पर्यटन हा आता एकविसाव्या शतकाचा मूलमंत्र झाल्यासारखेच आहे. प्रत्येक देश, राज्य, शहरे पर्यटनासाठी जणू सज्ज झालेली दिसतात. जास्तीत जास्त पर्यटक आपल्या देशात यावेत, त्यांनी आपल्या देशाचा वारसा समजून घ्यावा, त्याचा अनुभव घ्यावा, परकीय चलन आपल्याकडे यावे आणि त्यायोगे स्थानिक मालाला उठाव आणि स्थानिक जनतेला रोजगार मिळावा असा सरळ सोपा हिशोब. अर्थात यात गर काहीच नाही. भारताला तर निसर्गाची मोठी साथ आणि त्याचबरोबर हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. त्या इतिहासाचे साक्षीदार असलेले विविध स्थापत्य प्रकार आपल्या देशात विपुल आहेत आणि त्याचा डांगोरासुद्धा कायम पिटला जातो. जागतिक वारसा स्थळेसुद्धा भारतात थोडीथोडकी नाही तर तब्बल ३५ आहेत. भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्यासुद्धा काही कमी नाही, परंतु आपण खरंच पर्यटनस्नेही आहोत का? दुर्दैवाने त्याचे उत्तर नाही असे द्यावे लागते. आपण जाहिरातबाजीमध्ये नक्कीच अग्रेसर असू, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, त्याच्या विपरीत चित्र दिसते; पण मग पर्यटनस्नेही म्हणजे नक्की काय, असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे आणि त्याचं उत्तर आपल्याच जवळ असलेल्या देशात अनुभवायला मिळतं, तो देश म्हणजे कंबोडिया. काय आहे तिथलं पर्यटन आणि कुठे आहे हा देश हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या देशाचा थोडा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे.

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा विस्तार हा भारताबाहेरदेखील मोठय़ा प्रमाणात झाला. विशेषत: आग्नेय आशियामध्ये तर भारतीय संस्कृती खूप मोठय़ा प्रमाणावर पसरली, रुजली आणि वाढलीसुद्धा! तिथल्या देशांमध्ये सध्या जरी इतर धर्मीय राजवटी असल्या तरीसुद्धा प्राचीन भारतीय संस्कृतीची तिथे झालेली भरभराट आजसुद्धा मंदिरे आणि कला यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळते. श्रीलंका, ब्रह्मदेश (म्यानमार), इंडोनेशिया, मलेशिया, जावा-सुमात्रा-बाली बेटे, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम इथंपर्यंत प्राचीन भारतीय संस्कृती बहरली होती, प्रस्थापित झालेली होती. या देशांमधले राजे हे वैष्णव, शैव अथवा बौद्ध धर्माचे अनुयायी होते. त्यानुसार आपल्या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मंदिरांची निर्मिती केलेली होती जी आजही आपल्याला पाहता येते.

Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?
K-Pop craze spread to every corner of India
K-Popसाठी त्यांनी घर सोडलं, पण…मुर्शिदाबादमध्ये त्यावेळी काय घडले?

कंबोडिया हा त्यातलाच एक देश. कुठे आहे हा देश आणि काय आहे याचा इतिहास, कशासाठी जायचे तिथे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. त्यासाठी त्याचा इतिहास आणि तिथे काय आहे ते आधी पाहायला हवे. आग्नेय आशियामध्ये ब्रह्मदेश म्हणजेच सध्याचा म्यानमार आणि थायलंड या देशांना लागून कंबोडिया हा देश वसलेला आहे. एका बाजूने समुद्र आणि इतर बाजूंनी लाओस, व्हिएतनाम आणि थायलंड अशा या देशांच्या सीमा आहेत. फूनान, चेन-ला आणि ख्मेर अशा राजघराण्यांनी या देशावर राज्य केले. इ.स.च्या पहिल्या शतकात कौंडिण्य नामक व्यक्ती भारतातून तत्कालीन कंबुज म्हणजेच सध्याच्या कंबोडियाला गेली. तिने तिथे असलेल्या नागवंशीय सोमा नामक राजकन्येशी विवाह केला आणि मेकाँग नदीच्या खोऱ्यात एका महत्त्वपूर्ण राज्याची स्थापना केली, तेच प्राचीन फूनान नामक िहदू राज्य होय. त्यानंतर इ.स.च्या चौथ्या शतकात भारतातूनच अजून एक कौंडिण्य याच नावाची व्यक्ती तिकडे गेली. तू कंबुज देशाचा राजा होशील, असा त्याला दृष्टांत झाल्यामुळे तो तिथे गेला. तिथल्या प्रजेनेसुद्धा त्याला आपला राजा म्हणून स्वीकारले आणि तिथे त्याने राज्य स्थापले. अशा विविध कथा या प्रदेशाबद्दल सांगितल्या जातात आणि नुसत्या कथा नव्हे, तर इथे येऊन गेलेल्या विविध चिनी प्रवाशांच्या वर्णनावरून हा इतिहास जगासमोर आला आहे. इथल्या राजांनी कायम तत्कालीन चिनी राजवटीशी मिळतेजुळते घेतलेले दिसते. अनेक वेळा चीनच्या दरबारात यांनी आपले राजदूतसुद्धा पाठवले आहेत. इ.स. ९०२ पासून इथे जयवर्मा दुसरा याच्या उदयाने ख्मेर राजवट सुरू झाली. अतिशय संपन्न अशी ही राजवट इ.स. १४३१ पर्यंत चालू होती. अनेक कर्तृत्ववान राजे या राजवटीत होऊन गेले. त्या सर्व राजांनी विविध कला आणि परंपरांना मोठा आश्रय दिला. आपला राज्यविस्तार मोठय़ा प्रमाणावर केला. या सगळ्याच राजांच्या काळात स्थापत्य आणि शिल्पकलेला मोठे प्रोत्साहन मिळाल्यामुळे अनेक मोठमोठी मंदिरे यांच्या राजवटीत उभारली गेली. खरे तर कंबोडिया म्हणजे पॉल पॉट या क्रूरकम्र्याने केलेली अपरिमित मनुष्यहानी असे चित्र काही वर्षांपूर्वी झाले होते; परंतु या सर्वावर मात करून हा देश आज जागतिक पर्यटन नकाशावर मोठय़ा अभिमानाने झळकतो आहे.

नॉमपेन्ह आणि सीएम रीप ही कंबोडियामधली दोन महत्त्वाची शहरे. त्यातले नॉमपेन्ह हे राजधानीचे शहर आहे. प्रशासकीय कार्यालये आणि सचिवालय हे नॉमपेन्ह इथे आहे, तर सीएम रीप हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर. सीएम रीप हे नाव खरं तर थायलंडच्या लोकांनी या प्रदेशावर विजय मिळवल्याच्या प्रीत्यर्थ ठेवलेले आहे. सीएम म्हणजे सयाम आणि रीप म्हणजे विजय. सयामी लोकांच्या विजयाचे प्रतीक म्हणून या ठिकाणाला सीएम रीप हे नाव दिले गेले. प्राचीन अंकोर साम्राज्य हे याच ठिकाणी वसलेले होते आणि त्यामुळे विविध मंदिरे आणि स्थापत्य हे पाहण्यासाठी सीएम रीप या ठिकाणीच यावे लागते. भारतातून कंबोडियाला जाण्यासाठी बँकॉकला विमान बदलून जावे लागते. विमान जसजसे उतरण्यासाठी खाली येऊ लागते तसे सर्वत्र पसरलेली भातशेती आणि त्यातून वाहणारा नदीचा, कालव्यांचा प्रवाह आपले लक्ष वेधून घेतो. तांदूळ हे एकमेव पीक या देशात घेतले जाते. अत्यंत टुमदार, देखण्या अशा सीएम रीप विमानतळावर आपले विमान उतरते. एखादा छोटासा एस.टी. स्टँड असावा ना इतका छोटा आणि टुमदार असा हा विमानतळ आहे. परिवहनच्या बसेस जशा फलाटावर समोरून येऊन उभ्या राहतात अशी इथे विमाने समोरून येऊन उभी राहतात. संपूर्ण लाकडी नक्षीकाम केलेला हा विमानतळ केवळ प्रेक्षणीय आहे. अतिशय स्वच्छ, प्रशस्त आणि शांत-निवांत असा हा विमानतळ. इथे आल्यावर थेट व्हिसा देण्याची सोय इथे असल्यामुळे तेवढीच काय ती वर्दळ. बाकी इमिग्रेशनचे सोपस्कार अगदी झटपट उरकले जातात. या देशाचा पर्यटनस्नेही स्वभाव विमानतळावरच जाणवतो. विमानतळावर बाहेर लगेच या शहरात चालणारे मोबाइलच्या सिमकार्ड विकत मिळते. त्याचे प्लॅन्स, त्याची वैधता आणि त्याचे पसे हे स्पष्टपणे सांगणारा मोठा फलक लावलेला आहे.

सीएम रीप हे गाव निव्वळ पर्यटकांसाठी वसवलेले दिसते. इथे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि लोकांची निवासस्थाने असं काहीही दिसत नाही. ते सर्व या गावापासून काही अंतरावर छोटय़ा खेडय़ांतून वसलेले आहे. इथे फक्त हॉटेल्स, शॉिपग कॉम्प्लेक्स, नाइट मार्केट आणि विविध दुकाने एवढेच दिसते. खूप मोकळी जागा असल्यामुळे दाटीवाटीने काही बांधले आहे असे अजिबात नाही. कंबोडियावर फ्रेंचांचे राज्य असल्यामुळे इथल्या वाहतुकीवर त्याची छाप पडलेली दिसते. भारतातल्या वाहतुकीच्या नेमकी विरुद्ध दिशेने म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूने इथली वाहतूक आहे. सगळी वाहने इथे लेफ्ट हँड ड्राइव्ह आहेत. रस्ता ओलांडताना मात्र आपली पंचाईत होते. सवयीनुसार आपण उजवीकडे पाहतो, परंतु इथे वाहने डावीकडून येत असतात.

सीएम रीप या शहरातच प्राचीन अंकोर राजधानीचे अवशेष असल्यामुळे इथे ती सर्व वारसास्थळे पाहण्यासाठी तीन दिवसांसाठीचे एक तिकीट विकत घ्यावे लागते. ४० डॉलर ही त्याची फी आहे. टोल नाक्यासारख्या बांधलेल्या इमारतीपाशी आपली बस उभी राहते आणि आपल्याला रांगेत तिथे जावे लागते; परंतु सरकारी काम असूनसुद्धा अवघ्या काही मिनिटांत तिथे आपला फोटो काढून तो एका पासवर चिकटवून तो पास आपल्याला तिथल्या तिथे दिला जातो. हे सर्व करण्यासाठी असलेला कर्मचारी वर्ग अतिशय हसतमुख सेवा बजावत असतो. सात दिवसांसाठी तो पास दिला जातो, त्यातले कोणतेही तीन दिवस तो वापरलेला चालतो. अत्यंत पर्यटनस्नेही असा हा देश असल्यामुळे विमानतळापासून ते अगदी सामान्य बाजारातसुद्धा कुठेही फसवाफसवी अथवा खोटेपणा असे काहीही नाही. जे आहे ते स्वच्छ सांगितले जाते. कुठेही पशासाठी अडवणूक नसते. कंबोडिया सरकारने पर्यटनासोबत आपल्या स्थानिक जनतेचा रोजगार संरक्षित केलेला आहेत. इथे प्रत्येक प्रवासी बससोबत एक स्थानिक गाईड घेणे हे अनिवार्य आहे. स्थानिकांचा रोजगार त्यांनी अशा पद्धतीने जपलेला आहे. गाईडसुद्धा अतिशय अभ्यासू आणि चुणचुणीत असतात. कोणत्याही अतिरंजक आणि तद्दन फालतू गोष्टी न सांगता कंबोडियाचा इतिहास आणि त्याचे स्थापत्य यांचे योग्य आणि नेमके वर्णन हे लोक करून देतात. चिनी, कोरियन आणि पाश्चात्त्य पर्यटक इथे येत असल्यामुळे चिनी, कोरियन, फ्रेंच आणि इंग्लिश अशा भाषा येणारे गाईड्स इथे उपलब्ध असतात. पर्यटकांच्या समूहानुसार ती ती भाषा बोलणारे गाईड्स पुरवले जातात. हे गाईड्स विशिष्ट मंदिरावरसुद्धा कुठे कोणते वैशिष्ट्य़पूर्ण शिल्प आहे याचे वर्णन आणि ते शिल्प तिथे दाखवून देणे हे काम अगदी चोख करतात. हा सगळा अंकोर परिसर मंदिरांनी नटलेला आहे. दगडी बांधणीची आणि खास ख्मेर स्थापत्याने नटलेली ही मंदिरे केवळ अप्रतिम आहेत. सगळीच पाहणे काही शक्य होत नाही, परंतु न चुकता पाहावीत अशी काही ठिकाणे आहेत ती मात्र पाहिलीच पाहिजेत.

नॅशनल म्युझियम : म्युझियम हे त्या त्या प्रदेशाची संस्कृती, इतिहास, कला आपल्यासमोर उलगडून दाखवत असतात. सीएम रीपचे म्युझियमसुद्धा असेच नितांत सुंदर आहे. ख्मेर राजवटी, त्यातले मोठमोठे राजे, त्यांनी केलेली कामे अशा अनेक गोष्टी इथे विविध दालनांतून मांडून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक राजवटीमधील ठळक वैशिष्टय़े, त्यांच्या काळातील सापडलेले अवशेष इथे खूप सुरेख मांडून ठेवले आहेत. त्याचसोबत एक हजार बुद्धमूर्ती असलेले दालन तर केवळ प्रेक्षणीय आहे. विविध काळांत बुद्ध मूर्ती कशा घडवल्या जात असत, त्यांच्या चेहरेपट्टीमध्ये कसे बदल होत गेले याचे सुंदर दर्शन या दालनात आपल्याला होते. त्याचसोबत विविध राजांच्या मूर्ती, मंदिरांचे अवशेष चांगल्या पद्धतीने जपले आहेत. या म्युझियममध्येसुद्धा प्रशिक्षित कर्मचारी आहेत. ते प्रत्येक दालनाची नेमकी माहिती पर्यटकांना देतात.

ता प्रोम मंदिरे : जवळजवळ ४०० वष्रे हा सगळा अंकोर परिसर संपूर्णपणे दुर्लक्षित राहिला होता. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ ऑरी माऊ हा काही वनस्पतींच्या शोधासाठी इथे फिरत असताना त्याला मंदिरांचे अवशेष आढळले. त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने ते स्वच्छ करून घेऊन एक एक मंदिर त्या झाडांच्या दाटीतून बाहेर काढले आणि अशा प्रकारे असंख्य मंदिरे या प्रदेशी उघडकीला आली. जवळजवळ ४०० वष्रे संपूर्णपणे झाडीत असलेली ही मंदिरे, त्यांच्या अवतीभोवती झाडांच्या मुळांचा विळखा पडला होता. ता प्रोम या ठिकाणी अशी मंदिरे आहेत, की ती सर्व बाजूंनी झाडांनी वेष्टिलेली आहेत. जर झाडे तोडली तर ती मंदिरेसुद्धा ढासळतील. म्हणून ती झाडे तशीच ठेवून ही मंदिरे मोकळी केलेली आहेत. खाली मंदिर आणि त्याच्या सर्व बाजूंनी झाडांचा विळखा, अशी रचना इथे खूपच आकर्षक आणि वेगळी दिसते. कंबोडिया सरकारने या गोष्टीचेसुद्धा सुंदर मार्केटिंग करून पर्यटकांना आकर्षति केलेले आहे. ता प्रोम मंदिरांना भेट देताना आपण कधी झाडाच्या ढोलीतून तर कधी त्याच्या फांद्यांच्या जंजाळातून जात असतो. मंदिरे अजून ढासळू नयेत म्हणून इथे आतूनसुद्धा त्यांना आधार दिलेले आहेत. ही झाडांनी वेष्टिलेली मंदिरे आणि तो परिसर वेगळाच दिसतो. त्याच्यासमोर फोटो काढण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते.

कबाल स्पीअन : सीएम रीपपासून ४० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. इथे एक डोंगर चढून वर जावे लागते. वर जायला सुरेख पायवाट केलेली आहे. वाटेत खूप जुने आणि भलेमोठे वृक्ष आहेत. त्या वृक्षांचे स्थानिक नाव आणि वनस्पती शास्त्रीय नाव लिहिलेल्या पाटय़ा लावलेल्या आहेत. डोंगर चढायला अंदाजे एक तास लागतो. इथे वर आल्यावर मात्र मोठे नवल आहे. सीएम रीप नदी या डोंगरावरून खाली येते आणि पुढे सीएम रिप शहराकडे जाते. इथे डोंगरमाथ्यावर खडकात हजारो शिविलगे खोदलेली आहेत. ही शिविलगे नदीपात्रात खोदलेली असल्यामुळे या नदीचे सहस्रिलग असेही नामकरण केले गेले आहे. या शिविलगासोबतच ब्रह्मदेवाचे अंकन इथे नदीपात्रातल्या खडकावर केलेले आहे; पण इथे बघण्यासारखे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेल्या शेषशायी विष्णूच्या प्रतिमा. ज्या खडकावरून ही नदी वाहते त्या खडकावर शेषशायी भगवान कोरलेले आहेत. पायाशी देवी लक्ष्मी दाखवली असून शेषाच्या वेटोळ्यावर भगवान विष्णू पहुडलेले दिसतात. ही मूर्ती अशी काही खुबीने कोरलेली आहे, की इथे देवाच्या पायावरून नदीचा प्रवाह वाहत असतो. शहराला होणारा पाणीपुरवठा हा जणू काही देवाच्या पायाचे तीर्थच आहे अशाच उद्देशाने इथे या मूर्ती कोरलेल्या आहेत. पावसाळ्यात नदीचा प्रवाह बदलू शकेल म्हणून जिथे जिथे प्रवाह आहे त्या त्या ठिकाणी शेषशायी विष्णूच्या मूर्ती इथे कोरलेल्या आहेत. कुठल्याही दिशेला नदीचा प्रवाह बदलला तरीसुद्धा देवाच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय नदी पुढे वाहणार नाही याची दक्षता इथे शिल्पकारांनी घेतलेली दिसते. विष्णू पादोदकं र्तीथ.. या न्यायाने अत्यंत कल्पकतेने आणि मोठय़ा व्यापक उद्देशाने कोरलेले हे असे शिल्पकाम इतरत्र क्वचितच पाहायला मिळेल. खूप रमणीय असा हा परिसर आहे. शेषशायी विष्णुमूर्ती आणि त्यांचे वैशिष्टय़पूर्ण प्रयोजन इथे आल्याचे समाधान मिळवून देतात.

बांते स्रय मंदिरे : ख्मेर राजवटीमधील एक कर्तृत्ववान राजा म्हणजे राजेंद्रवर्मा दुसरा (इ.स. ९४४-९६८). याचा मंत्री यज्ञवराह यांनी आपले खासगी मंदिर म्हणून या त्रिमूर्ती मंदिराची निर्मिती केली. हा परिसर मोठा रमणीय. मंदिरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या मार्गावर दुतर्फा जुन्या काही मंदिरांचे सुंदर अवशेष पाहायला मिळतात. अतिशय छोटेखानी परंतु खूपच सुंदर असे हे मंदिर. जसे ओडिशामधले मुक्तेश्वर मंदिर तसेच हे बांते स्राय मंदिर. यावर दक्षिण भारतातल्या पल्लव स्थापत्याची मोठी छाप जाणवते. कदाचित पल्लवांचे स्थपती, शिल्पी आणून हे मंदिर घडवून घेतले असावे. द्राविड शैलीची शिखरे असलेला हा मंदिर समूह. इथल्या मंदिरांची खासियत म्हणजे इथे दगडातून कोरलेले खिडक्यांचे गज. जणू काही लेथवर आकार दिला असावा इतक्या सफाईने हजारो गज एकसारखे, एकाच मापाचे कोरलेले आणि ते खिडक्यांमध्ये बसवलेले इथल्या अनेक मंदिरांवर दिसतात. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला काही माकडांची शिल्पे बसवलेली आहेत. त्यांचे प्रयोजन मात्र समजत नाही.

अंकोरथॉम : ख्मेर सम्राट जयवर्मा-सातवा याच्या राजधानीचे ठिकाण म्हणजे अंकोरथॉम. जवळजवळ नऊ वर्ग किलोमीटर एवढय़ा परिसरात पसरलेल्या या राजधानीमध्ये राजाने विविध देवळे बांधली. संपूर्ण अंकोरथॉम परिसराला दगडी तटबंदी आहे. त्याभोवती खंदक खोदलेला आहे. या खंदकावरून प्रवेश करण्यासाठी दगडी पूल बांधले आहेत. या पुलाच्या कठडय़ावर समुद्रमंथनाचे प्रतीक असलेला नाग आणि देव-दानव यांच्या मोठय़ा आकारातल्या मूर्ती कोरून ठेवल्या आहेत. प्रवेशद्वारावर जे शिखर आहे त्या शिखरावरसुद्धा चारही बाजूंनी मानवी चेहरे दिसतात. या परिसरात त्याने बयोन नावाचे एक भव्यदिव्य मंदिर बांधले आहे. बौद्ध देवता अवलोकीतेश्वराला समíपत असलेले हे मंदिर आहे. हे अगदी मुद्दाम आणि आवर्जून पाहण्यासारखे आहे. इथे जवळजवळ ३७ मानवी चेहरे कोरलेले मनोरे बांधलेले आहेत. अतिशय आकर्षक असे हे स्थापत्य आहे. मंदिराच्या शिखरासारखा असलेला भाग आणि त्यावर कोरलेले मानवी चेहरे हे जगात इतरत्र कुठे असतील असे वाटत नाही. हे चेहरे राजा जयवर्मा याचेच आहेत, असे काहींचे म्हणणे आहे. राजाचे आपल्या प्रजेवर लक्ष आहे हे दाखवण्यासाठी असे चेहरे कोरलेले असावेत, तर काहींच्या मते ते चेहरे राजाने अवलोकीतेश्वराचे म्हणून कोरलेले दिसतात. आपल्या देवाचे आपल्या राज्यावर लक्ष आहे असेच राजाला सूचित करायचे असेल. या चेहऱ्यांवर एक गूढ हास्य आहे. ते खूपच सुंदर दिसते. इथे त्याला ‘अंकोर स्माइल’ असे म्हटले जाते. मंदिर परिसर खूपच छान राखलाय आणि पर्यटकांची त्या चेहऱ्यांसमोर उभे राहून फोटो काढायला खूप गर्दी असते. संध्याकाळी कलती उन्हे या चेहऱ्यांवर पडली की, हे चेहरे खूप गूढ भासतात. हा अंकोरथॉमचा सगळा परिसर रमणीय आहे. विविध मंदिरे आणि त्यावर केलेले शिल्पकाम बघण्यासारखे आहे.

जगप्रसिद्ध अंकोरवाट मंदिर : सगळ्या जगाचे लक्ष लागून असलेले, ख्मेर स्थापत्याचा मेरुमणी असलेले, जागतिक वारसा म्हणून युनेस्कोचा दर्जा मिळालेले जगातील कोणत्याही धर्मीयांमधील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेले ठिकाण म्हणजे हे अंकोरवाट मंदिर. संकल्पना, रचना, स्थापत्य या सगळ्याच बाबतीत अवाढव्य असे असलेले हे मंदिर. ख्मेर राजा सूर्यवर्मा दुसरा (इ.स. १११३-११८१) याने हे मंदिर बांधले. हे आहे विष्णू मंदिर. हे मंदिर मेरू पर्वताचे प्रतीक आहे असे समजून बांधलेले आहे. त्यामुळे मुख्य मंदिराचा कळस सर्वात उंच आणि त्याभोवती इतर चार मंदिरे आहेत. मेरू पर्वताच्या आजूबाजूला असलेल्या शिखरांचे प्रतीक म्हणून ती चार शिखरे आहेत. मेरू पर्वत हा क्षीरसागरामध्ये स्थित आहे असे समजून या मंदिराच्या चारही बाजूंनी मोठा खंदक खणला असून त्यात कायम पाणी असते. चारही बाजूंनी या मंदिरात जाण्यासाठी या खंदकावर दगडी पूल बांधलेले आहेत. ५१० एकर एवढय़ा प्रचंड परिसरात बांधलेले हे महाकाय मंदिर. याची सगळी परिमाणे अचाटच म्हणायला हवीत. मंदिरात जाताना एकेका टप्प्यावर एक अशा तीन तटबंदी आहेत. प्रत्येक तटबंदीच्या आत मोठे प्रांगण आणि मोठमोठय़ा गॅलरीज आहेत. त्यामध्ये असलेल्या िभतींवर खूप लांबच लांब अशी कथनशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिरात जागोजागी िभतींवर मूर्तिकला दिसून येते. त्यांना उठाव खूप कमी आहे, पण मूर्तीची विविधता खूप दिसते. समुद्रमंथनाच्या संकल्पनेचे मोठे आकर्षण या मंडळींना होते. जिथे मिळेल तिथे समुद्रमंथन कोरलेले आहे; पण इथे एक गंमत पाहायला मिळते आणि ती म्हणजे समुद्रमंथनाच्या देखाव्यात मारुती आणि रावणसुद्धा पाहायला मिळतात. त्याचसोबत महाभारतातील विविध प्रसंग, तसेच युद्धप्रसंग इथे मोठय़ा संख्येने कोरलेले दिसतात. नरकाची कल्पना करून नरकामध्ये मिळणाऱ्या यातनांचे प्रभावी शिल्पांकन इथे केलेले आहे. मुख्य मंदिरात गर्भगृहात विष्णूची मूर्ती होते. जयवर्मा-सातवा या राजाने ती हलवून तिथे बुद्धाची मूर्ती स्थापन केली; परंतु विष्णू मूर्तीची नासधूस नाही केली त्याने. ती मूर्ती याच मंदिरात दुसरीकडे एका बाजूला प्रस्थापित केली. आठ हातांची विष्णू मूर्ती जवळजवळ १५ फूट उंच आहे. हातामध्ये आता आयुधे नाहीत. इथले लोक तिला बुद्ध मूर्ती म्हणून पुजतात. अंकोरवाट मंदिर परिसर मोठा भव्य आहे. हे संकुल तीन मजली असून प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी मुळात असलेल्या दगडी पायऱ्या आता खूपच झिजल्या असल्यामुळे तिथे लोखंडी जिने बसवले आहेत. प्रत्येक मजल्यावर एक मोठे प्रांगण, त्याच्या चारही बाजूंनी माíगका आणि त्याला खिडक्या आहेत. इथून खालचा परिसर मोठा रमणीय दिसतो. जवळजवळ अर्धा दिवस तरी हे मंदिर पाहण्यासाठी द्यावा लागतो.

कंबोडिया हा देश खरोखरच मंदिरांनी समृद्ध आहे; पण आपल्याला मिळालेल्या वारशाचे चीज कसे करायचे, त्यातून जगाचे लक्ष आपल्याकडे कसे वेधून घ्यायचे आणि आपल्या अख्ख्या देशाचा चरितार्थ या मंदिर पर्यटनावर कसा चालवायचा याचे मूíतमंत उदाहरण म्हणजे कंबोडिया. अंकोरवाट मंदिर म्हणजे या देशाचा जीव की प्राण. ५१० एकर इतक्या अवाढव्य परिसरात वसलेले हे मंदिर एका नजरेत दिसणे केवळ अशक्य कोटीतली गोष्ट; परंतु इथल्या सरकारने ते पाहण्याची एक नामी शक्कल लढवली आहे. सबंध अंकोरवाट मंदिर एकाच नजरेत पाहण्यासाठी एक मोठा बलून आकाशात सोडलेला असतो. मुख्य मंदिरापासून अंदाजे सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. त्यासाठी दहा डॉलर तिकीट आहे. पतंग जसा सरळ आकाशात जातो तसा हा बलून आहे. एका मोठय़ा लोखंडी दोरखंडाने तो बांधला आहे. याला खाली गोलाकार गॅलरी असून त्यात लोकांना उभे राहता येते. हा बलून सरळ २०० मीटर आकाशात वर जातो. तिथून अंकोरवाट मंदिराचा देखावा केवळ आणि केवळ अप्रतिम दिसतो. इतक्या उंचीवरूनच हे मंदिर पाहायला हवे. तरच ते एका दृष्टिक्षेपात दिसू शकते, अन्यथा एवढा मोठा मंदिर परिसर एका वेळी सगळाच्या सगळा पाहणे अशक्य गोष्ट आहे. जवळजवळ १५ मिनिटे हा बलून वर असतो, नंतर तो खाली आणला जातो. सबंध अंकोरवाट मंदिर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. त्या मंदिराचे भव्यदिव्य दर्शन असे आकाशातून झाल्यामुळे त्याचे नेमके स्थापत्य आपल्या लक्षात येते. आपल्याकडे भारतात इतकी सुंदर सुंदर ठिकाणे आहेत; पण एका तरी ठिकाणी अशी सुविधा द्यावी, ते भव्य वारसास्थळ उंचावरून एकाच दृष्टिक्षेपात पर्यटकांना पाहता यावे असे आपल्या लोकांना का सुचत नाही? त्याचे एक कारण असेही असेल की, आपल्या देशाचे पोट पर्यटनावर अवलंबून नाही, त्यामुळे पर्यटकांकडे पाहण्याची स्थानिकांची आणि सरकारची बेफिकिरी त्याला कारणीभूत असेल; पण कंबोडिया हा फक्त पर्यटनावरच जगणारा देश आहे. त्यामुळे तिथे अशा नवनवीन कल्पना लढवल्या जातात आणि त्या अगदी नेमस्तपणे राबवल्या जातात.

पर्यटनस्नेही सरकार असले, की सामान्य जनतासुद्धा पर्यटनाला कसा हातभार लावते याचे एक अतिशय आकर्षक उदाहरण इथे पाहायला मिळते. सीएम रीपमध्ये तुम्ही कुठल्याही हॉटेल अथवा उपाहारगृहात गेलात तरी तिथे फ्री वाय-फाय दिले जाते. हॉटेल्समध्ये िभतींवर त्या वाय-फायचा पासवर्ड लिहिलेला असतो. हे तर काहीच नाही. कबाल स्पीअन किंवा अन्य स्थळांशेजारी नारळपाणी, कोिल्ड्रक्स विकणाऱ्या टपऱ्या असतात. ते नारळपाणीवालेसुद्धा फ्री वाय-फाय सेवा उपलब्ध करून देतात. आपला पर्यटक कोणत्या जमान्यात वावरतो आहे, जग कुठे चालले आहे याचे इतके नेमके अवलोकन जगात दुसरीकडे कुठे केलेले नसेल. पाश्चात्त्य पर्यटकसुद्धा फ्री वाय-फाय सेवा पाहून अवाक्  होतात. पर्यटकांची आजची मोठी गरज काय आहे आणि ती गरज आपण पुरवून आपला धंदा कसा वाढवू शकू याचं हे मोठं उदाहरण आहे. कमालीची पर्यटन मत्री हे इथले हे खास वैशिष्टय़.

सुप्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त इथे प्री-कोह, प्रासात क्रावान ही मंदिरे, सा-स्रांग नावाचा राजा जयवर्मा दुसरा याने बांधलेला मोठा तलाव, ईस्ट मेबन आणि वेस्ट बराय हे भव्य तलाव, तोनले साप नावाचे मोठे सरोवर या गोष्टीसुद्धा तितक्याच देखण्या आणि पाहण्याजोग्या आहेत. इथले बहुसंख्य लोक हे धर्माने बौद्ध आहेत, कारण १५ व्या शतकानंतर इथे थेरवादी बौद्ध धर्म प्रस्थापित झाला. बहुसंख्य जनता ही आदिवासी आहे. विविध प्रकारचे किडे, गोगलगाई इथे अगदी सर्रास खातात. कंबोडियाचे चलन हे रियाल असून ते फारच स्वस्त आहे. आपला एक रुपया म्हणजे त्यांचे ६० रियाल असे गणित आहे; पण पर्यटकांशी केले जाणारे सगळे व्यवहार हे अमेरिकन डॉलर या चलनातच केले जातात. प्रत्येक मंदिराच्या बाहेर कंबोडियावर आणि इथल्या मंदिरांवर लिहिलेली पुस्तके मोठय़ा संख्येने विकायला असतात. दोन किंवा तीन डॉलरमध्ये ही पुस्तके विकत मिळतात. इथले बाजारसुद्धा विविध वस्तूंनी सजलेले आहेत. स्थानिक कलाकारी केलेले स्त्रियांसाठीचे स्टोल्स हा इथला अगदी लोकप्रिय वस्त्रप्रकार. खूप मोठय़ा प्रमाणावर याची खरेदी पर्यटकांकडून केली जाते. बाजारात मात्र अगदी तद्दन भारतीय पद्धतीने खूप घासाघीस करावी लागते आणि अगदी आधी सांगितलेल्या किमतीच्या पावपट किमतीतसुद्धा ती वस्तू मिळू शकते. संपूर्ण बाजारात स्त्रियांचे प्राबल्य मोठय़ा प्रमाणावर आहे. एकूणच इथे विविध क्षेत्रांत, मग ते सरकारी नोकरी असो, हॉटेलमधील वेटर असो, फळे आणि भाजी दुकानदार असोत, सर्वत्र स्त्रियाच दिसतात. पुरुष फक्त इथे ‘टुकटुक’ नावाची दुचाकी चालवताना दिसतात. या टुकटुकला मागे लाकडी हौदा बांधून त्यात चार माणसे बसायची सोय केलेली असते.

भारतीय खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत. हॉटेल इंडियासारख्या उपाहारगृहात पंजाबी तसेच दक्षिणी पदार्थ मिळू शकतात; पण त्याचबरोबर खास ख्मेर चवीचे पदार्थसुद्धा इथल्या उपाहारगृहात चाखायला मिळतात. इथे अजून एक मिळणारा अगदी वेगळा पदार्थ म्हणेज ‘क्ख्लान’. हे नावच एवढे विचित्र आहे ना, पण हा पदार्थ अत्यंत अप्रतिम आहे. कोवळे बांबू आतून पोखरतात, त्यात नारळाच्या पाण्यात भिजवलेले तांदूळ किंचित मीठ घालून शिजवतात. सगळा भात शिजला की बांबूची साले काढून टाकतात. मग त्या भाताला बांबू, मीठ, नारळ यांची संमिश्र अशी अफलातून चव प्राप्त होते. आपल्याकडे जसे हमरस्त्यावर फळे विकायला बसतात तसे इथे हमरस्त्यावर हे ‘क्ख्लान’ विकत मिळते. मुद्दाम थांबून अगदी न चुकता खावे असा हा पदार्थ म्हणजे कंबोडियाचे वैभव म्हणावे लागेल. इथले लोक इतके आतिथ्यशील आहेत की, आपले राहते हॉटेल जेव्हा आपण सोडतो तेव्हा निरोप समारंभासारखा एक छोटेखानी समारंभ करून हॉटेलकडून आपल्याला एक स्टोल आणि एक छोटी वस्तू भेट म्हणून देतात. परत आमच्याकडे या म्हणून सांगतात. आपल्याकडे हे का नाही दिसत? किमान मला तरी नाही दिसले हे कुठे. वस्तू, तिची किंमत याला काही महत्त्व नाहीये. आपुलकी, स्नेह मग तो व्यवसायवृद्धीसाठीसुद्धा असेल, तरी पण या गोष्टींना इथे अनन्यसाधारण महत्त्व दिलेले दिसते.

भारताच्या एका छोटय़ा राज्याएवढा असलेला हा देश मंदिर पर्यटनामुळे संपन्न आहे. आज जगभरातून कोटय़वधी पर्यटक कंबोडियामध्ये येत असतात. दुर्दैवाने आपण भारतीय मात्र त्या तुलनेने अगदीच कमी संख्येने तिथे जातो. त्याबद्दल फारशी माहिती नसणे हे एक कारण असले तरीसुद्धा काही प्रमाणात अनास्था हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. थायलंड या देशी तिथले अनेक सुखोपभोग घेण्यासाठी भारतातून पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी जात असतात, परंतु थायलंडला लागूनच असलेल्या कंबोडियामध्ये त्यातले कितीसे लोक जात असतील हे एक कोडेच आहे; परंतु कंबोडिया हा खरोखर मुद्दाम वेळ काढून पाहण्यासारखा प्रदेश आहे. मंदिरांची भव्यता, विविधता आणि निसर्गाने नटलेला हा टुमदार देश पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. पर्यटकस्नेही असा हा देश आहे. फक्त तांदूळ एवढय़ाच पिकावर जगणाऱ्या या देशाला एका िहदू मंदिरामुळे नवसंजीवनी लाभली आणि आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर या देशाने आपला मोठा ठसा उमटवला आहे. या देशाची आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ आपण जाऊन अनुभवायला हवी.

खरं तर प्रत्येक भारतीयाने इथे एकदा येऊन आपल्या प्राचीन संस्कृतीचा हा अनमोल ठेवा एकदा तरी पाहिला पाहिजे. िहदू संस्कृती किती मोठय़ा प्रमाणावर बहरलेली होती आणि त्याची पाळेमुळे आजदेखील इथल्या जनमानसात किती खोलवर रुजलेली आहेत, त्याचे अगदी योग्य रीतीने मार्केटिंग करून हा देश कसा समृद्ध झाला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. हॉटेलची नावे असोत, अप्सरा नृत्य असो अथवा रंगकाम, चित्रकला असो, अंकोरवाट मंदिराशिवाय इथली कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. िहदू मंदिरावर जगणारा, िहदू मंदिराचे चित्र आपल्या झेंडय़ावर मिरवणारा आणि िहदू मंदिराचे चित्र आपल्या रियाल या नोटेवर छापणारा कंबोडिया हा जगातील एकमेव देश आहे. नुसते अभिमान, गर्व असा आरडाओरडा करण्यापेक्षा आपल्या कृतीतून अभिमानाने ही प्रतीके मिळवणारा पर्यटनस्नेही कंबोडिया पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार आहे. ‘सुसडाई’.. म्हणजे ‘या, आपले स्वागत आहे’ असे बोलून मोठे आदरातिथ्य जपणारा हा देश निश्चितच पाहण्याजोगा आहे, देखणा आहे, आतिथ्यशील आहे. या देशाला अवश्य भेट द्यावी. आपले इथले वास्तव्य आणि विविध कलांचे दर्शन कायमच स्मरणात राहील, आपली भटकंती समृद्ध होईल.

आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com