कथा – तृतीय क्रमांक
दहा माणसांच्या रगाडय़ातले माझे घर. पाच मिनिटे स्वस्थ बसायला मिळायचे नाही, पण आता मात्र या चार भिंतींत मी एकटी. भिंतींशी, छताशी गोष्टी कराव्यात आणि मन रमवावे. दुसरे काय करू शकते? ही भयानक पोकळी जीवनाला व्यापून राहिली आहे. त्यातून सुटका कशी करून घेणार? वच्छीसारखी काही दिवसांनी मीही रस्त्यावरून हातवारे करत मोठमोठय़ांदा स्वत:शीच बोलत िहडायला लागेन. वच्छी माझी मैत्रीण अशीच एकटी पडली. एकटी राहिली आणि त्याने मनाचे संतुलन बिघडत अशी वेडी झाली. मला वेळीच सावरायला हवे. पण म्हणजे काय करायला हवे? काही सुचत नाही. मुलगा परदेशात आपापल्या व्यापात, संसारात. मी कुठे त्यांच्यात लुडबुडायला जाऊ. थोडे दिवस जाऊन आलेही, पण तिथे आपली मुळे या वयात रुजणे शक्य नाही. परधर्माची सून. तिच्याशी कोणत्याच गोष्टीवरून सूत जुळत नाही. मुलाची घालमेल होते. मग मीच निर्णय घेतला. आले झाले परत. परत लुडबुडायचे नाही. उरलेले आयुष्य एकटीने जगायचे.

वेगवेगळ्या संस्थांत जाते. वाचन करते, फिरून येते. पण नाटक-सिनेमाला, हॉटेलमध्ये एकटीने जायची हिंमत होत नाही. कुणीतरी बरोबर हवे. नेहमी कोण मिळणार? काही निर्णय घ्यायची वेळ आली तर सल्ला तरी कुणाला विचारणार? या वयातल्या मैत्रिणीही सगळ्या व्यवहारी. शाळा-कॉलेजमधल्या मैत्रिणींसारख्या थोडय़ाच असणार? पन्नाशी ओलांडलेल्या, जीवनाचे टक्केटोणपे खाऊन तयार झालेल्या. सावध भूमिका घेणाऱ्या. शेवटी निपटावे लागते आपले आपल्याला. इतर नातेवाईकही सगळे कडेने पोहणारे. आपले हक्काचे माणूस असे मधूनच साथ सोडून गेल्यावर असेच होणार. दुसरे काय होणार? एकटय़ानेच चहा प्यायचा, एकटय़ानेच जेवायचे, एकटय़ाने सगळी कामे करायची घरची, बाहेरची नुसते एकटेपणा भरून पुन्हा दशांगुळे उरले आहे. खरेच असेच आणखी काही वर्षे राहिले तर माझी वच्छीच होणार.

फोन वाजला. ज्येष्ठ नागरिक संघातले दामले बोलत होते. ‘‘आहात का बाई घरात, वाढदिवसाचे कार्ड द्यायला यायचे आहे.’’

अरे आज माझा वाढदिवस. तोही विसरले होते. ६० पूर्ण झाली की वयाला. गोपाळ गेल्यापासून हे असेच होते. ते असले असते तर माझ्या एकसष्टीचा घाट घातला असता, किती कौतुके केली असती. माझ्या लांबसडक वेणीवर छानसा गजरा आणला असता, नवी साडी आणली असती. बाहेर जेवायला, फिरायला घेऊन गेले असते. सतत ‘जानकी- जानकी’चा जप करायचे. त्यांच्याशिवाय ही पाच वर्षे कशी काढली माझी मला माहीत. आणखी किती काढायची आहेत देव जाणे. ‘‘हॅलो! ऐकताय ना? येऊ का वाढदिवसाचे कार्ड द्यायला?’’ मी पटकन भानावर आले. ‘‘हो, या ना या. आहे मी घरी.’’ फोन ठेवल्यावर वाटले उगीच त्यांना या म्हटले. हल्ली ते जरा जास्त संपर्क वाढवत आहेत असे वाटते. पण असू दे. आपलाही तास अर्धा तास जरा बरा जाईल. बोलायला मिळेल कुणाशी तरी. छानसे खायला करीन. पटकन तयार होईन. त्यांना यायला अजून अर्धा-पाऊण तास लागेल म्हणाले. बाजारात जाऊन येणार आहेत.

गोपाळांनी हट्ट धरला म्हणून ते सेवानिवृत्त झाल्यावर मीही स्वेच्छा निवृत्ती घेतली. म्हटले सगळे आयुष्य धावपळीत गेले, आता आयुष्याची संध्याकाळ एकमेकांना साथसोबत करत निवांत घालवू या. पण जेमतेम एखादेच वर्ष मध्ये गेले आणि हे एकटेपण कायमचे मागे लागले. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो. खूप मजेत होतो. कुठले कुठले विषय निघत होते. चला आता झोपू या म्हटले तर काय माहीत गोपाळ कायमचेच झोपतील! पहाटे पहाटे उठणारा माणूस अंगावर उन्हे आली तरी उठेना म्हणून हलवायला गेले तर प्राणपाखरू उडून गेलेले. मला न कळू देता, न निरोप घेता. एकटेपणाच्या खाईत लोटून. मी दीर्घ श्वास घेतला. कितीही मागचे विसरायचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा आठवणी येतात. चला आटपा लवकर. आता दामले बेल वाजवतील, मी मनाला बजावले. पटपट शिरा केला. भाजणीच्या वडय़ांची तयारी केली.

गोपाळ जायच्या आधीच समीर दोन वर्षे अमेरिकेला निघून गेला. तिकडेच एका गोऱ्या मडमेशी सूत जुळवले. लग्न केले. आम्हाला दोघांनाही ते भावले नाही. पण आपल्याच मुलाला आपण पाठीशी घालायला हवे म्हणून त्याच्या लग्नाची नातेवाईकात, शेजारीपाजारी भलावण केली. एकुलता एक मुलगा. तोडून कसे टाकणार? जाऊ या म्हटले त्याचा संसार पाहायला. पण तो योग काही आला नाही. सूनमुख न पाहताच गोपाळ निघून गेले. समीर धावत आला. सगळी निरवानिरव केली.  जाताना मला हट्टाने घेऊन गेला. तिथले ते वातावरण मला काही भावले नाही. सुनेचे ते तोकडे कपडे, ते मांसाहारी पदार्थाचे घरभर भरलेले वास, ते दारू पिणे आणि एकमेकांच्या खोलीत जातानाही इंटरकॉमवरून परवानगी मागणे, माझ्या संस्कारांना हे सारे कसे मानवणार? बसणे-बोलणे नाही, गप्पा नाहीत. ती दोघे कामाला जाणार. मी एकटी भुतासारखी. इथेही एकटीच आहे, पण इथले एकटेपण आणि तिथले एकटेपण यात जमीन- अस्मानाचा फरक आहे. इथला परिसर माझा आहे. वातावरण माझे आहे. भाषा माझी आहे. तिथे सुनेचे इंग्रजी मला कळायचे नाही. माझे इंग्रजी सुनेला कळायचे नाही. सगळा आनंदीआनंद. दिवसाकाठी १५ ते २० मिनिटे काय ते समीरशी बोलणे व्हायचे. पण सूनबाई-अ‍ॅना आणि मी फक्त एकमेकींना स्माईल देत बसायचो. आले झाले पळून. मुलासाठी जीव तुटतो. पण तो आहे हाच केवढा आधार वाटतो. पुन्हा मन भरकटायला लागलेय. पटकन तयार व्हायला हवे. नाहीतर गाऊनवर दार उघडायची पाळी येईल.

पटपट तयार झाले. छानशी साडी नेसले. अजूनही सडसडीत बांधा सुडौल आहे. रुपेरी केसांनी अधूनमधून हजेरी लावली तरी चेहरा अजूनही आकर्षक आहे. एकेकाळची कॉलेजमधली मी रूपगर्विता होते. नाटकात भूमिका, सूत्रसंचालन आपोआप माझ्याकडे चालत यायचे. पण गेल्या पाच वर्षांत मी हे सारे विसरले होते. आरशातही असे स्वत:ला न्याहळले नव्हते. सगळा नूरच पालटला आहे माझा. ‘चला घर आवरा आता पटकन.’ अरे बेल वाजलीच.

‘या या,’ मी दामलेंचे स्वागत केले. उंचपुरे उमदे, रसिक व्यक्तिमत्त्व, बोलण्यात छाप पाडण्याची कला. आले तेच मुळी स्मितहास्य करत. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. संघाच्या वाढदिवसाचे कार्ड त्यांनी दिलं. संघासाठी देणगीचे पाकीट तयार करून ठेवले होते ते मी दिले. ‘‘६१ वर्षांच्या आहात असे वाटतच नाही. अजूनही तरुणच दिसता.’’ त्यांच्या या शेरेबाजीने मी मनात हरखून गेले. ‘पण मधे मधे कधीतरी उदास उदासही वाटते.’ ‘‘मला परवा परवापर्यंत माहीत नव्हते गोपाळराव फाटक आता नाहीत हे. तुम्ही बायका हल्ली कुंकू लावता. मंगळसूत्र घालता त्यामुळे कळत नाही. कुणी आवर्जून उल्लेख केला तरच कळते. पण छान आहे हा बदल. उगीच कुणा उपटसुंभ्याची नजर नको जायला. लोक फार वाईट असतात हो.’’ त्यांची मते मला पटत होती. खाणेपिणे झाले. माझ्या सुगरणपणाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. मला खूप बरे वाटले.

दामलेंच्या आग्रहाखातर मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीत गेले. एका दिवसाची पावसाळी सहल. एका आठवडय़ाची हिवाळी सहल. सगळीकडे गेले. कार्यकारिणीत असल्याने बैठका, कार्यक्रमाचे नियोजन, बक्षिसांची, सत्कारांची खरेदी या निमित्ताने वारंवार भेटत राहिलो. आता दामलेंच्या बरोबर असण्याची मला सवय झाली. मी त्यांची वाट पाहायला लागले. हळूहळू त्यांची ओढही वाटू लागली. मुलाशी फोनवर बोलताना त्यांचा उल्लेख व्हायला लागला.  गोपाळराव फोटोतून मिस्कीलपणे पाहात आहेत असे वाटू लागले. ते असताना नेहमी म्हणायचे, जानकी कुणीही आधी जाऊ दे दुसऱ्याने एकटे राहायचे नाही. कुणाची तरी सोबत मिळवायची. तेव्हा मी त्यांच्यावर चिडत असे. ‘‘हे काय? परत लग्न का करायचे? या वयात तेही? लोक तोंडात शेण घालतील.’’ ते म्हणायचे लग्नच कशाला करायला हवे? ते न करता मैत्री करायची. एकत्र राहायचे. या वयाला आता फक्त सोबतीची गरज असते. ती भागली की झाले.’’ मला काही ते पटायचे नाही. पण हे भयाण एकटेपण अनुभवल्यावर त्यांच्या म्हणण्यातही तथ्य होते अस वाटायला लागलेय.

एके संध्याकाळी दामले वेगळ्याच मूडमध्ये होते. कधी नाही ते बायकोबद्दल बोलत होते. चाळिशीचा नाही झालो तर पत्नी कॅन्सरने गेली. पदरात मूलबाळ नाही. सडाफटिंग जगलो. मित्रांनी, घरच्यांनी पुन्हा लग्न करण्याचा आग्रह धरला, पण मी बधलो नाही. तिच्या जाण्याला २५ वर्षे झाली. पहिल्यांदा सैरभैर झालो, पण हळूहळू सावरले स्वत:ला. सामाजिक संस्थांत झोकून देऊन काम केले. लोकांनाही असा आगापिछा नसलेला कार्यकर्ता हवाच होता. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक संघात घुसलो. मन रमवत राहिलो, पण आता वय वाढत आहे तसं एकटेपण अंगावर येतंय. उद्या हृदयात कळ आली तर पाणी पाजायला कोणी नाही. तरुणपण एकटय़ाने निभावणं सोपं असतं जानकीबाई, म्हातारपणी नाही जमत ते. आता आयुष्याचा जरा वेगळा विचार करावा म्हणतो. पण प्रस्ताव मांडला तर तो स्वीकारला पाहिजे, नाही तर आहे तीही मैत्री तुटायची, अशी भीती वाटते. ‘आहे का कुणी अशी मनात भरलेली? सरळ मन मोकळं करा. तुम्हाला कोण नाही म्हणेल?’ मी अभावितपणे बोलून गेले. दामलेंनी दीर्घ श्वास घेतला आणि सरळ माझ्या डोळ्यांत रोखून पाहत म्हटलं, ‘जानकी, तू हो म्हणशील मला?’ माझ्या अंगातून वीज लक्कन गेली. मी डोळे मिटले. ‘शांतपणे विचार करून उत्तर दे जानकी. नाही म्हणालीस तरी चालेल. पण मैत्री तोडू नकोस गं.’ आणि ते सरळ निघून गेले.

माशांचं मोहळ घोंघावत अंगावर यावं तसं मला झालं. प्रत्येक माशी मला कडाडून चावत होती. ‘४० र्वष गोपाळरावांबरोबर संसार करून तृप्ती नाही मिळाली तुला?’ ‘या वयात नातेवाईक म्हणतील म्हातारचळ लागलय मेलीला.’ ‘पिकल्या पानाचा हिरवा देठ’, ‘म्हातारी लफडेबाज निघाली हं’, ‘या वयातही पटवला की!’ ‘मनाची नाही जनाची काही लाज.’ ‘बरं झालं, एकटी बिचारी पडली होती. आता सोबत तरी मिळाली.’, ‘त्यात काय झालं? आपल्याकडेही आता आलं आहे ते लोण’, ‘काही वाईट नाही, चांगलाच विचार केला तिने,’ ‘हल्ली बरेच जण हा पर्याय निवडायला लागले आहेत.’ उलटसुलट विचार, नुसतं थैमान सुरू झालं डोक्यात. हॅम्लेटची टू ही ऑर नॉट टू बी स्थिती मी अनुभवत होते. गोपाळरावांच्या फोटोसमोर उभी राहिले आणि त्यांना सरळ फैलावरच घेतलं. ‘का गेलात असा अर्धा डाव टाकून? माझा काही विचार केलात जाताना? तुम्ही गेलात सुटून, पण हे सारं मी एकटीन् कसं रेटायचं? तुमचा संसार उभा करताना काडी काडी जमवावी लागली तेव्हा अनेक प्रकारची दु:ख-कष्ट पदरी आली, पण तुमच्या साथीच्या जोरावर सगळं निभावून नेलं. आता हे केवढं मोठं दु:ख माझ्या पदरात पडलं तुमच्या नसण्यामुळे. तुम्ही असता तर ही वेळच आली नसती माझ्यावर, आपोआप डोळे पाझरायला लागले.

आठ दिवस झाले मी दामलेंशी संपर्कच केला नाही. नकोच तो विषय. त्यांचाही फोन आला नाही. ते वाट पाहत असतील माझ्या निर्णयाची. कुणाचा तरी सल्ला घ्यायला हवा. कुणाला विचारू? पटकन समीर डोळ्यापुढे उभा राहिला. मनाचा हिय्या करून त्याला फोन लावला. एका दमात सगळं ओकून टाकलं आणि त्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मनाची तयारी केली. ‘काय आई तू हे बोलतेस? मला स्वप्नातही कधी हा विचार मनाला शिवला नाही. बाबांच्या जागेवर तुझा तो दामले? शीऽऽ मी कल्पनाही करू शकत नाही.’ मी फोन बंद करून टाकला. मला कळल्या त्याच्या प्रतिक्रिया. बस झालं, हे सगळ संपवून टाकायचं आता. पोटचं पोरही समजून घेत नाही. याने ख्रिश्चन पोरीशी लग्न केलं तर आम्ही त्याची कड घेऊन इतरांना ऐकवलं. कोत्या विचारांचं ठरवलं. मानव हाच धर्म, असं याच्या वागण्याचं समर्थन चारचौघात केलं. त्यालाही तोडून न टाकता सगळं स्वीकारलं. कितीही मनाला पटत नव्हतं तरी. जाऊ दे. संपला आता विषय. दामले वाट पाहतील पाहतील आणि सोडून देतील. आपण त्यांच्याशी कोणताच संबंध यापुढे ठेवायचा नाही.

पुढचे १०/१२ दिवस मनाशी झगडत, तळमळत काढले आणि अचानक पत्र आलं अमेरिकेहून. अ‍ॅना समीर फाटक, पत्रावरचं नाव वाचून मी उडालेच. आता डिक्शनरीच घेऊन बसू हिची मुक्ताफळं वाचायला. ही

आता मला उपदेशाचे डोस पाजणार. पत्र उघडलं तर चक्क मराठीत. अक्षर समीरचं. ‘अ‍ॅननं हट्ट धरला म्हणून तिचे विचार मी तुला मराठीत लिहून पाठवतो आहे.’ पहिलंच वाक्य हे असं कोरडं ठणठणीत. ‘प्रिय आई, तुमचं आणि समीरचं बोलणं मी फोनवरून ऐकलं. काही कळलं नाही, पण समीर चांगला चिडला होता. तावातावाने बोलत होता म्हणून मी त्याला खोदून खोदून विचारलं. मग तुमचा प्रॉब्लेम मला कळला. मेलच करणार होते पण तुम्हाला तो काढणं आणि वाचणं यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागली असती आणि आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्यांच्या कानावर गेल्या असत्या म्हणून पत्र लिहिते आहे. समीरकडे लक्ष देऊ नका. तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मी इतकंच सांगते, एकटय़ा राहू नका. सोबत मिळते आहे ती सोडू नका. फक्त लग्न करू नका. मग बाबांच्या पेन्शनची फॅसिलिटी जाईल. म्हणून फक्त एकत्र राहा. ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये.’ म्हणजे पटलं नाही तर पटकन वेगळं होता येईल. भावनावश न होता व्यवहाराने वागा. तुमचं त्यांचं पैशाचं काँट्रिब्युशन ठरवून घ्या. मला हवं तेव्हा मी काही दिवस एकटी राहणार. काही दिवस तुमच्या घरी एकत्र राहू. काही दिवस माझ्या घरी एकत्र राहू अशी अट घाला. आपलं घर सोडू नका. सोबतीची गरज दोघांना आहे. एकत्र राहून खूप मजा करा. मी तुमच्या पाठीशी आहे. काही लागलं, गरज पडली तर तुमच्या मागे उभी राहीन. त्यांचा आणि तुमचा एक फोटो मला पाठवा. माझे आई-बाबा म्हणून तो मला हवा आहे. समीरचं मी बघून घेईन.’

पत्र वाचून मी गारच पडले. सुनेशी कोणत्याच बाबतीत सूत जुळत नाही म्हणणारी मी. याबाबतीत तिचे-माझे धागे जुळले. एक स्त्री म्हणून तिने मला समजून घेतलं. माझ्या भावनांची कदर केली. मला पाठिंबा दिला. लेकीनंही असा विचार केला नसता. मी पत्राची अक्षरश: पारायणं केली आणि दामलेंना फोन करायला धावले. ते येईपर्यंत मला आता भरभर तयार व्हायचं होतं. नवोढेची ओढ मला लागली होती. आता कधीही दारावरची बेल वाजेल. माझं सगळं लक्ष तिकडेच लागलं होतं. अ‍ॅनाने सुचवलेले मुद्दे मी तंतोतंत पाळणार होते. याबाबतीत ती माझी मार्गदर्शक होती. गुरू होती. मी पटापट आवरायला घेतलं. आवरता आवरता आतुरतेने मी वाट पाहत होते. जीवनाच्या अनोख्या वळणावर मी उभी होते. पण एकटी नव्हते. अ‍ॅना माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची पाठराखण करत होती. या स्त्रीत्वाच्या पुढे वय, नातं, धर्म सगळं गळून पडलं होतं. बेल वाजली. मी धावत दार उघडायला गेले.
डॉ. वृंदा कौजलगीकर – response.lokprabha@expressindia.com