दालफ्राय कशी करायची इथपासून कुठल्याही म्हणजे अगदी कुठल्याही प्रश्नाचं सप्रमाण दृश्य उत्तर देणारा महागुरू म्हणजे यूटय़ूब. आपलं आयुष्य व्यापणाऱ्या त्याच्या व्याप्तीचा शोध..

आज डिजिटल जगात जगणाऱ्यांच्या मते जगात दोन महागुरू आहेत. जगातल्या यच्चयावत प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे मिळतात, असा तमाम नेटिझन्सचा ठाम विश्वास आहे. काहीही अडलं नडलं की हे नेटिझन्स पहिल्यांदा या दोन विंडोज ओपन करतात. तिथे तीन अक्षरं टाइप केली की (कधी कधी पूर्ण टाइप पण करावे लागत नाही) संभाव्य उत्तरांच्या खंडीभर लिंक येतात. अक्षरश: एखाद्या गोणीतून धान्य ओतावे तशी ही माहिती आणि आकडेवारी तुमच्या अंगावर म्हणजे स्क्रीनवर ओतली जाते. म्हणजे तुम्ही टाइप केलेत की जगातील सर्वात लांब रस्ता कोणता? म्हणजे दहा-पंधरा आकडी संख्येने उत्तरांच्या लिंक्सचा आकडा झळकतो. ती वाचण्यापेक्षा जगातील त्या लांबलचक रस्त्यावर फिरून येता येईल इतकी उत्तरांची संख्या मोठी असते. हे सांगणारा थोरला महागुरू म्हणजे गुगल आणि धाकटा यूटय़ूब.

खरेच यांच्याकडे जगातील कोणत्याही अक्षरश: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आहे. ते बरोबर की चूक याची खात्री नाही, पण उत्तर आहे. म्हणजे अगदी माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा कोणतीही घटना असो. धाकटय़ा महागुरूकडे तर प्रत्येक घटनेचे दृश्यप्रसारणच आहे. लहान मुलाची काळजी कशी घ्यावी, हगीज् कसे बदलावे (हसू नका २४ हजार ४०० व्हिडीओज आहेत), लंगोट कसा बदलावा (याचे पण ४४० व्हिडीओज आहेत), बडबड गीतं कोणती, ती कशी गायची, मग शाळेत काय शिकावे, स्कूल बॅग कशी भरावी (२ लाख ५० हजार व्हिडीओज), पेन्सीलला टोक कसे करावे, बुटांना पॉलिश कसे करावे.. एक ना दोन लाखो प्रश्नांना उत्तरं येथे असतात आणि अभ्यासातले काही कळले नाही तर मग काय लाखो-कोटय़वधी जण शिकवायला एका पायावर तयार असतात. जरा मोठे झाल्यावर (१५च्या आसपास) मग ड्रेस कसा असावा, मेक अप कसा करावा, हेअर स्टाइल कशी असावी, साडी कशी नेसावी, शाळा-कॉलेजात एखादा प्रोजेक्ट करायचा असो लगेच येथे शेकडय़ांनी प्रोजेक्ट मिळतात. खेळाची आवड असेल तर कोणता खेळ कसा खेळावा (कबड्डी खेळायची असेल तर दोन लाख ९४ हजार व्हिडीओ तुम्हाला शिकवायला तयार आहेत). मुलाखत कशी द्यावी याचे पण ज्ञान येथे आहे. मन रिझवण्यासाठी येथे करमणुकीचे लाखो पर्याय आहेत. दिवाळी आलीय तर रांगोळी काढायचे, फराळ करायचे मार्गदर्शन मिळते. स्वयंपाक कसा करावा हे पण येथे शिकता येते आणि व्यायाम कसा करावे तेदेखील. आरोग्य कसे सांभाळावे तेदेखील आणि मद्यपान कसे करावे तेदेखील. म्हातारपणाची काळजी कशी घ्यावी त्याची देखील तजवीज येथे आहे. थोडक्यात काय तर अगदी जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमच्या आयुष्यातील यच्चयावत सर्व प्रश्नांना, घटनांना उत्तरे येथे दिली जातात.

ही उत्तरे कोण देते. तर बहुतांशपणे तुम्ही-आम्हीच ती देत असतो. अगदी तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसापासून ते जगातील त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च तज्ज्ञ हे ज्ञान देत असतो, तुमचे मनोरंजन करत असतो आणि जी जी माहिती आहे ते त्या सव्‍‌र्हरवर अक्षरश: ओतत असतो. या ज्ञान देणाऱ्यांची, मनोरंजन करणाऱ्यांची संख्या किती आहे? तर तब्बल एक बिलियनहून अधिक व्हिडीओज या महागुरूच्या सव्‍‌र्हरवर आहेत. म्हणजे ते काही त्यांच्या मालकीचे नाहीत. ते तुम्ही-आम्हीच तयार केलेले आहेत. पण ते परत तुम्हाला-आम्हाला दाखवण्यासाठी त्यांच्या सव्‍‌र्हरवर ठेवले आहेत.

या सर्वाची सुरुवात झाली ती २००४ मध्ये. चलचित्रीकरणासाठी जगात असंख्य पर्याय होते. पण अशी चलचित्रणे एकमेकांशी शेअर करायला योग्य माध्यम उपलब्ध नव्हते. त्यातूनच स्टीव चेन, चाड हुर्ले, जावेद करीम या तिघांनी मेन्लो पार्कच्या गॅरेजमध्ये जे काही प्रयोग केले त्यातून यूटय़ूबचा जन्म झाला. नावातच ‘यू’-टय़ूब असले तरी त्याला गुगलस्पर्श झाला नव्हता तोपर्यंत ते तेवढे प्रसिद्ध झाले नव्हते. २००६ मध्ये गुगलने प्रचंड मोठी किंमत देऊन (१.६५ बिलियन डॉलर्स मोजले असे म्हटले जाते.) यूटय़ूबला त्यांच्यामध्ये सामावून घेतले आणि गुगलच्या सर्वव्यापी धोरणानुसार यूटय़ूब थेट तुमच्या आयुष्याला व्यापू लागले.

खरे तर मनोरंजनासाठी हे सारं काही सुरू झालं होते आणि त्याचा अगदी सुरुवातीच्या काळातला वापरदेखील केवळ मनोरंजनासाठीच होता. आपल्याकडे तर सुरुवातीच्या काळात याचा सर्वाधिक वापर झाला तो जुने चित्रपट पाहण्यासाठी. ज्यांच्याकडे चित्रपटांचे स्वामित्व हक्क आहेत त्यांनी ते यूटय़ूबवर अपलोड केले. त्याच वेळी अनेकांना जागतिक सिनेमाची कवाडं खुली झाली. फेस्टिव्हलवर अवंलबून असणाऱ्यांना यूटय़ूबने अलिबाबाची गुहाच उघडून दिली होती.

२००७ नंतर याला गती येऊ लागली. केवळ आपल्याकडे चलचित्रं आहेत म्हणून ती यूटय़ूबवर अपलोड करायची याच्या पलीकडे हे प्रकरण जाऊ लागले. ठरवून एक प्रेक्षक वर्ग गृहीत धरून, त्यानुसार विषय घेऊन व्हिडीओज तयार होऊ लागले. आणखीन एका मोठय़ा वर्गाला स्पेस देण्याचे काम यूटय़ूबने केले. पण त्याला थोडा वेळ जावा लागला. ते खऱ्या अर्थाने झाले मोबाइल स्मार्ट झाल्यानंतर.

एकदा विश्व व्यापायचे म्हटल्यावर मग मागे वळून पाहताच येत नाही. आपण बोललेलं कोणी तरी ऐकतेय, त्यावर बरी-वाईट प्रतिक्रिया देतंय ही घटनाच प्रत्येकाला सुखावून जाणारी असते आणि वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणं कधीही सोपं, त्यामुळे प्रेक्षकवर्गदेखील वाढू लागला. मग ज्याच्याकडे जे काही सांगण्यासारखे होते ते येथे दिसू लागले. या सर्वाला प्रांत, भाषा, लिंग, काळ, वेळ कशाचीच मर्यादा नाही. पाहणाऱ्यालापण नाही आणि तयार करणाऱ्यादेखील नाही. मुद्रित माध्यमात सर्वानाच लिहायला मिळायचे नाही, पण ब्लॉगवर लिहायची आणि प्रसिद्ध करायची सुविधा आल्यावर मात्र ब्लॉगर्सचा चक्क सुळसुळाट झाला. तसेच काहीसं येथेदेखील म्हणावे लागेल. हे जे लाखो कोटय़वधी व्हिडीओ तयार करणाऱ्यांना यूटय़ूबर म्हणून ओळखले जाते.

यूटय़ूब चॅनल्स हा शब्द आजकाल सर्रास वापरला जात असला तरी ही चॅनल्स म्हणजे स्वतंत्र काही तरी व्यवस्था आहे, टीव्ही चॅनल्सना पर्याय आहे वगैरे समजूत असते. खरे तर जो कोणी यूटय़ूबवर आपले अकाऊंट तयार करतो आणि त्याद्वारे त्याने एखादा जरी व्हिडीओ अपलोड केला तरी ते तुमचे स्वत:चे चॅनलच झालेले असते.

या विश्वव्यापी असणाऱ्या यूटय़ूबने आपल्याकडेदेखील चांगलेच हातपाय पसरले आहेत. इतके की, सध्या देशात मोबाइलच्या माध्यमातून यूटय़ूबचा वापर करणाऱ्यांची संख्या महिन्याला १३० टक्क्य़ांनी वाढत आहे. देशातील सर्वाधिक पाहिली जाणारी यूटय़ूब चॅनल्स पाहिली तर त्यात सध्या तरी मनोरंजनाचा प्रभाव अधिक आहे. सुरुवातीच्या काळातील मनोरंजनाचा प्रभाव अजूनही आहेच. राजश्री एंटरटेन्मेंट हे अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे २००६ पासून थेट यूटय़ूबशी कंटेंट क्रिएटर म्हणून करार करणाऱ्यांपैकी एक आहे. दक्षिण आशियातील पहिल्या काहींपैकी एक म्हणावे लागेल. सुरुवातीला त्यांचा भरदेखील केवळ स्वत:कडे स्वामित्व हक्क असणाऱ्या चित्रपटांवरच होता. नंतर अनेक चित्रपटनिर्मिती संस्थांनीदेखील स्वामित्व हक्क असणाऱ्या चित्रपटांच्या साहाय्याने यूटय़ूबवर शिरकाव केला.

त्यानंतर विविध वाहिन्यांच्या (बातमी आणि मनोरंजन) यूटय़ूब चॅनल्सनी ही जागा व्यापली, पण सध्या सर्वाधिक चलती आहे ती व्यंगात्मक पद्धतीने किंवा चटपटीत नाटय़ाच्या आधारे मनोरंजन करणाऱ्या यूटय़ूब चॅनल्सवरील कार्यक्रमांची. अगदी थोडक्या वेळेत (पाच ते पंधरा मिनिटे) केले जाणारे आणि तांत्रिकदृष्टय़ा दर्जेदार सादरीकरण ही त्यांची जमेची बाजू. वेब सीरिज हा प्रकार अजून तरी तितकासा लोकप्रिय झालेला नाही. सध्या तरी तो मर्यादितच आहे. मराठीत सध्या भारतीय डिजिटल पार्टी, शॉटपूट, अद्भुत क्रिएशन अशी काही नवीन नावं यामध्ये हालचाल करताना दिसतात. सादरीकरणाचा दर्जा आणि कंटेंटबद्दल ती उजवी आहेत, पण आर्थिकदृष्टय़ा सध्या तरी ते प्राथमिक पातळीवरच आहेत असे म्हणावे लागेल. त्यांच्या कार्यक्रमांकडे ते एक गुंतवणूक म्हणूनच पाहत आहेत. स्वत:चा ओरिजनल कंटेंट वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट दिसून येते. अर्थातच ही गुंतवणूक व्यावसायिकपणे होत आहे.

दुसरा सर्वाधिक लाडका प्रकार आहे तो म्हणजे रेसिपीजचा.

यूटय़ूबने केलेला एक चांगला बदल म्हणजे लघुपटांना थेट व्यासपीठ निर्माण करून दिले. लघुपट निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना दोघांनाही केवळ फेस्टिव्हल्सवरच अवलंबून राहायला लागायचे. आज केवळ मराठी लघुपटांचा शोध यूटय़ूबवर घेतला तर तो दोन लाखांच्या आसपास आकडा दाखवतो. त्यातील पुनरावृत्ती सोडली तरी ही संख्या बरीच मोठी आहे.

पण हे सारं कशासाठी करायचं? काळाची गरज म्हणून की एक प्रयोग म्हणून की व्यवसाय म्हणून? त्याचं उत्तर यूटय़ूबच्या रचनेत दिसून येऊ लागले. त्याआधी कोणत्याही व्यवसायाच्या मुळाशी असणारे आणि सर्वाना माहीत असणारे वाक्य उदृधत करावे लागेल, ते म्हणजे ‘जगात कोणीही काहीही फुकट देत नाही.’ यूटय़ूब ही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी. तरीदेखील आपण म्हणतो की आम्ही सारं काही घरबसल्या फुकट पाहतो. तर ते तसे होत नाही. हे हल्ली अनेकांना जाणवतेय ते यूटय़ूबवर असणाऱ्या जाहिरातींमधून. अर्थातच ही यूटय़ूबने केलेली अधिकृत रचना आहे. ज्यांनी व्हिडीओ अपलोड केला असेल त्यांना आपल्या व्हिडीओवर जाहिरात घ्यायची संधी घेता येते. तशी संपूर्ण सोय येथे ऑनलाइनच आहे. पण तुमच्या चॅनलवर जाहिरात करणार कोण? ती सारी व्यवस्था यूटय़ूब करते. तुम्हाला जाहिरात मागायला कोणाच्या दारात जायची गरज नाही. ज्यांना जाहिरात करायची आहे त्यांची गरज काय आहे ते आणि तुमच्या व्हिडीओवर कुठे जाहिरात करायची याला तुमची संमती आहे या दोहोंची सांगड यूटय़ूब घालते. अगदी व्यावसायिक पद्धतीने. म्हणजेच सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असणारे चॅनेल, व्हिडीओजचा विषय, तो व्हिडीओ पाहण्याचा कालावधी, प्रेक्षक काय पाहतोय, त्याला काय आवडतंय हे सारे यूटय़ूब नोंदवत असते. जाहिरातीतून यूटय़ूबला मिळणाऱ्या निव्वळ नफ्यातून ५५ टक्के रक्कम तुम्हाला दिली जाते. मात्र तीदेखील ६० दिवसांनंतर आणि किमान १०० डॉलर जमा झाल्याशिवाय नाही. अर्थात हे असे पैसे मिळवण्यासाठी तुमचा व्हिडीओ तेवढाच दमदार, तांत्रिकदृष्टय़ा दर्जेदार आणि अचूक असायला हवा.

म्हणजे हा अगदी व्यवस्थित व्यवसाय आहे आणि तो वर सांगितलेले जन्मापासून मृत्यूपर्यंतचे व्हिडीओ तुम्ही पाहता त्यावर अवलंबून आहे. यूटय़ूबने जाहिरातीच्या माध्यमातून आजवर किती पैसे मिळवले याची आकडेवारी जाहीर केलेली नाही पण केवळ कंटेंट आयडी असणाऱ्यांना स्वामित्व हक्कापोटी दोन बिलियन डॉलर्स दिले आहेत. अर्थात ज्यांना हौसेखातरच हे सारं करायचं आहे त्यांच्यासाठी यातलं काहीच लागू होत नाही. व्यावसायिकांसाठी मात्र ही संधी आहे. मात्र त्याच वेळेस हौशी व्हिडीओजची संख्यादेखील प्रचंड आहे.

यूटय़ूबचे असंख्य वापर आहेत त्यामध्ये शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे अजून तरी शिक्षणासाठी थेट वापर होत नाही. पण सलमान खान अ‍ॅकॅडमी नावाच्या जगविख्यात संस्थेचे तब्बल यूटय़ूबवर २८ लाख वर्गणीदार आहेत आणि ९२ कोटींपेक्षा अधिक लोकांना त्यांचे व्हिडीओज पाहिले आहेत. (या सलमान खानचा ‘त्या’ सलमान खानशी काहीही संबंध नाही. या अ‍ॅकॅडमीत अतिशय सहजसोप्या पद्धतीने व्हिडीओच्या माध्यमातून गणित शिकवले जाते.) अर्थातच शिक्षणामध्ये यूटय़ूबच्या प्रसाराची सुरुवात  आज ना उद्या होणारच याचेच द्योतक म्हणावे लागेल. आपल्याकडेदेखील हळूहळू याचा वापर वाढतो आहे. देशातील आयआयटीमध्ये काही प्रमाणात व्हिडीओजचा वापर होताना दिसतोय. अर्थात हे झालं अधिकृत माध्यमांसाठी. पण आजकाल अनेक घरांमध्ये मुलांच्या प्रोजेक्टसाठी सर्रास याचा वापर होत आहे. यूटय़ूबच्या वापराचं नावीन्य नव्या पिढीला विशेषत: जी आज पाच ते पंधरा वयोगटात आहे त्यांना अजिबात राहिलेलं नाही. त्यातून काही प्रश्नदेखील निर्माण होत आहेत. अशा प्रकारे व्हिडीओज असतील नेमका कोणता योग्य आणि कोणता अयोग्य हे आपण कसे ठरवणार. सध्या तरी त्यासाठी आपणाकडे प्रेक्षकसंख्या आणि लाइक्स याचाच आधार आहे. पण त्याचबरोबर कृत्रिमरीत्या प्रेक्षकसंख्या वाढवण्याचे प्रकारदेखील अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. या संदर्भात  आयआयटीतले प्राध्यापक जितेंद्र शहा सांगतात की, त्यासाठी व्हिडीओ रेटिंग हा त्यावर पर्याय असू शकतो. तसेच एखादा व्हिडीओ प्रेक्षकांनी किती वेळ पाहिला याची माहिती म्हणजेच वॉच टाइमची माहिती सर्वसामान्य प्रेक्षकांनादेखील मिळायची सुविधा हवी. यूटय़ूब हे शिक्षणासाठी वेगळे चांगले माध्यम ठरू शकते. पण त्यासाठी वर्गवारी करण्याची गरज आहे. त्यावर काहीतरी वाईट पाहिले जाईल असा ग्रह न करता त्यासाठी योग्य ते चाळणी वापरून व्हिडीओज तुमच्यासमोर आणणाऱ्या इंटरनेट सेवा पुरवठादाराची गरज आहे.

यूटय़ूबवरील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मनोरंजनाच्या क्षेत्रातदेखील असेच काहीसे प्रश्न आहेत. व्यावसायिक चॅनलधारक असतील तर ते मनोरंजनाचा दर्जा उच्च ठेवतात. या संदर्भात चित्रपट समीक्षक गणेश मतकरी सांगतात की, यूटय़ूबने लघुपटांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असले तरी केवळ साधन उपलब्ध आहे म्हणून त्याचा वापर करून लघुपट होण्याचं प्रमाण बेसुमार वाढले आहे. त्यामुळे त्याचं पावित्र्यचं हरवून जाईल की काय असा धोकादेखील दिसत आहे.

खरं तर हे सारंच आपला उंबरठा ओलांडून केव्हाच घरात आलं आहे. पण आपल्याकडे उपलब्ध असणारा स्पेक्ट्रम (तरंगलहरी) त्यासाठी पुरेसा आहे का? सध्या तरी आपल्या बॅण्डविड्थमध्ये पूर्ण क्षमता नाही. पण एकदा का याला बाजारपेठेचे स्वरूप आले की त्यामध्ये संधीचा उपयोग करणारे अनेक जण असतात. अशी संधी आपल्याकडे आहेदेखील. नुकताच आपल्या देशात मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने एक विशेष पथदर्शी प्रयोग आयआयटीच्या सहकार्याने पूर्ण केला आहे. आपल्या दूरचित्रवाणीच्या स्पेक्ट्रममध्ये ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्याचा वापर व्हिडीओ पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो. या मोकळ्या जागेला ‘व्हाईट स्पेस’ असे संबोधले जाते. मायक्रोसॉफ्टने हा प्रयोग सहा-सात महिन्यांपूर्वीच केला आहे. नोंद घ्यायची बाब म्हणजे एमटीएनलने पाचेक वर्षांपूर्वी अशा प्राकरचा प्रयोग केला होता आणि त्यात त्यांना अपयश आले होते. (एमटीएनलला कदाचित याची व्यावसायिकता उमगली नसावी), पण आता मायक्रोसॉफ्ट हे तंत्र वापरण्यासाठी जोर लावत आहे.

जितेंद्र शहा पुढे सांगतात की, ही बदलाची नांदीच आहे. आज ना उद्या हा प्रयोग प्रत्यक्षात कार्यान्वित झाला की मग खेडोपाडी व्हिडीओज पाहणं शक्य होईल.

याला दुसरा पूरक मुद्दा म्हणजे येत्या काळात यूटय़ूबदेखील भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित करत आहेत. यूटय़ूबचे मनोरंजन भागीदारी विभागाचे प्रमुख सत्या राघवन सांगतात की, येणाऱ्या काळात यूटय़ूब हे भारतीय भाषांवर भर देणार आहे. आजच यूटय़ूब वापरणारा जो वर्ग आहे त्यामध्ये छोटय़ा शहरांचा समावेश वाढत आहे. याबाबत भारत जगात पहिल्या दहामध्ये आहे.

थोडक्यात काय आता सर्वानाच व्हिडीओ पाहण्याची गरज वाटू लागली आहे. आणि त्याचवेळी व्हिडीओ तयार करण्याचीदेखील. पण चांगल्यातून वाईटदेखील घडतं आणि वाईटातून चांगलं तसं काहीसं युटय़ूबवर होताना दिसत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये याचा वाढता वापर आणि त्याबाबतीतल्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे यूटय़ूब वापरावर बंधन आली आहेत. याबाबत जितेंद्र शहा सांगतात की सध्या आपल्याला अशा एका इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या सेवेची गरज आहे, जो चाळणी लावून व्हिडीओज आपल्यापर्यंत पोहोचतील. हे सहज शक्य आहे. त्यातून गुणवत्तेवरदेखील नियंत्रण ठेवता येईल.

आज यूटय़ूब आणि पर्यायाने व्हिडीओजनी आपले विश्व अशा प्रकारे व्यापले आहे. एकाच वेळी ते अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मोठे साधन ठरते आहे तर दुसरीकडे त्याचा दुरुपयोगदेखील होत आहे. काय पाहावं काय पाहू नये याचं तारतम्य शेवटी आपल्यालच बाळगावं लागणार आहे.

यूटय़ूबच्या जन्मानंतर त्याने तुमच्या आमच्या सर्वाच्याच जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच सारा प्रवास एकत्र आणताना त्याचा उत्तम व्यवसाय केला आहे. मात्र हा व्यवसाय असाच पुढे सुरू राहणार आहे का? की यूटय़ूबची एकाधिकारशाही असणार आह? यूटय़ूबचे भविष्य काय, तर ‘यूटय़ूबच भविष्य’ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. व्हिडीओ हे भविष्य असणार आहे पण त्यासाठी यूटय़ूबचीच गरज असेल असे नाही. कारण ज्यांनी व्यापारी पद्धतीने यूटय़ूबचा वापर सुरू केला होता त्यांना यातून अर्थातच नफा अपेक्षित आहे. आज या नफ्यामध्ये यूटय़ूबचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. (यूटय़ूब हे निव्वळ नफा वाटून घेते. म्हणजेच त्यांचा खर्च निघाल्यानंतरचा नफा). मग ज्यांच्याकडे ठोस दर्जेदार कंटेंट आहे, ज्यांना खात्री आहे की त्यांचे व्हिडीओज यूटय़ूबवर पाहण्याऐवजी त्यांनी स्वतंत्ररीत्या निर्माण केलेल्या प्रणालीवर पाहायला प्रेक्षक येतील त्यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. वूट, हॉटस्टार ही त्यापैकी काही वेचक उदाहरणे. ही स्वतंत्र चूल सध्या तरी व्यावसायिकांच्या हातात आहे. पण ती उद्योग-व्यवसाय म्हणून यूटय़ूबला व्यवस्थित स्पर्धा करणारी आहे. अर्थातच त्यातूनच भविष्यात व्हिडीओजवरून नवे व्हिडीओ युद्ध पेटले तर नवल वाटायला नको.

लोकांना काय काय आवडते?

सध्या जगातील एकंदरीत कल पाहिला तर त्यामध्ये संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना सर्वाधिक प्रेक्षकवर्ग आहे. कार्टून्स, रेसिपीज यांचा क्रमांक त्याखालोखाल आहे. न्यूज, गॅजेट्स रिव्ह्य़ू हे अलीकडे लोकप्रिय होणारे काही अन्य व्हिडीओज आहेत. चांगल्या प्रकारे कोणी गॅजेटबद्दल सांगत असेल तर त्याला भरपूर वाव आहे हे त्याच्या तिसऱ्या- चौथ्या स्थानावरून दिसून येते.

अर्थात हे एका ठरावीक वर्गाला डोळ्यासमोर ठेवून केलेले व्हिडीओज, पण जगात सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्यांमध्ये वरचा क्रमांक लागतो तो ‘हाऊ टू..’ या शब्दाचा. लेखाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे या हाऊ टूच्या पुढे काहीही लावता येते आणि त्याचा व्हिडीओ येथे असतो. एखाद्या वस्तूबरोबर आलेले दहा-बारा घडय़ांचे पाच-दहा भाषांमध्ये असणारे मॅन्युअल वाचण्यापेक्षा त्या उत्पादनाबद्दल काय आणि कसे हे सांगणारा दोन-पाच मिनिटांचा व्हिडीओ पाहणे हल्ली अनेकांना श्रेयस्कर वाटू लागले आहे. व्यापारी वापर म्हणून मनोरंजन वरचढ असले तरी लोकांना असे मार्गदर्शनपर व्हिडीओज हवे असतात.

राजश्री मराठीच्या महाव्यवस्थापक सोनाली बिर्जे सांगतात की, रेसिपीजच्या बाबतीत विचार केला तर सर्वाधिक शोधली जाणारी रेसिपी दाल फ्राय आहे, किंबहुना सध्याच्या धावत्या जगात लोकांची गरज अगदी साधी आहे. अगदी कणीक कशी मळायची, भात कसा लावायचा हेदेखील अनेकांना माहीत नसते आणि करिअरच्या स्पर्धेत अशा गोष्टी शिकणे होत नाही. त्यामुळे आम्ही अशा साध्या साध्या व्हिडीओजना प्राधान्य दिले आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद आहे.

तर दुसरीकडे प्रेरणादायी व्याख्यांनानादेखील चांगला प्रतिसाद आहे. गेली ३० वर्षे अशी व्याख्याने देणाऱ्या टी. एस. मदान यांनी पाच वर्षांपासून जाहीर व्याख्यानं द्यायची बंद केली आहेत. त्यांच्या मते व्याख्यान म्हणजेच ज्ञान जर लोकांना फुकट देण्याची सोय असेल म्हणजेच त्याकरिता लोकांकडून पैसे घेण्यापेक्षा अन्य ठिकाणाहून पैसे येणार असतील, तर ते अधिक सोयीस्कर असेल. त्यातून भरपूर फायदा होत नसला तरी व्यवस्थित उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात.

याशिवाय यूटय़ूबवर सर्वाधिक काय शोधले जाते, तर ते म्हणजे शृंगारदृश्ये. ‘फक्त प्रौढांसाठी’ अशा दृश्यांऐवजी शृंगारिक व्हिडीओजची सध्या प्रचंड चलती आहे. या चॅनल्सना प्रेक्षकसंख्या प्रचंड असते, मात्र वर्गणीदार तुलनेने कमी आहेत.

इंटरनेटला ब्रॅण्डची गरज, ब्रॅण्डला इंटरनेटची गरज?

मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत झालेल्या अफाट वाढीनंतर इंटरनेटचा प्रसारपण तितकाच वाढला. मुद्रित माध्यम, दूरचित्रवाणी माध्यम या दोहोंच्या बरोबरीने आता उत्पादकांना जाहिरातींसाठी हे माध्यमदेखील खुणावत आहे, पण केवळ जाहिराती करण्यापेक्षा थेट त्या उत्पादनाचा समावेश कंटेंटमध्ये करण्यासाठी सध्या अनुकूलता असल्याचे दिसून येते. त्यातही रेसिपीजसारख्या लोकप्रिय व्हिडीओजना तर त्यांचे प्राधान्य असल्याचे राजश्री मराठीच्या सोनाली बिर्जे सांगतात.

जाहिरातीतून किती मिळतात?

यूटय़ूबवर जाहिरातीतून पैसे मिळतात हे खरे असले तरी सध्या तरी मोजकी काही टॉपची नावं सोडली तर इतरांची फारशी चर्चा होत नाही. किंबहुना, ही आकडेवारी जाहीर करायला कोणाचीही तयारी नसते. यूटय़ूबच्या धोरणानुसार निव्वळ नफ्यातील ५५ टक्के चॅनलधारकाला मिळतात. अर्थातच हे पैसे तुमच्या व्हिडीओला किती लाइक्स आहेत आणि सबस्क्रायबर आहेत त्यावरच अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे दहा हजार प्रेक्षकसंख्येमागे दीड डॉलर मिळतो असे समजते. हल्ली एखादा व्हिडीओ सुरू केल्यावर तीस एक सेकंदाची जाहिरात येते. त्याच वेळी त्यावर ‘स्किप अ‍ॅड’चा पाच सेकंदाचा बॅण्ड येतो. ही जाहिरात जर तुम्ही पूर्ण पाहिली तरच उत्पादकाला त्यासाठी खर्च द्यावा लागतो आणि चॅनलधारकाला पैसे मिळतात. अन्यथा नाही. ही जाहिरात देताना यूटय़ूब प्राधान्याने विचार करते ते तुमचा व्हिडीओ किती काळ पाहिला जातोय याचा. त्याला वॉच टाइम असे संबोधले जाते त्या व्हिडीओचा वॉच टाइम जर चांगला असेल तर यूटय़ूब तुमचा व्हिडीओ स्वत: प्रमोट करते. अर्थात, यापलीकडे जाऊन केवळ व्हिडीओवरच नाही तर यूटय़ूबने उर्वरित जागेत स्वत:च्या अखत्यारीत जाहिरातीची जागा शोधलीय आणि त्यावर तुम्ही जो व्हिडीओ पाहता आहात त्यानुसार जाहिरात येत असते. प्रेक्षकाला जर जाहिरात पाहायचीच नसेल तर मात्र त्याला त्यासाठी स्वतंत्र पैसे भरून जाहिरातविरहित व्हिडीओ पाहता येतो. फक्त अमेरिकेतच सध्या अशा सुविधेसाठी महिन्याला दहा डॉलरच्या आसपास शुल्क आकारले जाते. आपल्याकडे अ‍ॅड ब्लॉकरचा वापर सर्रास होतो. त्यामुळे इंटरनेटवर सर्फिग करताना तुम्हाला जाहिराती दिसत नाहीत, पण अनेक वेबसाइट अ‍ॅड ब्लॉकरचे नियंत्रण काढल्याशिवाय त्यांचा कंटेंट तुम्हाला वाचू देत नाहीत. जर अशा वेबसाइटचा कंटेंट काहीही करून पाहायचाच असेल तर मात्र प्रेक्षकदेखील अ‍ॅड ब्लॉकर हटवण्याची तसदी घेतात.

कॉपीराइट स्ट्राइक

इंटरनेटच्या विश्वात सर्वाधिक वादाचा चर्चेचा मुद्दा हा स्वामित्व हक्काचा आहे. किंबहुना, इंटरनेटवरचे सर्व फुकटच अशी समजूत असल्यामुळे असे घडले असावे. यूटय़ूबने स्वामित्व हक्काच्या संरक्षणासाठी ‘कंटेंट आयडी’ची योजना केली आहे. तुमचा व्हिडीओ कंटेंट जर दुसऱ्या कोणी वापरला असेल तर तुम्ही त्यावर हक्क सांगू शकता. यूटय़ूबकडे तक्रार करू शकता. अशा घटनेला कॉपीराइट स्ट्राइक म्हटले जाते. अशा वेळी स्वामित्व हक्क नसणाऱ्या व्यक्तीच्या चॅनलवर, तुमच्या व्हिडीओवर तुम्हीच जाहिराती घेऊन त्यातून उत्पन्न मिळवू शकता किंवा त्याला सदर व्हिडीओ काढायला सांगू शकता किंवा त्या व्हिडीओचा आवाज बंद करू शकता. अर्थात, अशा प्रकारे हक्क सांगणे त्यानंतर त्याची शहानिशा होणे आणि कारवाई होणे यात कालहरण होऊ शकते आणि प्रतिस्पध्र्याना तुमचे चॅनल तात्पुरते बंद करण्याची संधी मिळू शकते. अशी उदाहरणं सध्या आपल्याकडे झाली आहेत.

दूरचित्रवाहिन्या यूटय़ूबवर कशासाठी?

उपग्रह वाहिन्यांच्या आगमनानंतर सारं जग आपल्या दिवाणखान्यात आल्यासारखे वाटू लागले. ते खरेदेखील आहे. हा प्रेक्षकवर्गदेखील मोठा आहे, पण असे असतानादेखील यच्चयावत उपग्रह वाहिन्याच नाही तर अनेक वृत्तपत्रांनादेखील यूटय़ूबचा आधार घ्यावा लागत आहे. याबद्दल एबीपी माझाचे वरिष्ठ कंटेंट एडिटर मेघराज पाटील सांगतात, ‘‘आज जर प्रेक्षक टीव्ही पाहत असेल तर तो उपकारच करत आहे. कारण त्यासाठी टीव्ही, डिश असा सारा जामानिमा लागतो आणि पुन्हा वर वाहिन्यांच्या प्रक्षेपणाची वेळ पाळावी लागते. पण हातातल्या स्मार्ट फोनवरच ही सुविधा आल्यानंतर प्रेक्षकाच्या वेळेनुसार वाहिन्यांना उपलब्ध असण्याची गरज आहे. प्रेक्षकाच्या सोयीच्या ठिकाणी, सोयीच्या पद्धतीने त्याच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचण्यासाठी यूटय़ूबचा वापर करणे गरजेचे झाले आहे.’’

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com@joshisuhas2