दुनाबकडे बघितलं तर ती जणू म्हणाली, ‘‘मी तुला पुन्हा दिसणार नाही असं वाटलंच कसं तुला? सर्बयिाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मीच तर व्यापून आहे. सर्बयिात परत ये, परत भेटू..’’

विमानाची तिकिटे हातात पडली आणि सामानाची जोरदार बांधाबांध सुरू झाली. प्राचीन पर्यावरणाच्या आणि पुरातत्त्वीय अभ्यासासाठी जवळजवळ तीन-साडेतीन आठवडे सर्बयिाला जायचे ठरले होते, त्यामुळे स्वत:च्या दोन जाडजूड बॅगांसोबत सर्वेक्षण आणि खोदकामासाठी लागणारी चांगली मणभर वजनाची ‘हत्यारे आणि अवजारे’सुद्धा न्यावी लागणार होती. मला मुळातच सारख्या नवनवीन याद्या करणे आणि (नवरा कितीही वैतागत असला तरी!) सदैव काही ना काही आवरत बसणे, याची दोन्हीची प्रचंड खोड आहे. त्यामुळे मीच स्वत:हून पुढे पुढे करून सर्बयिा-बांधाबांधीची जबाबदारी गळ्यात पाडून घेतली आणि आधी माझ्या सर्बयिासफरीचा आणि मग अर्थातच माझ्या कामाचा सर्वत्र बोभाटा करून घेतला! अनेकांनी मला विचारलं, ‘सर्बयिाच का?’ (त्याआधी त्याहून अनेकांनी ‘ते कुठे आले?’ असा चतुर प्रश्न करून ‘ते काय असते?’ या त्यांच्या मनीच्या खऱ्या प्रश्नाचे उत्तर पदरात पडून घेतले होतेच!), तेव्हा मी उगीचच ‘‘मला चॉइस नाही! माझे पीएच.डी.चे अ‍ॅडवायजर तिथेच काम करतात..’’ वगरे सांगून पीएच.डी.चे विद्यार्थी नेहमीच कसे मास्तरांच्या ‘वझ्याचे’ बल असतात, अशी लोकांची पक्की समजूत करून दिली! वास्तविक, अत्यंत इंटरेिस्टग कामाबरोबरच युरोपातला, तोही पूर्व युरोपातला एक अत्यंत वेगळा देश पाहायला मिळणार म्हणून मी मनातून प्रचंड म्हणजे तुडुंब खूश होते!

सर्बयिा हा दक्षिण-पूर्व युरोपातला एक छोटुकला देश. किती छोटुकला असे विचारलेत तर आपल्या महाराष्ट्राच्या निव्वळ अर्धा; सर्बयिाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला गाडीने फार तर फार आठ तास लागत असतील! परंतु एवढय़ा कमी क्षेत्रफळातसुद्धा अगणित निसर्गदत्त डोंगररांगा- नद्या- तळी- वने- पक्षी- प्राणी यांनी भरगच्च आणि गेल्या हजारो वर्षांच्या मानवी इतिहासाचा साक्षीदार असणारा सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत म्हणावा असा सर्बयिा! तसे हे दक्षिण-पूर्व युरोपातले सर्वच बाल्कन देश, अर्थात क्रोएशिया, सर्बयिा, बोस्निया, अल्बानिया, मेसिडोनिया, बल्गेरिया, स्लोवेनिया तसे नसले तरी असे उच्चभ्रूच आहेत. खरे तर त्यांना त्याऐवजी उच्च‘भू’ म्हटले तर तेही चुकीचे ठरू नये. कारण मुळातच हे देश युरोप, आशिया आणि आफ्रिका या तीन महत्त्वाच्या खंडांच्या सीमांजवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेले आहेत आणि त्यातून दानुब, तिस्ता, सावा या आपल्या गंगा-ब्रह्मपुत्रेसारख्या प्रचंड मोठाल्या नद्यांनी हा सारा प्रदेश भलताच सुपीक करून ठेवला आहे. ही अतिशय उच्च प्रतीची ‘भू’ साऱ्याच बाल्कन प्रदेशाने आपल्या पूर्वज मंडळींना गेली हजारो वष्रे इकडून तिकडे, तिकडून इकडे करायला आणि कसायला देऊ केलेली आहे! मानव मुळात आफ्रिकेत निपजला- सुरुवातीची लाखो वष्रे तिथेच राहिला हे सध्याच्या ज्ञानानुसार खरेच, पण मग टोळ्याटोळ्यांनी अधिकाधिक चांगल्या जमिनीच्या शोधात तो पुढील लाखो वष्रे आफ्रिकेबाहेर हिंडत राहिला. आधी इजिप्त आणि तांबडा समुद्र ओलांडून तो मध्य-पूर्वेत गेला आणि मजल-दरमजल करीत आशियात आणि मग युरोपात स्थिरावला! हे झाले पन्नासेक हजार वर्षांपूर्वीचे चित्र. पण सुमारे दहा-बारा हजार वर्षांपूर्वी त्याने दुसरा एक महत्त्वाचा टप्पा गाठला तो म्हणजे शेती करण्याचा! सुरुवातीला त्याला ती उच्च‘भू’ गवसली ती पुन्हा मध्य-पूर्वेतच, नाईल आणि टिग्रीस-युफ्रेटिटिसच्या खोऱ्यात (पुरातत्त्वीय परिभाषेत ज्याला ‘फर्टाइल क्रेसंट’ म्हटलेले ऐकले असेल तर हाच तो भाग) आणि तोवर जे सापडेल- मिळवता येईल ते गपगुमान खाणाऱ्या मानवाने आता जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गहू, जवस, बार्ली असे काहीबाही पिकवायला सुरुवात केली. बरे शेती करायची म्हणजे महिनोन्महिने एकाच ठिकाणी काम करणे आले, म्हणजे एकाच ठिकाणी राहणे आले, आणि मग त्याचे बूड अखेर एका ठिकाणी स्थिर झाले आणि कसण्याबरोबरच तो खरोखरीच वसायला शिकला. या साऱ्याची सुरुवात मध्य-पूर्वेत झाली खरी, पण काही काळातच (म्हणजे पुरातत्त्वीय प्रमाणानुसार एखाद-दोन हजार वर्षांतच!) शेतीची कला मध्य-पूर्वेतून तुर्कस्थानात आणि तिथून त्याला अगदी लागून असलेल्या बाल्कन प्रदेशात आली आणि मग तिथेही ती कायमचीच रुजली. इथली कसदार जमीन तत्कालीन मानवासाठी वरदान ठरली आणि युरोपात पहिल्यांदा शेती सुरू झाली. युरोपात पन्नास हजार वर्षांपूर्वीपासून राहणाऱ्या माणसाला शेती आणि वस्ती या गोष्टी शिकायला जवळजवळ चाळीस हजार वष्रे लागली आणि दरम्यानच्या कालखंडातले सारे लहान-मोठे बदल उघडय़ा डोळ्यांनी पाहणाऱ्या आणि खुल्या दिलाने आपल्या गर्भात जपणाऱ्या बाल्कन भागाला म्हणूनच युरोपच्या प्राचीन इतिहासात प्रचंड महत्त्व आहे. अर्थात ही ‘एका बाल्कनची गोष्ट’ एवढय़ावरच संपली असे नाही. शेती रुजली, मग काळानुरूप पिकांच्या प्रकारात वाढ होत गेली आणि सोबत मनुष्यवस्तीही वाढत गेली. पुढे चार-पाच हजार वष्रे शेती केल्यावर मानवाला चुळबुळ्या स्वभावानुसार राहवेनासे झाले असावे, त्याने कुठे कुठे खोदाखोद सुरू केली आणि एकामागोमाग एक धातू शोधून काढले; त्यात पहिला नंबर तांब्याचा, मग ब्राँझचा आणि कालांतराने लोखंडाचा! या साऱ्या धातूंसोबत तावून सुलाखून मानवाची सामाजिक आणि आíथक प्रगती होत राहिली. एका अर्थी आज जी युरोपाची भरभराट पाहायला मिळते आहे, त्याची पायाभरणी कुठे तरी याच मातीत झाली होती, असे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच युरोपीय आणि जागतिक पुरातत्त्ववेत्त्यांनी बाल्कनचे महत्त्व पदोपदी अधोरेखित केलेले आहे. याच प्रदेशाच्या गेल्या काही हजार वर्षांचा सांस्कृतिक इतिहास एकाच वेळी उत्खननातून आणि प्राचीन पर्यावरणबदलांतून उलगडता यावा यासाठी सलग तीन वष्रे या भागात खरीखुरी (आणि बौद्धिक) भटकंती करण्याचा मोका मला मिळाला होता!

या भटकंतीची सुरुवात झाली ती सर्बयिाची राजधानी बेलग्रेडपासून! न्यूयॉर्क ते झुरिक आणि मग आल्प्स्वरून उडत उडत सर्बयिाचे निकोला टेस्ला विमानतळ गाठले. टॅक्सी पकडून बेलग्रेडच्या रस्त्याला लागलो. मध्यवर्ती भागात ‘हॉटेल रोयाल’मध्ये पहिले एक-दोन दिवस मुक्काम असणार होता, तेव्हा आपापल्या खोल्यांमध्ये पटापटा सामान टाकले आणि  ‘आत्ता झोपले तर जेट लॅग येईल..’ असे स्वत:ला बजावून थोडे फ्रेश होऊन शहर फिरायला बाहेर पडले. आजवर युरोपाचे गुणवर्णन फक्त ऐकले होते, आज मात्र ते डोळ्याला दिसायला लागले होते- छोटे छोटे निमुळते रस्तेवजा-गल्ल्या, इंटरलॉकिंग पद्धतीने केलेले त्यांचे षटकोनी आकाराच्या दगडांचे बांधकाम आणि दोन्ही बाजूला एकमेकींना अगदी चिकटून बांधलेल्या एक तर अस्सल रोमन पद्धतीचे खांब असलेल्या राखाडी इमारती नाही तर बायझँटियन- रशियन- मुसलमानी पद्धतीने बांधलेल्या गोल-हिरव्या घुमटांच्या इमारती. या दुसऱ्या प्रकारच्या इमारती जेव्हा जागोजागी दिसायला लागल्या, तेव्हा परत एकदा त्यांनी इतिहासात डोकावायला लावले. लोहयुगानंतर काहीशे वर्षांतच, साधारण इ.स.पू. २००-१०० मध्ये उत्तर-पश्चिमेकडे सरकत सरकत रोमनांचे साम्राज्य अख्ख्या युरोपभर पसरले आणि बाल्कन- दक्षिण- पूर्व युरोपात ते बायझँटियन या उपशाखेच्या रूपात पुढली चांगली १२०० वष्रे टिकले. परत एकदा, नसíगक संसाधनाच्या दृष्टीने (आणि म्हणून राजकीयदृष्टय़ा) अतिशय मोक्याचा भाग, कुणालाही तो सोडायचा नव्हता आणि मिळेल त्या मार्गानी मिळवायचा होता, त्यामुळे हंगेरी- ऑस्ट्रिया- जर्मनी वगरे युरोपच्या इतर भागांतून इथे सदैव आक्रमणे होत राहिली. शेवटले मोठे आक्रमण तुर्कस्तानातून आलेल्या बलाढय़ मुस्लीम ओटोमनांचे (ओस्मान आणि त्याच्या वंशजांचे); ज्यांनी बायझँटियनांच्या ऱ्हासादरम्यान स्थानिक राज्यांना मांडलिकत्व देत देत या भागात पाय रोवायला सुरुवात केली आणि पुढली जवळजवळ ४००-५०० वष्रे, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या भागात आपले बस्तान बसवले. या सगळ्याच रणधुमाळीत सदैव नवनवीन लोक येत-जात आणि वसत राहिले आणि वसताना हे आपापल्या कला, भाषा, संस्कृती आणि स्थापत्य घेऊन वसले; बेलग्रेडच्या क्नेझ मिखायलोवानामक मुख्य रस्त्यावर या सर्व संस्कृतींची सरमिसळ पाहायला मिळत होती आणि अगदी अलीकडल्या मुस्लीम राजवटीचा आणि मूळच्या सनातनी (ओर्थोडॉक्स) ख्रिश्चन धर्माचा प्रभाव बांधकामावर दिसत होता. माझ्यासारखी भूशास्त्र-पुरातत्त्व वगरे विषयांच्या मागे लागलेली मंडळी जरा काही जुने दिसले की लग्गेच प्रेमात पडतात(!), त्यामुळे क्नेझ मिखायलोवाच्या या ऐतिहासिक विविधतेने मला पहिल्याच दिवशी खिशात घातले आणि सर्बयिाच्या पुढल्या तिन्ही ट्रिपांमध्ये तिथल्या रस्त्यावर पडीक राहून तिथली डझनभर वस्तुसंग्रहालये, विविध सांकृतिक केंद्रे आणि बेलग्रेड विद्यापीठाचे विविध प्रभाग यांना भेटी देणे हे महत्त्वाचे बेलग्रेड-कार्य राहिले!

क्नेझ मिखायलोवाप्रमाणेच, प्रत्येक ट्रिपमध्ये अजून एक ठरलेली चक्कर असायची ती म्हणजे तिथल्या कालेमेग्दान किल्ल्यावर. बेलग्रेडच्या बरोब्बर मध्यभागी दानुब- खरे तर, दुनाब- आणि सावा या नद्यांच्या संगमावर, एका बुटक्या टेकाडावरचा हा किल्ला इ.स.पू. तिसऱ्या शतकात कधी तरी तत्कालीन (लोहयुगीन) स्थानिक जमातींनी बांधल्याचे संदर्भ सापडतात. किल्ल्याचा एकूण विस्तार बघताना वाटले, हा किल्ला नव्हेच. हे त्या वेळी आख्खे गावच असावे आणि तसेच झाले. संपूर्ण किल्ला फिरता फिरता ठिकठिकाणी केलेल्या- जपलेल्या उत्खननातून आणि सोबत लिहिलेल्या माहितीतून कळले की, जमातीतले जवळजवळ सर्वच लोक या किल्ल्याच्या परिसरातच राहत असत. मनात आले, तेव्हा लोकसंख्या मोजकी असेल तेव्हा ते अगदीच सुटसुटीत झालेले असेल, टेकाडाच्या पायथ्याशीच कायम दुथडी भरून वाहणाऱ्या दोन मोठ्ठाल्या नद्यांच्या बेचक्यात हा वसलेला आणि समोर दोन्हीकडे मलोन्मल त्यांच्या सुपीक गाळाचा सखल प्रदेश. ना खाण्याची आबाळ, ना पिण्याच्या पाण्याची, शिवाय उद्या आजूबाजूने आलीच अजून इतर टोळकी तर त्यांना पटकन नद्या ओलांडून येणेही अशक्यच! पुन्हा एकदा, स्ट्रॅटेजिक लोकेशन कोण सोडणार, त्यामुळे तेव्हापासून आत्ता-आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक राजवटीने चढाया करकरून तो जिंकला आणि युद्धात उद्ध्वस्त झालेला असला तरी डागडुजी करून वापरात ठेवला. त्यामुळे किल्ल्याला एकात एक- एकात एक अशा अनेक तटबंद्याच नाहीत तर किल्ल्याचे बुलंद बुरूजसुद्धा हजारो हातांनी बांधले गेलेत. या किल्ल्याचेही शेवटचे राज्यकत्रे ओटोमनच, त्यांनीच याला ‘काले’ (किल्ला) आणि ‘मैदान’ (रणभूमी) एकत्र करून दिलेले नाव काही अंशी अपभ्रंश होत अजूनही टिकून आहे. आज किल्ल्यावर लोहयुगीन गावाचे काही अवशेष, काही रोमन विहिरी, एक-दोन ओटोमान राजांची थडगी, एक-दोन छोटी सनातनी चर्च, आधुनिक रणगाडे-तोफायुक्त लष्करी वस्तुसंग्रहालय असे बरेच काय काय आहे, पण या सगळ्यावर कडी करून जातो तो म्हणजे उंचावरून सारा माहोल बघणारा पोवेद्निक ऊर्फ ‘द विक्टर’! हा साधारण माणूसभर उंचीचाच, पण एका मोठ्ठाल्या उंच रोमन खांबावर एका हातात ससाणा आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन उभा असलेला ब्राँझचा अर्धनग्न पुतळा शतकानुशतके चाललेल्या राजकीय उलथापालथीनंतर मिळवलेल्या सर्बयिाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. एकीकडे ओटोमनांपाठपोठ ऑस्ट्रियन साम्राज्यातून सुटका, मग पहिले-दुसरे महायुद्ध आणि मग युगोस्लावियातली लहान-मोठी युद्धे आणि दुसरीकडे दुनाब-सावेचा नीरव संगम बघत हा विक्टर गेली शंभर वष्रे उभा आहे.

सलग तीन वष्रे सर्बयिात हेच वेळापत्रक असायचे – आल्या आल्या पहिले दोन दिवस जेट लॅग घालवायला बेलग्रेड फिरफिर फिरायचे आणि मग मुक्काम हलवून तीन आठवडे पश्चिम-मध्य सर्बयिातल्या लहान-मोठय़ा गावांना, तिथल्या लोकांना आणि मुख्य म्हणजे नद्या-सरोवरे-तळ्यांना भेट देत पीएच.डी. कामासाठी भूशास्त्रीय ऐवज जमवायचा आणि तो घेऊन न्यूयॉर्क गाठून मिळवलेल्या नमुन्यांचा अभ्यास करायचा. एक शेवटची एकटीने मारलेली ट्रीप वगळता, सर्बयिातल्या वेळापत्रकात किमान १०-१५ जण सोबत असत. दोन-तीन माझ्या विद्यापीठातलेच शिक्षक म्हणजे मी आणि अजून दोन विद्यार्थ्यांची अ‍ॅडवायझर मंडळी आणि बाकी सगळी उत्खननाच्या कामाचा अनुभव मिळावा म्हणून आलेली काही इतिहास/पुरातत्त्व विषय घेऊन बी.ए. करणारी न्यूयॉर्कची आणि सर्बयिाची मुले-मुली! काम चालू असताना-नसताना सगळ्यांचीच वेगवेगळ्या विषयांवर टकळी चालू असायची. हे सगळेच सर्बयिन लोक मला फार आवडले, एकदम मनमोकळे, प्रेमळ आणि अगत्यशील, विशेषत: गावाकडली मंडळी तर फारच. गंमत म्हणजे बेलग्रेडमध्ये असेपर्यंत भाषेचा प्रश्न कमी आला, कारण तिथे तोडकेमोडके तरी का होईना इंग्रजी येणारे भेटायचे आणि आमचेही एखाद-दुसरे पाठ केलेले सर्बयिन शब्द (उदाहरणार्थ, वोडा=पाणी, ख्लेव्ह=ब्रेड) चालून जायचे, पण तिकडे गावाकडे काम करताना भाषेची ही चंगळ नव्हती. त्यातून तिथली लिपीसुद्धा वेगळी, तेव्हा बेलग्रेडमध्ये क्वचित पण इंग्रजी बोर्डसुद्धा दिसायचे, थोडे बाहेर सरकलो की सगळे ‘चिरलिक’मध्ये. (दक्षिण पूर्व युरोप आणि रशियात वापरली जाणारी लिपी). मला मुळात भाषा-लिप्या जाम आवडतात आणि इथे चिरलिकमध्ये सगळे फोनेटिक – बोले तसा लिहे – होते, तेव्हा मी पहिल्या दिवसापासून हळूहळू एकेक अक्षर जुळवत शब्द वाचायला लागले होते पण तरी अर्थ तर कळायला हवा ना, नाही तर एकाचे दोन व्हायचे! एकुणात, कामाला सुरुवात केली तेव्हा ना आम्हाला सर्बयिन यायची आणि ना स्थानिक लोकांना इंग्रजी, तरीही हातवारे करीत करीत कित्येक संभाषणे चालायची. अर्थात, फील्डवर्कच्या दिवशी सर्बयिन पोरे आळीपाळीने आमच्याबरोबर दुभाषिक म्हणून यायची; कारण तळ्यात-मळ्यात कुठेही गाळ-मातीचे नमुने घ्यायचे झाले की त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची/जागामालकाची परवानगी घ्यावी लागायची. हे सगळे तो/ती दुभाषा/दुभाषी त्यांना समजावून सांगायची. यातल्या एकाही ठिकाणी आम्ही रिकाम्या हाती परतलो नाही की रिकाम्या पोटीही परतलो नाही. प्रत्येक ठिकाणी आधी घराबाहेरच्या अंगणात टेबल-खुच्र्या टाकून आधी इथल्या खास कॉफी – इथल्या खास टíकश कॉफीचा पेला समोर यायचा आणि सोबत ख्लेव्ह आणि कायमाक नावाचे इथले खास, घरी बनवलेले चीज! एका ठिकाणी तर एका अतिशय गोड आज्जीने मला अगदी जवळ घेऊन ब्रेडचा तुकडा देत माझ्या सह-दुभाष्याला मला सांगायला सांगितले, ‘‘किती बारीक आहे ही. हे घरचे कायमाक आहे, अजून खा म्हणावं, तब्येत चांगली होईल! इकडे येऊन खोदकाम करायचे तर शक्ती नको का?’’ – मला एक मिनीट कळेना मी सर्बयिात आहे की भारतात! असे आदरातिथ्याचे अनेक किस्से. अजून गंमत म्हणजे सर्व सर्बयिन पोरे जिथे जाऊ तिथे ‘ही मूळची भारतातली आहे बरं का’ असं आवर्जून सांगायचे आणि समोरच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच आदरमिश्रित होऊन जायचे. एक तर आपण भारतीय म्हणजे अगदी ‘अव्वल’ रंगाचे, त्यामुळे मी मूळची अमेरिकेची नाही हे तसेही कुणीही एका फटक्यात ओळखायचे आणि ‘भारतातून आले’ असे उत्तर आले की लोक जोरात जोरात ‘इंडिया! इंडिया! बिग कंट्री! ब्युटीफुल पीपल!’ असे म्हणत माझ्याशी हात मिळवायचे, माझा भाव विनाकारण वधारायचा. मला सुरुवातीला वाटले हे नेहरू-टिटो या कनेक्शनमुळे असेल पण मग हळूहळू लोकांशी बोलताना लक्षात आलं की पूर्व-युरोपातले सर्वच लोक स्वत:ची पाळेमुळे भारतात आहेत, असे समजून जगणारे..त्यांच्या मते, सर्व ‘सर्ब’ हे एके काळी भटक्या जमातींच्या रूपाने पूर्वेकडून युरोपाच्या भागात आले आणि जेव्हा केव्हा आले तेव्हा भारत हे एकमेव जुने राष्ट्र होते तेव्हा त्यांचे मूळ कुठे तरी भारतात आहे. फार गंमत वाटली ऐकून. पुढे कधी तरी गप्पांमध्ये भारतातल्या भाषांचा विषय निघाला आणि तर एक मुलगा – ओग्नेन – म्हणाला, ‘‘ईज चारुता फ्रॉम युवर लँग्वेज ऑर िहदू लँग्वेज’’ – तिकडे ‘िहदी’ला ‘िहदू’ म्हणतात?! -? मी म्हटलं ‘‘दोन्हीही नाही, ते मूळचे संस्कृत आहे, त्याची फोड-अर्थ असे असे.’’ संस्कृत हा शब्द ऐकल्या क्षणाला त्याचे डोळे चमकले आणि म्हणाला, ‘‘प्लीज टीच मी टू राइट इट इन संस्कृत.’’ मी म्हटलं, ‘‘नक्की, पण आता मला सांग तुझ्या नावाचा अर्थ-मूळ काय आहे?’’ तर म्हणाला, ‘‘ओग्नेन मिन्स फायरमॅन.’’ हे ऐकून माझे डोळे चमकायचेच काय पांढरे व्हायचेच राहिले! मी म्हटलं, ‘‘तुला माहितेय संस्कृतमध्ये फायरला अग्नी असा शब्द आहे.’’ हे ऐकून तर तो चक्क नाचतच सुटला, त्याच्या इतर सगळ्या सवंगडय़ांना बोलावून आणलं आणि ओरडत म्हणाला, ‘‘माय नेम हॅज अ संस्कृत रूट. आय अ‍ॅम अ ट्र सर्ब!’’ त्याच्या या वाक्याची मज्जा वाटली आणि थोडे वाईटही. ओटोमान-ऑस्ट्रियन राज्ये गेली पण या भागातला राजकीय आणि सामाजिक तणाव कधीच कमी झाला नाही. सततची चाललेली युद्धे आणि त्यातून कायम होरपळून निघालेला तरी पुन:पुन्हा उभा राहणारा समाज, स्वत:च्या अस्मिता जपण्यासाठी, दृढ करण्यासाठी स्वत:ला विविध कारणांनी अधिकाधिक जुन्या संस्कृतींशी जोडू पाहत होता. त्यांच्याकडून कधी तरी ९९ सालच्या नाटो बॉिम्बगचे प्रसंग ऐकताना अंगावर काटा आला होता. मागे एकदा असंच ‘माली ग्रादाच’ नावाच्या एका ठिकाणी पाहणी करायला गेले होते तर गावात उतरल्या उतरल्या वेशीवर एका शिळेवर मोठय़ा अक्षरांत काही तरी संदेश लिहिल्यासारखा दिसत होता आणि खाली ऐंशीएक मृतांची नावे आणि वये. सगळ्या चाळीशीतल्या स्त्रिया आणि बारा वर्षांखालची मुले-बाळे. तोवर बऱ्यापैकी वाचता यायला लागलं होतं म्हणून नावे-वये कळली, पण वरचे शब्द लागेनात. मग सोबतची एक सर्बयिन मुलगी काहीशी खिन्न होत म्हणाली, ‘‘धिस ईस फ्रॉम वर्ल्ड-वॉर-वन, जर्मन्स अटॅक्ड धिस एरिया.. देयर वेर नो मेन लेफ्ट, हूएव्हर वाज लेफ्ट गॉट किल्ड..बट द मेसेज अबोव इज अ बीट सूिदग..इट सेज – दे थॉट दे वन, बट नो वन गेन्स पीस थ्रू कििलग..’’ सुन्न व्हायला झालं, वाटलं किती नि काय भोगलं-भोगताहेत हे लोक आणि किती काळ, यात दोष कुणाचा? बाल्कनच्या मोक्याच्या भौगोलिक परिस्थितीने यांना अधिकाधिक संकटातच टाकलंय.. म्हटलं, आपल्या कामातून जितकी जमेल तितकी या भागाची ओळख करून घेऊ आणि जमेल तशी ती भेटणाऱ्याला करूनही देऊ.

हेच ओळखीचे सत्र सुरूच राहिले. एका भेटीत कामाव्यतिरिक्त तीन-चार दिवस वेळ काढता आला आणि पहिल्यांदाच सर्बयिाचा पूर्व भाग बघायला मिळाला. दुनाबचे सर्बयिातले पूर्वेकडले शेवटले टोक अर्थात सर्बयिा-रोमानियाची सरहद्द. या भागात नद्याच सरहद्दी आहेत. पश्चिमेकडे द्रिना नावाची नदी सर्बयिा-बोस्नियाची सरहद्द, नदीच्या अल्याडपल्याड जशी दोन गावे असतात तसे चक्क दोन देश. पण या पूर्व सरहद्दीवर जाण्याची दोन खास आकर्षणे होती, एक म्हणजे गेले खूप वष्रे उत्खननात असलेले रोमराज्यातील एका राजधानीचे शहर, विमिनाशिअम आणि दुसरे, दुनाबचा आयर्न गेट्स भाग आणि त्यावर जतन केलेले लेपेन्स्की वीर हे मध्याश्मयुगीन गाव. विमिनाशिअम हे दुनाबच्या किनाऱ्यावर रोमनांनी वसवलेले कित्येक किलोमीटर क्षेत्रफळाचे एक प्रचंड मोठे शहर. हा चाळीसेक हजारांची वस्ती असलेला भाग पहिल्या ते जवळजवळ चवथ्या शतकापर्यंत हा रोमन सैन्याचा अतिशय महत्त्वाचा सैन्यतळ होता, पुढे अनेक लहान-मोठी आक्रमणे होत होत हे शहर कायमचे उद्ध्वस्त झाले. अलीकडे सर्बयिन पुरातत्त्व विभागाने हा प्रदेश िपजून काढत काढत जवळजवळ चार किलोमीटपर्यंतचा परिसर उत्खनन करून पर्यटकांसाठी खुला केला आहे. मी आणि अजून काही भटके अमेरिकन-सर्बयिन साथीदार पुरातत्त्व विभागाने नेमून दिलेल्या पश्चिम दरवाजाने आत शिरलो, आत आमची टूर गाईड स्लाजाना (ऊर्फ सुवर्णा) आमची वाटच पाहत होती. गेल्या गेल्या तिने आमचे दिशांचे ज्ञान तपासले (!), इथून पुढे या दिशेला रस्ते, मंदिरे, रोमन बाथ आहेत, त्या दिशेला गेलो की आपल्याला पुनरुज्जीवित केलेला रोमन वाडा पाहायला मिळेल अशी सगळी इत्थंभूत माहिती दिली. आम्ही ज्यावर उभे होतो तो साक्षात पश्चिम तटबंदीचाच भाग होता. तिथून उजव्या हाताला काही मीटर अंतरावर तत्कालीन कालव्यांचे रोमनांनी विणलेले मोठ्ठाले जाळे पाहायला मिळाले. आत्ता या ठिकाणापासून सहाएक किलोमीटर दुरावलेली दुनाब रोमनांच्या काळी अवघ्या दीड किलोमीटरवर होती, त्यामुळे तिचे पाणी वळवून शहराला पाणीपुरवठा करायचा हा मार्ग. आपल्याकडे कात्रजचे पाणी शनिवारवाडय़ात आणले, त्यातलाच हा प्रकार. काही ठिकाणी अजूनही पाणी झिरपताना दिसत होते आणि शेजारच्याच मोठय़ाल्या खोदकामात रोमन बाथ ऊर्फ थम्रे, त्यामुळे रोमनांनी एकुणात दुनाबच्या पाण्याचा झडझडून कसा उपयोग केला हे लगेचच कळायला सुरुवात झाली! थम्रे किंवा गरम पाण्याचे सार्वजनिक न्हाणीघर हे तर रोमराज्याचे खास वैशिष्टय़. एकुणात त्यांचा सगळा कारभारच मोकळाढाकळा, तसेच हे न्हाणीघर होते. चारी बाजूंनी बांधून काढलेली तीनेक फुटी िभत आणि न्हाणीघरात उतरून जायला तीन-चार पायऱ्या आणि खाली जमिनीवर सदैव खेळते गरम आणि थंड पाणी. ज्याला हवे त्याने आंघोळ करावी किंवा प्रवाहात पहुडावे नाही तर भितींवर बसून शोभा पाहावी, ज्याला जसे हवे तसे! सगळे दोन हजार वष्रे जुने बांधकाम, पण त्यातही काही थंड-गरम पाण्याचे पाइप अगदी सुस्थितीत होते. न्हाणीघरात उतरायला परवानगी नव्हती पण िभतीवरून चालता येत होते, तेव्हा चालत चालत खाली डोकावले तर  फरशीवर षटकोनी आकाराच्या दगडांचे इंटरलॉकिंग पद्धतीने केलेले बांधकाम दिसले. बेलग्रेडमध्ये (युरोपात अनेक ठिकाणी) रस्ते-गल्ल्यासुद्धा असेच षटकोनी आकाराच्या दगडांचे इंटरलॉकिंग केलेले आठवले. एकदम ‘युरेका’ झाले!

मी या ठिकाणी दोन हजार वष्रे जुन्या वस्तू-वास्तूच नाही तर तितकीच जुनी एक मानवी कल्पनासुद्धा पाहत होते! तिथून हरखून पुढे निघालो तर तोवर गप्पागप्पांत स्लाजानाला आमच्या सर्बयिातल्या संशोधनाची माहिती झाली होती. मग तिने आम्हाला राजवाडय़ाकडे नेण्याआधी आम्हा एका ‘खुफिया’ ठिकाणी ओढले, जिथे प्रचंड मोठय़ा, अवघी बारा हजार जनसंख्या मावू शकेल इतक्या अजस्र रोमन नाटय़गृहाचे खोदकाम चालू होते. हेही रोमनांचे वैशिष्टय़, त्यांच्या शहरात कायम एक मोठ्ठे अर्धगोलाकार व्यासपीठ आणि त्याभोवती हजारोंची बठक रचना असायची. थोडा वेळ आम्ही हा भाग धुंडाळला आणि मग पुनरुज्जीवित केलेल्या रोमनवाडय़ाकडे निघालो. आजूबाजूच्या अत्याधुनिक वातावरणात हा वाडा ‘रस्टिका’ अगदीच ‘ऑड मॅन आउट’ म्हणावा इतका रोमनकालीन होता. कमानीतून आत शिरल्याशिरल्या मोठ्ठा चौक, त्यात मध्यभागी निळ्या-पांढऱ्या फरशांनी बनवलेली मोठ्ठाली पुष्करणी, त्याच्याशेजारी खास रोमनांचे रथ आणि संपूर्ण लाल रंगाच्या फरशांनी बांधलेला बंगलीवजा वाडा. हे खरे तर विमिनाशियममध्ये जे जे सापडले त्याच्या संशोधनाचे केंद्र, पण सर्बयिन पुरातत्त्व विभागाला आणि युरोपियन युनियनला इथला इतिहास ठरेल असा एक वाडा या भागात (एक मूळ वाडा सापडला होता त्याच ठिकाणी) उभा करून जिवंत करायचा होता. ती जागा नेमकी पुनर्बाधणी करण्याच्या दृष्टीने जिकिरीची निघाली म्हणून त्यांनी हे विज्ञान-संशोधन केंद्रच ‘रस्टिका’ स्वरूपात पर्यटकांसाठी खुले केले आणि नुसते खुले केले नाही तर, रोमन स्थापत्याबरोबर रोमन वातावरणही जपले जावे म्हणून त्या त्या खोल्यांना शोभतील अशी ‘क्युबिक्युलम’, ‘सेनेटस’, ‘अट्रियम’ अशीच नावे दिली! हा सारा मामला भन्नाटच होता, हा विचार करीत विमिनाशियममधून बाहेर पडलो आणि पुढल्या प्रवासाला लागलो.

पुढला थांबा – दुनाबचा आयर्न गेट्स भाग आणि त्यावर जतन केलेले लेपेन्स्की वीर हे मध्याश्मयुगीन गाव. विनिमशियमवरून पूर्वेकडे दानुबच्या किनाऱ्यालगत गाडी हाकत हाकत ‘बलून स्टेशन’ नावाच्या ठिकाणी आलो आणि दहा-पंधरा जणच बसू शकतील, एवढी छोटी बोट घेऊन दुनाबच्या प्रवाहात शिरलो. नदीपात्रात दोन्ही बाजूला चुनखडीचे मोठाले खडक  होते. यांना इथे ‘डायनाराइटस’ म्हटले जाते. लाखो वर्षांपूर्वी (भूशास्त्रीय परिभाषेत, अगदी अलीकडच्या काळात!) डायनारिक पर्वत तयार होण्याच्या प्रक्रियेत इथल्या खडकांची उलथापालथ झाली आणि या भागात लांबच लांब घळ्या तयार झाल्या. त्यातली ही एक होती. ती दानुबचे किनारे अर्थात सर्बयिा आणि रोमानिया यांना बुलंदपणे राखतेय म्हणून या जागेला ‘आयर्न गेट्स ऑफ द दानुब’ म्हटले जाते. या भागात दुनाबचं पात्र तसं छोटं होतं, फार तर पाचशे मीटर असेल, आणि मागे म्हटले तसे दुनाब हीच दोन देशांमधली सरहद्द तेव्हा तेही अंतर इथे कमी झाले होते. आम्ही सर्बयिाहून निघालो होतो तसे अजून कोणी रोमानियाच्या बोटीतून अगदी शेजारून निघाले होते. एकमेकांना ओलांडून जाताना ‘हाय, बाय, दोबर दान (गुड डे)’ची देवघेव होत होती. अजून पुढे सरकलो तर रोमानियातली नदीकिनारी वसलेली एक-दोन सुंदर चर्चेस दिसली, उतरू शकणार नव्हतो (वेगळा विसा लागला असता!) तेव्हा डोळे आणि कॅमेऱ्यानेच त्यांची शोभा टिपून घेतली. पुढे एक भव्य नजरा दिसला तो म्हणजे द्रागान नामक एका रोमानियन शिल्पकाराने आठ वष्रे खपून दगडात कोरून काढलेले डेसेबलस या डाशियन राजाचे चाळीसेक मीटर उंचीचे शिल्प! रोमनांनी डाशिया (सध्याचा रोमानिया आणि थोडा युक्रेनपर्यंतचा भूभाग) काबीज करू नये म्हणून युद्धात धारातीर्थी पडणाऱ्या या राजाला अजूनही रोमानियन लोक खूप मानतात. हे शिल्प जगातील सर्वोत्तम ‘नसíगक शिल्पां’पकी एक गणले जाते. पण पुढे लगेचच सर्बयिाच्या बाजूला ‘हम भी कुछ कमी नही’ म्हणणारा ‘तबुला त्रयाना’ अर्थात रोमनसम्राट त्रयानाचा एक शिलालेख दिसला. नावाडय़ाने मुद्दाम बोट जवळ नेली आणि आम्ही शिलालेखावरची पुसट झालेली रोमन लिपी वाचायला लागलो. अर्थातच, स्वस्तुती करणारा शिलालेख होता तो. डाशियन लोकांना हरवून रोमानिया काबीज केल्यावर राज्यविस्तारासाठी रोमनांनी इ.स. १०५ मध्ये दुनाब नदीवर भलामोठ्ठा पूल बांधला आणि आपल्या पराक्रमाची नोंद करावी, यासाठी रोमनसम्राटाने हा शिलालेख तयार करून पुलाच्या (सर्बयिन) बाजूला लावला. कालांतराने त्रयानचा तो पूल उद्ध्वस्त झाला-केला गेला, शिलालेख टिकला. १९७१-७२ मध्ये दुनाबवर जलविद्युत निर्मिती केंद्र बांधण्यात आले आणि पाण्याखाली जाऊ नये म्हणून ‘तबुला त्रयाना’ जरा अजून उंचीवर आणून बसविले गेले. काळानुरूप या शिलालेखावरची माहिती पुसट होते आहे, मात्र याच्या छोटय़ा प्रतिकृती सर्बयिन सरकार मुद्दामच अधिकाधिक तयार करते आहे, त्यातली एक आमच्या नावाडय़ाने आम्हाला भेट देऊन टाकली. दुनाबच्या पात्रात चांगली दोन तासांची रपेट मारून मग ‘लेपेन्स्की वीर’च्या रस्त्याला लागलो. लेपेन्स्की वीर ही दुनाबच्या काठावर वसलेली एक मध्य पाषाणयुगीन (अर्थात मेसोलिथिक, इसपू ५३००-४८००) वसाहत. जवळजवळ पाच वष्रे सातत्याने उत्खनन आणि संशोधन केल्यानंतर पुरातत्त्व विभागाला इथे असंख्य बहुमूल्य अवशेष सापडले. १९७१-७२ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या धरणामुळे ही जागा पाण्याखाली जाणार, हे लक्षात येऊन तत्कालीन सरकारने येथील सर्व अवशेष जसेच्या तसे सुरक्षित उंचीवर आणून ठेवले आणि त्यावर काचेचे कवच घातले. पण अवशेष म्हणजे काय काय असेल याची त्या कवचातून आत शिरून, संग्रहालयात नीट डोकावून पाहीपर्यंत आम्हाला कल्पनासुद्धा आली नाही! त्या मंडळींनी अक्षरश: लेपेन्स्की वीरचा उत्खनन केलेला जमिनीचा तुकडा अख्खाच्या अख्खा उचलून इथे आणून ठेवला होता! इतिहास जपण्याची ही दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून मला तर तिथल्या पुरातत्त्व विभागाचे पायच धरावेसे वाटले. इथले बरेच अवशेष पुढे त्यांनी बेलग्रेडच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात हलवले पण काही थोडे अवशेष तिथेच बाळगून तिथले छोटेखानी वस्तुसंग्रहालय छान सजवले आहे. त्यात मला सगळ्यात आवडला म्हणजे तत्कालीन लोकांचा ‘मत्स्यदेव’, दुनाबच्या पाण्यापाशी राहत असल्याने हे लोक या मत्स्यदेवाची पूजा करीत, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. अजून पुढे लेपेन्स्की वीरची काय काय नवनवीन माहिती कळतेय ते बघूच!

लेपेन्स्की वीरवरून बेलग्रेडकडे निघताना दुनाबच्या किनाऱ्यालागत गाडी धावत होती. या वेळी दुनाबकडे पाहून उगाचच भरून आलं. वाटलं आता परत कधी दिसेल ही लेपेन्स्की वीर ते पार कालेमेग्दानपर्यंत हजारो वष्रे करोडो जिवांची अन्नदात्री-जीवनदायिनी आपल्याला. पण ते दु:ख फार काळ टिकलं नाही. परतीचा प्रवास संपवून पुन्हा बेलग्रेडमध्ये शिरलो तर शहराच्या मध्यभागी ही पुन्हा स्वागताला उभी! तिला एकदा शेवटचे उराउरी भेटू म्हणून माझ्या आवडत्या कालेमेग्दान किल्ल्यावर गेले तर तिची सखी सावा आणि ती शांतपणे संगमावर पहुडलेल्या.. दुनाबकडे बघितलं तर म्हणाली, ‘‘मी तुला पुन्हा दिसणार नाही असं वाटलंच कसं तुला? सर्बयिाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मीच तर व्यापून आहे. सर्बयिात परत ये, परत भेटू, दोब्रोदोश्ली सर्बयिू! अर्थात तुम्हा सर्वाचे सर्बयिात कायम स्वागत आहे!’’

डॉ. चारुता कुळकर्णी – response.lokprabha@expressindia.com