19 March 2019

News Flash

मी लेखक कसा झालो?

आयुष्याच्या वाटेवर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळींचा सहवास मला लाभला.

डॉ. रवी बापट

dw-42स्वप्नातसुद्धा मला कधी असे वाटले नव्हते, की माझे नाव मराठी पुस्तकावर लेखक म्हणून छापून येईल. गप्पांमध्ये एखादी गोष्ट रंगवून, तपशिलात जाऊन सांगणे मला कायमच आवडत आलेले आहे. गप्पांच्या मैफिलींमध्ये असे अनुभवलेल्या प्रसंगांचे कथन केले कीमला सगळे सांगायचे की, ‘अरे, हे लिहून काढ ना!’ १९७५-७६ ची गोष्ट असेल. विनय नेवाळकर आणि दिगंबर कुलकर्णी या मित्रांसोबत गदिमांबरोबरच्या गप्पांच्या मैफिलीत बसायचा योग आला. तिथे पुन्हा हाच विषय निघाला. मी गदिमांना म्हणालो, ‘‘अण्णा, मला मराठी लिहायचा न्यूनगंड आहे. कारण मी हिंदीत शिकलो. ऱ्हस्व, दीर्घ, जोडाक्षरे वगैरेंचा माझा नुसता गोंधळ उडतो. मग मला लिहायचा कंटाळा येतो. आणि लेखनात वेळही खूप जातो. ते प्रेमाने म्हणाले, ‘‘अरे डॉक्टरा, जे मनात आले ते लिहायचे. कशाला व्याकरणाची काळजी करायची? लेखनिक घेतो सुधारून.’’

जवळजवळ ३०-३५ वर्षांपूर्वी कै. मुरारराव राणे (दादर येथील श्रीशिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते) यांनी त्यांच्या ‘स्वरमाला’ या दिवाळी अंकाकरिता वैद्यकीय लेख द्या म्हणून मला गळ घातली होती. मी नेहमीप्रमाणे- ‘‘मी हिंदीत शिकलोय, मराठीत लिहिणे मला जमत नाही,’’ अशी सबब पुढे केली. ते म्हणाले, ‘‘मग इंग्रजीत लिहा. मी त्याचे भाषांतर करून घेतो. पण काहीही झाले तरी तुमच्या लेखाशिवाय मी अंक छापणार नाही.’’ मुराररावांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते. त्यांना नाही म्हणणे मला जमेना. शेवटी मी इंग्रजीत लिहिले आणि आनंद नाडकर्णी (आताचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ, लेखक आणि नाटककार  डॉ. आनंद नाडकर्णी) या माझ्या विद्यार्थ्यांला विनंती केली की, ‘याचे भाषांतर करून दे.’ तो तयार झाला. खरे म्हणजे तो सरांना नाही म्हणू शकला नाही, हेच खरे! आनंदने केलेले भाषांतर छापून आले आणि मला लिहिता येते असा गैरसमज सर्वत्र पसरला. मी एक प्रकारे ही आफतच ओढवून घेतली होती.

पुढे डॉ. शरदिनी डहाणूकरांनीही मला लिहायला भाग पाडले आणि त्याकामी मला खूप मदतही केली. त्या स्वत: माझ्या लिखाणावर उत्तम संस्कार करत असत आणि मी फुकटचा भाव खात असे. मात्र, एवढे सगळे मदतीला असूनसुद्धा आपण सातत्याने लेखन करावे असे मला कधीच वाटले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एके जागी बूड टेकून लिहीत बसण्याचा मला फार कंटाळा आहे. आणि त्यात पुन्हा न्यूनगंड मदतीला येत असे. आणि मग नकोच ती कटकट म्हणून मी सरळ नकार द्यायचो! हो, एक मात्र त्यामुळे होत असे, की मी आढेवेढे घेतले की ‘मग मुलाखत द्या’ असा ससेमिरा मागे लावला जायचा. माझे म्हणणे मुलाखतकार आपापल्या शैलीत मग मांडत असत.

एक गोष्ट मुंबईत आल्यापासून मी प्रयत्नपूर्वक केली होती, ती म्हणजे माझे मराठी मी सुधारले. (मी मुंबईत १९५७ साली आलो तेव्हा मला मराठी नीट बोलता येत नसे.) निदान संभाषणापुरते तरी ते सुधारले होते. लिखाणाच्या बाबतीत मात्र गोंधळ उडत असे. आता तर मराठी भाषणात मी इंग्रजी शब्द सहसा वापरतच नाही. मी गमतीत बोलताना म्हणतो की, ‘मी मराठीच्या बाबतीत ‘बाटगा’ असल्यामुळे जास्त कडवट आहे.’ आता मला मराठी शब्दही सहजगत्या सुचतात. पण ते फारच बोजड असतील तर श्रोत्यांची क्षमा मागून मी रूढ इंग्रजी शब्द वापरतो. पण तेही अपवादात्मक! ‘तुम्ही मराठी काय छान बोलता हो! तुम्ही बालमोहन किंवा किंग जॉर्जचे विद्यार्थी आहात का?,’ असा प्रश्न मला मध्य मुंबईतले श्रोते कधी कधी विचारतात. ‘नाही हो. मी मध्य प्रांतातल्या बालाघाटच्या शेठ जटाशंकर त्रिवेदी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळेचा, हिंदी माध्यमात शिकलेला विद्यार्थी आहे,’ असे मी सांगितल्यावर, ‘काय थापा मारतोय!’ असे भाव समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसतात.

निरनिराळ्या दिवाळी अंकांमधून माझ्या मुलाखती आणि लेख छापून येत असत. अगदी चक्क ‘कालनिर्णय’च्या मागील पानावरही माझे लेख छापून आले आहेत. हे सगळं घडलं, पण तरी स्वत:हून लेख लिहिण्याची प्रेरणा मला कधी झालीच नाही. इंग्रजीतसुद्धा फक्त शास्त्रीय प्रबंध लिहिण्यापुरतेच माझे लिखाण होत असे.

१९८१-८२ मध्ये वैद्यकीय पुस्तकांचे एक ज्येष्ठ  प्रकाशक श्री. सामंत माझ्याकडे आले आणि ‘तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वैद्यकावरचं एक पुस्तक लिहा,’ म्हणून मागे लागले. तेव्हा मी आणि डॉ. मनोज कामदार आम्ही दोघांनी मिळून ‘RDB’s Art of studying Surgical Pathology’ हे पहिले पुस्तक लिहिले. गंमत म्हणजे मी कैलास मानसरोवरच्या ट्रेकवर असताना १९८२ च्या ऑगस्टमध्ये सामंत यांनी ते प्रकाशित केले. १९९४ मध्ये माझ्या काही विद्यार्थ्यांनी मी शिकवीत असलेल्या क्लिनिकल सर्जरीच्या नोट्स वाढवून/ सुधारून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक काढायची कल्पना मांडली. मला पण ती आवडली. कारण १९९३ मध्ये मी विभागप्रमुख झाल्यावर मला शिकवायला पुरेसा वेळ मिळायचा नाही. ते पुस्तक म्हणजे ‘RDB’s Art of Clinical Presentation’ माझी इच्छा होती की, हे पुस्तक आपणच छापून घ्यावे आणि स्वस्तात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. मी ‘कालनिर्णय’च्या राजू, नंदू आणि जयू या साळगांवकर बंधूंना भेटलो आणि विनंती केली की, ‘मला हे पुस्तक तुम्ही छापून द्याल का? मला याची किंमत कमी ठेवायची आहे. (झेरॉक्स करण्यापेक्षाही कमी! वैद्यकीय पुस्तकांच्या बाबतीत पुस्तके झेरॉक्स करून घेणे हा प्रकार सर्रास चालतो.) मला रॉयल्टीची अपेक्षा नाही.’ त्यांनी मोठय़ा मनाने ते मान्य केले. हे पुस्तक चांगलेच विद्यार्थिप्रिय झाले. आरडीबीचे हे ‘लाल’ पुस्तक बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्रनच्या खिशात असते. पुढे हे पुस्तक भलानी या वैद्यकीय पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थेला प्रकाशनाकरता दिले. आता त्याची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. माझे विद्यार्थी डॉ. गिरीश बक्षी आणि डॉ. मिहीर बापट हे पुस्तक संपादित करतात. डॉ. चेतन कंथारिया आणि डॉ. अनिरुद्ध देशपांडे या माझ्या विद्यार्थ्यांनी १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या पहिल्या वैद्यकीय पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढली. ही माझी ‘शल्यचिकित्सा’ या विषयावर लिहिलेली पुस्तके सोडली तर मी इंग्रजी वा मराठी लिखाण करायच्या भानगडीत कधी पडलो नाही, हेच खरे!

मला आत्मचरित्र किंवा चरित्र या दोन्ही प्रकारांमध्ये रस नव्हता. कारण आत्मचरित्रामध्ये ओळींच्या मधले वाचावे लागते व चरित्रामध्ये अतिशयोक्ती वगळावी लागते. एकदा सुप्रसिद्ध पोलीस चातुर्यकथा लिहिणारे श्रीकांत सिनकर वॉर्ड क्रमांक पाचमध्ये माझ्याकडे दाखल झाले होते. एके दिवशी मी एका उत्तर भारतीय रुग्णाशी हिंदीत बोलत होतो ते त्यांनी ऐकले. ते मला म्हणाले, ‘तू इतकी सुंदर हिंदी कशी काय बोलतोस? बम्बैया असून?’ जेव्हा मी त्याला सांगितले की,‘माझे शिक्षण अकरावीपर्यंत हिंदी माध्यमात झाले आहे. आणि हिंदुस्थानी व मराठी दोन्ही भाषेत मी छान बोलू शकतो..’ तेव्हा तो चकितच झाला. मी सांगितले की, ‘एखादा असा रुग्ण आला की मी माझा भाषेचा सराव चालू ठेवतो.’ तो इरेस पेटला आणि म्हणाला, ‘मी तुझे चरित्र लिहिणार.’ श्रीकांत एक अवलिया होता. संध्याकाळी टेपरेकॉर्डर आणि कॅसेट्स घेऊन आला आणि म्हणाला, ‘तू केईएममध्येच राहतोस. रोज रात्री आपण बसू या. मी प्रश्न विचारतो, तू उत्तरे दे.’ सहा-सात टेप रेकॉर्ड झाल्या. मात्र, श्रीकांत घरी गेला आणि त्या टेपबद्दल विसरून गेला. एके दिवशी त्याचे सुहृद.. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे शशिकांत भगत माझ्याकडे आले होते. मी त्यांच्याकरवी त्याला विनंती केली की, त्या टेप मला आणून दे. त्याने लगेचच त्या आणून दिल्या. परंतु त्या तशाच माझ्याकडे बरेच दिवस पडून होत्या. एकदा कॉ. जी. एल. ऊर्फ अण्णा रेड्डी आले होते. त्यांना त्या मी दाखवल्या. त्यांनी त्या नेल्या आणि आमचा एक कॉम्रेड मोहन नाईक याच्याकडून टंकलिखित करून आणल्या. हे लिखाण फारच विस्कळीत आणि अर्वाच्य होते. कारण श्रीकांत वेडेवाकडे प्रश्न विचारत होता आणि मीही बिनधास्त उत्तरे देत होतो. हे लेखन काही मित्रांनी वाचले आणि संपादन करून ते छापावे असे त्यांनी सुचवले. त्यात काही बाबी मी अतीच सत्य लिहिल्या होत्या आणि थोडय़ा त्याकाळच्या समाजातल्या रूढी-परंपरांशी विसंगत होत्या. जेव्हा मी ते लिखाण डॉ. शरदिनी डहाणूकरांनावाचावयास दिले तेव्हा त्यांचीही प्रतिक्रिया ‘थोडीशी काटछाट व संपादन करून छापायला हवे,’ अशीच होती. मात्र, त्यांनी त्यांच्या एका ओळखीच्या पत्रकार प्रकाशकाला ते दाखवल्यानंतर त्याने हे लिखाण प्रकाशित करण्यायोग्य नाही असे मत दिले. मला त्याचे कारण लक्षात आले होते. ते म्हणजे- यौवनात येताना मला आलेल्या समस्यांचे वर्णन मी त्यात केले होते!

त्यानंतर हे बाड माझ्याकडे कित्येक दिवस पडून होते. मी तो विषय बाजूला सारला होता. मध्यंतरी जवळजवळ १०-१५ वर्षे गेली. मला परत परत माझे वैद्यकक्षेत्रातले अनुभव लिहून काढण्याचा आग्रह अनेकांकडून होत होता. मलाही कधी कधी सुरसुरी यायची. मी एखाद्या मित्राला हाताशी धरून काही अनुभव लिहूनही काढले. मला माझ्या अनुभवावरच लिखाण करायचे होते तरीही मला स्वत: मी लिहू शकेन, हा विश्वास अजूनही निर्माण झालेला नव्हता.

डॉ. अरुण टिकेकर ‘लोकसत्ता’चे संपादक असताना त्यांनी वैद्यकीय विषयावर सदर लिहा असे मला सुचवले. मी त्यांना ‘नाही जमणार’ असे सांगत होतो. कारण एकदा सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश तथा तात्या माडगूळकरांशी गप्पा मारत असताना सदरलेखनाबद्दल ते म्हणाले होते की, ‘‘गडय़ा, हे सदर लिहायचे म्हणजे मोठीच डोकेदुखी आहे. दर आठवडय़ाला नवीन विषय शोधायचा हे मोठे कठीण काम असते. परत तो लोकांना आवडला पाहिजे; निव्वळ स्वत:ला नाही. मी सगळे ग्रंथालय पालथे घालायचो, तेव्हा कुठे विषय सापडायचा. बरं, वर्षांचे ५२ आठवडे आपण लिहिलेले वाचकालाही रुचले पाहिजे.’’ त्यांच्या या अनुभवामुळे मीसुद्धा ‘नकोच ही भानगड! कशाला डोक्याला त्रास करून घ्यायचा?’ म्हणून सदर लिहायला टाळाटाळ करत होतो. पण डॉ. टिकेकर धीर देत. म्हणायचे, ‘लिहा हो जे मनात येईल तसे.. त्यावर संपादकीय संस्कार आम्ही करू.’

मग मी डॉ. टिकेकरांना सांगितले की, ‘आधुनिक वैद्यक व्यवसायात आलेल्या नवनव्या तपासण्या वा उपचारांवर मी लिहिणार नाही, दैनंदिन होणाऱ्या आजारांवर लिहीन.’ माझी अशी पक्की धारणा आहे की, असे लिखाण हे फक्त त्या विषयाची माहिती देण्याकरिता केले जात नाही, तर बाजारात आलेल्या नवीन उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या निमित्ताने त्याची जाहिरात आणि बाजारीकरणाकरिता ते वापरले जाते. रुग्णाच्या मनात हेच उपचार करणे कसे आवश्यक आहे, हे त्याद्वारे भरवले जाते. माझा याला तात्त्विक विरोध होता व आहे. खरे म्हणजे असे लिखाण वैद्यकीय व्यावसायिकांपुरते मर्यादित असावे. त्यांनी ते गरजेनुसार रुग्णोपचारांत अमलात आणावे. सदरलेखन करताना माझी एक अट होती की, मी माझ्यासोबत एक सहलेखक/ लेखिका घेईन. मी स्वत: लिहू शकेन हा विश्वास अजूनही आलेला नव्हता. मी डॉ. कामाक्षी भाटे यांना विनंती केली आणि त्यांनीही ती आनंदाने मान्य केली. आम्ही एकत्र बसून ४०-५० विषय निवडले. तरीही मनात धाकधूक होतीच. म्हणून १५ डिसेंबपर्यंत मी डॉ. टिकेकरांना सदराबद्दल हुलकावण्या देत राहिलो. पहिले आठ-दहा विषय लिहून झाल्यावर मगच मी ‘हो’ म्हणालो. त्यावर ‘लोकसत्ता’तल्या मंडळींनी बरीच संपादकीय कलाकुसर केली. डॉ. टिकेकरांनी ‘स्वास्थ्यवेध’ असे नाव सदराला सुचविले. सर्दी, पडसे इत्यादी दैनंदिन आजारांवरचे हे सदर चांगलेच लोकप्रिय झाले. त्याचा ‘यूएसपी’ चांगला आला असे टिकेकरांनी नंतर सांगितले. पुढे त्याचे संकलित पुस्तक ‘कालनिर्णय’ने २००२ मध्ये माझ्या साठीच्या समारंभात प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध केले. त्याचाही खप उत्तम झाला. हे पुस्तक लोकांना वैद्यकीय मार्गदर्शिकेसारखे वाटले. ‘काही झाले की आम्ही त्यातून माहिती घेतो,’ dw-43असे बरेच मित्र आणि रुग्ण आजही आवर्जून सांगतात. गेली काही वर्षे हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होते. ते त्याच्या आवृत्त्या काढतात.

२००३ साली मी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरू झालो आणि नाशिकला राहायला गेलो. तिथे कामाव्यतिरिक्त मला बराच वेळ मोकळा असे. माझा साहाय्यक भंडारी हा अत्यंत उत्साही गृहस्थ होता. त्याला मराठी वाचनाची आवड होती. तो त्याच्या शब्दांत (अहिराणी बोलीत) लिहून घ्यायचा आणि मी आठवणी सांगायचो. पण हा केवळ वेळ घालवायचा प्रकारच होता. त्यावर पुस्तक काढावे असे मला कधी वाटले नाही. २००४ साली मी कुलगुरूपदाचा राजीनामा देऊन मुंबईला परत आलो. २००५ साली एकदा सुनीती जैन मला सहज म्हणून भेटायला आल्या होत्या. नुकत्याच त्या महाराष्ट्र शासनाच्या  प्रसिद्धी  विभागातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी आग्रह केला की, ‘तू तुझ्या आठवणी मला सांग. मी लिहून घेते.’ त्यांनी माझा सतत पिच्छाच पुरवला. त्यांचा धोशा मागे नसता तर मी ‘वार्ड नं. ५ के. ई. एम.’ लिहायच्या भानगडीतच पडलो नसतो. सुनीतीने खूपच मेहनत घेतली. खरे म्हणजे माझी आणि त्यांची वेव्हलेंग्थ छान जुळली. त्या मी सांगितलेले प्रसंग उत्कृष्ट शब्दांकन करून आणायच्या. त्यांचे लिखाण जणू काही मीच सर्वाशी संवाद साधतो आहे असे असायचे. पुस्तकाची रूपरेषाही त्यांच्याच मदतीने ठरवली. श्रीकांत लागू आणि अशोक जैनही अधूनमधून मार्गदर्शन करायचे. आम्ही एका गोष्टीवर सहमत होतो, की याचे स्वरूप आत्मचरित्र वा चरित्र असे नसेल. त्यातली आत्मचरित्रपर माहिती अगदी थोडक्यात असेल. माझ्या स्वानुभवांवर आधारित हे पुस्तक असेल. हळूहळू पुस्तकाने आकार घेतला. परंतु प्रश्न हा होता की, हे पुस्तक कुठला प्रकाशक छापायला तयार होईल? हाही प्रश्न सुनीती आणि अशोक जैन यांनीच सोडवला़  रोहन प्रकाशनचे चंपानेरकर यांनी पुस्तक प्रकाशित करायचे मान्य केले. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीचे सर्व संस्कार सुनीतीनेच केले. पुस्तकाचे प्रकाशन प्रतिभा पवार यांच्या हस्ते चव्हाण सेंटरमध्ये करायचे असे ठरले. मात्र, शेवटच्या क्षणी त्या काही अडचणींमुळे येऊ  शकल्या नाहीत. मी माझे मित्र व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना विनंती केली. ते नेमके त्या दिवशी दुसऱ्या एका कामानिमित्त चव्हाण सेंटरमध्ये आले होते. चार तास आधी त्यांना पुस्तक दिले. त्यांनी ते चाळले. डॉ. आनंद नाडकर्णी आणि अरुण साधू यांनीही यायचे कबूल केले. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छान झाला. सर्वाना आश्चर्याचा धक्का देणारा वक्ता म्हणजे माझे जीवलग मित्र विजय देसाई यांचे भाषण! ते बोलायला उभे राहिले आणि सभागृहात एक आश्चर्योद्गार निघाला. विजय जगन्मित्र; पण तो भाषण करणार, ही कल्पनाच अजब होती. विजयने ठसक्यात भाषण केले आणि आवर्जून सांगितले की, ‘आमच्यासारख्या रुग्णांमुळे डॉक्टर रवी बापट मोठे झाले!!’ डॉ. आनंद नाडकर्णीने पुस्तकाचा छान सविस्तर आढावा घेतला व हा एक दस्तावेज आहे असा अभिप्राय दिला. अरुण साधूंनी माझ्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आणि हे पुस्तक डॉक्टरांच्या स्वानुभवावर आधारित असल्याने ते वाचकांच्या पसंतीस पडेल आणि त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांचे उद्गार पुढे खरे ठरले. माझे मित्र खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्या दिवशी जे उत्स्फूर्तपणे व जिव्हाळ्याने भाषण केले ते समारंभाचा कळस गाठणारे होते. आजही अनेकजण त्याची आठवण काढतात. मला खरा आनंद याचा झाला, की त्या दिवशी माझ्या रुग्णपरिवाराने आणि सुहृदांनी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित राहून माझ्यावरील प्रेमाची पावती दिली. माझ्या मनात त्यावेळी एकच भावना होती की, चला, एका सर्जनच्या नावावर एक पुस्तक प्रकाशित झाले! हे पुस्तक २००६ सालात प्रकाशित झाले आणि आश्चर्य म्हणजे त्याची सोळावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. वाचकांनी हे पुस्तक खूपच उचलून धरले. पुस्तकावर जाहीर मुलाखती झाल्या. तीन साहित्य पुरस्कारही मिळाले. मी सांगितले आणि सुनीतीने ते उत्तम तऱ्हेने पुस्तकात मांडले. ‘या मनीचे त्या मनी आणि ते वाचकांच्या मनी’ असा काहीसा प्रकार यात झाला असावा.

या सगळ्याचा जरी मला आनंद झाला, तरीही आपण लेखक झालो आहोत असे मला अजूनही वाटत नव्हते. प्रकाशनाच्या दिवशी सोहळा संपल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला, की जे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते ते प्रत्यक्षात आले. माझे नाव लेखक म्हणून पुस्तकावर छापून आले. आणि तेही मराठीत- हेसुद्धा विशेषच म्हणायचे! कृतकृत्यच झालो मी.

साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी डॉ. चंदू पाटणकर आणि डॉ. कामाक्षी भाटे यांनी डॉ. अमोल अन्नदाते या आमच्या विद्यार्थ्यांची माझ्याशी ओळख करून दिली. त्यांनी मला सांगितलं की, ‘सर, हा एक होतकरू मुलगा आहे. त्याला लिखाणाची आवड आहे. त्याला काही मदत करा.’ त्याच सुमारास मी ‘Tuesdays with Moire’ हे पुस्तक वाचले होते. माझ्याही मनात एक विचार आला की, आपल्याला विद्यार्थिदशेपासून आतापर्यंत जवळजवळ पन्नास वर्षे जी. एस. मेडिकल कॉलेज आणि के. ई. एम. रुग्णालयात पूर्ण होतील. तेव्हा या तरुण विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रश्नोत्तराच्या स्वरूपात गेल्या पन्नास वर्षांत झालेले वैद्यक क्षेत्रातले बदल आपण लिहून काढावेत. मी मग त्याच्याबरोबर सहा महिने शालेय जीवनापासून ते वैद्यकीय शिक्षण आणि प्रत्यक्ष वैद्यक व्यवसाय अशा विविध विषयांवर बोललो. त्याने सर्व लिहून घेतले. त्याचा सळसळता उत्साह पाहून त्याला मी ‘लोकसत्ता’मध्ये घेऊन गेलो. तो पुढे तिथे सदरही लिहू लागला. डॉ. अमोल अन्नदाते पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी दुसऱ्या महाविद्यालयात निघून गेला आणि ते लेखन तसेच राहिले. पुढे मीच त्या लिखाणाचा पाठपुरावा केला तेव्हा त्याने लिहिलेले ते बाड मनोविकास प्रकाशनाचे पाटकर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांचे मत पडले की, हे लेखन विस्कळीत आहे. याचे पुनर्लेखन करण्याची आणि संपादन करण्याची गरज आहे. योगायोगाने एकदा माझे पत्रकार मित्र चंद्रशेखर कुलकर्णी भेटले व त्यांनी याकामी मदत करायचे कबूल केले. मात्र, त्यांना वेळ होत नव्हता, परिणामी आमचे प्रस्तावित कामही मार्गी लागत नव्हते. पाटकर मात्र ते पुस्तकरूपात प्रसिद्ध करायला खूपच उत्सुक होते. त्यांनी लिखित बाड त्यांच्याकडून परत आणले. मी सुनीती जैन यांना ते पाहावयाची विनंती केली. त्यांचेही मत पडले की,हे लिखाण फारच विस्कळीत आहे. पुन्हा प्रश्न निवडून त्याची उत्तरे सविस्तर व मुद्देसूद लिहायला हवीत. त्या या कामाकरता वेळ द्यायला तयार झाल्या. मग पुन्हा लिखाण सुरू झाले. जवळजवळ सहा महिने आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा काही तास आमचे लिखाण चालू होते. सुनीतीने खूपच मेहनत घेतली. पुस्तकाचा बाज कसा असावा, प्रकरणे कशी असावीत, आणखीनही इतर वैद्यकीय विषयांत मी काम केलेले होते, ते विषय यात घ्यावे की नाही, या सर्व बाबींचा विचार झाला. मला आलेली महनीय व्यक्तींची पत्रे पहिल्या पुस्तकात आम्ही आत्मस्तुती नको म्हणून समाविष्ट केली नव्हती. ती निदान परिशिष्ट म्हणून शेवटी जोडावी, कारण तो एक ठेवा आहे असा मी आग्रह धरला. मी केलेले आयुर्वेदातले संशोधन आणि इतर विषयांसंदर्भातही लिहावे असे ठरले. शेवटी एकदाचे पुस्तक लिहून तयार झाले. मात्र, पुस्तकाचे नाव काय ठेवावे, हे ठरत नव्हते. नावे सुचविण्यात अशोक जैन यांचा हातखंडा! त्यांनी ‘पोस्टमॉर्टेम’ हे नाव सुचवले. बराच ऊहापोह झाला, की याचा ‘शवविच्छेदन’ एवढाच अर्थ निघू शकेल! पण कुठल्याही घटनेचे किंवा काळाचे काटेकोर विश्लेषण करतानाही हाच शब्द वापरला जातो हे लक्षात घेतले गेले आणि हेच नाव निश्चित केले गेले. या सगळ्या लेखनकाळात अरविंद व आशीष पाटकर कित्येकदा तासन् तास आमच्याबरोबर बसायचे. प्रकाशनापूर्वीचे सर्व सोपस्कार सुनीतीने आणि पाटकरांनी पार पाडले. प्रकाशन समारंभ यशवंतराव चव्हाण केंद्रातच घ्यायचा, ही माझे बंधुवत मित्र विजय देसाई यांची आज्ञा होती. समारंभास मान्यवर म्हणून डॉ. धनागरे, राजीव खांडेकर यांना पुस्तकाबद्दल विवेचन करण्यास बोलवावे असे ठरले. माझी इच्छा होती की, पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठल प्रभू यांनी करावे. ते गेली पन्नासहून अधिक वर्षे गिरणगावात फॅमिली डॉक्टर म्हणून व्यवसाय करताहेत. त्यांनीही यायचे कबूल केले. समारंभ उत्तम पार पडला. डॉ. धनागरे यांनी पुस्तकाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रातील एकंदर परिस्थितीचा सुंदर आढावा घेतला. या पुस्तकाची आता सातवी आवृत्ती बाजारात आली आहे. पुस्तक थोडे खळबळजनक आहे, त्यामुळे त्याचे स्वागत वाचक मंडळी कशी करतील, याबद्दल मी साशंक होतो. पण त्यावर चांगली परीक्षणे आली. वाचकांचा प्रतिसादही चांगला मिळाला. माझे पुस्तक वाचून आदरणीय म. वा. धोंड सरांनीही कौतुक केले आणि ‘डॉक्टर, असेच लिहीत राहा,’ असा सल्ला दिला.

गेली काही वर्षे मी कॉम्प्युटर हाताळायला शिकलो आहे. इंग्रजीबरोबरच मराठीही टाईप करायला शिकलोय. आता बऱ्याचदा मी स्वत:च लिहून काढतो. मला वाटतं की, या पुस्तक ‘लिहिण्याच्या’ नव्हे, पण ‘सांगण्याच्या’ खटाटोपात मी स्वत:ही लिहायला लागलो. आताशा जसे मनात येईल तसे मी लिहितो. व्याकरणाकडे दुर्लक्ष करतो. सुसूत्रपणे लिहिणे जमत नाही, पण शेवटी लेखनिक आणि संपादक मंडळी सुधारून घेतात. हे लिखाण आता छापूनही यायला लागले आहे. हो, एक मात्र खरंय, की लिहिण्याचा फार कंटाळा येतो बुवा. बोलणे सोपे, लिहिणे कठीण अशी अवस्था आहे. कुणी लिहा म्हणाले की कपाळावर आठय़ा पडतातच आणि मी टाळाटाळ करतो. अनेकजण विचारतात की, आता नवीन काय? माझे एकच तुणतुणे- ‘आता झाली की तीन पुस्तके! आणखीन कशाला मला त्रासात पाडता?’

अर्थात लिहायची खुमखुमी अजूनही आहे. काही रुग्णांबद्दल, त्यांच्या आजाराची माहिती देऊन लोकशिक्षणाच्या दृष्टिकोनातून लिहावे असे वाटते. विशेषत: क्लिनिकल मेडिसिन- म्हणजे ‘निरीक्षण- परीक्षण- निदान’ ही प्रक्रिया वैद्यक शिक्षणात भूतकाळात जमा होते आहे. पण तिचे महत्त्व आजही आहे, हे अधोरेखित करावे असे मनात होते. माझी केदार नायगावकर याच्याशी ओळख झाली. एक दिवस त्याचा फोन आला की, ‘सर, मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मला वेळ द्याल का?’ मी त्याला बोलावलं. विशेष म्हणजे तो अमेरिकेतील विविध रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांसंबंधीच्या माहितीचे पुनर्लेखन (Medical Transcription) गेली पंधरा वर्षे करतो आहे. मला वाटले, यालाच का नाही विनंती करायची, की पुढच्या पुस्तकासाठी मदत कर! कारण तो वैद्यकीय शब्दांशी परिचित होता. तोही आनंदाने तयार झाला. केदार रुईयाचा विद्यार्थी. संस्कृत घेऊन त्याने एम. ए. केले आहे. मराठी विषय होताच. गेले वर्षभर आमचे लिखाण चालू होते. केदारने नाव सुचवले की, ‘डॉ. रवी बापटांची चावडी’! माझे मित्र व ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनाही हे नाव आवडले. कारण ते माझ्या चावडीवरचे नेहमीचे सदस्य!! पण मनोविकास प्रकाशनाच्या आशीष पाटकर यांनी हे शीर्षक तुमच्या पुस्तकाला शोभत नाही म्हणून ‘अचूक निदान’ असे ते करावे असे सुचविले. ‘अचूक निदान’चा प्रकाशन सोहळा १३ ऑगस्ट २०१५ रोजी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजच्या जीवराज मेहता सभागृहात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि ‘मार्मिक’चे संपादक पंढरीनाथ सावंत, अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या उपस्थितीत अतिशय हृदयस्पर्शी असा झाला. येणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या पिढय़ांना ते उपयोगी पडावे व आम जनतेलाही याची माहिती व्हावी, ही या पुस्तकामागची कल्पना. मला एक आश्चर्य वाटते की, ‘वॉर्ड नं. पाच केईएम’ची सोळावी, ‘पोस्टमॉर्टेम’ची सातवी आणि ‘अचूक निदान’ची या प्रकाशनाच्या वेळी तिसरी आवृत्ती तयार होती. त्याबद्दल वाचकांचे मन:पूर्वक आभार.

आता मी सगळ्या व्यावसायिक, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा इत्यादी जबाबदाऱ्यांमधून हळूहळू मुक्त होत आहे. फक्त माझे भाग्यविधाते असलेल्या के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये माझ्या माहेरघरी- म्हणजेच जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात सन्माननीय प्राध्यापक म्हणून एक कार्यालय मला प्रेमाने माझ्या सहकाऱ्यांनी दिलेले आहे, तिथे मी सकाळी बसतो. सर्व क्षेत्रांतली जुनी मित्रमंडळी तिथे मला भेटायला येतात. रुग्ण घेऊन येतात. सल्ला घेतात. फावल्या वेळी मनात येईल तसे मी संगणकावर लिखाण करत असतो. पण अजूनही मी लेखक झालेलो नाही. मी माझ्या चावडीवर जुन्या आठवणींत रमतो. अजूनही माझी स्मरणशक्ती बरीच शाबूत आहे. वैद्यक सोडून इतर आठवणी लिहा असे मित्रमंडळी सुचवतात. आयुष्याच्या वाटेवर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळींचा सहवास मला लाभला. त्यांच्या आशीर्वादाने आजवर जे ग्रहण केले ते पुस्तकरूपाने उतरले तर छानच आहे. अजूनही मी लेखक झालो आहे असे मला वाटत नाही. मी आहे फक्त गोष्टीवेल्हाळ रवी बापट!

First Published on February 8, 2016 12:07 pm

Web Title: dr ravi bapat
टॅग Doctor,Writing