20 February 2019

News Flash

जर्मनीतले अरण्यपुराण

जर्मनीतील विमानतळांवर उतरताना घनदाट, नीटस वृक्षराजींमधून शहरीपणाच्या खाणाखुणा दिसायला अंमळ वेळ लागतो.

dw-118शहरातली जंगले

१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.

..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..

फ्रँकफर्ट असो, नाहीतर बर्लिन; इवलेसे ड्रेस्डेन असो किंवा चिमुकले हॅनोव्हर- जर्मनीतील विमानतळांवर उतरताना घनदाट, नीटस वृक्षराजींमधून शहरीपणाच्या खाणाखुणा दिसायला अंमळ वेळ लागतो. सूचीपर्ण, रुंदपर्ण वृक्षांची अथांग हिरवाई, त्यातून डोकावणारी आरस्पानी सरोवरे आणि घनदाट केशसंभारातून मधोमध रेखलेल्या भांगासारख्या अरण्यातल्या त्या वाटा.. सुरुवाती सुरुवातीला याचं भारीच अप्रूप वाटे.

पहाटे विमानतळावर उतरल्या उतरल्या पहिली मीटिंग जर दुपारी तीनला असेल तर जर्मन सहकारी म्हणत, ‘आता असं करू- प्रथम जरा अरण्यात फेरफटका मारू. तिथेच लंच घेऊ आणि मग जाऊ मीटिंगला.’ मनात प्रश्न उठे- ‘इथे फ्रँकफर्टसारख्या अवाढव्य विमानतळाजवळ कुठलं आलं बुवा अरण्य?’ जर्मन सहकारी अपूर्वाईने माहिती देत- ‘ही बघ, ही र7 क्रमांकाची एस्बान (ट्रॅम) कोणालाही २५ मिनिटांत थेट विमानतळावरून अरण्याच्या वेशीशी पोहोचवते.’

त्यावेळी सिटी फॉरेस्ट- जर्मन भाषेत ‘स्टाटवाल्ड’- या संकल्पनेची झालेली ती पहिली ओळख. आणि मग हे कवतिक जर्मनीतल्या छोटय़ा-मोठय़ा सर्वच शहरांत कायम भेटत राहिलं. या सिटी फॉरेस्ट्सचा लळा लागू लागला. प्रत्येक शहराची त्याच्या त्याच्या अरण्याशी कशी वेगळीच अनुबंधांची रेशीमगाठ! त्याच्यामागचा विचारांचा पीळ, इतिहासाचे धागे आणि समाजभानाचे रंग.. त्यांचीच ही चित्तरकथा!

जर्मनी या देशाचा एक-तृतीयांश भूभाग अरण्यांनी व्यापलेला आहे. वृक्षांची एकूण संख्या- सात अब्ज. जर्मनीची लोकसंख्या आठ कोटी सव्वीस लाख. म्हणजे एका जर्मन नागरिकासाठी पंच्याऐंशी वृक्ष शुद्ध प्राणवायूच्या उत्सर्जनाची जबाबदारी निभावतात. जर्मन घरांच्या परसातली झाडेझुडपे म्हणजे वृक्ष नव्हे बरं का! जर्मन स्वभावातल्या काटेकोरपणाने ‘वृक्ष’ या शब्दाची रोखठोक व्याख्याही केली आहे. उंची, रुंदी याचबरोबर तीस वर्षे वयोमानाच्या वर असणारी हिरवी संपदा म्हणजे वृक्ष. जर्मन वनखात्याने वृक्षतोडणी, वृक्षलागवड आणि लाकूड उत्पादन यासाठी काळावेळाची जी शंृखला बसवली आहे ती ४० ते ३०० वर्षांच्या वृक्षांचे सर्वेक्षण करून आणि त्यासंबंधीचे काटेकोर नियम व कायदे बनवून! त्यामुळे जर्मनीवरील वृक्षछत्र विरून जाणे हे केवळ असंभव!

जर्मनीतील प्रत्येक शहर आपापल्या संकेतस्थळांवर मोठय़ा दिमाखाने आपली अरण्यसंपदा प्रदर्शित करते. सिटी सेंटर, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून किती मिनिटांत कुठची सार्वजनिक वाहतूक सेवा तुम्हाला स्टाटवाल्डपाशी घेऊन जाईल, हे आर्जवाने सांगते. फ्रँकफर्ट हे शहर ३८६६ हेक्टर अरण्यसंपदा मिरवते. तर बर्लिनचे स्टाटवाल्ड २८,५०० हेक्टर भूभाग व्यापते. सरतेशेवटी राजधानीच ती! इवलेसे ड्रेस्डेन- पण तेही ६१३३ हेक्टर वनसंपदा राखून आहे. लाईपत्सीगची जनसंख्या जेमतेम पाच लाख; पण या शहराने आपले वनक्षेत्र २५०० हेक्टर इतक्या भूभागावर जोपासले आहे. हॅनोव्हरचे सिटी फॉरेस्टचे नाव- आयलनरीऽऽ. ‘आयलन्’ हे त्या भागात पारंपरिक वाढणाऱ्या वृक्षजातीचे नाव. आणि ‘रीऽऽ’ म्हणजे दलदलीसारखा तेथील जमिनीचा प्रकार. आल्बरेश्ट फॉन झाक्सन या उमरावाने १३७१ साली त्याच्या प्रजेला हे ६७५ हेक्टरचे अरण्य नजराणा म्हणून देऊन टाकले. मात्र अट एकच : या अरण्याचे संवर्धन आणि जपणूक सर्व नागरिकांनी मिळून करायची. आज साडेसहाशे वर्षे उलटलीत; पण हॅनोव्हरवासी हे वचन विसरलेले नाहीत. समस्त जर्मन प्रजाजन असंच इतिहासातलं खूप काही विसरलेले नाहीत. भाषेचीसुद्धा कशी गंमत असते पाहा. भाषेतून विचार होतो, तशीच विचारांच्या जमिनीतून भाषा उगवते. स्टाटवाल्ड- सिटी फॉरेस्टचे मराठी भाषांतर करू पाहावे तर ‘शहरातली जंगले’ असे करावे लागेल. हे शब्दद्वय उच्चारताच डोळ्यांपुढे क्राँक्रिटचे जंगल उभे राहते. शहर आणि अरण्य हे आपल्या अनुभवांत, विचारांत आणि पर्यायाने भाषेत विरोधाभासी शब्द आहेत. अरण्यात शहर असू शकत नाही, आणि शहरात अरण्य असू शकत नाही- असे काहीसे. आपल्या देशात नागरी जीवनाची अरण्याशी नाळ केव्हाचीच तुटलीय. रोजच्या अस्तित्वाशी त्याचा संबंधच राहिलेला नाही.

जर्मनीत तसे झाले नाही. त्यांच्या सांस्कृतिक इतिहासाचे प्रत्येक पाऊल अरण्याशी निगडित राहिले. जर्मन असण्याशी त्याचा घनदाट संबंध राहिला. जर्मन आत्मभानाचे अत्यंत महत्त्वाचे प्रतीक अशी अरण्याची ओळख राहिली. जर्मन राज्यघटनेतले चौदावे कलम जर्मन नागरिकांना अरण्य-सान्निध्याचा मूलभूत हक्क बहाल करते, ते उगाच नव्हे. जर्मनी या देशाच्या जीवनप्रवासात कधी आणि कसे सुरू झाले हे आरण्यक?

dw-119त्याचं असं झालं.. काळ आहे ख्रिस्तोत्तर नववे वर्ष. म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा. त्यावेळी संपूर्ण युरोप खंड रोमन साम्राज्याच्या अधिछत्राखाली होता. फक्त ऱ्हाईन आणि डॅन्यूब नदीच्या पश्चिमेकडील जंगलपट्टीत या रोमनांची डाळ काही केल्या शिजत नव्हती. या निबीड अरण्यात गेर्मान भाषा बोलणाऱ्या रानटी टोळ्यांचा संचार होता. या टोळ्यांनी रोमनांना अगदी जेरीला आणले होते. या विस्कळीत टोळ्यांचा उपद्रव भारीच वाढला म्हणतात. रोमन सम्राटाने वारूस नावाच्या पराक्रमी सरदाराला या टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी धाडले. वारूसने ऐन हिवाळ्याच्या तोंडावर या गेर्मानांचे अन्नसाठे आणि इंधनसाठे नष्ट करण्याचा सपाटा चालवला. मग या उपाशी गेर्मान टोळ्याही चवताळल्या. हेरमान (लॅटिनमध्ये ‘आरमेनियुस’) या मुखियाने सर्व गेर्मान टोळ्यांची जमवाजमवी केली आणि एक भीषण डाव रचला. त्याने वारूसलाा ‘सर्व गेर्मान टोळ्यांची वसतीस्थाने मी दाखवतो,’ असे आमिष दाखवले. त्यावर भाळून वारूसने आपली संपूर्ण कुमक हा निबीड अरण्यात घातली. वरून धोधो पाऊस कोसळत होता. प्रदेश दलदलीचा. आणि एकच घात झाला. चहूबाजूंनी गेर्मान टोळ्यांनी रोमन सैन्यावर भीषण हल्ला चढवला. २३ हजार रोमन सैनिक कापले गेले. त्यांना पळताही आले नाही. कारण हा भूप्रदेश त्यांना नवीन होता. या खूँखार गेर्मानांनी वारूसचे मुंडके सम्राट आगुस्टुसला भेट म्हणून पाठवून दिले. तत्कालीन रोमन इतिहासकारांनी बलिष्ठ रोमनांचा या टिनपाट गेर्मानांनी केलेला हा दारुण पराभव इत्थंभूतपणे वर्णन करून ठेवला आहे. पुढे बाराव्या शतकात ही सर्व वर्णने जगापुढे आली. हा निबीड अरण्याचा, गेर्मान भाषा बोलणाऱ्या टोळ्यांचा प्रदेश ‘जर्मनी’ नावाने ओळखला जाऊ लागला. कालक्रीझऽ या जंगलातले निर्णायक युद्ध ही जर्मन लोकांची ओळख बनली. अरण्यप्रदेशाने त्यांना दिलेली साथ ही जणू एका जन्मखुणेसारखी जर्मन मनात कायम राहिली.

गेर्मानांच्या या निर्णायक विजयामुळे आणखी एक गोष्ट झाली. तत्कालीन युरोप खंडात प्रोटो इंडो- युरोपिअन भाषासमूहातील अनेक छोटय़ा-मोठय़ा भाषा नावारूपाला येऊ पाहत होत्या. रोमन साम्राज्याची भाषा लॅटिन. या ज्ञानभाषेचा दरारा असा काही, की त्याच्या प्रभावात त्यातल्या बहुसंख्य भाषा पुसल्या गेल्या. प्रोटो इंडो- युरोपिअन भाषासमूहातली जर्मन ही एकुलती एक भाषा तेवढी वाचली, रुजली, पुढे फळाफुलाला आली. कालक्रीझऽ या अरण्यभूमीमुळे जर्मन समूहाला आणि जर्मन भाषेला जीवदान मिळाले, ओळख मिळाली, आत्मभान मिळाले.

त्यानंतर अवतरले जर्मनीतील अंधारे मध्ययुग. इसवी सन सहावे ते पंधरावे शतक. या काळात जर्मन समाजात एक घट्टमुट्ट सरंजामशाही व्यवस्था उभी राहिली. जर्मन राजे, उमराव, सरदार आणि चर्चचे बिशप्स या मूठभर पंधरा टक्क्य़ांच्या हातात सर्व सत्ता राहिली. जर्मनीतील सर्व अरण्ये आणि शेतजमिनी या पंधरा टक्क्यांच्या हातात. बाकी पंच्याऐंशी टक्के श्रमिक, दलित, पीडित, अक्षरश: चरकात पिळले जात होते. अरण्यांची मालकी हा अभिजन वर्गाच्या प्रतिष्ठेचा व मानमरातबाचा अविभाज्य भाग होता. पुढे मार्टनि ल्यूथर या शेतकरीपुत्राने बंडाचा झेंडा उभारला. श्रमिकांना विवेकवादाच्या धर्माचे बाळकडू पाजले. जर्मनीतील ही पंधरा टक्के अन्याय्य सत्ताकेंद्रे वितळत चालली. फ्रेंच राज्यक्रांतीने समानतेचे वारे आणले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील लेखक-कवींनी जर्मन मनाला अरण्यभूमीची ओढ लावली. युद्धांनी पोळलेल्या जिवांना चंदनाचा लेप लावणारी अरण्यातली शांतता हा तत्कालीन जर्मन साहित्यातून उमटणारा हुंकार तळागाळात पोहोचला.

समाजशास्त्र असे सांगते की, कुठल्याही समाजातले निम्न स्तर जेव्हा वर येण्याची धडपड करत असतात तेव्हा त्या समाजातल्या अभिजन वर्गाने पाडलेल्या प्रथा, सवयी, परंपरा यांचे अजाणते अनुकरण सतत होत राहते. जर्मनीत एकोणिसाव्या शतकात जसजशी जर्मन समाजातली सरंजामशाही अस्त पावू लागली आणि जनसामान्यांच्या हातावर सुबत्तेची खिरापत पडू लागली, तसतशी या वर्गात आपल्या मालकीची अरण्ये असण्याची गरज आणि स्पर्धा वाढू लागली.

‘आजच्या जर्मनीतील अरण्यांचे मालक कोण?’ या प्रश्नाचा मागोवा घेताना जी उत्तरे मिळतात ती यासंदर्भात पुरेशी बोलकी आहेत. जर्मनीतील फक्त चार टक्के अरण्ये केंद्र सरकारच्या मालकीची आहेत. २९ टक्के अरण्यांची मालकी विविध राज्यांकडे आहे. १९ टक्के अरण्ये नगरपालिकांच्या ताब्यात आहेत. तर बाकीची सर्व- म्हणजे ४८ टक्के अरण्ये ही खाजगी मालकीची आहेत.

निसर्गसंपत्ती ही जेव्हा तिथल्या रहिवाशांच्या निगराणीत राहते तेव्हा तिचे आपसूक जतन होते असा आजवरचा मानवेतिहास सांगतो. कारण सरळ आहे. या रहिवाशांचे भरणपोषण त्यावर अवलंबून असते. आपल्याकडील जलसाठय़ांची देखरेख ही पूर्वी गावठाणांकडे होती. ब्रिटिशांनी ती आपल्या ताब्यात घेतली. सरकारी मालकी झाली म्हणताना त्याकाठी राहणाऱ्या समूहांची नाळ जलसाठय़ांपासून तुटून गेली. मग त्यांचे संवर्धन ही तर दूरचीच गोष्ट.

प्रत्येक जर्मन नागरिकाला अरण्याचे सान्निध्य उपलब्ध करून देणे हे जर्मन सरकारला घटनेद्वारा बंधनकारक राहिले, यामागे भावनिक, सांस्कृतिक आणि समाजशास्त्रीय विचार तर होताच; त्याचबरोबर त्यात एक अर्थकारण आले आणि मागोमाग येणाऱ्या कायदेशीर तरतुदीसुद्धा आल्या.

जर्मनीतील अरण्ये ही काही आदिम अरण्ये नाहीत. तिथे देवराईसारख्या संकल्पना नाहीत. आजच्या जर्मनीतील बहुतांश अरण्ये ही मानवनिर्मित आहेत. उत्तम लाकडाचे उत्पादन हा जर्मन अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कागदाचे उत्पादन, घरबांधणी, जळाऊ इंधन असे त्याचे अनेक उपयोग आहेत. येथील हिवाळा कडक आणि वर्षांतले नऊ महिने त्याचा संचार. लाकूड उष्णतेचे मंद वाहक. त्यामुळे हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात शीतल घरे शीतल राहणे आवश्यक. त्यामुळे घरबांधणीत उत्तम लाकडाचा वापर आलाच. निसर्गसंपत्तीचा शिस्तशीर आणि आखणीबद्ध उपभोग हा जर्मन विचारसरणीचा गाभा राहिला आहे. अल्प भूभाग; तोही तसा भाकड. त्यामुळे या संस्कृतीमध्ये एक भविष्यवेधी वृत्ती आली. उद्याचा विचार आजच केला पाहिजे, हे उपजत शहाणपण आले. जी काही निसर्गसंपत्ती आहे ती जपून, साठवून वापरली पाहिजे, हे आंतरिक बंधन तयार झाले. अरण्यशास्त्र शिकवणारे पहिले विद्यापीठ जर्मनीत १८२१ साली स्थापन झाले. शास्त्रशुद्ध पद्धतीने जंगल संवर्धन करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू झाले. इंजिनीअरिंग क्षेत्रातल्या ज्ञानाने या संशोधनाला उपयुक्ततेचे कोंदण दिले. या शास्त्रशाखेचे नाव मोठे बोलके आहे- ‘रॅशनल फॉरेस्ट्री’! जर्मनीत नऊ विद्यापीठे वर्षांकाठी सात-आठशे पदवीधरांचे मनुष्यबळ ‘अरण्ये’ नावाच्या या उत्पादन केंद्रासाठी पुरवतात. याशिवाय जर्मनीतील आठ स्वायत्त संशोधन संस्थांमध्ये हजारभर संशोधक भविष्याचा वेध सतत घेत असतात. अरण्यांमधून दरवर्षी तेरा लाख लोकांना रोजगार मिळतो. लाकूड व्यवसायाची जर्मनीतील उलाढाल वार्षिक १७० अब्ज यूरोंची आहे. जर्मनीतील जंगलांचा भूभाग ११४ लाख हेक्टर्स. आणि दर हेक्टरी लाकडाचे उत्पादन आहे-३३६ घनमीटर. उत्पादनवाढीचा दर २०% प्रतिवर्ष. लाकूड उत्पादनाला लागणारा कच्चा माल म्हणजे वृक्ष. त्यांचे आयुष्यमान किमान चाळीस वर्षे व कमाल ३०० वर्षे. म्हणजे उत्पादनवाढीचा हा दर राखण्यासाठी जमीन, पाणी, लागवड आणि काळाचे किती चोख नियोजन या देशाने साधले असले पाहिजे!

जर्मनीचे उदरभरण निर्यातीवर होते. त्यामुळे मालाचे प्रमाणिकरण आले. लाकडाचा दर्जा अमुक एक राखण्याचे बंधन जंगल संवर्धकांवर राहिले. रसायने व कीटकनाशकांचा वापर वृक्षराजीवर झाला, किंवा वातावरणातील प्रदूषणामुळे वृक्ष आजारी झाले त्यावेळी नगरपालिका, राज्ये, खासगी मालक यांना वठणीवर आणणारे कायदे झाले. कायदेपालन झाले नाही तर त्यांचा लाकूडमाल नाकारला जाण्याची भीती राहिली. वृक्षांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणाऱ्या ५,४०० स्वायत्त संस्था आपापल्या परिसरात अरण्य कायदे काटेकोर पाळले जातात वा नाही, यासंबंधीची माहिती सरकार आणि नागरिकांना पाठवतात. जर्मन कायद्याने अरण्य संवर्धनाची पाच मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. १) सामान्य नागरिकाला सहज जंगलात जाता येण्याची सोय करणे. २) जैववैविध्य राखणे. ३) जागतिक पातळीवर मोजल्या जाणाऱ्या कार्बन फूटप्रिंट्सच्या तुलनेत जर्मन अरण्यांची कामगिरी जोखणे. ४) लाकडाकडे पुनरोपयोगी इंधन (रीन्यूएबल रिसोर्स) यादृष्टीने पाहण्याचे महत्त्व ओळखणे. ५) ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

‘अरण्ये मरतात तेव्हा पाठोपाठ मानवजातही मरते..’ असा जर्मन भाषेत एक वाक्प्रचार आहे. तो अगदी ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकायला मिळतो. जर्मनीत ऐंशीच्या दशकात एक धोक्याची घंटा वाजली. ‘वाल्ड स्टेर्बन’- म्हणजे अरण्ये आजारी पडणे आणि मृतवत होणे. त्याला दोन प्रमुख कारणे होती. एकतर समृद्धीच्या आलेखाबरोबरच वाढलेला वाहनांचा सुळसुळाट आणि दुसरे कारण जर्मनीतील औषध आणि रसायन कारखान्यांनी ओकलेला धूर. त्यामुळे पर्यावरणरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या नागरिकांच्या संस्था चवताळून उठल्या. कायदेपंडित खडबडून जागे झाले. मोटारी, रसायने व औषधांची निर्मिती आणि निर्यात ही तर हवीच; कारण त्यावर जर्मनीचे पोट अवलंबून. परंतु जनमताचा रेटा असा जबरदस्त, की अरण्यांच्या आजारपणावर सरकारला तातडीची पावले उचलावीच लागली. कारखान्यातले सांडपाणी, वायूची धुरांडी यांनी स्वच्छ आणि निर्धोक केलेले पाणी आणि वायूच फक्त वातावरणात सोडण्याची सक्ती आली. कागद व काचेचा पुनर्वापर कायद्याने बंधनकारक झाला. जर्मनीत औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी माल विकला की त्यांची जबाबदारी संपत नाही. त्या औषधांसाठी वापरलेले पॅकिंग गोळा करणे आणि ते रिसायकल करणे, हीसुद्धा या कारखान्यांचीच जबाबदारी. या नियमावल्या पाळता पाळता जर्मन उत्पादने प्रचंड महाग ठरतात, हेही ओघाने आलेच. उगाच नाही जर्मन रसायन आणि मोटार कंपन्या जगभरात जाऊन उत्पादन केंद्रे उभारतात. विशेषत: आशियाई देशांत पर्यावरणवादी विचार फारच अशक्त आहे. कायद्यांत पळवाटा आहेत. आपल्या घरातला कचरा नाही का आपण दुसऱ्याच्या परसात ढकलत? त्याचेच हे जागतिक उदाहरण!

दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने मारलेली औद्योगिक भरारी सर्वश्रुत आहे. औद्योगिक क्षेत्रात जसजसे ऑटोमेशन आले, संगणकीकरण आले, तसतसे शारीरिक श्रम कमी कमी होत गेले. कामाच्या ठिकाणी एकाग्रपणे आणि स्वयंशिस्तीने काम करण्याची पूर्वापार सवय जर्मनांना होतीच. त्यामुळे ‘मनुष्यबळ विकास’ या संज्ञेअंतर्गत कामाचे तास कमी करत जाणे आणि प्रत्येकाला स्वत:च्या विकासासाठी फावला वेळ उपलब्ध करून देणे, हे उद्योगजगताने स्वत:चे जणू लक्ष्य ठरवले. इतर देश आठवडय़ाला ४० ते ४८ तास काम करण्याची सक्ती करतात. हे प्रमाण जर्मनीत ३५ ते ३८.५ तास इतकेच आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जणू प्रत्येकजण मनाने वीकएंड मोडवर जातो. आबालवृद्ध आपापले छंद जोपासतात. अरण्यात चालायला वा धावायला जाणे हे आठवडय़ातले दोन-तीन दिवस ठरलेलेच. याव्यतिरिक्त सायकलवरून जंगलात दिवसाकाठी ४०-५० कि.मी.ची सायकलसैर हा सर्वाचाच फावल्या वेळचा उद्योग आहे. ‘वाल्ड-वांडरूंग’ म्हणजेच ‘अरण्यातली भ्रमंती’ या शब्दाला इथे सांस्कृतिक परिमळ आहे. शहरापासून दूर, माणसांपासून दूर नीरव अरण्याची संगत ही जर्मन मनाची आस आहे. ठसठशीत नकाशांवर या अरण्यवाटा रेखून दाखवलेल्या असतात. अगदी दीड कि.मी.पासून ते शंभर-दोनशे कि.मी.पर्यंत ज्याला जसे अंतर झेपेल ती वाट प्रत्येकाने पकडावी. कोणी पायी, कोणी सायकलवर, तर कोणी घोडय़ावर. विशेषत: उत्तर जर्मनीत- एकेकाळच्या प्रशियन प्रदेशात अरण्यातली घोडदौड हा मनस्वी लाडका शौक आहे.

जर्मन जंगलात सापाकिरडाचे भय नाही. वाघरू येण्याची शक्यता नाही. कधीतरी दूरवर एखादा लांडगा क्वचित दिसतो. रानडुकरे असतात. पण ती माणसांपासून चार हात दूर राहणे पसंत करतात. ससे मात्र खूप. वाटेत लागणाऱ्या जलाशयांमध्ये हंसपक्ष्यांचा विहार सुरू असतो. अनेक प्रकारच्या पक्ष्यांची किलबिल मात्र ऐकू येत नाही. जर्मन कायद्याने त्यांनाही ‘अरण्यात शांतता पाळा’ असे शिकवून ठेवले आहे की काय कोण जाणे. शनिवार-रविवार स्टाटवाल्डमध्ये असे मुक्त हिंडल्यावर, शुद्ध हवेत श्रमाचा घाम गाळल्यावर जर्मन शहरातला नागरिक जणू पुन्हा भानावर येतो. मनापासून कामाला जुंपून घेतो.

जर्मन अरण्यांवर अधिराज्य करतो तो जर्मनीतला ओकवृक्ष. तो जर्मनीचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याखालोखाल बीच वृक्षाचा क्रमांक लागतो. त्याची फळे डुकरांच्या खाद्यात वापरतात. पाईन आणि स्प्रूस ही सूचीपर्णी झाडे लष्करी सैनिकांच्या ओळीत शिस्तशीर उभी असतात. जर्मन अरण्ये अक्राळविक्राळ नाहीत. सभ्य, सुसंस्कृत गुणीजनांसारखी ती आज्ञाधारी वाटतात. हेमंत ऋतूत ती पिवळाजर्द, नारिंगी शालू परिधान करतात. उग्र हिवाळी वारे त्यांच्या पर्णसंभाराचे पूर्ण वस्त्रहरण करून टाकतात. बर्फाची चादर थोडेफार लज्जारक्षण करते कधीमधी! पण हिवाळ्यातली वृक्षांची ही भयाण नग्नता मानवी मनाला निराशाग्रस्त करण्याची क्षमता राखून असते, एवढे मात्र खरे!

जर्मन ललित लेखक एलियास कानेटींनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय, ‘जर्मन मनात जणू अव्याहत अरण्यभूमीला शोधण्याचा प्रयास चालू असतो. याच अरण्यात एकेकाळी राहिलेल्या त्यांच्या पूर्वजांचा हा शोध असतो का? कोण जाणे. पण वृक्षांशी तादात्म्य पावणे, त्यात अद्वैत शोधणे हा जर्मनीचा स्थायीभाव आहे.’
वैशाली करमरकर

First Published on February 8, 2016 11:01 am

Web Title: germany forest