06 July 2020

News Flash

सुबत्तेच्या देशातला दुष्काळ

टेक्सास नामक वाळवंटात आपण आलो आहोत याची जाणीव गाडीबाहेर बघितल्यावर होत होती.

dw-100‘अमेरिका म्हणजे सुबत्ता’ हे समीकरण आपल्या मनात इतकं  दृढ झालंय, की तिथल्या काही राज्यांमध्येही दुष्काळ पडतो असं जर कुणाला सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. फरक इतकाच, की तिथे दुष्काळावर सकारात्मक दृष्टीनं काम केलं जातं. दुष्काळावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांत तिथले नागरिकही सहभागी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या मनपा सकारात्मक राजकीय इच्छाशक्तीने दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करतात. त्याची ही कहाणी..

२०११ साली मी मध्य टेक्सासमध्ये आले. अगदी ७ जूनलाच. आपल्याकडे तेव्हा मृग नक्षत्र लागतं आणि पावसाला सुरुवात होते असं मानतात. वळवाचा पाऊस मे महिन्याच्या शेवटापासूनच पडत होता. पुण्याहून मुंबईला येताना रस्ताभर हिरवळ बघितली. अमेरिकेत जाण्याची तयारी म्हणून आदल्या दिवशी काही खरेदी करायला बाहेर पडले होते तर अर्धा तास पाऊस पडून ठाण्यात घोटाभर पाण्यातून चालावं लागलं होतं. या अशा वातावरणातून २४ तास प्रवास करून जगाच्या दुसऱ्या टोकाला आले. विमानतळाबाहेर पडेस्तोवर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले होते. बाहेर डोळे दिपवणारं टळटळीत ऊन होतं. गॉगलच्या काळ्या काचांशिवाय डोळे उघडायला त्रास होत होता. विमानतळाहून शहरात जाताना आजूबाजूचे रस्ते दिसत होते. करपलेलं गवत. जिथे बघावं तिथे दुष्काळी रंग. टेक्सास नामक वाळवंटात आपण आलो आहोत याची जाणीव गाडीबाहेर बघितल्यावर होत होती. टिपिकल वेस्टर्न सिनेमांमध्ये दिसतात तशी टंबलविड्स रस्त्यावरून टुणूक टुणूक करत जात नव्हती, एवढंच!

dw-93तेव्हापासून मी मध्य टेक्सासमधल्या ऑस्टिन या शहरात राहते आहे. ऑस्टिन ही टेक्सासची राजधानी. राज्यातलं चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर. भारतीयांना अमेरिकेतला बे-एरिया हा टेक् इंडस्ट्रीमुळे माहीत असतो. त्याच्याखालोखाल टेक् इंडस्ट्री ऑस्टिनमध्ये आहे. ऑस्टिनचं विद्यापीठही चांगल्या विद्यापीठांमध्ये गणलं जातं. ‘लाइव्ह म्युझिक’ ही ऑस्टिनची आणखी एक खासियत आहे. टेक् इंडस्ट्री, विद्यापीठ, संगीत, गाजणारा चित्रपट महोत्सव आणि ‘Keep Austin Weird’ हे घोषवाक्य ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे ऑस्टिनची पुण्याशी तुलना सहज होते. किंचित आकडे बघायचे तर पुण्याचं आणि ऑस्टिनचं क्षेत्रफळही साधारण समानच आहे. लोकसंख्येची घनता ऑस्टिनमध्ये पुण्याच्या साधारण एक-पंचमांश किंवा पुण्याची लोकसंख्या ऑस्टिनच्या पाचपट. ऑस्टिनमध्ये सरासरी पाऊस ३२ इंचाच्या आसपास पडतो. आकडे कोणत्या संस्थेकडून मिळवले, त्यावर एखाद् इंचाचा फरक पडतो. पुण्याचं सरासरी पर्जन्यमान साधारण २८.५ इंच आहे. पर्जन्यमानही दोन्ही ठिकाणी फार निराळं नाही. या लेखात मुद्दामच या दोन शहरांचा विचार करते आहे. मी या दोन्ही शहरांमध्ये काही र्वष राहिले आहे. एका सामान्य नागरिकाला घरबसल्या आंतरजालावरून, बातम्या आणि वृत्तपत्रांमधून ज्या गोष्टी समजू शकतात त्या अभ्यासून हा लेख लिहिला आहे.

dw-94चित्रपटांमध्ये किंवा हल्ली आंतरजालावर मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या लेखनात दिसतो तसा प्रगत देश म्हटल्यावर उंच काचेच्या इमारती, त्यांच्यासमोर असणारं हिरवंगार गवत, गुळगुळीत रस्ते, स्वच्छता या एवढय़ाच गोष्टी दिसतात. प्रगती म्हणजे फक्त श्रीमंती झगमगाट नाही. प्रगती ही संकल्पना फक्त पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नाही. सामान्य व्यक्तीचं आयुष्य आहे त्यापेक्षा अधिक सुखासमाधानाचं कसं होईल, याचा विचार म्हणजे प्रगती. अमेरिका हा फक्त प्रगत देश आहे असं नाही, तर अमेरिकेला Land of Plenty-  ‘सुकाळाचा देश’ समजतात. सुकाळ म्हणजे अमर्याद स्रोत; श्रीमंती नाही! सुकाळ राखण्यासाठी जमाखर्च मांडून त्याचा ताळमेळ राखावा लागतो. अमेरिकेचा आर्थिक जमाखर्च वाचणाऱ्यांना याचं नवल वाटेल; पण सतत दुष्काळाला सामोऱ्या जाणाऱ्या भागांमध्ये पाण्याचं व्यवस्थापन करणं इथे नेहमीचं आणि सवयीचं आहे. मी अमेरिकेत ऑस्टिनमध्ये राहायला आले तेव्हा दुष्काळ सुरू झाला होता. सकाळी उठून स्थानिक वाहिनीवरच्या बातम्या लावल्या तेव्हा  खून, चोऱ्या, बलात्काराच्या बातम्या आपल्याकडे दिसतात तशा इथेही दिसत होत्या. पण त्यापलीकडे दुष्काळाच्या सद्य:स्थितीबद्दल बरंच विवेचन सुरू होतं. पण आपण ज्याला भारतात दुष्काळ समजतो, तितकी वाईट परिस्थिती अजिबातच नव्हती. म्हणजे गाडय़ांच्या खालचा पृष्ठभाग पाणी मारून धुवायला बंदी, रोज टबात पाणी भरून त्यात डुंबण्याऐवजी पाच मिनिटांत शॉवरखाली अंघोळ उरका- अशी विनंती करणारं काहीतरी सुरू होतं. या अशा बातम्यांमुळे कोणाच्याही रोजच्या जगण्यावर, आयुष्यावर काहीही फरक पडत नाही. किंबहुना, बातम्या ऐकल्या नाही तर या गोष्टी घडतात यावर सामान्य माणूस विश्वासही ठेवणार नाही. दिवसभर कधीही नळ उघडला तरी पाणी येत होतं. समृद्धी, सुकाळ, श्रीमंती या गोष्टी आकडय़ांच्या रूपात कागदावर वाचणं निराळं आणि ते अनुभवणं निराळं- हे हळूहळू समजायला लागलं.

पुणे शहरात १२ सें. मी. पाऊस पडला तर त्याचं आकारमान ०.८४ घन कि. मी. होईल. पण पडलेला सगळा पाऊस धरणांमध्ये साठत नाही. पावसाच्या सुरुवातीला बहुतेकसं पाणी जमिनीत शोषून घेतलं जातं. काही प्रमाणात ते जमिनीतून झाडांकडे, पिकांकडेही जातं. विहिरींमध्ये जर जिवंत झरे असतील तर त्यांनाही पावसातून जमिनीत मुरलेलं पाणीच मिळतं. ते पाणी न मिळाल्यास जिवंत झरे आटतील. जमिनीत पाणी मुरलं, आणखी मुरायला जागा राहिली नाही की नंतरचं पाणी ओहोळ, नाल्यांमधून वाहत नद्यांमध्ये जातं. नद्यांवर आपण धरणं बांधलेली असतात. त्या बंधाऱ्यांमागे जे तलाव असतात त्यांच्यात पाणी साठायला आणखी काळ लागतो.

dw-95या लेखाच्या निमित्ताने मी आंतरजालावर पाण्याच्या वापरासंदर्भात थोडे आकडे शोधायचा प्रयत्न केला. पुण्यात राहत असताना स्थानिक वृत्तपत्रांमुळे पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि मुळशी या चार तलावांमधून पाणी येतं हे समजलं होतं. चारही तलाव मिळून ३० टीएमसी (०.८४ घन कि. मी.) पाणी साठवता येतं. त्यापकी वर्षांला ११.५ टीएमसी पाणी पुणे शहरात येतं. पुणे मनपाने पाणीपुरवठा विभागाकडे पुण्यासाठी १४.५ टीएमसी पाणी मागितलं आहे. पुण्याची लोकसंख्या विकिपीडियानुसार, पन्नास लाख आहे. याचा अर्थ पुण्यातली प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी १७५ लिटर पाणी वापरते. या वर्षी पाऊस कमी पडला आहे हे बातम्यांमधून समजतंच. पण या चार तलावांमध्ये किती पाणी आहे, तलाव किती भरलेले आहेत, गेल्या काही वर्षांमध्ये तलावांची पातळी कशी, कधी, किती बदलली याची माहिती ‘इन्फम्रेशन एज्’मध्येही सहज मिळाली नाही. या चार तलावांची पातळी शोधण्यासाठी ‘गूगल’वर शोधलं असता पानशेत तलावाची पातळी शोधताना एका खाजगी संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या २५ तलावांची माहिती सापडली. लेख लिहिला त्या दिवशीची पातळी आणि इतर काही आकडे तेवढे मिळाले. लेख लिहिताना सप्टेंबर महिना संपत आलेला.. म्हणजे या वर्षांतले पावसाचे महिने जवळजवळ संपले आहेत. आता परतीचा पाऊस आणि बेमोसमी पाऊस पडेल तितकाच. पण पुढच्या वर्षी मान्सून येईस्तोवर वापरण्यासाठी ३० टीएमसी क्षमतेपकी किती पाणी जमा झालेलं आहे, त्यापकी किती पाणी पुढच्या वर्षी जूनमध्ये पाऊस येईपर्यंत वापरण्यासाठी उपलब्ध केलं जाईल, याची माहिती शोधाशोध करूनही सहज मिळाली नाहीच.

ऑस्टिनसाठी मी अशीच माहिती आणि आकडे शोधत होते. १९९०  पासून २०१४ पर्यंतचे आकडे ऑस्टिन मनपाच्या संस्थळावर सहज मिळाले. त्या संस्थळानुसार, २००६ साली ऑस्टिन मनपाने पाणी वाचवण्यासाठी कार्यक्रम सुरू केला तेव्हा ऑस्टिनमध्ये पाण्याचा सरासरी वापर दरडोई दर दिवशी ७२० लिटर होता. पाणी जपून वापरण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून लोकसंख्या सातत्याने वाढूनही दरडोई पाण्याचा वापर ४७५ लिटपर्यंत कमी (!) झालेला आहे. हे आकडे वार्षिक सरासरीचे आहेत. भारताची तुलना करत सांगायचं झालं तर अमेरिकेत सुकाळाचं व्यवस्थापन होतं. महाराष्ट्राच्या काही भागांत भरपावसात महिन्यातून एकदा टँकरने पाणी येतंय, त्याला आपण दुष्काळ म्हणतो. ठरावीक भागांत दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून अधूनमधून राजकीय आंदोलनं घडतात. अमेरिकन ‘दुष्काळ’ हा ‘आहे’ किंवा ‘नाही’ अशा दोनच प्रकारचा नसतो. टेक्सास हे राज्य पूर्वापार दुष्काळी राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. कोणत्या भागात किती पाऊस पडतो, जमिनीत किती आद्र्रता आहे, किती लोकसंख्येसाठी किती पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा घटकांचा अभ्यास करून दर आठवडय़ाला कुठे किती दुष्काळ आहे याचं गणित केलं जातं. सगळ्या राज्यांसंबंधात अशी माहिती सहज शोधता येते. या माहितीच्या तपशिलात शिरण्याची गरज नाही, पण गेल्या वर्षभरात कुठे, किती दुष्काळ होता, इथपासून गेल्या आठवडय़ात काय परिस्थिती होती, याची साद्यंत माहिती या संस्थळावर मिळते. dw-96दुष्काळाच्याही पाच पातळ्या आहेत. सगळ्यात अधिक तीव्रतेचा दुष्काळ असतो तिथेही टँकरने पाणी पुरवलं जातंय अशी वेळ अजूनपर्यंत आलेली नाही.

ही माहिती सामान्य नागरिकांसाठीही काही प्रमाणात गरजेची असते. सुकाळाच्या देशात माणसं कमी आणि जागा भरपूर; त्यामुळे घरंही मोठी आणि घरासोबत मागेपुढे अंगण, अंगणात गवत ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अंगणातल्या गवताला कधी, किती पाणी घालता येईल, हे दुष्काळाच्या आणि तलावांच्या पातळ्यांवर अवलंबून असतं. अधूनमधून मनपा घरी पोस्टकार्ड पाठवून कोणत्या दिवशी ऑटोमॅटिक िस्प्रकलरने गवताला पाणी घालता येईल, कोणत्या दिवशी पाइप वापरून पाणी घालता येईल, याची माहिती करून देते. ही माहिती मनपाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असते. आठवडय़ात वेगवेगळ्या दिवशी घरांना, व्यावसायिक इमारतींना, सार्वजनिक जागांसाठी िस्प्रकलर आणि पाइपने पाणी घालता येतं. या नियमांचं उल्लंघन कोणी करतंय का, याची तपासणी करण्याची यंत्रणा कुठेही अस्तित्वात नाही. तरीही लोक शिस्तीत नियम पाळतात. क्वचित कोणी नियम मोडतात. ते भर उन्हाळ्यात गवताचा रंग हिरवागार दिसला की समजतंसुद्धा. त्याबद्दल शिक्षा करण्याऐवजी दंडात्मक कारवाई किंवा दंडात्मक कारवाईऐवजी मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो.

ऑस्टिनची लोकसंख्या वाढती आहे. या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी भविष्याची तरतूद करणंही महत्त्वाचं आहे. स्थानिक बातम्यांमध्ये त्याच्याही बातम्या असतात. २०५० सालापर्यंत ऑस्टिनची लोकसंख्या दुप्पट होईल असा अंदाज आहे. या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी आत्ताच पसे गुंतवणं महत्त्वाचं आहे. यासाठी पाऊस कुठे पडतो, पाणी कुठे अडवता येईल, याचा अभ्यास केला जातो. पायाभूत सुविधा उभारायच्या तर त्यासाठी गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी पाणीपट्टी वाढवावी लागेल, असा प्रस्ताव ऑस्टिन मनपाने मंजूर केला. त्याआधी नागरिकांकडून हरकती मागवल्या गेल्या. याबाबतची चर्चा मनपाच्या अधिवेशनात झाली तेव्हा नागरिकांनी तिथे जाऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात अशा सूचनाही आल्या. लोकशाहीचे हे रूप कोणत्या भारतीय महानगरात दिसत असेल, याबद्दल मला थोडा प्रश्नच पडला.

२०११ मध्ये टेक्सासमध्ये अभूतपूर्व कोरडा उन्हाळा होता. चार महिने पूर्णपणे कोरडे गेले. तलावांची पातळी झपाटय़ाने कमी होत होती. त्यानिमित्ताने हवामानाबद्दल स्थानिक वाहिन्यांवर बऱ्याच चर्चा झडायला लागल्या. स्थानिक टीव्ही वाहिन्या- म्हणजे ऑस्टिन शहर आणि त्याभोवती साधारण २०० कि.मी त्रिज्जेचं वर्तुळ आखलं तर तेवढाच भाग मुंबईचा टीव्ही चॅनल असेल, तर पुण्यासाठी निराळा. रोज दहा-पंधरा मिनिटं टीव्ही बघून स्थानिक हवामान कसं आहे, संपूर्ण अमेरिकेत हवामान कसं आहे, वातावरणातल्या कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, या गोष्टी प्राथमिक पातळीवर समजल्या. विज्ञानाच्या कोणत्याही शाखेचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग, निरीक्षणं, सिद्धान्त, कंप्युटर मॉडेिलग अशा निरनिराळ्या गोष्टी केल्या जातात. वैज्ञानिकांना समजलेलं विज्ञान आपल्यापर्यंत मांडण्याचं काम असतं पत्रकार, विज्ञानलेखक या बौद्धिक मध्यमवर्गाचं. प्रगत देशातला हा वर्ग आपले काम चोख बजावतो.

डोक्यावर उच्च दाबाचा पट्टा आला की बाहेरून थंड किंवा दमट हवा आत शिरकाव करू शकत नाही. तापमान वाढतं. उच्च दाबाचा पट्टा आपल्या डोक्यावरून हलला की आद्र्रता आपल्या भागात येऊ शकते. तेव्हाच शीतलहर आली, हवा थंड झाली की पाऊस पडतो. एवढय़ा सगळ्या निसर्गनियमांतून जाऊन जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा त्याची बित्तंबातमीही घरबसल्या मिळू शकते. आपल्या घराच्या आसपास पाऊस पडतोय का, साधारण किती पाऊस पडतोय, हे सगळं दूर ऑफिसात बसूनही दिसू शकतं. आता आपल्या भागात पाऊस नसेल तर अजून किती वेळाने पाऊस येईल, अशा प्रकारचे अंदाजही या संस्थळांवरून करता येतात.

लेखात पुण्याचा वारंवार उल्लेख करण्याचं कारण आहे. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये इतर महाराष्ट्रापेक्षा अधिक पायाभूत सोयीसुविधा आहेत. पुण्यात दिवसाला दरडोई पाणीवापर १७५ लिटर आहे. तर ऑस्टिनची गेल्या वर्षीची वार्षिक सरासरी दरडोई, दरदिवशी ४७५ लिटर होती. पुण्याच्या अडीच पटीपेक्षाही जास्त. पुणेकर साधारण किती पाणीपट्टी भरतात याचा अंदाजे आकडा शोधायचा प्रयत्न केला. महिन्याला काहीशे रुपये एवढंही पाण्याचं बिल उच्च मध्यमवर्गीय पुणेकर भरत नाहीत. याउलट, ऑस्टिनमध्ये दर दिवसाला ४७५ लिटर पाणी वापरल्यास महिन्याची पाणीपट्टी माणशी २३ डॉलर येईल. चार माणसांच्या कुटुंबाचा खर्च (साधारण) १०० डॉलर होईल. इथे रुपयांचं थेट डॉलरमध्ये रूपांतर करता येणार नाही. पुणेकर महिन्याला जितकी पाणीपट्टी भरतात तितक्या पशात दोन माणसांचं बाहेरचं जेवणही नीट होणार नाही. ऑस्टिनमध्ये १०० डॉलरमध्ये निदान १०-१२ लोकांना एक वेळ जेवता येईल. मुद्दा असा की, पाणी मुबलक आहे, त्याच्याच जोडीला त्या पाण्याची किंमतही घसघशीत आहे. पाणी एवढं महाग का? पाणी जमा करण्यासाठी धरणं बांधणं, धरणांची देखभाल, पाण्याचं व्यवस्थापन, पाणी किती आहे याची माहिती उपलब्ध करून देणं आणि भविष्याची तरतूद यांच्यासाठी हा पसा खर्च होतो. आत्ता खर्च केले, तर उद्या त्याचे परिणाम दिसणार!

ऑस्टिनमध्ये पाणी व्यवस्थापनास २००६ पासून सुरुवात झाली असं मी आधी लिहिलेलं आहेच. पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आधी पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो, हे बघणं महत्त्वाचं आहे. घरगुती पाणीवापर हा पिणे, स्वयंपाक, कपडे, भांडी धुणे, गाडी व घराची साफसफाई आणि घरासमोरच्या गवताला पाणी घालण्यासाठी होतो. यातला मोठा हिस्सा गवताला पाणी घालण्यासाठी खर्च होतो. ज्या दिवशी पाऊस पडला, त्या दिवशी किती पाणी वापरलं गेलं आणि कोरडय़ा दिवशी किती पाणी वापरलं गेलं, या फरकातून गवताला किती पाणी वापरलं जातं, ते समजतं. ऑस्टिन मनपाच्या संस्थळावरून समजलं, की सप्टेंबर महिन्यात पाऊस नसताना दरडोई, दरदिवशी साधारण ६२५ लिटर पाणी वापरलं गेलं. पाऊस पडला तेव्हा ४५० लिटर! याचा अर्थ साधारण २५% पाणी गवताला घातलं जातं. लोकांनी घरासमोर गवत ठेवण्याजागी  वाळवंटी लँडस्केिपग केलं तर त्यासाठी ऑस्टिन मनपा काही सवलत देते. पावसाचं पाणी घराच्या छपरांवरून ओघळतं आणि वाहून जातं. त्याजागी हे पाणी साठवलं.. रेनवॉटर हार्वेिस्टग केलं तर सुरुवातीच्या खर्चासाठीही मनपाकडून काही प्रमाणात सवलत मिळते. या वर्षी ‘एल् निनो’ हा वातावरणातला परिणाम सक्रिय होईल आणि टेक्सासमध्ये बराच पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. ते पावसाचं पाणी िपपांमध्ये साठवून वापरावं यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती, पत्रकं प्रदर्शित केलेली दिसतात.

पाण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने १९९० च्या दशकात अमेरिकेत कमी पाणी वापरणारे शौचालयाचे फ्लश वापरण्यासाठी उत्तेजन द्यायला सुरुवात झाली. १९८० पर्यंत एका फ्लशमागे १३.२ लिटर पाणी वापरलं जात असे. ही रचना बदलून एका फ्लशमागे फार तर सहा लिटर पाणी वापरायला सुरुवात झाली. अधिक पाणी वापरणाऱ्या शौचालयांवर ठरावीक लेबल असतं; जेणेकरून ग्राहकांना निवड करताना ही माहिती उपयुक्त ठरेल. अलीकडच्या काळात दोन फ्लशचे शौचालय वापरात आलेले आहेत. त्यात अनुक्रमे चार लिटर आणि सहा लिटर पाणी वापरलं जातं. कमी पाण्याच्या शौचालयामुळे सांडपाणी वाहून नेण्यात आलेले अडथळेही गेल्या वीस वर्षांत दूर झालेले आहेत.

अमेरिका हा प्रगत देश आहे म्हणून सगळीकडे पाणी व्यवस्थापनाची जागृती आहे अशातली गत नाही. सध्या कॅलिफोर्नियात असलेल्या दुष्काळाच्या बातम्या मराठी वृत्तपत्रांमध्येही दिसत आहेत. उत्तर कॅलिफोर्निया आणि शेजारच्या नेवाडा राज्यात बर्फ पडतो. तो उन्हामुळे वितळतो. ते पाणी कॅलिफोर्नियात येतं. गेली चार र्वष हा बर्फ-पाऊस फारच तुटपुंजा झालेला आहे. शिवाय कॅलिफोर्नियात पाणी येतं ते कोलोरॅडो नदीतून. ग्रँड कॅनियनमधून वाहणारी नदी ती हीच. ही नदी मुळात कॅलिफोर्नियाच्या पूर्व सीमेवरून वाहते. तिथून ते पाणी कृत्रिमरीत्या हजारो कि. मी. प्रवास करून कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात आणलं जातं. त्या पाण्यावर मोठय़ा प्रमाणावर शेती केली जाते. त्या पाण्याशिवाय ही शेती आणि तिथली अर्थव्यवस्था टिकणार नाही. कोलोरॅडो नदी वेगवेगळ्या राज्यांतून येते आणि त्या राज्यांमध्ये नदीच्या पाण्याचं विभाजन केलेलं आहे. पण जेवढं पाणीवाटप केलेलं आहे, तेवढं पाणी नदीत मुळातच नाही. गेल्या शतकात जेव्हा हे पाणीवाटप केलं गेलं त्या दशकात नदीच्या पात्रात अभूतपूर्व पाऊस पडला होता. त्यामुळे तेव्हाचं पाणीवाटपाचं गणित चुकल. परंतु अजूनही ते सुधारण्याचे प्रयत्न होत नाहीत. (झाली ना कृष्णा-कावेरी पाणीवाटप तंटय़ांची आठवण!) इतर राज्ये पुरेसं पाणी वापरत नाहीत म्हणून कॅलिफोर्नियाला ते पाणी मिळतं. त्यातून पहिल्याच वर्षी पाऊस कमी झाल्यानंतर कॅलिफोर्नियात पाणीवापरावर नियंत्रण आणलं गेलेलं नाही. सलग चार र्वष पाण्याचा उपसा घरासमोरच्या गवताला घालण्यासाठी होत राहिला. पर्यटन सुरू राहावं म्हणून बोटी चालवतात त्या तलावांमध्ये पाणी भरून ठेवण्यात आलं. इथे शाहीस्नानासाठी दुष्काळात पाणी सोडण्याच्या आपल्याकडच्या पद्धतीची आठवण होते. आता शहरातल्या पाणीवापरावर हळूहळू र्निबध येत आहेत.

लॉसएंजेलिसमध्ये एका तलावात प्लास्टिकचे काळे गोळे सोडण्यात आले. हे गोळे पाण्यावर तरंगतात. परिणामी बाप्षीभवनामुळे पाणी उडून जाणं ९०% कमी झालं आहे. शिवाय साचवून ठेवलेल्या पाण्यात शैवाल (algae) तयार होतं. तेही या गोळ्यांमुळे आटोक्यात राहील अशी अपेक्षा आहे. त्यातून पाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च कमी होतो. भारतातही काही ठिकाणी नदीच्या कालव्यांवर सौरऊर्जा तयार करणारी पॅनल्स बसवलेली आहेत. नवीन तंत्रज्ञान किंवा जुनं तंत्रज्ञान वापरण्याच्या नव्या पद्धती अमलात आणून पाणी वाचवण्याकडे पावलं वळायला लागली आहेत.

मध्य टेक्सासमध्ये २०११ चा उन्हाळा फारच कोरडा गेला. त्यापुढे तीन र्वष सातत्याने कमी पाऊस झाला. तलावांची पातळी कमी होत गेली. या वर्षी बरा पाऊस पडतो आहे. तरीही ऑस्टिन मनपा, स्थानिक टीव्ही वाहिन्या, स्वयंसेवी संस्था अधूनमधून ‘पाणी जपून वापरा’ हे सांगत असतातच. हे सांगताना पाणी कसं वाचवता येईल याबद्दल इंटरनेट, शहरातली ग्रंथालयं, फार्मर्स मार्केट्स अशा ठिकाणी बरीच माहिती मिळते. पाण्याच्या बिलासोबत पाणी वाचवण्याचे उपाय सुचविणारी पत्रकं येतात.

प्रगत पाश्चात्त्य देशांत- जिथे लोकसंख्या कमी आणि पर्जन्यमान जास्त आहे- तिथे जे उपाय करण्याची गरज नसते तेसुद्धा आपल्याला शोधण्याची गरज आहे. कपडे व भांडी धुतलेलं, अंघोळ केलेलं पाणी शौचालयात फ्लशसाठी वापरण्यासाठी पुरेसं चांगलं असतं. कुठेतरी मर्यादित प्रमाणावर झालेला वापर वगळता पाण्याचा पुनर्वापर ही संकल्पना अजून आपल्याकडे क्षितिजावरही दिसत नाहीए. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये ज्या सांडपाणी निचऱ्याच्या व्यवस्थेची सुरुवात झाली, त्यात कपडे, भांडी, अंघोळीचं पाणी आणि शौचालयात वापरलेलं पाणी एकत्र करून प्रक्रियेसाठी नेलं जातं, ती अजूनही आपल्याकडे कायम आहे. उपलब्ध स्रोत आणि लोकसंख्या यांचा विचार न करता मान्सूनचे चार महिने पाऊस ही बाब फक्त भारतीय उपखंडापुरती मर्यादित आहे. जगात बऱ्याच ठिकाणी वर्षांचे बाराही महिने कधीही पाऊस पडू शकतो. मोसमी हवामानाचा भारतात होणारा मोठा तोटा म्हणजे चार महिने पडणारा पाऊस हा पुढे आणखी आठ महिने पुरवून, टिकवून वापरायचा असतो. अर्धा तास पाऊस झाल्यावर ठाणे शहरात घोटाभर पाणी जमा होतं, पण ते शेवटी अरबी समुद्रात जातं. आणि उन्हाळ्यात पुन्हा पाणीकपात होते. पाऊस कधी पडणार याबद्दल वेधशाळेच्या संस्थळावरून धड माहिती समजत नाही. त्यांची मॉडेल्स फार चांगली आहेत अशातलाही भाग नाही. आपल्याकडे यंत्रं आहेत, पण ती वापरण्यासाठी पुरेशी बुद्धिमान माणसं आपण धरून ठेवू शकत नाही. आपली मुलं परदेशात जाऊन हवामानशास्त्र शिकतात. तिथेच राहतात. या ‘ब्रेन ड्रेन’बद्दल जी चिंता व्यक्त केली जाते, ती रास्तच आहे. पण पावसाळ्यात ढगांतून पडणारं गोडं पाणी आपण ‘ड्रेन’मधून वाहू देतो आणि उन्हाळ्यात टँकरच्या मागे दरवर्षी धावतो, हेही आपण कधीपर्यंत चालवून घेणार आहोत?

धरण, पाणी यासंबंधात निरनिराळी एककं, उदा.- क्युसेक, एमएलडी आणि टीएमसी ही आपल्या वाचनात येतात. हे नक्की काय शब्द आहेत?
क्युसेक (Cusec) = घनफूट प्रती सेकंद
टीएमसी (TMC) = (बिलियन) एक अब्ज घनफूट = ०.०३ घन कि.मी.
एमएलडी (MLD) = (मिलियन) दहा लाख लिटर प्रती दिवस
१ एमएलडी = २४७० क्युसेक

संहिता जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 11:31 am

Web Title: droughts in the united states
टॅग Drought
Next Stories
1 आपली प्राचीन ‘स्मार्ट’ शहरे
2 कथा.. पानिपतच्या मराठा युद्धकैद्यांची!
3 तिसरे आगाखान
Just Now!
X