटल्ड नाही आहोत. म्हटलं आधी स्वत:चं काहीतरी असूदे व्यवस्थित. मग करू विचार. आणि तुझं काय घरी सांगितलंस ना तुमच्याबद्दल? काय म्हणाले आईबाबा?’’

‘‘हो सांगितलं, पण त्यांचं म्हणणं आहे की तो एकतर मुंबईचा नाहीये. त्यामुळे नवीन शहरात जाऊन अ‍ॅडजस्ट करायला जमेल का मला? त्यांचंपण बरोबर आहे गं, आपण मुंबईसारख्या शहरात वाढलेल्या मुली. एकदम सेमी अर्बन ठिकाणी कायमचं राहायचं म्हटलं तर बराच त्रास होतो.’’ ‘‘हो ना, म्हणूनच मीपण आईबाबांना स्ट्रिक्टली सांगितलंय मुलगा बघताय तर मुंबईचाच, फारात फार पुणे, पण त्यापलीकडे नको. त्यांनी त्या मॅट्रिमोनिअल साइट्सवर नावनोंदणी केलीये माझी. कायतरी उगाचच टाइमपास. मला काही हे पटत नाही, पण सांगणार कोण आईबाबांना?’’ तिसरीने तिची व्यथा मांडली. ‘‘अगं, माझं आणि यतीनचं सांगायच्या आधी आमचे नातेवाईक कुठून कुठून स्थळं आणायचे. आता तुम्हीच सांगा आपण काय नोकऱ्या सोडून गावात जाऊन बसायचं का? लाइफस्टाइलचा किती फरक पडतो, अगं खरंतर यतीनच्या घराच्या रीतीभाती आणि आमच्या रीतीभाती यातही तसा जमीनअस्मानाचाच फरक आहे. पण त्यांच्या घरात ते तितकंसं पाळलं जात नाही म्हणून बरंय. नाहीतर जुळवून घेणं किती कठीण होऊन बसतं. इथं आपल्याला आपल्याच घराच्या रीतीभाती नीटशा माहीत नसतात तिथे त्याच्या घराच्या तर दूरच.’’ यावर मात्र त्या सगळ्यांनीच एकमेकांना मनापासून टाळ्या दिल्या. ‘‘मी तर मुंबई सोडून जाणं इमॅजिनपण नाही करू शकत. मुंबईच काय मला तर माझा एरियापण नाही बदलायचा. म्हणूनच त्याच्याबद्दल घरी सांगितल्यावर आता तोच विचार करतेय. मुंबईची ही लाइफस्टाइल सोडून राहायला जमेल का मला?’’ ‘‘खरंय तुझं. आहे कठीण हे. पण तुला सांगू, मी असा विचार करणं सोडून दिलंय. म्हटलं समजा एखाद्या चांगल्या मुलाचं स्थळ आलं तर काय हरकत आहे, आय मीन जर तो वेल सेटल्ड असेल घर व्यवस्थित असेल, आईवडीलही आमच्या लाइफस्टाइलशी जुळवून घेणारे असतील तर काय हरकत आहे, जर तो मुंबईचा नसला तर म्हणजे अगदीच गावसुद्धा नाही़. हल्ली जातीपेक्षा जास्त तुमची लाइफस्टाइल जास्त मॅटर करते, विच आय थिंक इज फेअर इनफ.’’ अजून कोणीतरी म्हणाली, ‘‘काय गं तू का गप्प? बोल ना काहीतरी, तुझं काय लग्नाचं?’’ इतका वेळ गप्प बसलेल्या तिला कोणीतरी विचारलं. ‘‘तुम्हाला असं नाही का वाटत की लग्न म्हणजे एक अ‍ॅडव्हेंचर असतं?’’ आता गप्प राहण्याची वेळ बाकी जणींची होती. ‘‘अरे म्हणजे बघा ना, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मधला बेअर ग्रिल जसा एका अ‍ॅडव्हेंचर्स ट्रिपवर निघतो ना तसं वाटतं मला लग्न. एकदम नवीन जागा, तिथलं सगळं अनोळखी, लव्ह मॅरेज असलं तरी तिथे येणारी संकटंपण वेगळी. आधी कधीच न अनुभवलेली.’’  ‘‘हो.. आणि वाटेत भेटणारे प्राणीसुद्धा भलतेच अतरंगी.’’ बाकीच्याही आता तिच्या या ट्रिपमध्ये सामील झालेल्या. ‘‘हो ना, पण मला काय वाटतं माहीतेय, आपण त्या ट्रिपमधले बेअर ग्रिल नसतो. आपण असतो कॅमेरामॅन. त्या नवख्या जागेत आपल्याला स्वत:ला तर सांभाळायचं असतंच, पण तिथं घडणारी प्रत्येक गोष्टसुद्धा टिपायची असते, मॅनेज करायचं असतं सतत, फरक एवढाच की त्यांचं हे काही तासांसाठी असतं, आपल्याला मात्र आयुष्यभर या अ‍ॅडव्हेंचरला सामोरं जायचं असतं.’’ ‘‘आपणही करू की पार त्यातलं वाइल्ड थ्रिल टिकवून.’’ गप्पांच्या गाडीने आता स्पीडब्रेकर ओलांडून केव्हाच वेग घेतला होता.

’ ’

संकोच गेला, मोकळेपणा आला…

लैंगिक संबंधाबाबत वर्षांनुवर्षे आपल्याकडे कुजबुजतच किंवा गॉसिपिंगच्या अंगाने बोलायची सवय आहे. लग्नानंतरच्या सहजीवनातदेखील लैंगिक बाबीत हीच भीड, संकोच अनेक वेळा असायचा. पाण्यात पडलं की आपोआप पोहता येईल याच पद्धतीने याकडे पाहिले जायचे. पण, आज ही परिस्थिती बदलली आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या दोन महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांनी आजच्या पिढीची पूर्णत: बदलेली लैंगिक आणि आरोग्य मानसिकता प्रकर्षांने दिसून येते. सेक्सविषयी मनात भीती असेल तर त्याबद्दल जोडीदाराशी बोलाल का? समुपदेशन घ्याल का? की भीतीचा वेगळा अर्थ काढला जाईल म्हणून विषयच टाळाल. या प्रश्नावर एकजात सर्वानी जोडीदाराशी मोकळेपणाने बोलू असं सांगितलं आहे. हा एक मोठा आणि सकारात्मक बदल म्हणावा लागेल. सहजीवनाचा अविभाज्य घटक असणाऱ्या लैंगिक संबंधाबाबत मनात उगाचच किंतु ठेवणारी मानसिकता आजची पिढीची नाही, हेच यातून स्पष्ट होते. नंतर प्रश्न वाढण्यापेक्षा आधीच बसून चर्चा करू, त्यात भीती, लाजेचा प्रश्नच उद्भवत नाही अशी या पिढीची थेट भूमिका दिसून येते. शरीर संबंध ही नैसर्गिक बाब आहे, त्याबाबत दोघांमध्ये खुलेपणा असायला हवा हे आज सर्वानाचा पटलं आहे. दोघांनी एकमेकांशी बोलायचे असल्यामुळे, अगदीच गरज भासली तरच समुपदेशन घेऊ अशी भूमिका दिसून येते. थोडक्यात काय, संकोच, भीड चेपली आणि मोकळेपणा आला हेच यातून अधोरेखित होतंय.

हाच मोकळेपणा आणखीन एका बाबतीत प्रकर्षांने दिसून येतो तो म्हणजे लग्नाआधीच्या शारीरिक संबंधाबद्दल जोडीदाराला सांगणं. एकेकाळी असा काही संबंध आला असेलच तर त्याबाबत गुप्तता बाळगण्याकडेच साधारण कल असायचा. पण, आज ८५ टक्के मुलामुलींनी याबाबतीतली माहिती जोडीदाराला देणं गरजेचं वाटतं.

केवळ लैंगिक आयुष्यापुरताच विचारातला बदल नाही तर एकूणच आरोग्याबाबतीची जागरूकता वाढीस लागल्याचे सध्या दिसून येत आहे. मध्यंतरी एक काळ होता जेव्हा एचआयव्ही चाचणी करून घेण्याबाबतची जागरूकता वाढली होती. पण, आज मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आरोग्यविषयक चाचण्यांची गरज असल्याचे तब्बल ८५ टक्के जणांनी ही गरज नोंदवली आहे.

मात्र त्याच वेळी सहजीवनासाठीचं कौन्सेलिंगची फारशी गरज न वाटणे हे आश्चर्यकारक आहे. एक तर आमचे प्रश्न सांभाळण्यास आम्ही समर्थ आहोत हा तरी त्यामागचा दृष्टिकोन असू शकतो, आमच्यात तिसरा नको, ग्यान देणे नको, हा सूर असू शकतो.  ’ ’

लग्नसंस्थेतील भविष्यातील बदलांची नांदी

सर्वेक्षणातून पुढे आलेली काही निरीक्षणं लग्नसंस्थेत होऊ  घातलेल्या भविष्यातील बदलांची नांदी आहेत. तरुणवर्गाच्या विशेषत: मुलींच्या मनात लग्नाचा उद्देश आणि त्याचं आयुष्यातील स्थान यात बरेच बदल होताना दिसत आहेत. मुलींमध्ये शिक्षणामुळे आलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचं हे द्योतक असावं.

इतिहास बघता विवाहसंस्थेचा उगम हा पुरुषकेंद्री व्यवस्थेतून झालेला दिसून येतो. पुरुषांनी, पुरुषांच्या सोयीसाठी निर्माण केलेली व्यवस्था आणि म्हणूनच सर्वेक्षणातील बहुतांश मुलगे हे ‘आहे ते बरे चालले आहे’ या मताचे, तर मुली मात्र आपापल्या परीने प्रस्थापित व्यवस्थेला वेगवेगळ्या टप्प्यांवर धडका देणाऱ्या! आपल्या मागण्यांविषयी अत्यंत ठाम आणि आग्रही असणाऱ्या!

शिक्षित मुलींच्या बाबतीत आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जीवनात व्यक्ती म्हणून स्थान हे लग्नामागील उद्देश किमान शहरी भागात तरी लोप पावले आहेत. भावनिक आणि शारीरिक गरजा हे कदाचित आता लग्नसंस्थेचे प्रमुख स्तंभ आहेत. आणि म्हणूनच मुला- मुलींमधील हेच भावनिक बंध त्यांना जोडीदार म्हणून एकत्र येण्यास आणि या गरजा न भागल्यास त्याच सहजतेने विलग होण्यास कारणीभूत ठरतील. याचे पर्यवसान कादाचित काही शतकांनी लग्नसंस्था कालबा होण्यात होऊ  शकते. येथे सहजतेने म्हणण्याचे कारण हे की लग्न ही मुलींना आयुष्यातील अंतिम सार्थकता वाटत नाही. आपले सामाजिक अस्तित्व सिद्ध करण्यासाठीही त्यांना लग्नाची आवश्यकता वाटत नाही. गरज असेल तिथे स्वखुशीने तडजोड पण काही अटींबाबत ठाम अशी भूमिका घ्यायची मुलींची मानसिकता दिसून येते. वेळप्रसंगी आईवडिलांना सोबत घेऊन राहण्याची मुलीची तयारी, नवऱ्याकडे लग्नानंतर किमान प्रायव्हसीची मागणी ही सर्वेक्षणातून आलेली काही उदाहरणे.

आधुनिकतेच्या वाटेवर चालू लागलेल्या मुला-मुलींच्या मनात काही बाबतीत मात्र विरोधाभास दिसून येतो. शक्य असल्यास टीव्ही मालिकांप्रमाणे लग्न थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने करण्याचा मोह आजच्या तरुणाईला सोडता येत नसल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी विशिष्ट सामाजिक संदर्भ असलेले लग्न विधी आधुनिक काळात केवळ प्रतीकांच्या स्वरूपात अस्तिवात असलेले दिसून येतात. या विधीचा अगदी वरवर जरी अभ्यास केला तरी त्यातील फोलपणा आणि काही प्रसंगी अवमानकारक मानसिकता (उदा. कन्यादान, लाजाहोम) उघड होते. परंतु प्रवाहाविरुद्ध पोहण्याला शक्ती आणि धाडस लागते. तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणात अशी साहसी मानसिकता तयार व्हायला वेळ लागेल पण होईल मात्र नक्की! लग्नानंतर नाव आणि आडनाव बदलण्याच्या बाबतीतही हेच निरीक्षण समोर येते. नाव नाही पण आडनाव बदलण्यास हरकत नाही असे मुलींचे मत आहे. आई-वडिलांनी प्रेमाने ठेवलेल्या ‘नावा’शी मुलीचे अस्तित्व निगडित असते आणि लग्नानंतर बदलेल्या ‘आडनावा’शी नवऱ्याचे अस्तित्व! हे दोन्ही टिकून ठेवण्याचा कदाचित हा प्रयत्न असावा!

आयुष्यातील आपली प्रत्येक कृती ही आपली जीवनविषयक विचारधारा प्रकट करत असते. लग्न ही व्यक्तीच्या आयुष्यातील फारच मोठी घटना! आजची तरुण पिढी आपल्या कृतीतून किमान त्याविषयीच्या विचारातून लग्नासंदर्भात काय संदेश देते याची चुणूक आपल्याला या सर्वेक्षणातून येते.               ’ ’
चारुता गोखले

मुलींना बदलायचा आहे, लग्नव्यवस्थेचा साचा

आपल्या आईबाबांच्या लग्नाचा अल्बम ती अगदी कौतुकाने पाहत होती. ‘‘आई, काय गं, तुझ्या लग्नात हे किती विधी? बापरे, कंटाळा नाही आला का तुला, मी नाही करणार हं हे सगळं, मला तुम्ही सांगूही नका असलं काही करायला,’’ मुलीने सहजपणे आईला सांगितलं. खरंतर लग्न हा विषय प्रत्येक घरात कधीना कधी चर्चिला जातोच. पण आता मात्र लग्न हा ‘दोन जिवांच्या मीलना’पलीकडे निघून गेलेला विषय आहे. ‘लोकप्रभा’च्या लग्नविषयक सव्‍‌र्हेमधून हे प्रकर्षांने जाणवतं. मुलींची लग्नाबद्दलची बदलत जाणारी मते ही त्यातील लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

पूर्वी मुलगा जरी मुलीने ठरवलेला असला तरी लग्न कसं, कुठे, केव्हा करायचं हे घरातली मोठी माणसं ठरवायची. आता मात्र हा निर्णय घेण्यातही मुलींचा सहभाग वाढलाय. लग्न माझं आहे तर ते कसं करायचं हा निर्णयसुद्धा मीच घेईन असं आजकालच्या मुलींचं मत आहे. स्नेहा आपल्या ताईला सांगते, ‘‘ताई मला तुझ्यासारखं टिपिकल लग्न नकोय. मस्त डेस्टिनेशन वेडिंग हवंय. प्रत्येक क्षण कसा एन्जॉय करता आला पाहिजे.’’ म्हणजे खर्च नेहमीच्या लग्नपद्धतींवर न होता डेस्टिनेशन वेडिंगसारख्या हटके गोष्टींवर करायचा आहे.

मुलींना मिळालेल्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे असेल कदाचित, पण आपल्याला लग्नाच्या बाबतीत गृहीत धरणं मुलींना आावडेनासं झालंय. लग्न की नोकरी याबाबत बहुतेक जणी नोकरीवर ठाम आहेत. हल्ली मुलगा कसा असावा याचीही विशलिस्ट बऱ्यापैकी बदलली आहे. ‘माझी काळजी घेणारा’ ते ‘मला माझी स्पेस देणारा’ इतपत ती आलीये. नुकतंच लग्न ठरलेली आसावरी तिच्या मैत्रिणीला सांगत होती. ‘‘मी अंशुमनला सांगितलं की तू एका एमएनसीमध्ये काम करतोस. यू नो हाऊ इट इज. काम प्रचंड असतं. बरेचदा लेट होतं घरी यायला. अन् वीकेंड आला की बाहेर जाणं होतंच. त्यामुळे उद्या लग्न झाल्यावर तुला इतका उशीर का होतो, लवकर घरी येत जा असलं जमणार नाही. तू लवकर आलास तर तू स्वयंपाक बनवत जा. मी आले तर मी बनवेन. नाहीतर आपण बाईच ठेवू. मला मात्र जमणार नाही रोज रोज स्वयंपाक करायला.’’  मला स्पेस हवीये या विचाराचा आवाका तसा बराच मोठा आणि व्यक्तिसापेक्ष आहे. पण बऱ्याच अंशी याचा अर्थ असा असतो की मी फक्त तुझी बायको नसून एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि हे माझ्या नवऱ्याने समजून घेऊन त्याचा आदर केला पाहिजे. पण एका बाजूला मुली स्वत:च्या स्वातंत्र्याबद्दल इतक्या जागरूक दिसल्या तरी अजूनही बव्हंशी मुलींना आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त कमावता मुलगाच हवाय. म्हणजे अजूनही त्या ‘वुमन ऑफ द हाऊस’ बनायला तितक्याशा तयार नाहीत. याला कारणीभूत आपल्यावर वर्षांनुर्वष बिंबवली गेलेली मानसिकताही असावी.

असं म्हणतात की लग्न आधी समाजाला कळतं आणि मग लग्न करणाऱ्या दोघांना. आत्ताच्या मुलींना हेच नकोय. समाजाची संकल्पनाच त्यांनी संकुचित केली आहे. मी, माझे आईबाबा आणि माझे असे काही जवळचे लोक. बाकीच्या इतर माणसांचं लटांबर बाळगण्यात त्यांना काहीच स्वारस्य नाही. ‘‘हे पाहा आईबाबा, मी निवडलेल्या मुलाबद्दल शेजारच्या काकांना काय वाटतं किंवा गावच्या चुलतमामे आत्याला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना काय वाटतं यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला काय वाटतं ते सांगा.’’ असं आईबाबांना निक्षून सांगितलं जातं.

थोडक्यात काय तर लग्नाचा हा वर्षांनुवर्षांचा साचा मुलींना बदलायचाय. तसा प्रयत्नही त्या करत आहेत. अर्थात तो पूर्णपणे बदलायला अजून बरीच वर्षे जायची आहेत. पंखात बळ मात्र आलंय. तरीही मुलींची अवस्था पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखी झालीये. खूप धडपडीने पिंजऱ्यातून बाहेर तर पडलोय. पण आपण उडायला लागल्यावर पडणार तर नाही ना; या अदृश्य पिंजऱ्याने मात्र त्यांना जखडून ठेवलंय.        ’ ’

मुलांना मात्र हवीय, टिपिकल बायको

मुलगा-मुलगी वयात (लग्नाच्या) आले की हल्ली अनेक घरांमध्ये लग्नाबद्दल मोकळेपणाने चर्चा होताना दिसत असली तरी ती असते आधुनिक युगात संस्कार, परंपरा जपल्याच पाहिजेत अशी. शहरामध्ये राहणारी तरुणाई स्वत:ला मॉडर्न मानते खरी पण आजही मुलांना घरच्यांना सांभाळून घेणारी, मनमिळाऊ संस्कारी मुलगी हवी असते. खरं तर ही मागणी अनादी काळापासूनची आहे. टीव्हीवर एक जाहिरात होती, ज्यामध्ये मुलगी हातभर काढलेले टॅटय़ू दाखवते. सर्वात आधी ते पाहून मुलगा आश्चर्यचकित होतो. मात्र, नंतर म्हणतो माझ्या आईला चित्रकला फार आवडते. खरंच असे हातभर टॅटय़ू असलेली मुलगी आजच्या आयांना आणि मुलांनादेखील आवडेल का? त्याचं उत्तर नाहीच असेल. कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांना मुलगी संस्कारी हवी आहे. हातभर टॅटय़ू हे आजही भारतीय संस्काराच्या व्याख्येत कुठेच बसत नाही, हेच खरं.

आजही मुलींची मुलांकडून स्वत:चं घर असावं तो स्थिरस्थावर असावा अशी मागणी दिसते. ही मागणी चुकीची नाही. परंतु एकही मुलगी असं म्हणत नाही की माझ्या मालकीचे घर आहे, मला चांगली नोकरी आहे. मला फक्त समजूतदार मुलगा हवा. हेच मूल्यांच्या बाबतीत दिसतं. मुलगी आपल्यापेक्षा थोडी वरचढ असणं त्यांना कमीपणाचं वाटतं. मग आपल्या मानसिकतेमध्ये खरंच बदल झालाय का?

पत्रिकेवर, देवाधर्मावर विश्वास नाही या गोष्टी अनेकजण चर्चेचमध्ये मुद्दा मांडताना छातीठोकपणे सांगतात. परंतु मुलगा असो वा मुलगी देवाधर्माच्या बाबतीत गरज पडल्यास एक पाऊल मागे जाण्यालाच पसंती देताना दिसतात. पत्रिकेच्या पुढे जाऊन आरोग्य चाचणीबाबतीत मुलं-मुली दोघेही सजग झालेली आहेत ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. तसेच सेक्सच्या बाबतीतही अगदी मोकळेपणाने चर्चा होणं गरजेचं आहे किंवा समुपदेशन घेणं अनेकांना योग्य वाटत असल्याचं आशादायक चित्र दिसतं. पत्रिका बघूनच लग्न जुळण्याचे दिवस आता काहीसे मागे पडले असले आणि दिसण्यावर काहीच नसतं, मनं जुळली पाहिजेत हेदेखील केवळ म्हणण्यापुरतंच मर्यादित आहे. कारण जात, पोटजात, धर्म, भाषा, खाण्याच्या पद्धती यांना आजही लग्नाच्या बाजारात मोठय़ा प्रमाणात महत्त्व आहे. लव्ह असो वा अरेंज मॅरेज या मुद्दय़ांवर गाडी येऊन थोडी रेंगाळतेच.

भारतीय समाजात प्रत्येकाला लग्न धूमधडाक्यात आणि सर्वाना सहभागी करून घेऊनच करायला आवडतं. खर्च किंवा चालीरीतीच्या बाबतीत दिले जाणारे उपदेश स्वत:च्या लग्नाचा विषय आला की आपोआप मागे पडतात. तसंच चित्रपटात दाखवलं जाणारं मोठं आणि एकत्र कुटुंब सर्वानाच हवंहवंसं वाटतं, परंतु खऱ्या आयुष्यात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. एकवेळेस ईएमआयवर जगणं परवडेल पण एकत्र कुटुंब नको, हे आजच्या लग्नसंस्थेचं वास्तव आहे.

दिलेला शब्द पाळलाच पाहिजे ही आपली शिकवण. त्यामुळे एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न ठरवलं आणि त्यानंतर आणखी चांगलं प्रपोजल आलं किंवा त्यानंतर अचानक एखादा मुलगा किंवा मुलगी आवडायला लागली तरीही अनेकजण पहिल्या साथीदारासोबत प्रामाणिक राहणंच पसंत करतात. माणसं पडताळूप पाहण्याची, संधी देण्याची रिस्क आजचा तरुणही क्वचितच घेताना दिसतो. त्यामुळे कॉन्ट्रॅक मॅरेज ही संकल्पनाही अनेकांना बोगस वाटते. तसंच लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या गोष्टींना कायद्याची मान्यता मिळत असली तरी त्यामध्ये स्वत:ला अडकवून न घेण्याकडेच अनेकांचा कल दिसतो.

लग्न ही एकदाच करायची गोष्ट आहे, असाच दृष्टिकोन आजच्या बहुतांश पिढीचाही आहे. त्यामुळे सर्वाना शेटपर्यंत साथ देणारा जोडीदार हवा आहे. यामध्ये वाईट काहीही नसलं तरी तो नातं जपण्याचा निर्णय असतो की समाजाच्या भीतीने नातं फरफटवत नेण्याचा, हे मात्र स्पष्टपणे आजच्या पिढीलाही सांगता येत नाही. त्याला संस्कृती, परंपरेच्या नावाचा मुलामाच अधिक दिला जातो.    ’ ’

निवडक प्रतिक्रिया

नोकरीलाच प्राधान्य

मी करत असलेल्या नोकरीत मला नाइट शिफ्ट करावी लागते. त्यामुळे निव्वळ नोकरीची वेळ या विषयावर मुलाकडच्यांनी हरकत व्यक्त केली तरीही माझ्यासाठी नोकरीच प्रथम प्राधान्य असेल आणि आहे. मला असं वाटतं आजच्या पिढीत शिकलेल्या व नोकरीला असलेल्या अनेक मुलींनाही हा निर्णय पटण्याजोगा असावा. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करणं ही काळाची गरज आहे आणि यासाठी लग्नाच्या अटींच्या रूपात, कोणीही ‘वेळ’ ही नड सांगत असेल तर ते मला मुळीच पटणार नाही. ऑफिसची वेळ बदलून घेण्यासाठी मीसुद्धा प्रयत्न करेन, पण त्या प्रक्रियेसाठीही काहीसा कार्यालयीन वेळ लागणारच आहे; त्यामुळे ही बाब जर सासरच्यांनी समजून घेतली व आग्रही भूमिका धरली नाही तर फारच चांगलं.
गौरी राजाध्यक्ष (नाव बदलले आहे)

विश्वासार्ह भूमिका महत्त्वाची

या धकाधकीच्या आयुष्यात नात्यांनाही नकळत आपण बराच स्पीड दिला आहे. पहिलं प्रेम, कुणा एका व्यक्तीशी बोलण्यात, (त्याच्याशी किंवा तिच्याशी) अनुभव शेअर करण्यात असणाऱ्या आवडीचं, बहुधा सवयीचं एका प्रेमळ व्यसनात रूपांतर होणं या सर्व गोष्टी आज खूप दुर्मीळ होत आहेत. कारण मोबाइलचा डाटा पॅक ज्याप्रमाणे हळूहळू संपत जातो, त्याचप्रमाणे नात्यांमधला समजूतदारपणाच्या एमबी अतिशय वेगाने संपत आहेत. लग्नसंस्कृतीवरही याचा परिणाम निश्चितच होत आहे. माईंडसेट बदलण्यामागे धावता धावता मग काही टोकाचे निर्णय या लग्नसंस्कृतीला तडजोडीचा टॅग लावायला भाग पाडत आहे. त्यामुळे लग्न, नाती व तुमचा जोडीदार याबाबत विश्वासार्ह भूमिका बाळगण्याची गरज आहे असं मला वाटतं.
एम. केपाटीकर

स्वतंत्र राहण्याची जबाबदारी माझीच

मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला तर स्वतंत्र राहून स्वावलंबी आयुष्य जगण्याला मी प्राधान्य देईन. करिअरला महत्त्व देत असल्यामुळे मी निवडलेल्या प्रोफेशनमध्ये मला आईवडील व इतर कौटुंबिक, भावनात्मक चौकटींमध्ये अडकणं बहुधा जमणार नाही. याचा अर्थ घरच्यांशी संबंध तोडणं हाही होत नाही. वेळ पडल्यास एकटं राहण्याच्या माझ्या निर्णयावर मी ठाम आहे आणि त्यासाठी मी कोणाला जबाबदारही ठरवू इच्छिणार नाही. किंबहुना परिस्थिती आल्यास एकटं, पण कुटुंबापासून विभक्त राहण्याच्या माझ्या या निर्णयावर मी समाधानी असेन.
संपदा बांदेकर

response.lokprabha@expressindia.com
Twitter – @aru001

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 11:45 am

Web Title: marriage 6
टॅग : Marriage
Next Stories
1 चित्रसम्राटाची शताब्दी
Just Now!
X