04 August 2020

News Flash

तिसरे आगाखान

आगाखान हे काही एखाद्या व्यक्तीचे पाळण्यातले नाव नव्हे; तो आहे एक खिताब.

dw-106भारतातील ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या अर्धशतकात ‘आगाखान’ हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व विविध नात्यांनी प्रकाशात होते. मुस्लिमांच्या एका पंथाचे प्रमुख, मुस्लीम लीगच्या प्रणेत्यांपैकी एक, ब्रिटिश सरकारचे एक सरंजामदार, रेस आणि घोडे यांचे शौकीन धनिक, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताच्या प्रतिनिधित्वाची ब्रिटिश सरकारने संधी दिलेले एक मवाळ नेते.. अशा वेगवेगळ्या रूपांत त्यांना ओळखले जात होते. ‘आगाखान पॅलेस’ हे त्यांचे पुण्यातले निवासस्थान महात्मा गांधींच्या तेथील स्थानबद्धतेमुळे आणि कस्तुरबा आणि महादेवभाई देसाई यांच्या तेथे झालेल्या निधनामुळे भारताच्या राजकीय इतिहासातले एक तीर्थ बनले आहे.

आगाखान हे काही एखाद्या व्यक्तीचे पाळण्यातले नाव नव्हे; तो आहे एक खिताब. पुढे हा खिताब धारण करणाऱ्याला पहिले, दुसरे, तिसरे आगाखान असे ओळखले जाऊ लागले. महंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांत दोन गट पडले. एका गटाने पैगंबरांनंतर आता कोणी त्यांचा धार्मिक वारस- धर्मगुरू नाही, त्यांची शिकवण कुराणात आहे, तीच पुरेशी आहे असे ठरवले. या गटाने पंथाच्या व्यवस्थापनासाठी अबू बकर याची निवड केली. अबू बकरला मानणाऱ्यांचा पंथ हा ‘सुन्नी’ म्हणून ओळखला जातो. पैगंबरांच्या काही शिष्यांनी मात्र पैगंबरांचा जावई अली हा नातेवाईक म्हणून त्यांचा वारस आहे व तोच पैगंबरांचा धार्मिक वारसा चालवील असे ठरवले. या हजरत अलीला पंथप्रमुख म्हणून तर मानले जाईच; पण त्याबरोबरच तो खलिफा म्हणूनही मानला जाई. हजरत अलीला पहिला खलिफा मानणाऱ्या पंथाला ‘शिया’ असे नाव आहे. या शिया पंथाचे पुन्हा काही उपपंथ आहेत. स्वत:ला हजरत अलीचे वंशज मानणाऱ्या कुटुंबांपैकी एकाचा प्रमुख हसन अली शाह एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी इराणच्या राजाच्या दरबारात होता. त्याला ‘आगाखान’ असा खिताब तेथील राजाने दिला होता. पुढे इराणच्या राजाशी त्याचे वितुष्ट आले आणि काही शतकांपूर्वी इराणचे अग्निपूजक जसे भारतात आश्रयाला आले तसाच हा हसन अली शाह आगाखानही भारतात आश्रयाला आला. येताना त्याने आपले हजारभर अनुयायी आणि सेवक बरोबर आणले होते. तो मुंबईत राहू लागला. ब्रिटिश सरकारने इस्माईली पंथाचा शेहेचाळीसावा इमाम म्हणून त्याला मान्यता दिली, ‘हिज हायनेस’ ही पदवी दिली आणि त्याला तनखाही चालू केला. ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली नांदत हे आगाखान इस्माईली आणि खोजा जमातींचे प्रमुख म्हणून काम करू लागले. या पहिल्या आगाखानाचे नातू सर सुलतान महंमद शाह म्हणजे भारतीय राजकारणात प्रसिद्ध झालेले तिसरे आगाखान. या तिसऱ्या आगाखानांचा जन्म तेव्हा मुंबई प्रांतात असलेल्या कराची शहरात २ नोव्हेंबर १८७७ रोजी झाला. मुंबई आणि पुण्यातच ते वाढले. तिसऱ्या आगाखानांच्या आजोबांचे आणि वडिलांचे त्यांच्या बालपणीच निधन झाले. ब्रिटिश शिक्षकांच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आगाखानांचा पहिला विवाह झाला. त्यांची चुलत बहीण शहजादी बेगम हिच्या प्रेमात ते पडले. आगाखानांचा विवाहाचा प्रस्ताव मुलीच्या वडिलांनी- आगा जंगीशाह यांनी मान्य केला. हा विवाह होण्यापूर्वी मुलीचे वडील आणि त्यांचे कुटुंबीय हज यात्रेला गेले. तेथे एक दुर्दैव या कुटुंबाची वाट पाहत होते. यात्रा संपवून परत निघाले असता जद्दा येथे जंगीशाह आणि त्यांचा मुलगा शाह अब्बास या दोघांचा खून झाला. उरलेले कुटुंबीय भारतात परत आले आणि त्यानंतर हे लग्न लागले. हा विवाह आगाखानांना किंवा त्यांच्या पत्नीला फारसा सुखाचा झाला नाही. ‘आम्हा दोघांच्या अज्ञानामुळे आमचे संबंध बिघडले,’ असे आगाखानांनी म्हटले आहे. आगाखान आणि शहजादी बेगम कायमचे विभक्त झाले. आणखी दोन वर्षांनी- १८९८ मध्ये युरोपमध्ये गेले असताना माँटेकालरेच्या बॅले संचामध्ये काम करणाऱ्या थेरेसा मॅग्लिआनो या नर्तिकेवर आगाखानांचा जीव जडला. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती. आठ-नऊ वर्षांनंतर १९०७ साली तिच्याशी त्यांनी कैरोमध्ये मुस्लीम पद्धतीने विवाह केला. त्यांच्या या पत्नीचा १९२६ मध्ये (आज अगदीच किरकोळ समजल्या जाणाऱ्या) एका शस्त्रक्रियेदरम्यान दुर्दैवाने रक्ताची गुठळी हृदयाकडे जाऊन आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर एक वर्षांने अँड्री कॅरन हिच्याबरोबर त्यांनी चौथे लग्न केले. हे लग्नही चौदा-पंधरा वर्षांत संपुष्टात आले. धर्माधारित समजुती व रिवाज हे त्यांच्या मतभेदाचे कारण असावे. १९४३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तेरा महिन्यांनी आगाखानांचे पाचवे व शेवटचे लग्न झाले. हा लग्नसंबंध मात्र शेवटपर्यंत टिकला.

१८९८ साली आगाखान युरोपात असताना भारतात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांपैकी दूरच्या नात्यातल्या एकाचा पुण्यामध्ये खून झाला. आश्रित आणि कुटुंबीय यांचा एक मोठा ताफा त्यांना पोसावा लागत होता. या सर्वाचे एकमेकांशी संबंध फार गुण्यागोविंदाचे असणे शक्यच नव्हते. शिवाय ज्याच्याशी आपले जुळत नाही त्याला नाहीसे करणे, ही गोष्ट आखाती देशांच्या संस्कृतीत फारशी निषिद्धही मानली जात नव्हती. स्वत:भोवती अस्ताव्यस्त पसरलेल्या या भल्यामोठय़ा ताफ्याला बाजूला सारणे हेही तसे सोपे काम नव्हते. आगाखानांनी ब्रिटिश सरकार आणि पोलीस यांच्या मदतीने व थोडे गोडीगुलाबीने काही महिन्यांत ते काम पूर्ण केले. त्यानंतर आगाखानांचा कौटुंबिक काफिला काहीसा आटोक्यात आला.

वयाच्या विसाव्या वर्षीच आगाखानांना नव्या काळातल्या पंथप्रमुखाचे कर्तव्य पार पाडावे लागले. १८९७ मध्ये मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागांत गाठीच्या प्लेगची साथ आली. या प्लेगचा प्रतिबंध करण्यासाठी लस शोधून काढण्यात आली होती. परंतु ही लस टोचून घ्यायला लोक तयार नसत. शेवटी आगाखानांनी ही लस अनेक लोकांच्या उपस्थितीत स्वत:ला टोचून घेतली व त्याची यथोचित प्रसिद्धीही करविली. आपल्या पंथप्रमुखाचे हे उदाहरण पाहून त्यांच्या अनेक अनुयायांनी ही लस टोचून घेतली. या साथीत जे लोक दगावले त्यात इस्माईली पंथाची मंडळी इतरांच्या तुलनेत कमी होती. योगायोगाने मुंबई सरकारच्या नोकरीत असलेल्या एका तरुण संशोधकाचा आगाखानांशी त्यावेळी परिचय झाला. हा संशोधक म्हणजे जन्माने रशियन ज्यू असलेले प्रो. हाफकिन. कॉलऱ्याची साथ जेव्हा उग्र रूप धारण करू लागली त्यावेळी आगाखानांनी स्वत: प्रो. हाफकिन यांची भेट घेतली व त्यांच्या संशोधनासाठी ‘आगाहॉल’ या नावाने तेव्हा ओळखली जाणारी आपली वास्तू आगाखानांनी दिली. हाफकिन यांचे संशोधन नंतरच्या काळात मान्य झाले आणि आज त्यांच्या नावाने मुंबईत रोगप्रतिबंधक लस शोधणारी व तयार करणारी शासकीय संस्था काम करते आहे. कॉलऱ्याची लसही स्वत:ला टोचून घेऊन आगाखानांनी आपल्या पंथानुयायांसमोर पुन्हा उदाहरण घालून दिले. एखाद्या चांगल्या कामात आपण पुढाकार घेतला तर आपल्याला यश मिळू शकते असा आत्मविश्वास आगाखानांना यामुळे आला.

१८९७ सालीच व्हिक्टोरिया राणीचा हीरकमहोत्सव होता. त्यानिमित्त सिमल्यास भरलेल्या दरबाराला आगाखान हजर होते. आपल्यासोबत त्यांनी तीन मानपत्रे तयार करून आणली होती. एक इस्मायली पंथाचे प्रमुख म्हणून, दुसरे पश्चिम भारतातल्या मुसलमानांचे प्रमुख म्हणून आणि तिसरे मुंबई आणि पुण्याच्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून. असे दिसते की, आगाखानांच्या व्हॉइसरायशी झालेल्या या भेटीमुळे पुढील काळात आगाखानांचा आपल्या राजकारणाला उपयोग होईल असे ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले. त्यांचा हा होरा खरा ठरला. त्यानुसार नंतरच्या काळातले आगाखानांचे राजकारण हे ब्रिटिशांच्या सोयीचेच होते. त्यावेळच्या केंद्रीय कायदेमंडळात लोकनियुक्त सभासद फारच कमी होते. सरकारी अधिकारी आणि सरकारनेच नेमलेले नागरिक यांचीच संख्या मोठी असे. ज्यांचे हितसंबंध आपल्यात गुंतलेले आहेत आणि जे आपल्याला अनुकूल राहतील, अशा व्यक्ती कायदेमंडळात शासनातर्फे नियुक्त करून त्यात लोकांचे प्रतिनिधीही आहेत असा देखावा निर्माण करण्याचे ब्रिटिश शासनाचे धोरण होते. तिसरे आगाखान हे त्यासाठी एक सोयीचे नाव होते. शिवाय आगाखानांचे वागणे-बोलणे अतिशय सुसंस्कृत होते. लॉर्ड कर्झन व्हॉइसराय असताना नोव्हेंबर १९०२ मध्ये आगाखानांना केंद्रीय विधिमंडळाचे सभासद नेमण्यात आले. दोन वर्षे त्यांनी हे काम केले. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांना ही संधी मिळाली होती. दोन वर्षांनंतर पुन्हा आलेल्या पुनर्नियुक्तीच्या प्रस्तावाला मात्र आगाखानांनी नकार दिला. राणीच्या राज्यारोहणाच्या वाढदिवशी दिल्या जाणाऱ्या पदव्यांपैकी ‘के. सी. आय. ई.’ व ‘जी. सी. आय. ई.’ या पदव्याही त्यांना मिळाल्या होत्या.

dw-107कोलकात्यामध्ये केंद्रीय विधिमंडळाचे सभासद म्हणून काम करीत असताना आगाखानांना व्हॉइसराय लॉर्ड कर्झन, सेनाधिपती फिल्डमार्शल किचनेर यांच्यासारख्या ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबरच उदारमतवादी देशभक्त गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. गोखल्यांच्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाने आगाखान प्रभावित झाले. त्यांनी त्याबद्दल लिहिले आहे- ‘‘गोखले हिंदू आणि मी मुस्लीम होतो. पण आमचे मित्रत्व धर्मभेद किंवा वंशभेद यांचा अडथळा येऊ देणारे नव्हते. ते द्रष्टे, धैर्यशील आणि उदार होते. माझे विचार आणि दृष्टिकोन यांच्यावर गोखल्यांचा झालेला परिणाम लक्षणीय आहे. गोखल्यांच्या व्यक्तिमत्त्वात नैतिक सामर्थ्यांचा प्रत्यय येत असे; परंतु त्याचबरोबर ते प्रसन्न आणि आवडणारेही होते. भारतीयांच्या मनातील देशाच्या भवितव्याबद्दलच्या भावना तीव्र आहेत आणि गोखले हे त्याचे प्रवक्तेआहेत, हेही मला लक्षात आले. देशातले सरकार हे त्याची कामकाजपद्धती आणि उद्दिष्ट या दोन्ही दृष्टीने किती परकीय आहे, हेही मला कळले. आपल्या किरकोळ मागण्याही मान्य होत नाहीत, हे पाहून आता भारतीय नेतृत्वाने आपले राजकीय भवितव्य स्वत:च ठरवण्याचा अधिकार (स्वातंत्र्य) मागण्यास सुरुवात केली आहे.’’ गोखल्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांच्या राजकीय ध्येयाची आगाखानांनी वाखाणणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘‘सचोटीच्या प्रत्येक विचारी माणसाने जी ध्येये आपल्या मनाशी बाळगावी, तीच तुम्ही ठेवली आहेत आणि तोच तुमचा स्वाभाविक धर्म आहे.’’ आगाखानांचा आणि गोखल्यांचा स्नेह गोखल्यांच्या निधनापर्यंत कायम होता.

काँग्रेस ही संघटना भारतातील मुसलमानांच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही आणि तिच्यावर हिंदुमताचा प्रभाव अधिक आहे असे आगाखान यांना वाटू लागले होते. विधिमंडळात मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व आणि शासकीय नोकऱ्यांत त्यांचा प्रमाणशीर सहभाग यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असेही त्यांचे मत बनले. १९०७ नंतरच्या काळात भारतात वास्तव्य असले म्हणजे आगाखानांचे लक्ष येथील राजकारणातही गुंतू लागले. मोर्ले-मिंटो सुधारणांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली होती. नवाबअली चौधरी, ढाक्याचे नवाब सर महमद शफी आणि पंजाबचे सर सुल्फिकार अली खान यांच्या नेतृत्वात मुस्लीम राजकीय नेतृत्व संघटित होऊ लागले होते. १९१० साली नागपूरला मुस्लीम शैक्षणिक परिषद भरविण्यात आली. या परिषदेचा मूळ उद्देश मुस्लीम विद्यापीठासाठी एकमुखी मागणी करणे, हा होता. या मागणीप्रमाणेच अलीगढला मुस्लीम विद्यापीठ स्थापन झाले. अलीगढचे विद्यापीठ सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयींनी समृद्ध व्हावे व ते मुस्लीम आकांक्षांचे केंद्र व्हावे म्हणून आपण प्रयत्न करावा असेही आगाखानांना वाटू लागले होते. त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही सुरू केले. आगाखानांची घडण लक्षात घेता त्यांनी मुस्लिमांच्या संघटनेला आणि त्यांच्या शिक्षणाला मदत करावी, हे स्वाभाविकच होते. मुस्लिमांना शिक्षण का द्यावयाचे, याबद्दल आगाखानांच्या मनातली कल्पना स्पष्ट होती. स्वातंत्र्यानंतर आमच्या समाजावर देशाच्या कारभाराची येणारी जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना सक्षम करणे, हाच त्यांच्या दृष्टीने या शिक्षणाचा हेतू होता. या अभ्यासक्रमात संस्कृतसुद्धा मुस्लिमांना शिकवावे असे त्यांनी सुचवले होते. ही भाषा आली म्हणजे आपल्या शेजाऱ्याची नीट ओळख मुसलमानांना करून घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची- पाकिस्तानची कल्पना आगाखानांसमोर आहे, हे यावरून उघड आहे. हिंदू शेजारी राहतील- म्हणजे एका राज्यात राहणार नाहीत, हाही याचा स्पष्ट अर्थ आहे.

१९१५ साली गोपाळ कृष्ण गोखल्यांचे निधन झाले. नजीकच्या भविष्यकाळात अमलात आणता येतील अशा त्यांच्या मनातील अत्यावश्यक घटनात्मक सुधारणांचे एक टिपण करून पाठवा, असे मुंबईच्या गव्हर्नरांनी त्यांना सुचवले होते. असे महत्त्वाचे टिपण आपण तयार करताना आगाखान आणि फिरोजशहा मेहता यांचा सल्ला घ्यावा असे गोखल्यांना वाटत होते. आपल्या मृत्यूपूर्वी दोनच दिवस अगोदर हे टिपण त्यांना  तयार करता आले. त्यावेळी इतरांशी चर्चा करायला वेळच उरला नव्हता. या टिपणाच्या टंकलिखित प्रती आगाखान व मेहता यांना पाठवाव्यात, असे त्यांनी सांगून ठेवले. या टिपणालाच ‘गोखल्यांचे मृत्युपत्र’ असे संबोधले जात होते.

१९२८ मध्ये दिल्लीत अखिल भारतीय मुस्लीम परिषद भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षपद आगाखानांनीच भूषविले होते. मुस्लिमांना आपले प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडण्याचा अधिकार असावा, शासकीय सेवेमध्ये मुस्लिमांना यथायोग्य प्रतिनिधित्व असावे, अशा मागण्या या परिषदेने केल्या. आजवर मुस्लिमांच्या स्वतंत्र चळवळीपासून अलिप्त असलेले आणि त्या मागण्यांना विरोध करणारे महमदअली जिना या परिषदेच्या सुमाराला खासगीरीत्या मुस्लिमांच्या स्वतंत्र संघटनेला आणि स्वतंत्र राजकीय चळवळ करण्याला अनुकूल झाले होते, असे आगाखानांनी नोंदवले आहे. काँग्रेसमध्ये आपल्याला काही भवितव्य नाही असे जिनांना वाटू लागले होते. जिनांना आपल्या (स्वतंत्र मुस्लीम संघटनेच्या) बाजूने वळविण्यात आपल्याला यश आले, असे आगाखानांनी म्हटले आहे. ३० डिसेंबर १९०६ रोजी ढाक्याला मुस्लीम लीगची स्थापना झाली. आगाखान तिच्या संस्थापकांपैकी एक होते. जिनांचे नेतृत्व मात्र नंतर उदयाला आले.

श्रीमंत पंथानुयायांकडून मिळणाऱ्या देणग्या, नजराणे आणि सरकारी तनखा यामुळे आगाखानांची आर्थिक स्थिती भक्कम होती. त्यांचे बरेचसे वास्तव्य परदेशातच असे. आगाखानांना युरोपात राहण्याची आणि तेथील विलासी जीवन उपभोगण्याची इच्छा तर होतीच; परंतु त्याचबरोबर अशा भेटीमुळे ब्रिटिश राजघराण्याशी निकटचे संबंध राखता येऊ शकतात, हाही एक महत्त्वाचा फायदा होता.

आगाखान लंडनमध्ये असताना महाराणीने त्यांना विंडसर कॅसल राजवाडय़ामध्ये भेटीसाठी आमंत्रित केले. ‘तुम्ही स्वत: एका राजघराण्यातील असल्यामुळे तुम्ही माझ्यासमोर गुडघे टेकून मला अभिवादन करावे असे मी म्हणणार नाही,’ असे त्या म्हणाल्या. आगाखानांनी राणीने पुढे केलेल्या हाताचे चुंबन घेऊन आपला आदरभाव व्यक्त केला. व्हिक्टोरियाचे वय तेव्हा ७९ वर्षांचे होते. तरीही राणीच्या बोलण्यात स्पष्टता होती व त्यांच्या शारीरिक हालचालीत कोणतीही विकलता नव्हती. व्हिक्टोरिया आपल्याबरोबर भारतीय नोकरांचा ताफा बाळगीत असत. त्यांच्या व्यक्तिगत सेवेला भारतीय नोकर पाहून आगाखानांना थोडे आश्चर्य वाटले. व्हिक्टोरियानंतरच्या राजांनी मात्र भारतीय नोकर बाळगले नाहीत. त्यामुळे भारताचे पारतंत्र्य ठळक होते, हे त्यांच्या लक्षात आले असावे. पुढच्या काळात आगाखान अनेक वेळा युरोपात गेले आणि तेथे दीर्घकाळ राहिले. अशा वास्तव्यात विविध क्षेत्रांतल्या कर्तृत्ववान व्यक्तींना भेटण्याची व त्यांची ओळख करून घेण्याची त्यांना संधी मिळे. त्याची आगाखानांना आवड होती. त्यांच्या अशा अनेक भेटींचे वेधक वर्णन त्यांनी ‘World Enough and Time’ या शीर्षकाने लिहिलेल्या त्यांच्या आठवणींमध्ये आलेले आहे.

अशा भेटींमध्ये ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची एक भेट होती- तुर्कस्थानचे सुलतान आणि सुन्नी मुस्लिमांचे खलिफा अब्दुल हमीद यांची.. आगाखानांनी इस्तंबूलमध्ये घेतलेली. ऑटोमन साम्राज्याचा तो शेवटचा काळ होता. फारशी प्रभावी राजकीय सत्ता उरलेली नव्हती. तरीही मुस्लीम जगतात त्यांना खलिफा म्हणून अतिशय मान होता. जगात बहुसंख्येने असलेल्या सुन्नी जमातीचे ते प्रमुख होते. आणि आगाखान शिया पंथातील एका उपपंथाचे! सुन्नी आणि शिया पंथीयांनी एकमेकांशी एकेकाळी इस्लामच्या इतिहासातील कडवट झुंज दिलेली होती. आता या भेटीत सुन्नी पंथाचे प्रमुख आणि शिया पंथातील एका उपपंथाचे प्रमुख एकमेकांना भेटणार होते. संघर्षांच्या स्मृती फारच पुसट झालेल्या होत्या. पूर्वजांचे वैर विसरून दोघांना एकमेकांना भेटावयाचे होते.

इस्तंबूलच्या राजवाडय़ात ही भेट झाली. या काळात आपला केव्हाही कोणीतरी खून करील, या भीतीने तुर्की सुलतानला पछाडले होते. त्या भीतीच्या छायेतच ते राहत होते. राजवाडय़ात सुरक्षाव्यवस्था तर होतीच; त्याशिवाय सुलतान नेहमी बंद खोलीत स्वत:ला कोंडून घेत. आगाखान आत आल्यानंतर पुन्हा त्या खोलीचे दार बंद करून घेण्यात आले. एक दुभाषा वगळल्यास त्या दोघांशिवाय खोलीत दुसरे कोणी नव्हते. सुलतान सभ्य आणि मृदू शब्दांत बोलत होते. पण त्यांना आपल्या आसनावर हालचाल करणेही कठीण झालेले दिसत होते. नंतर आगाखानांच्या लक्षात आले की, त्यांनी इतिहासकाळातील धातूची संरक्षक कवचेसुद्धा धारण केलेली आहेत. स्वत:च्या राजवाडय़ात- आणि तेही आगाखानांसारखी व्यक्ती भेटायला आलेली असताना या सगळ्याची गरज काय, असा प्रश्न आगाखानांच्या मनात निर्माण होणे साहजिक होते. ‘मी त्यांचा खून करण्यासाठी आलो आहे असे त्यांना वाटत होते काय?,’ असा गमतीचा प्रश्न तेव्हा आगाखानांच्या मनात आला होता. सुलतान अब्दुल हमीद यांच्याबरोबर आगाखानांचे जेवण झाले नाही. पण आगाखान उतरले होते त्या हॉटेलमध्ये रोज दोन वेळा राजवाडय़ातून मुद्दाम तयार केलेले उत्तम जेवण पोहोचविले जाई. पहिल्या महायुद्धात पडण्याची चूक तुर्की सम्राटांनी केली. त्यात त्यांचा पराभव तर झालाच; परंतु त्यांचे खलिफापदही खालसा केले गेले.

१९२९-३० मध्ये भारताच्या राजकीय भवितव्याचा विचार करण्यासाठी गोलमेज परिषद भरवली जाईल असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले होते. त्याप्रमाणे तीन वेळा या परिषदा झाल्या. या परिषदांना भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणी हजर राहावे, हे सरकारनेच ठरवले होते. त्यात महंमद अली जिना, सर जाफरुल्ला खान, श्रीनिवास शास्त्री, मुकुंदराव जयकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बडोद्याचे गायकवाड आणि सर अकबर हैदरी, मिर्झा इस्माईल आणि आगाखान अशी प्रमुख मंडळी होती. काँग्रेसला अर्थातच निमंत्रण होते. पण पहिल्या परिषदेला काँग्रेसतर्फे कोणीच हजर राहिले नाही. त्यामुळे त्यात काही निर्णय होऊच शकला नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदेला म. गांधी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. या परिषदेच्या वेळी आलेले प्रतिनिधी एकमेकांच्या गाठीभेटी घेत व त्यात बऱ्याचशा महत्त्वाच्या चर्चा होत. आगाखान रिट्झ हॉटेलमध्ये उतरले होते. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमानंतर आगाखानांच्या खोलीवर गांधीजी सरोजिनी नायडूंबरोबर आले आणि तेथे त्यांची चर्चा झाली. राजकारणाबरोबरच सरोजिनीबाईंनी हैदराबादच्या सहाव्या निजामाच्या आपल्या आठवणी सांगितल्या. त्याच्या काव्यलेखनाबद्दलही सांगितले. ‘सरोजिनीबाईंइतके प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेली स्त्री मी पाहिली नाही,’ असे आगाखानांनी नोंदवले आहे. पुण्यामध्ये गांधीजींच्या अ‍ॅपेंडिक्सवर शस्त्रक्रिया झाली असताना ससून इस्पितळात आगाखान त्यांना भेटायला गेले होते, त्याचीही आठवण आगाखानांना आली. चर्चेच्या सुरुवातीला आगाखानांनी गांधीजींना एक सूचक प्रश्न विचारला. ‘‘भारतातील मुस्लिमांनी तुम्हाला आपल्या पित्याप्रमाणे (वत्सल व रक्षणकर्ते) मानावे काय व तुम्हाला त्या नात्याने पाठिंबा द्यावा काय?’’  गांधीजींनी स्पष्टपणे उत्तर दिले की, ‘‘खरे म्हणजे माझ्या मनात मुस्लिमांबद्दल पितृप्रेम आहे असे मी म्हणू शकत नाही. मात्र, राजकारणात मुस्लिमांबद्दल काय भूमिका असावी याबद्दल आपण एकत्र बसून चर्चा करू शकतो.’’ आपली भेट संपत असताना आगाखानांनी ‘तुम्हाला मार्क्‍स आणि मार्क्‍सवादाबद्दल काय वाटते?,’ असा प्रश्न गांधीजींना विचारला. गांधीजींनी उत्तर दिले, ‘‘एका देशाला (रशियाला) ते करू द्या. त्या देशातली शासन संघटना, सैन्य आणि पोलीस, शासकीय बळजबरी संपू द्या. शासनसंस्था विरघळून जाऊ द्या. मग आपण त्याचा विचार करू.’’ आगाखानांच्या या खोलीतच जिना, मुस्लिमांचे इतर प्रतिनिधी आणि गांधीजी यांच्याही पुन्हा बैठका झाल्या.

१९३५ साली तिसऱ्या आगाखानांना त्यांच्या जमातीचे इमामपद मिळून पन्नास वर्षे होत होती. त्यानिमित्त एक मोठा समारंभ मुंबईत झाला. समारंभात आगाखानांची सुवर्णतुला करण्यात आली. बरेच दिवस चाललेला हा उत्सव सुरू असतानाच पंचम जॉर्ज यांच्या निधनाची बातमी आली. पंचम जॉर्ज हे इंग्लंडचे राजे आणि भारताचे सम्राट तर होतेच; शिवाय ते आगाखानांचे व्यक्तिगत मित्रही होते. आगाखानांनी पुढचे सगळे समारंभ रद्द केले. असाच एक भव्य समारंभ आगाखानांना इमामपद मिळाल्याला साठ वर्षे झाली तेव्हा १९४५ साली झाला. हिरे-माणकांनी त्यांची तुला करण्यात आली. नंतर त्या पैशाचा एक विश्वस्त निधी उभारण्यात आला. पंचम जॉर्जनंतर राजे आठवे एडवर्ड राज्यावर आले. त्यांच्या राजपदाच्या पहिल्या वर्षांतच अनेक वेळा त्यांना भेटण्याची आगाखानांना संधी मिळाली. या भेटी जेव्हा बिगरसरकारी आणि खासगी असत तेव्हा राजेसाहेबांबरोबर श्रीमती वॅलिस सिम्सन असत. पुढे त्या विंडसरच्या डचेस झाल्या. लंडनमध्ये त्यावेळी त्यांच्या व राजेसाहेबांच्या संबंधांबद्दल कुजबुज चालू होती. सिम्सन यांच्याबरोबर राजेसाहेबांनी लग्न करण्याला ब्रिटिश परंपरावाद्यांचा विरोध होता. हे लग्न करण्याचा हट्ट धरल्यामुळे आठव्या एडवर्डना पुढे राजत्याग करावा लागला. एका सामान्य नागरिकाचे जीवन ते जगत असताना आगाखानांची आणि त्यांची भेट दोघेही जर्मनीत असताना १९३७ साली झाली. डय़ूक आणि डचेस ऑफ विंडसर (राजपद सोडल्यानंतर मिळालेले नामाभिधान) यांना आगाखान भेटले त्यावेळी इतर विषयांबरोबरच स्वाभाविकपणे त्यांच्या बोलण्यात सिंहासनावर बसलेल्या आपल्या भावाचा- सहाव्या जॉर्जचा उल्लेख येई, त्या- त्या वेळी त्यांचा उल्लेख डय़ूक ‘राजेसाहेब’ असाच करीत. राजपदाविषयीची निष्ठाही त्यांच्या बोलण्यातून प्रकट होई. आपणही एकेकाळी राजे होतो आणि आपले ते राजपद गेले, हे जणू डय़ूक पूर्णपणे विसरून गेले होते. काही दिवसांनंतर आगाखान लंडनला गेले. जर्मनीत त्यांची हिटलरशीही भेट झाली होती. त्या भेटीचा वृत्तान्त समजून घेण्यासाठी सहाव्या जॉर्जनी त्यांना भेटीस बोलावले. हिटलरच्या भेटीचा वृत्तान्त सांगितल्यानंतर राजेसाहेबांनी त्यांना ‘माझे भाऊ भेटले का? ते कसे आहेत?,’ असा प्रश्न केला. डय़ूकच्या भेटीचा वृत्तान्त सांगताना त्यांच्या बोलण्यात प्रकट झालेले भावाबद्दलचे प्रेम, राजनिष्ठा तसेच राजत्याग करावा लागल्याबद्दल अजिबात विषाद नसणे, या गोष्टीही आगाखानांनी त्यांना सांगितल्या. ते ऐकताना राजेसाहेबांना गहिवरून आले होते.

dw-108महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल आगाखानांनी फारच हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. आगाखानांच्या किशोरावस्थेपासून ते सयाजीरावांना ओळखत होते. सयाजीराव मुंबईला आले म्हणजे त्यांना मुद्दाम भेटायला आगाखान जात असत. ‘आपल्या तरुणपणातच सयाजीरावांबरोबर आपली मैत्री झाली आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ती टिकली. सयाजीरावांना आपला दर्जा आणि आनुषंगिक सन्मान यांची सतत जाणीव असे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक निर्भय, स्वतंत्र बाणा प्रकट होत असे. सयाजीरावांच्या विचारांमध्ये आपल्या कुटुंबाच्या किंवा जातीधर्माच्या हितापेक्षाही देशाच्या हिताला प्राधान्य होते,’ असे आगाखानांनी लिहिले आहे.

१९०८ सालच्या उन्हाळ्यात मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांचे पाहुणे म्हणून आगाखान आणि सयाजीराव दोघेही त्यांच्या घरी उतरले होते. ‘‘एके दिवशी रात्री सर्वत्र निजानीज झाली असताना सयाजीराव जागे होते. मी त्यांच्याकडे गप्पा मारायला गेलो, त्यावेळी ते जे बोलले ते मी कधीही विसरणार नाही. ते म्हणाले, ‘भारतातील ब्रिटिश सत्ता केवळ भारतीयांच्या संघर्षांने जाणार नाही. जागतिक परिस्थितीत असा मूलभूत बदल होईल, की तिला येथून जाण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.’ त्यानंतर ते म्हणाले, ‘इंग्रज गेल्यानंतर जे आपल्याला प्रथम करावे लागेल ते म्हणजे आमच्यासारख्या तथाकथित राजेमहाराजांच्या संस्थानांची बांडगुळे कापून टाकावी लागतील. कारण त्याशिवाय भारतीय राष्ट्र उभे राहू शकणार नाही. डलहौसीने बरीचशी संस्थाने खालसा केली नसती तर कदाचित सर्व संस्थानांचे मिळून एखादे संघराज्य निर्माण होऊ शकले असते. पण ती शक्यता आता संपली आहे.’

जे नंतर प्रत्यक्षात घडले, ते त्याने आधीच पाहिले- म्हणजे माझा मित्र किती दूरदृष्टीचा होता, आणि स्वत:बद्दलही किती तटस्थपणे विचार करू शकत होता ते आठवते, असे आगाखानांनी सयाजीरावांबद्दल लिहिले आहे.

आगाखानांच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूच्या वेळी आपल्या मुलांसाठी ठेवलेल्या संपत्तीत ८०-९० घोडे ठेवले होते. त्यांच्या आईने हा संभार बराच कमी करत २०-२५ घोडय़ांवर आणला होता. पण ते सगळे जातिवंत होते आणि रेसमध्येही भाग घेत होते. सर विन्स्टन चर्चिल यांना युद्धकाळात ब्रिटनचे नेतृत्व करणारे एक कर्तबगार पंतप्रधान, प्रभावी वक्तेआणि लेखक म्हणून आपण ओळखतो. परंतु भारतीयांच्या मनात आपल्या स्वातंत्र्याला विरोध करणारे साम्राज्यवादी अशीही त्यांची प्रतिमा आहे. आगाखानांची चर्चिल यांच्याशी मैत्री होती. १८९६ सालच्या उन्हाळ्यात ब्रिटिश घोडदळाचे काही अधिकारी बंगलोरहून पुण्याला आले होते, त्यात चर्चिलही होते. या अधिकाऱ्यांना आगाखान कुटुंबीयांनी संगोपन केलेले घोडे पाहण्याची इच्छा होती. दुर्दैवाने त्या काळात आगाखान आजारी असल्यामुळे ते त्यांना भेटू शकले नाहीत. आगाखानांनी आपल्या भावाला त्यांचे आदरातिथ्य करून आपले रेसचे आणि इतर घोडे दाखवावयास सांगितले. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांत विन्स्टन चर्चिल यांची निरीक्षणशक्ती अधिक सूक्ष्म होती, असे शमसुद्दीनने आगाखानांना नंतर सांगितले. पुढे आगाखानांना चर्चिल यांना भेटण्याची अनेक वेळा संधी मिळाली. उमर खय्यामच्या रचनांचे इंग्रजी भाषांतर चर्चिलना पूर्णपणे पाठ होते. ‘पण उमर खय्यामचे लेखन हे आपल्याला मान्य असलेले तत्त्वज्ञान नाही, ते एक काव्य म्हणूनच आपल्याला महत्त्वाचे वाटते,’ असे त्यांनी स्पष्ट केले. चर्चिल यांच्या व्यक्तिमत्त्वात अतिशय भावनाप्रधान असलेली आणि इतिहासाचे काव्यात्म विश्लेषण करणारी एक व्यक्ती आणि व्यावहारिक सत्याकडे अजिबात डोळेझाक होऊ न देता त्याची कठोर नोंद घेणारी व्यक्ती यांचे मिश्रण होते, असे आगाखानांनी लिहिले आहे. चर्चिल एक कुशल प्रशासक आहेत, असे आगाखानांचे मत होते. लॉर्ड चेम्सफर्ड यांचा भारताच्या व्हॉइसरायपदाचा कार्यकाल संपत असताना त्यांच्या जागी कोणाला नेमावयाचे याचा विचार सुरू झाला होता. लॉईड जॉर्ज यांनी आगाखानांच्या मनात एखादे नाव आहे का, असे विचारले तेव्हा त्यांनी सुचवलेल्या दोन नावांत विन्स्टन चर्चिल यांचेही नाव होते. परंतु चर्चिल यांची त्या जागी निवड झाली नाही. चर्चिल बदलणारा काळ लक्षात घेत असत. म्हणूनच गोलमेज परिषदेच्या वेळी स्वायत्त वसाहतीच्या दर्जालाही विरोध करणारे चर्चिल १९४२ साली सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठवतात, ही गोष्ट ब्रिटिश साम्राज्यातून भारताला पूर्णपणे मुक्त करण्याची वेळ आली आहे, हे त्यांनी मनोमन स्वीकारले होते याचे निदर्शक आहे, असे आगाखानांना वाटते.

१९३० च्या सुमाराला आगाखानांच्या मनात असे आले की, आपण जगभर पसरलेल्या, पण संख्येने छोटय़ा असलेल्या एका जमातीचे प्रमुख आहोत, पण आपल्याला स्वतंत्र भूभाग नाही. पोपची जशी व्हॅटिकनवर पूर्ण सत्ता असते तशी आपली पूर्ण राजकीय सत्ताही असलेला एक छोटासा का होईना, भूभाग आपल्याला असावा. भारत सरकारला त्यांनी त्याप्रमाणे विनंती केली. स्वत:चे राज्य असलेला भूभाग असला म्हणजे इतर राज्यकर्त्यां संस्थानिकांप्रमाणे आपल्याला दर्जा प्राप्त होईल असे आगाखानांना वाटत होते. भारत सरकारने त्यांची ही इच्छा मान्य केली नाही आणि राजकीय सत्ता असलेला भूभाग आगाखानांना मिळाला नाही. आगाखानांची आई जुन्या धर्मपरंपरेत वाढली होती. ती आजारी पडली तेव्हा आपल्याला मुस्लीम भूमीतच दफन केले जावे अशी इच्छा तिने व्यक्त केली. भारतातलेही काही मुसलमान मुस्लीम सत्ता असलेल्या देशात राहावयाला ब्रिटिशकाळात एकदा निघाले होतेच. आगाखानांची आई भारतात चिरविश्रांती घ्यायला तयार नव्हती. एका स्वतंत्र व सार्वभौम मुस्लीम देशातच तिला दफन हवे होते. ती अत्यवस्थ असतानाच वैद्यकीय सल्ला डावलून तिला इराकमध्ये नेण्यात आले. करबलाजवळच्या नजेफ गावाजवळ तिच्या पतीशेजारीच तिचे दफन करण्यात आले.

तिसरे आगाखान सर सुलतान महंमद शाह यांचा ११ जुलै १९५७ रोजी जिनेव्हामध्ये मृत्यू झाला. भारतीय राजकारणात ब्रिटिश सरकारशी अशी सहकार्याची भूमिका अनेक वेळा घेत, भारतातील गोपाळ कृष्ण गोखल्यांसारख्या देशभक्त उदारमतवाद्याशी आदरयुक्त मैत्री राखत, भारतातील मुस्लिमांना स्वतंत्र देश हवा व त्याचा कारभार करण्यासाठी ते सक्षम व्हावेत, अशी इच्छा करीत एक पंथप्रमुख म्हणून आपले काम बजावणारे आगाखान महाराष्ट्राच्या स्मृतीत गांधी स्मारक निधीला त्यांनी उदारतेने भेट दिलेल्या पुणे-अहमदनगर रस्त्यावरील ‘आगाखान पॅलेस’च्या रूपानेच आज उरले आहेत.
न्या. नरेंद्र चपळगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 11:23 am

Web Title: aga khan iii
Next Stories
1 भवताल आणि ‘भूमि’का
2 भोवळ
3 नंदनवनं महानगरांतली!
Just Now!
X