23 February 2019

News Flash

आम्स्तर्दाम बोस

त्यावेळी आम्स्तर्दाममध्ये सुमारे ५० हजार लोक बेरोजगार होते.

शहरातली जंगले

१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.

..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..

एखादा उत्सव, वास्तुउभारणी, व्यापार किंवा इतर कुठल्याही कारणांसाठी केलेल्या वृक्षतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व त्यातून निर्माण होणारा पर्यावरण असमतोल लक्षात घेऊन १९३४ ते ४० दरम्यान नेदरलॅंड्समधील आम्स्तर्दाम (अ‍ॅमस्टरडॅम)च्या नगरपालिकेने मोठय़ा प्रमाणावर राबवलेला एक उपक्रम अतिशय महत्त्वाचा व वाखाणण्याजोगा आहे. तो म्हणजे ‘आम्स्तर्दाम्स बोस’.. अर्थात ‘आम्स्तर्दाम्स फॉरेस्ट’! आम्स्तर्दाम शहराच्या दक्षिणेला असलेल्या आम्स्तल्व्हेन या उपनगराला लागून असलेल्या या जंगलाला तीन बाजूंनी गावं आणि शहराने वेढलं आहे. तर त्याच्या नैर्ऋत्येला अगदीच लागून नेदरलॅंड्सचा प्रमुख विमानतळ- स्किप्होल एअरपोर्ट आहे. या जंगलाचा बराचसा भाग हा आम्स्तल्व्हेन उपनगरात येत असला तरी त्याची मालकी मात्र आम्स्तर्दाम नगरपालिकेकडेच आहे. जवळजवळ एक हजार हेक्टर (दहा चौ. कि. मी.) क्षेत्रफळ असलेलं हे जंगल आज पाहताना या गोष्टीवर विश्वास बसत नाही, की त्याच्या निर्मितीमध्ये मानवाचा सक्रीय सहभाग आहे.

नेदरलॅंड्समधल्या न्यूव् मेरच्या परिसरातील लोकांना फिरण्यासाठी व निसर्गाशी जवळीक साधण्याकरता एखादं उद्यान असावं, ही कल्पना डच वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. याकोबास थैस यांनी १९०० मध्ये मांडली. आणि पुढे जवळजवळ २८ वर्षांनी आम्स्तर्दाम नगरपालिकेनं या जंगलाच्या उभारणीची आणि विकासाची मोहीम हाती घेतली. तो काळ आणीबाणीचा होता. त्यावेळी आम्स्तर्दाममध्ये सुमारे ५० हजार लोक बेरोजगार होते. अशा वेळी एकीकडे बेरोजगारीशी दोन हात करतानाच दुसरीकडे निसर्गाशी हातमिळवणी करण्याचा एक अचाट प्रयोग आम्स्तर्दाम नगरपालिकेनं केला आणि त्याला चांगलंच यश मिळालं. १९३४ ते १९४० यादरम्यान या जंगलासाठी निर्धारित केल्या गेलेल्या भूमीवर सुमारे २० हजार बेरोजगारांना झाडं लावण्याचं काम दिलं गेलं. या कामासाठी त्यांना दरमहा रीतसर पगार दिला गेला. त्यावेळी या कामगारांकडे फावडी, बी-बियाणं, खतं यांच्या वाहतुकीसाठी छोटी लाकडी हातगाडी आणि कचऱ्यासाठी लहान लोखंडी गाडय़ा एवढंच साहित्य होतं. झाडं लावण्याचं काम अतिशय उत्तम रीतीनं चालू असतानाच दुसरं जागतिक महायुद्ध छेडलं गेलं आणि या उपक्रमात मोठाच व्यत्यय आला; ज्यामुळे या जंगलातलं शेवटचं झाड अगदी अलीकडे- म्हणजे १९७० मध्ये लावलं गेलं. आज युरोपातलं सर्वात मोठं ‘शहरातलं जंगल’ म्हणून ‘आम्स्तर्दाम्स बोस’ची ख्याती आहे. या महायुद्धाच्या काळात नेदरलँड्समध्ये परिस्थिती हलाखीची असल्यानं थंडीपासून ऊब मिळावी म्हणून या जंगलातलं लाकूड घरात शेकोटीसाठी वापरलं गेलं. तसंच या जंगलातली काही जमीन जव (बार्ली) आणि मोहरी (राय) या पिकांच्या लागवडीसाठी वापरली गेली.

‘आम्स्तर्दाम्स बोस’ हे उद्यानवजा जंगल लोकांसाठी कायम खुलं राहील आणि त्यांच्यासाठी ते आकर्षणस्थळ असेल अशी त्याच्या उभारणीमागची संकल्पना होती. त्यासाठी कोर्नेलीस व्हान एस्तरेन व याकोबा म्युल्डर या दोन नगरविकास अधिकाऱ्यांनी पाश्चात्त्य- प्रामुख्याने इंग्रजी उद्यान वास्तुकलेचा (लँडस्केप गार्डनिंग) आधार घेतला. या शैलीचं वैशिष्टय़ असं की, यात झाडाझुडपांची संरचना जास्तीत जास्त नैसर्गिक वाटेल अशी केली जाते. म्हणूनच आम्स्तर्दाम्स बोसमध्ये अनेक वाहते झरे, नागमोडी वळणं घेत जाणारे किनारे, कोपरे आणि बारीक गवत असलेली कुरणं आहेत. म्हणूनच या जंगलाचा परिसर नजरेच्या टप्प्यात मावत नाही आणि हे जंगल आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं वाटतं. या जंगलाच्या कानाकोपऱ्यापर्यंत लोकांना फिरता यावं म्हणून पादचारी, सायकलस्वार, घोडेस्वार यांच्यासाठी रस्ते बांधले गेले आहेत. झरे, तलाव, कालवे यांनी या जंगलाची शोभा वाढवलीच; शिवाय त्यांच्या ओघानं बांधले गेलेले ११६ पूल हे या जंगलाला जगातल्या इतर जंगलांच्या तुलनेत अधिक जिवंत बनवतात. त्यातल्या ६७ पुलांची बांधणी आम्स्तर्दाम स्कूल ऑफ आर्किटेक्टमध्ये कार्यरत असलेल्या पीट क्रामेर या वास्तुविशारदाने केली आहे. हे सर्व पूल एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या शैलींतले आहेत. यापैकी अत्यंत साध्या आखणीचे ‘बॉलब्रिजेस’ आपलं लक्ष वेधून घेतात. यातील रंगीत गोळे पुलाचे वजन पेलतात आणि बोटीने जाताना अगदी सहजपणे आपल्या गरजेनुसार तो पूल उघडता व बंद करता येतो. याची मूळ संकल्पना बेर्नार्द फोरे द बेलिदोर या फ्रेंच अभियंत्याने बांधलेल्या पॅरिसमधील एका उद्यानातील पुलामध्ये पाहायला मिळते. याशिवायही अनेक लाकडी तसेच विशिष्ट रंगांत रंगवलेले पूल त्यानं बांधले, पण प्रत्येकाची आखणी वेगळी आणि अनोखी अशीच आहे.

dw-121या जंगलात बऱ्याच ठिकाणची माती चिकणमातीसारखी आहे. सुकी वा ओली जमीन, कुरणं यामुळे हे जंगल प्रामुख्यानं पाच विभिन्न भागांत विस्तारलं आहे. ‘स्किंकल्बोस’ भागात स्कॉटिश हायलँड गायी चरताना दिसतात, तर ‘सदर्न उव्हरलांदेन’ या भागात मार्श हॅरियर अथवा पाणघार घिरटय़ा घालताना दिसते. ‘उव्हरलांदेन आम्स्तलव्हेन्स पूल’ या भागात दुर्मीळ वनस्पती आणि वन्य ऑर्किड्स आढळतात. त्यांची निगा इतक्या सुंदर रीतीनं राखली गेली आहे, कीत्यामुळे या भागात किंगफिशर (खंडय़ा), बंटिंग, रीड वाब्र्लर (वटवटय़ा), सुतार, घारी, गिधाडं असे अनेक पक्षी दिसतात. ‘व्होगलआयलंड’ भागात वनस्पती व फुलपाखरांच्या अनेक जाती-प्रजाती आढळून येतात. ‘मेरझिक्त पोल्डर’ भाग हा कुरणांचा आहे. तिथं वेगळ्या प्रकारची फुलं पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर रेडशँक, ब्लॅक-टेल्ड गॉडविट (मळगुजा पक्षी अथवा काळ्या शेपटीचा पंकज), टिटवी हे पक्षीदेखील अधूनमधून दर्शन देतात. काही भागांत गवती सापदेखील आढळतात. इथली शुद्ध हवा ऑक्सिजन पुरवते. तर झाडाझुडपांनी शीतलता मिळते. दरवर्षी शरद ऋतूमध्ये इथल्या झाडांच्या पानांचा रंग बदलतो. हळूहळू पानगळ होऊन हिवाळा सुरू होतो. पण शरदातल्या त्या रंगांची सर दुसऱ्या कशालाच नाही! याशिवाय आणखी एका लहानशा भागात बरीचशी चेरीची झाडं एका वर्तुळात लावली आहेत. एप्रिल महिन्यात ही चेरीची झाडं पांढऱ्या फुलांच्या मोहरानं बहरून येतात आणि येणारा-जाणारा प्रत्येक जण अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन जातो.

जंगलाच्या तीन बाजूंनी शहर असल्यानं कुठूनही जंगलात जाण्याची सोय आहे. आणि माणसाचं मनोरंजन किती विविध प्रकारे होऊ शकतं हे लक्षात घेत या जंगलातील अनेक गोष्टींची आखणी केलेली दिसते. ‘ग्रोत स्पेलव्हैव्हर’ हा तलाव आणि ‘ग्रोत स्पेलवीद’ हे मैदान जंगलाची शोभा वाढवतात. ‘स्पोर्ट्स पार्क’ आणि तलावात बोटी उपलब्ध असतात. त्यातून तलावाची सैर करता येते. ‘स्पोर्ट्स पार्क’मध्ये टेनिस, हॉकी, फुटबॉल अशा खेळांसाठी भरपूर जागा आहे. जंगलातल्या एका विशिष्ट भागात झाडांवर मचाणं बांधली आहेत आणि एका मचाणावरून दुसऱ्या झाडावरच्या मचाणावर जाण्यासाठी दोरीचे पाळणे किंवा दोरखंड बांधले आहेत; ज्यांच्या साहाय्यानं ते अंतर पार करता येतं. या खेळात लहान मुलंच नव्हे, तर मोठेही भाग घेतात. त्याद्वारे रॅपलिंग तसंच दोरांच्या साहाय्यानं अंतर पार करण्याचं प्रशिक्षण व अनुभव मिळतो. परंतु हा परिसर केवळ उन्हाळ्यातच लोकांसाठी खुला असतो. काही भाग कॅम्पिंगसाठी राखून ठेवण्यात आला आहे; जिथं वर्षभर अनेक लोक विश्रांतीसाठी येत असतात. त्यामुळेच हे जंगल कायम जागं राहतं. तुम्ही जर दिवसभर फिरून दमला असाल तर ‘स्पा स्पोर्ट हॉटेल झौव्हर’मध्ये मसाज घ्या. हवी असेल तर ब्युटी ट्रीटमेंट करून घ्या अथवा स्पा, सौना आणि रिलॅक्सेशन रूम्समध्ये आराम करा. परंतु हेही तितकंच खरं, की इथे कॅम्पिंगशिवाय मजा नाही. याखेरीज जंगलात अंधाऱ्या रात्री चमचमत्या आकाशाखाली पहुडून एखादा सिनेमा वा कॉन्सर्टची मजा घेण्याची संधीही इथलं ‘बोस थिएटर’ (ओपन एअर थिएटर) देतं. अर्थात् इथं होणाऱ्या कार्यक्रमांच्या आवाजावर मर्यादा असतात. हवामानावरही बरंच अवलंबून राहावं लागतं.

लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच आकर्षित करणारी या जंगलातली अजून एक खास जागा म्हणजे ‘रिदामरहूव्ह’ हे ‘गोट फार्म’ (बकऱ्यांसाठीचं कुरण)! इथे बकऱ्यांखेरीज कोंबडय़ा, डुकरं, गायी, घोडे आणि पोनी असे अन्य प्राणीदेखील आहेत. या सर्वाना आपण अगदी जवळून पाहू शकतो. अगदी गोंजारूदेखील शकतो. रोज संध्याकाळी या बकऱ्यांचं दूध काढलं जातं. इथे कोंबडय़ांची अंडीही आपण गोळा करू शकतो. इथल्याच तळघरात बकरीच्या दुधापासून चीज, दही, ताक, लोणी हे पदार्थ बनवले जातात. अगदी ताजे असताना त्यांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच! इथलं आईस्क्रीम तर विशेष प्रसिद्ध आहे.

आम्स्तर्दाम्स बोसमध्ये फिरण्याचा आणखी एक मजेशीर मार्ग म्हणजे म्युझियम ट्राम! जुन्या हार्लेमरमेर स्टेशनहून सुटणारी आणि सुमारे सात कि. मी.चा रस्ता कापत पूर्ण जंगलाला फेरी मारणारी ही ट्राम फक्त रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेतच धावते. सुट्टी असल्याने लोक कुटुंबासोबत त्यातून जंगलाची सैर करतात. ही ट्राम पाहून लहानपणी पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये धावणाऱ्या ‘फुलराणी’चे दिवस आठवले नाही तरच नवल!

या सोयीसुविधा असल्याने लोक साहजिकच या जंगलाची निगादेखील राखतात. जंगलात केरकचरा होऊ नये म्हणून जागोजागी कचऱ्याच्या पेटय़ा आहेत. रस्ता चुकू नये म्हणून ठरावीक अंतरावर दिशादर्शक फलक लावले आहेत. जंगलामुळं आपल्याला खूप मजा करता येते, हे ठाऊक असल्यानं लहान मुलांनादेखील कुठल्याही विशेष सूचना द्याव्या लागत नाहीत. जंगलातल्या झाडांची, पशुपक्ष्यांची काळजी आणि जबाबदारी ‘ओन्स आम्स्तर्दाम्स बोस’ ही १९५४ साली स्थापन झालेली संस्था घेते. या संस्थेद्वारे दर महिन्याला एक माहितीपत्रक काढलं जातं; ज्यात त्या महिन्यात संस्थेद्वारे आयोजित प्रदर्शनं, सहली, लहान मुलांसाठीचे उपक्रम व जंगलातल्या वन्यसृष्टीबाबतच्या ताज्या घडामोडी नमूद केलेल्या असतात. जंगलात चालू असणारे उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा, कॉन्सर्ट्स या सगळ्यांवर संस्थेचं लक्ष असतं. जंगलातील पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही यासाठी कठोर नियम पाळले जातात. काही ऐच्छिक रक्कम भरून आपल्याला संस्थेचा सदस्य आणि जंगलाचा ‘बॉयफ्रेंड’ वा ‘गर्लफ्रेंड’ होता येतं. याशिवाय पर्यटक किंवा इतर कुणाला काही मदत लागली तर जंगलात या संस्थेचं एक व्हिजिटर सेंटर आहे; जिथे सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते. एकूणात या जंगलात फिरायला जाताना कुठलाही अडसर मधे येत नाही. पण अट एकच, की जंगलाची काळजी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे! या जंगलात फेरफटका मारायला कधीकाळी गेलात तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे .. पक्षीही सुस्वरे आळविती..’ या  अभंगाची तुम्हाल नक्कीच आठवण येईल. आणि जाणवेल, की यासारखं अभूतपूर्व विश्रामगृह दुसरं कुठलं नाही!
विश्वास अभ्यंकर

First Published on February 8, 2016 10:58 am

Web Title: amsterdamse bos